पुरातन काळापासून मानवांना असलेला आरोग्याचा ध्यास
पुरातन काळापासून मानवांना असलेला आरोग्याचा ध्यास
न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या जोॲनला टीबी (क्षयरोग) झाला होता. पण तिला झालेला टीबी सर्वसामान्य नव्हता. तिच्या शरीरात बळावलेले जंतू होते जे शक्तिशाली औषधांनाही प्रतिसाद देत नाहीत; या जंतूंचा संसर्ग झालेले निम्मे रुग्ण यांना बळी पडतात. एवढे असूनही जोॲनने नियमित उपचार घेतला नाही आणि तिच्यामुळे निदान एकदातरी निरोगी व्यक्तींना टीबीची बाधा झाली होती. तिची डॉक्टर हैराण होऊन एकदा म्हणाली: ‘हिला डांबून ठेवलं पाहिजे.’
प्राणघातक टीबी हा काही नवा रोग नाही. अक्षरशः कोट्यवधी लोक या रोगाची बाधा होऊन दगावले आहेत. फार काय, ईजिप्त व पेरू येथे सापडलेल्या पुरातन शवपेट्यांमधील मृतदेहांतही या रोगाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. आज, टीबीच्या जंतूंच्या नव्या जाती उत्पन्न झाल्या आहेत व वर्षाला वीस लाख लोक या रोगामुळे दगावतात.
आफ्रिकेच्या ग्रामीण भागांतील एका झोपडीत कार्लिटोस नावाचा मुलगा लहानशा पलंगावर पडला होता; त्याच्या कपाळावर घाम होता. मलेरियामुळे तो इतका जर्जर झाला होता, की त्याच्याने रडवतही नव्हते. त्याचे आईवडील विवंचनेत होते, पण औषधासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. आणि पैसे असते तरी, जवळपास एकही असा दवाखाना नव्हता की जेथे ते आपल्या लहानग्या मुलाला उपचाराकरता नेऊ शकले असते. ताप काही केल्या उतरला नाही आणि ४८ तासांच्या आत मुलगा मरण पावला.
मलेरियामुळे कार्लिटोससारखी दहा लाख मुले दर वर्षी मृत्यूमुखी पडतात. पूर्व आफ्रिकेच्या खेडोपाड्यांत सर्वसामान्य मुलाला मलेरियाचे जंतू वाहणारे विशिष्ट प्रकारचे डास महिन्यातून निदान ५०-८० वेळा चावतात. हे डास आता नवनव्या प्रदेशांत पसरू लागले आहेत आणि मलेरियाविरोधी औषधे पूर्वीपेक्षा कमी गुणकारी ठरू लागली आहेत. दर वर्षी ३० कोटी लोकांना तीव्र मलेरिया होतो.
कॅलिफोर्निया राज्यात, सॅन फ्रॅन्सिस्को शहरात राहणारा ३० वर्षीय केनेथ १९८० साली पहिल्यांदा, जुलाब व अशक्तपणाची तक्रार घेऊन आपल्या डॉक्टरकडे गेला होता. एका वर्षानंतर तो दगावला. उत्कृष्ट तज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार मिळूनही त्याचे शरीर हळूहळू क्षीण होत गेले आणि शेवटी तो न्यूमोनियाला बळी पडला.
दोन वर्षांनंतर, सॅन फ्रॅन्सिस्कोपासून १६,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर टांझानिया येथे एका तरुणीत अशाचप्रकारची लक्षणे दिसू लागली. काही आठवड्यांतच तिला चालताही येईना आणि त्यानंतर लवकरच तीही मरण पावली. गावकऱ्यांनी या विचित्र आजाराला जुलियाना रोग असे नाव दिले कारण जुलियाना असे नाव छापलेले कापड विकणाऱ्या एका माणसाकडून त्या तरुणीला व इतर स्थानिक स्त्रियांनाही या रोगाचा संसर्ग झाला होता.
केनेथ व ती टांझानियन तरुणी या दोघांनाही एकच रोग झाला होता: एड्स. १९८० दशकाच्या सुरवातीला, वैद्यकीय शास्त्राने सर्वात भयानक रोगजनक जंतूंवर विजय मिळवला आहे असे भासत असतानाच या नव्या संसर्गजन्य रोगाने मानवाजातीला पीडण्यास डोके वर काढले. दोन दशकांच्या आत एड्सच्या बळींची संख्या, १४ व्या शतकात युरोप व आशियात हैदोस घातलेल्या प्लेगमुळे दगावलेल्यांच्या संख्येपर्यंत येऊ लागली. त्या भयंकर प्लेगच्या साथीला युरोपचे लोक आजही विसरू शकलेले नाहीत.
काळा मृत्यू
काळा मृत्यू असे नाव पडलेल्या या साथीचा उद्रेक १३४७ साली झाला; सिसिलीच्या बेटावर मेसिना येथे क्रिमियाहून आलेल्या एक जहाजाने मुक्काम केला होता. नेहमीच्या मालासोबतच या जहाजाने प्लेगचे जंतू देखील वाहून आणले होते. * लवकरच काळा मृत्यू सबंध इटलीत पसरला.
पुढच्या वर्षी इटलीच्या सिएना नगराच्या आन्योलो दी ट्यूरा याने आपल्या गावात या रोगामुळे कशाप्रकारे अनर्थ माजला याचे वर्णन केले: ‘मे महिन्यात सिएनात मृत्यूचे ते अतिशय क्रूर व पीडादायक भयनाट्य सुरू झाले. रोगाला बळी पडणारे अगदी लगेच मरत होते. शेकडोंच्या संख्येने. दिवसा व रात्रीही.’ पुढे तो म्हणतो: ‘मी स्वतः आपल्या पाच मुलांना आपल्या हातांनी दफन केले. आणि माझ्या सारखेच कित्येकांना असे करावे लागले. कुणीही मेले तरी माणसं रडत नव्हती कारण मृत्यू सर्वांना अपेक्षित होता. किड्यामुंग्यांसारखी माणसे मेली. सर्वांना वाटले की जगाचा अंत आलाय.’
काही इतिहासकारांच्या सांगण्यानुसार, चार वर्षांत प्लेग सबंध युरोपभर पसरला आणि त्यात लोकसंख्येपैकी एक तृतीयांश मृत्यूमुखी पडले, म्हणजे जवळजवळ दोन ते तीन कोटी लोक. दूरस्थ आइसलँडमध्येही लोकसंख्येचा बराचसा भाग नाहीसा झाला. अतिपूर्वेत, चीनची लोकसंख्या १३ व्या शतकाच्या सुरवातीला जी १२.३ कोटी होती, ती १४ व्या शतकादरम्यान ६.५ कोटीपर्यंत घसरली. प्लेग आणि
त्यासोबतच आलेला दुष्काळ याला कारणीभूत ठरला असावा.यापूर्वी आलेल्या कोणत्याही साथीमुळे, युद्धामुळे अथवा दुष्काळामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झाली नव्हती. मॅन ॲण्ड मायक्रोब्स या पुस्तकात सांगितल्यानुसार “मानव इतिहासात यासारखे दुसरे कोणतेच संकट आले नव्हते. युरोप, उत्तर आफ्रिका व आशियाच्या काही भागांतील २५ ते ५० टक्के लोक बळी पडले.”
उत्तर व दक्षिण अमेरिका उरलेल्या जगापासून विलग असल्याकारणाने, ते काळ्या मृत्यूच्या तावडीतून बचावले. पण समुद्रप्रवास करणाऱ्या जहाजांमुळे ते फार काळ सुरक्षित राहू शकले नाहीत. १६ व्या शतकात प्लेगपेक्षाही जास्त घातक साथींनी पश्चिम गोलार्धात हैदोस घातला.
अमेरिका देवीच्या विळख्यात
कोलंबस वेस्ट इंडिझ बेटांवर १४९२ साली प्रथम आला तेव्हा त्याने येथील मूळ रहिवाशांचे वर्णन करताना म्हटले की हे लोक ‘देखणे, मध्यम उंचीचे आणि पिळदार शरीयष्टीचे’ आहेत. मात्र त्यांचे निरोगी दिसणारे शरीर केवळ एक आभास होता; युरोपातून प्रार्दुभाव झालेल्या आजारांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत.
१५१८ साली हिस्पॅनियोला नावाच्या बेटावर देवी रोगाचा उद्रेक झाला. मूळ अमेरिकन रहिवासी पूर्वी कधीही देवी रोगाच्या संपर्कात आले नव्हते. रोगाने आत्यंतिक भयंकर रूप धारण केले. एका स्पॅनिश प्रत्यक्षदर्शीच्या अंदाजानुसार या बेटावरील फक्त हजारएक लोकच जिवंत बचावले. लवकरच हा रोग मेक्सिको व पेरू देशांतही पसरला व तेथेही तोच भयानक प्रकार घडला.
पुढच्या शतकात, युरोपातून पिल्ग्रिम फादर्स वसाहती स्थापन करण्याकरता उत्तर अमेरिकेच्या मॅसच्यूसिट्स प्रदेशात आले तेव्हा देवीच्या रोगामुळे हा सबंध परिसर ओस पडल्याचे त्यांना आढळले. पिल्ग्रिमांचे नेते जॉन विन्थ्रॉप यांनी लिहिले: “जवळजवळ सगळेच मूळ रहिवासी देवी रोगाला बळी पडले आहेत.”
देवीनंतर इतर साथी आल्या. एका ग्रंथानुसार कोलंबसच्या आगमनानंतर सुमारे शंभर वर्षांत, परदेशी प्रवाशांनी आणलेल्या रोगांना पश्चिम गोलार्धातील ९० टक्के लोकसंख्या बळी पडली होती. मेक्सिकोची लोकसंख्या ३ कोटींपासून ३० लाखांपर्यंत रोडावली तर पेरूची लोकसंख्या ८० लाखांपासून १० लाखांवर आली. अर्थात देवी रोगाला केवळ मूळ अमेरिकन रहिवाशीच बळी पडले नाहीत. स्कर्ज—द वन्स ॲण्ड फ्युचर थ्रेट ऑफ स्मॉलपॉक्स या पुस्तकात सांगितल्यानुसार “मानव इतिहासात देवी रोगाला जितके लोक बळी पडले तितके प्लेगला . . . आणि विसाव्या शतकातील सर्व युद्धांनाही बळी पडले नाहीत.”
लढाई अद्याप जिंकण्यात आलेली नाही
प्लेग व देवी रोगाच्या भयंकर साथी आता इतिहासजमा झाल्या आहेत. २० व्या शतकात, मानवजातीने, विशेषतः औद्योगीकरण झालेल्या देशांत संसर्गजन्य रोगांविरुद्धच्या लढाईत अनेक विजय मिळवले आहेत. डॉक्टरांनी बहुतेक रोगांची कारणे शोधून काढली व त्यांवर उपचार करण्याचे मार्ग देखील
शोधून काढले. (खालील चौकट पाहा.) नवनव्या लशी व प्रतिजैवी औषधांत सर्वात चिवट रोगालाही नष्ट करण्याची जादुई शक्ती आहे असे भासू लागले.पण यु.एस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी ॲण्ड इन्फेक्शियस डिसीजेसचे भूतपूर्व संचालक डॉ. रिचर्ड क्राऊझ यांनी सांगितल्याप्रमाणे, “मृत्यू व कर जसे टाळता येत नाहीत तशाच साथी आहेत.” टीबी व मलेरिया अजूनही अस्तित्वात आहेतच. तसेच, खेदाने म्हणावे लागते, पण एड्सच्या जगद्व्यापी साथीनेही आठवण करून दिली आहे की प्राणघातक मरींचे थैमान अजूनही या पृथ्वीवर आहे. मॅन ॲण्ड मायक्रोब्स पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “संसर्गजन्य रोग हे आजही जगातील मृत्यूंचे सर्वात प्रमुख कारण आहे; आणि येणाऱ्या बऱ्याच काळपर्यंत राहील.”
काही डॉक्टरांना भीती वाटते की रोगांचा सामना करण्यात मनुष्याने उल्लेखनीय प्रगती साधली असली तरीसुद्धा, मागील काही दशकांतील पराक्रम केवळ अल्पकालीन असतील. रोगपरिस्थितीविज्ञान तज्ज्ञ, रॉबर्ट शोप ताकीद देतात, “संसर्गजन्य रोगांचा धोका नाहीसा झालेला नाही—किंबहुना तो वाढतोय.” पुढील लेखात याची कारणे स्पष्ट केलेली आहेत. (g०४ ५/२२)
[तळटीप]
^ प्लेगचे अनेक प्रकार दिसून आले, मुख्यतः गाठीचा प्लेग आणि फुफ्फुसदाहक अर्थात प्लेगजन्य न्युमोनिया. सहसा घुशींच्या शरीरावरील पिसवा गाठीच्या प्लेगाच्या प्रसारास कारणीभूत असतात; तर प्लेगजन्य न्यूमोनिया हा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या खोकल्यातून वगैरे उत्सर्जीत होताना बिंदुक संसर्गाने प्रसारित होतो.
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
दोन दशकांत, एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या, १४ व्या शतकात सबंध युरेशियाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या प्लेगमुळे बळी पडलेल्यांच्या संख्येशी स्पर्धा करू लागली
[६ पानांवरील चौकट/चित्रे]
ज्ञान विरुद्ध अंधविश्वास
चौदाव्या शतकात अविन्यॉन येथे पोपच्या घराण्यावर काळ्या मृत्यूचे सावट आले तेव्हा त्यांच्या डॉक्टरने त्यांना असे सांगितले की शनी, गुरू व मंगळ या तीन ग्रहांची कुंभराशीत, सूर्याशी युती घडणे हे प्लेगचे मुख्य कारण आहे.
सुमारे चार शतकांनंतरची घटना. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा घसा बसला. तीन मान्यवर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला. कसा? तर त्यांच्या शिरांतून जवळजवळ दोन लीटर रक्त काढून. काही तासांतच रुग्णाचा मृत्यू झाला. नीलावेध, अर्थात रक्त वाहू देण्याची प्रथा, हिप्पोक्रेटीसच्या काळापासून १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ २,५०० वर्षे वैद्यकीयशास्त्राने मान्य केलेली उपचारपद्धत होती.
अंधविश्वास व रूढीवादाचे ग्रहण सुटल्याशिवाय वैद्यकीय प्रगती अशक्य होती, पण तरीसुद्धा समर्पित डॉक्टरांनी संसर्गजन्य रोगांची कारणे व त्यांवरील उपचार शोधून काढण्याकरता बरेच परिश्रम घेतले. त्यांना लागलेले काही महत्त्वाचे शोध खालीलप्रमाणे आहेत:
◼ देवी. १७९८ साली एडवर्ड जेनर यांना देवी रोगावरील लस शोधून काढण्यात यश मिळाले. लसीकरणामुळे २० व्या शतकात पोलिओ, पीतज्वर, गोवर व जर्मन मीसल्स यांसारख्या रोगांनाही प्रतिबंध करता आला आहे.
◼ क्षयरोग. १८८२ साली रॉबर्ट कॉक यांनी टीबीच्या सूक्ष्म जंतूंचा शोध लावला आणि या रोगाचे निदान करण्यासाठी चाचणी देखील तयार केली. सुमारे ६० वर्षांनंतर टीबीवर उपचार करण्याकरता स्ट्रेप्टोमायसिन हे गुणकारी प्रतिजैव शोधून काढण्यात आले. हे औषध गाठींच्या प्लेगवरही उपयुक्त असल्याचे आढळले.
◼ मलेरिया. १७ व्या शतकापासून, सिंकोना झाडाच्या सालीपासून मिळवलेल्या क्विनाईन या औषधाने मलेरियाच्या लाखो रुग्णांचा जीव वाचवला आहे. १८९७ साली रोनाल्ड रॉस यांनी ॲनोफिलिस डास या रोगाचे वाहक असल्याचे शोधून काढले आणि यामुळे उष्णकटिबंधीय देशांत या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी डासांवर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
[चित्रे]
राशी पत्रक (वरती) आणि निलावेध
[चित्राचे श्रेय]
दोन्ही: Biblioteca Histórica “Marqués de Valdecilla”
[३ पानांवरील चित्रे]
आज, टीबी जिवाणूच्या नव्या जाती दर वर्षी जवळजवळ वीस लाख लोकांचा बळी घेतात
[चित्राचे श्रेय]
क्ष-किरण: New Jersey Medical School–National Tuberculosis Center; माणूस: छायाचित्र: WHO/Thierry Falise
[४ पानांवरील चित्र]
सुमारे सन १५०० च्या आसपासच्या या जर्मन खोदीव चित्रावर काळ्या मृत्यूपासून संरक्षणाकरता मुखवटा घातलेल्या एका डॉक्टरचे चित्र आहे. चोचीत सुगंधी पदार्थ असे
[चित्राचे श्रेय]
Godo-Foto
[४ पानांवरील चित्र]
गाठीच्या प्लेगचे जिवाणू
[चित्राचे श्रेय]
© Gary Gaugler/Visuals Unlimited