व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टायर—तुमच्या जीवनाचा आधार!

टायर—तुमच्या जीवनाचा आधार!

टायर—तुमच्या जीवनाचा आधार!

स्टीलच्या आणि काचेच्या एका पिंजऱ्‍यात तुम्ही बांधलेल्या स्थितीत आहात आणि तुमच्या आजूबाजूला ॲसिड आणि ज्वलनशील द्रव पदार्थांचे डबे आहेत अशी कल्पना करा. आता हा प्राणघातक पिंजरा जमिनीपासून काही इंच वर उचला आणि त्याला १०० फूट प्रती सेकंदाची गती द्या. शेवटी, तुमचे हे यंत्र अशाच प्रकारच्या इतर यंत्रांसोबत ठेवा आणि काही यंत्रे एकमेकांच्या शेजारून वेगाने जात असलेली तर काही यंत्रे विरुद्ध दिशेने वेगाने येत असलेली कल्पना करा!

तुम्ही गाडीत बसून ती चालवता तेव्हा अगदी हेच करत असता. गाडी चालवताना तुम्हाला नियंत्रण कसे ठेवता येते आणि सुरक्षित कशामुळे वाटते? हे बहुतांशी टायरवर अवलंबून असते.

टायरचे कार्य

टायरचे अनेक महत्त्वपूर्ण उद्देश आहेत. ते गाडीचे वजन तर झेलतातच पण त्याशिवाय उंचवट्यांवरून, खड्यांमधून किंवा खाबडखुबड रस्त्यावरून जाताना ते गाडीचे संरक्षणही करतात. पण महत्त्वाचे म्हणजे, टायरमुळे विविध प्रकारच्या रस्त्यांवर गती वाढवण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी, ब्रेक लावण्यासाठी आणि योग्य दिशेने गाडी नेता येण्यासाठी आवश्‍यक असलेली पकड गाडीला मिळते. एवढे असले तरी, टायरचा केवळ पोस्टकार्ड इतकाच भाग कोणत्याही एका वेळी जमिनीच्या संपर्कात असतो.

टायरचे महत्त्व पाहता, ते सुरक्षित राहतील आणि चांगल्या स्थितीत कार्य करतील यासाठी तुम्ही काय करू शकता? शिवाय, टायर निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या गाडीसाठी योग्य टायर कसे निवडू शकता? या प्रश्‍नांची उत्तरे देण्याआधी, टायरच्या इतिहासावर एक नजर टाकू या.

रबरचा उपयोग करण्यात अग्रेसर

चाकांचा हजारो वर्षांपासून वापर होत असला तरी, गाडीच्या चाकांवर बाहेरून रबर लावण्याची कल्पना तुलनात्मकपणे अलीकडेच जन्माला आली. १८०० च्या शतकाच्या पूर्वार्धात, लाकडी किंवा स्टीलच्या चाकांना प्रथम नैसर्गिक रबर लावण्यात आले. पण ते फार काळ टिकत नव्हते म्हणून भविष्यात रबरचे आच्छादन असलेली चाके बनवण्याला फारशी आशा नव्हती. मात्र, अमेरिकेतील कनेक्टिकट येथील दृढनिश्‍चयी संशोधक, चार्ल्झ गुडइयर यांनी ही परिस्थिती बदलली. १८३९ साली, गुडइयर यांनी व्हल्कनीकरण नावाच्या एका पद्धतीचा शोध लावला ज्यात उष्णता व दाबाखाली रबरमध्ये सल्फर ओतले जाते. या प्रक्रियेमुळे रबराला आकार देणे आणि झीजरोधक बनवणे सोपे बनले. रबराचे भरीव टायर अधिक लोकप्रिय बनले पण त्यांच्यावरचा प्रवास मात्र उंटावरील प्रवासासारखा असे.

१८४५ साली, स्कॉटिश अभियंता, रॉबर्ट डब्ल्यू. थॉम्पसन यांना पहिलेवहिले न्यूमॅटिक किंवा वायवीय टायरसाठी परवाना मिळाला. परंतु, आणखी एक स्कॉट व्यक्‍ती, जॉन बॉईड डन्लप यांनी आपल्या मुलाच्या सायकलीचा प्रवास सुधारण्यासाठी मेहनत केली तेव्हा या न्यूमॅटिक टायरला व्यापारी जगात यश मिळाले. डन्लप यांनी आपल्या नवीन टायरसाठी १८८८ साली परवाना काढला आणि त्यानंतर आपली स्वतःची कंपनी सुरू केली. तरीपण, न्यूमॅटिक टायरला अद्याप अनेक अडथळे पार करायचे बाकी होते.

एके दिवशी १८९१ साली, एका फ्रेंच सायकल चालकाचे टायर पंक्चर झाले. त्याने ते दुरुस्त करायचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला काही जमले नाही कारण ते टायर सायकलीच्या चाकाला कायमचे चिकटलेले होते. त्याने दुसऱ्‍या एका फ्रेंच व्यक्‍तीचा, एडवार मिशलान याची मदत घेतली; हा इसम व्हल्कनाईझ्ड रबरच्या कामासाठी प्रसिद्ध होता. मिशलान यांनी ते टायर दुरुस्त करायला नऊ तास खर्च केले. या अनुभवामुळे, दुरुस्ती सोपी व्हावी म्हणून त्याला चाकापासून वेगळे करता येणारे न्यूमॅटिक टायर बनवण्याची प्रेरणा मिळाली.

मिशलान यांचे टायर इतके यशस्वी ठरले की, त्यानंतरच्या वर्षी १०,००० सायकल चालक त्यांचा वापर करू लागले होते. त्यानंतर काही काळातच, पॅरिसमधील टांग्यांनाही न्यूमॅटिक टायर बसवण्यात आले; यामुळे फ्रेंच लोकांचा प्रवास सुखाचा झाला. १८९५ साली, न्यूमॅटिक टायरचा वापर मोटारगाड्यांवर करता येतो हे दाखवण्यासाठी एडवार आणि त्याचा भाऊ ऑन्ड्रे यांनी एका रेस कारला ते टायर बसवले पण त्यांची कार सर्वात शेवटी राहिली. तरीपण लोकांना या अजब टायरचे इतके कुतूहल वाटले की, मिशलान बंधूंनी टायरच्या आत काय लपवून ठेवले आहे ते पाहण्यासाठी त्यांनी चक्क टायर कापले!

१९३० आणि ४० च्या दशकांमध्ये, रेयॉन, नायलॉन आणि पॉलियेस्टरसारख्या नवीन टिकाऊ पदार्थांनी कापसाच्या व नैसर्गिक रबराच्या नाजूक पदार्थांची जागा घेतली. दुसऱ्‍या महायुद्धानंतर, थेट चाकाला लागून एअरटाईट सील असलेले टायर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला; यामुळे हवा भरण्यासाठी आत आणखी एक ट्यूब असण्याची गरज लागणार नव्हती. नंतर, यात सुधार करण्यात आले.

आज, टायर बनवण्यासाठी २०० हून अधिक पदार्थ वापरले जातात. आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही टायर १,३०,००० किलोमीटर किंवा त्याहून अधिक काळापर्यंत टिकतात; तर रेस कारचे टायर ताशी शेकडो किलोमीटर वेगाचा भार सहन करू शकतात. आजकाल, टायर सामान्य गिऱ्‍हाईकाला झेपतील इतके स्वस्त बनले आहेत.

टायरची निवड

तुमच्याजवळ मोटारगाडी असल्यास, तुम्हाला नवीन टायर विकत घेण्याचे कठीण काम करावे लागेल. टायर बदलण्याची वेळ आली आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता? वेळोवेळी टायर घासले गेले आहेत किंवा खराब झाले आहेत हे पाहण्याद्वारे. * टायर उत्पादक, टायरमध्ये वेअर इंडिकेटर बसवतात; यांना वेअर बार म्हणतात. टायर पूर्णपणे निकामी झाल्याचे ते दर्शक असतात. वेअर बार म्हणजे टायरच्या पृष्ठभागावरून आडवा जाणारा एक घट्ट रबराचा बँड असतो. टायरचा ट्रेड फाटला आहे का, त्यातून तारा बाहेर आलेल्या दिसू लागल्या आहेत का, टायरच्या बाजूला फुगवटे तयार झाले आहेत का किंवा आणखी इतर काही दोष दिसत आहेत का हे देखील तपासणे उत्तम आहे. यांपैकी कोणत्याही गोष्टी तुमच्या लक्षात आल्यास, टायर दुरुस्त करेपर्यंत किंवा ते बदलेपर्यंत तुम्ही गाडी चालवू नये. गाडीचे टायर नवीन असल्यास, टायर विक्रेता कदाचित वॉरंटी काळादरम्यान असल्यास खराब झालेले टायर कमी किंमतीत बदलून देऊ शकेल.

टायर बदलताना एकाच एक्सेलवरती सारख्या प्रकारची जोडी घातलेली बरी. तुम्ही एकच नवीन टायर बसवत असल्यास, जास्त ट्रेड असलेल्या दुसऱ्‍या टायरच्या बरोबरीने ते बसवा म्हणजे ब्रेक लावताना पकड मिळेल.

वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे आणि नमुन्यांचे टायर तपासून त्यातील एखादे निवडणे फार गोंधळवून टाकणारे असू शकते. परंतु, काही मुख्य गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला हे काम बरेच सोपे वाटेल. पहिली गोष्ट, चाक उत्पादकाने काय सुचवले आहे ते पाहा. तुमच्या गाडीच्या विशिष्ट गरजा असतात जसे की, टायर आणि चाकाचा आकार, गाडीचा खालचा भाग आणि जमीन यांतील अंतर आणि गाडीचे वजन पेलण्याची क्षमता. शिवाय, तुमच्या गाडीची रचना देखील महत्त्वाची आहे. अँटी-लॉक ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम असलेल्या आधुनिक गाड्यांसाठी खास वैशिष्ट्ये असलेले टायर वापरणे आवश्‍यक असते. सहसा गाडीच्या ओनर्स मॅन्युएलमध्ये कोणत्या प्रकारचे टायर असले पाहिजे हे सांगितलेले असते.

दुसरी एक गोष्ट म्हणजे, रस्ता. तुमची गाडी बहुतेक वेळा कच्च्या रस्त्यावर, फरसबंदी रस्त्यावर किंवा पावसात वा शुष्क हवामानात चालवली जाणार आहे का? कदाचित तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये गाडी चालवाल. तसे असल्यास, तुम्हाला ऑल-टरेन किंवा ऑल-सीझन टायर्सची आवश्‍यकता असेल.

शिवाय, टायरचे आयुष्य आणि टायरची पकड यांचाही तुम्ही विचार केला पाहिजे. सहसा, टायरचा ट्रेड जितका मऊ असेल तितकीच टायरची पकड अधिक असेल पण ते लवकर घासले जाईल. या उलट, टायरचा ट्रेड जितका कठीण असेल तितकीच टायरची पकड कमी असेल पण ते जास्त काळ टिकेल. सहसा हे रेटींग टायर जेथे विकले जातात तेथील विक्री साहित्यात आढळतात. परंतु, वेगवेगळ्या उत्पादकांचे टायर रेटींग वेगवेगळे असते एवढे लक्षात ठेवा.

बहुतेक गोष्टी तपासून पाहिल्यावर, टायरची किंमत हीच तेवढी अखेरची गोष्ट राहू शकते. सहसा चांगले उत्पादक, उत्कृष्टतेची चांगली खात्री देतात आणि चांगली वॉरंटीही देतात.

टायर उचित स्थितीत ठेवणे

टायर उचित स्थितीत ठेवण्यासाठी तीन गोष्टी आवश्‍यक आहेत: उचित वायुदाब ठेवणे, वेळोवेळी टायरची जागा बदलणे आणि त्यांचा तोल व सरळता राखणे. उचित वायुदाब ठेवणे फार महत्त्वाचे आहे. टायरमध्ये आवश्‍यकतेपेक्षा जास्त हवा भरल्यास ते मध्यभागी अकाली घासले जाईल. दुसरीकडे, वायुदाब कमी ठेवल्यास, टायरच्या कडा आवश्‍यकतेपेक्षा जास्त घासल्या जातील आणि इंधनाचा योग्य वापर होणार नाही.

रबरातून हवा निसटत राहिल्याने दर महिन्याला टायरमधील ०.५ किलोग्रॅम किंवा जरा अधिक हवा कमी होईल. म्हणून, टायरचा आकार पाहून त्यात उचित प्रमाणात हवा आहे की नाही हे तुम्हाला सांगता येईल असे गृहीत धरू नका. रबर उत्पादकांच्या संघटनेनुसार, “टायरमधली जवळजवळ निम्मी हवा कमी झाल्यावरही त्यात हवा कमी आहे हे दिसणार नाही!” म्हणून, टायरचा प्रेशर तपासण्यासाठी महिन्यातून एकदा तरी प्रेशर गेजचा वापर करा. गाड्या असलेले पुष्कळसे लोक सोयीसाठी म्हणून गाडीतल्या ग्लोव्ह कंपार्टमेंटमध्येच एक गेज ठेवतात. इंजिन ऑईल बदलताना प्रत्येक वेळी आणि टायर थंड स्थितीत असतात तेव्हा—दुसऱ्‍या शब्दांत, निदान तीन तासापर्यंत गाडी चालवली गेली नसेल किंवा १.५ किलोमीटरपेक्षा कमी अंतरापर्यंत गाडी चालवली असेल केवळ तेव्हाच—टायर तपासून पाहावेत. सहसा टायरमध्ये किती वायुदाब असायला हवा हे ओनर्स मॅन्युएलमध्ये, ड्रायव्हरच्या दरवाजाजवळ किंवा ग्लोव्ह कंपार्टमेंटमध्ये लावलेल्या लेबलवर लिहिलेले असते. प्रवासात तुम्हाला दचके बसायला नको असतील तर टायरमध्ये काठोकाठ (कमाल वायुदाब टायरच्या साईडवॉलवर लिहिलेला असतो) हवा भरू नका.

टायरच्या जागा वेळोवेळी बदलल्याने ते जास्त काळ टिकतील आणि सगळीकडून सारखे घासले जातील. तुमच्या गाडीच्या उत्पादकाने वेगळे काही सुचवले नसल्यास, प्रत्येक १०,००० ते १३,००० किलोमीटरनंतर टायरची जागा बदलणे उत्तम आहे, पुन्हा एकदा, जागा बदलण्याची सुचवलेली पद्धत कोणती आहे हे पाहण्यासाठी तुमचे ओनर्स मॅन्युएल पाहा.

शेवटी, टायरची सरळता दरवर्षी तपासून घेत जा किंवा असामान्य कंपन होत आहे असे लक्षात आल्यास किंवा कारची दिशा बदलताना काही दोष आढळल्यास, तपासून घ्या. तुमच्या गाडीची सस्पेन्शन सिस्टिम, गाडीतल्या वजनानुसार टायरची सरळता राखत असते; परंतु, साधारणतः होणाऱ्‍या झीजेमुळे टायर वेळोवेळी तपासणे व ते सरळ करवून घेणे आवश्‍यक असते. सस्पेन्शन आणि व्हील अलाईन्मेंट करण्यासाठी परवाना असलेल्या ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियनला गाडीची अचूक सरळता ठेवणे शक्य असेल ज्यामुळे टायरचे आयुष्य वाढेल आणि प्रवास सुरळीत होईल.

“इंटेलिजेंट” टायर

काही गाड्यांमध्ये कम्प्युटरमुळे टायरमधील वायुदाब सुरक्षित पातळीपेक्षा कमी होतो तेव्हा ड्रायव्हरला सूचना दिली जाते. काही टायर वायुदाबाविना अल्पकाळापर्यंत सुरक्षितपणे चालू शकतात आणि काही टायर पंक्चर झाल्यावर आपोआप स्वतःला बंद करून टाकतात. होय, विविध परिस्थितींमध्ये टायर कार्यक्षम असावेत म्हणून अभियंते नवनवीन डिझाईन्स काढत आहेत.

टायरचे पदार्थ, ट्रेड डिझाईन, सस्पेन्शन, स्टीअरींग आणि ब्रेकींग सिस्टिम्समध्ये प्रगती होते व त्यानुसार गाड्या बनवल्या जातात तसा गाडीतला प्रवास सुलभच नव्हे तर सुरक्षितही बनतो. (g०४ ६/८)

[तळटीप]

^ आपले टायर तपासून पाहण्यासाठी काय करावे याकरता पृष्ठ २९ वरील तक्‍ता पाहा.

[२९ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

टायर सुस्थितीत ठेवण्यासाठी तपासण्याचे काही मुद्दे

पाहून तपासण्याच्या गोष्टी:

❑ साईडवॉलमध्ये फुगवटे निर्माण झालेत का?

❑ ट्रेडच्या पृष्ठभागावर तारा बाहेर आलेल्या दिसताहेत का?

❑ ट्रेडची खोली सुरक्षित प्रमाणानुसार आहे का, की टायरवरील वेअर बार दिसू लागले आहेत?

हे देखील तपासा:

❑ टायरचा वायुदाब गाडी उत्पादकाने सुचवलेल्या वायुदाबानुसार आहे का?

❑ टायरची जागा बदलण्याची वेळ आली आहे का? (किती अंतरानंतर टायर बदलावे व कोणत्या पद्धतीने टायरची जागा बदलावी यासाठी गाडी उत्पादकाने दिलेल्या सूचना पाहा.)

❑ बदलत्या हवामानानुसार वेगळे टायर बसवावेत का?

[चित्र]

वेअर बार

[२८ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

टायरचे भाग

ट्रेडमुळे चालवताना व वळणावरती पकड मिळते

बेल्टमुळे ट्रेडला मजबूती मिळते व ते भक्कम केले जातात.

साईडवॉलमुळे टायरची बाजू सुरक्षित राहते व रस्त्यामुळे व वळणावरती होणारे नुकसान टळते

बॉडी प्लायमुळे टायरला मजबुती आणि लवचिकता प्राप्त होते

इनर लायनरमुळे हवा टायरच्या आत राहते

बीडमुळे चाकासोबत टायर घट्ट बसण्याची खात्री मिळते

[२७ पानांवरील चित्रे]

पूर्वीची सायकल आणि कार, दोन्हींमध्ये हवा भरून फुगवता येणारे टायर आहेत; जुन्या काळातील एका टायर फॅक्टरीतले कामगार

[चित्राचे श्रेय]

The Goodyear Tire & Rubber Company