व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मायलीनचा नवा चेहरा

मायलीनचा नवा चेहरा

मायलीनचा नवा चेहरा

मायलीनच्या आईद्वारे कथित

माझ्या ११ वर्षांच्या सुंदर मायलीनला नव्या चेहऱ्‍याची काय गरज होती? सांगते मी तुम्हाला.

मायलीन आमच्या दोन मुलींपैकी धाकटी. ऑगस्ट ५, १९९२ रोजी ओल्गीन, क्यूबा इथं तिचा जन्म झाला. तिचे पप्पा, तिची थोरली बहीण आणि मी तिच्या आगमनानं खूप आनंदी होतो. पण आमचा आनंद जास्त काळ टिकला नाही. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच, मला कांजण्या आल्या आणि एक महिन्यानंतर मायलीनलाही आल्या.

सुरवातीला तिची प्रकृती इतकी काही गंभीर वाटली नाही; पण नंतर ती गंभीर झाली व तिला आम्हाला दवाखान्यात ठेवावं लागलं. मायलीनला उत्तम वैद्यकीय उपचार मिळत होता, पण तिची प्रतिकार क्षमता इतकी खालावली, की तिला दुसरा एक संसर्ग झाला. तिच्या इवल्याशा नाकाच्या एका बाजूला मी एक असामान्य लाली पाहिली. हा अतिशय असामान्य व आक्रमक प्रकारचा जिवाणू असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं.

तिला त्वरित ॲन्टिबायोटिक देण्यात आलं परंतु काही दिवसांतच या जिवाणुनं तिच्या चेहऱ्‍यावर हल्ला करण्यास सुरवात केली. डॉक्टर या संसर्गाला थांबवायच्या आतच, मायलीनचं नाक, तिचे ओठ, तिच्या हिरड्यांचा काही भाग आणि तिची हनुवटी नाहीशी झाली होती. तिच्या एका डोळ्याच्या बाजूला छिद्रंही पडली होती.

माझ्या पतीनं व मी मायलीनला पाहिलं तेव्हा आम्ही दोघंही ओक्साबोक्शी रडू लागलो. आमच्या तान्हुलीला हे काय झालं होतं? मायलीनला अनेक दिवस अतिदक्षता विभागात ठेवलं होतं आणि डॉक्टरांनी तिच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. मायलीनचे पप्पा मला सतत म्हणत राहिले, “येणारी परिस्थिती झेलायला मन घट्ट कर.” पण, मी जेव्हा मायलीनचा इवलासा हात धरण्यासाठी इन्क्यूबेटरमध्ये हात घालायचे तेव्हा ती तो लगेच इतका घट्ट पकडायची की मला खात्री पटायची की मायलीन जगेल. मी तिच्या पप्पांना म्हणाले: “मायलीन मरणार नाही. पण तिच्या या अवस्थेत ती कशी जीवन जगेल माहीत नाही!” दररोज सकाळी आम्ही उठायचो तेव्हा आम्हाला असं वाटायचं, की हे सर्व केवळ एक वाईट स्वप्न होतं.

आम्ही दवाखान्यात होतो तेव्हा आमची मोठी मुलगी मायडलीस माझ्या आईवडिलांबरोबर राहायची; ती तेव्हा सहा वर्षांची होती. आपली बहीण कधी एकदाची घरी येतेय असं तिला झालं होतं. तिनं मायलीनला घरातून निघताना, मोठ्या निळ्या डोळ्यांची “बाहुली” म्हणून पाहिलं होतं. पण मायडलीसनं जेव्हा दुसऱ्‍यांदा मायलीनला पाहिलं तेव्हा ती भेदरून गेली; मायलीन खूप विद्रुप दिसत होती.

‘माझ्या बाळाला हे सर्व का सहन करावं लागतंय?’

दीड महिना दवाखान्यात राहिल्यानंतर मायलीनला घरी पाठवण्यात आलं. आम्ही ज्या शहरात राहत होतो तिथं तिला नेलं नाही, कारण लोकांनी तिला पाहावं असं आम्हाला वाटत नव्हतं. आम्ही, शहराबाहेर माझ्या आईवडिलांच्या मळ्याजवळच्या एका लहानशा घरात राहायला गेलो.

सुरवातीला मी मायलीनला, तिचं तोंड जिथं होतं त्या ठिकाणी असलेल्या लहान छिद्रातून अंगावर पाजू शकत होते. पण ती दूध चोखू शकत नव्हती. तिच्या जखमा बऱ्‍या होऊ लागल्या तेव्हा ते छिद्रही जवळजवळ बुजुन गेलं. मी तिला एका बाटलीतून फक्‍त द्रव्य रूपातच अन्‍न देऊ शकत होते. ती एक वर्षाची झाल्यावर आम्ही ओल्गीनला पुन्हा गेलो; तिथं डॉक्टरांनी ते छिद्र वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया केली.

मी स्वतःला विचारायचे, ‘माझ्या बाळाला हे सर्व का सहन करावं लागतंय?’ दुरात्मिक माध्यमाद्वारे मी या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या धार्मिक मूर्तींसमोर मी प्रार्थना करायचे. पण दोन्हींतून मला सांत्वन मिळालं नाही. काही नातेवाईकांच्या व मित्रांच्या खोचक बोलण्यानं मी अजूनच गोंधळून गेले. काही म्हणत असत, “देवानं या सर्व गोष्टी का होऊ दिल्या हे त्याला माहीत आहे.” दुसरे मला म्हणत, “ही नक्कीच देवाकडून शिक्षा आहे.” मायलीन मोठी झाल्यावर मी तिला काय उत्तर देईन याचीही मला काळजी वाटायची. एकदा, ती अजून लहानच होती तेव्हा तिनं आपल्या पप्पांना विचारलं: “मला दुसऱ्‍यांसारखं नाक का नाही?” तिच्या पप्पांना तिला काय उत्तर द्यायचं हे सुचले नाही, ते बाहेर जाऊन रडले. मी तिला, काय झालं होतं हे समजावण्याचा प्रयत्न केला. तिला अजूनही आठवतं, मी तिला सांगितलं होतं की एका लहानशा किड्यानं तिचं नाक आणि तोंड खाऊन टाकलं.

आशेचा किरण

एकदा मी खूप निराश झाले होते, इतक्यात आमच्या शेजारी राहणारी स्त्री यहोवाची साक्षीदार असल्याचं मला आठवलं. माझ्या मुलीवर देवानं इतकी मोठी पीडा का येऊ दिली हे मला बायबलमधून दाखवावं असं मी तिला विचारलं. मी तिला हेही विचारलं, की “हा आजार खरोखरच जर मी केलेल्या पापाची शिक्षा आहे, तर मायलीनला ती का भोगावी लागतेय?”

माझ्या शेजारणीनं माझ्याबरोबर तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल * या पुस्तकातून बायबलचा अभ्यास सुरू केला. हळूहळू मला समजू लागलं, की मायलीनला जे काही झालं होतं त्यासाठी देव जबाबदार नाही, तर तो आपल्या सर्वांची काळजी घेतो. (याकोब १:१३; १ पेत्र ५:७) आपल्या स्वर्गीय राज्यात येशू ख्रिस्ताद्वारे देव सर्व दुःखाचा कायमचा अंत करील ही अद्‌भुत आशा मी बाळगू लागले. (मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३, ४) या ज्ञानामुळे माझा विश्‍वास पक्का झाला आणि मी यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला प्रवृत्त झाले. सुरवातीला मायलीनच्या पप्पांना, मी जे काही करू लागले होते ते आवडत नव्हतं. आमच्यावर कोसळलेलं संकट सहन करायला मला मदत मिळत आहे असं समजून त्यांनी मला बायबलचा अभ्यास करण्यापासून रोखलं नाही.

परदेशातून मदत

मायलीन दोन वर्षांची होती तेव्हा, मेक्सिकोतील एका प्लास्टीक सर्जनला तिची केस समजली आणि त्यांनी तिच्यावर विनामूल्य उपचार करण्याची इच्छा व्यक्‍त केली. १९९४ साली तिच्यावर पहिल्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मायलीन आणि मी मेक्सिकोत जवळजवळ एक वर्ष राहिलो. सुरवातीला आम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधू शकलो नाही त्यामुळे आम्हाला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहता आले नाही. यामुळे मी आध्यात्मिकरीत्या अशक्‍त झाले. मग, एकदा एका स्थानीय साक्षीदाराने आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही लवकरात लवकर सहविश्‍वासू बंधूभगिनींबरोबर सहवास राखू लागलो. क्यूबाला परतल्यावर मी माझा बायबल अभ्यास पुन्हा सुरू केला आणि आध्यात्मिकरीत्या पुन्हा बरी झाले.

मायलीनच्या पप्पांना अद्यापही बायबलमध्ये आस्था नव्हती. त्यांची आस्था जागृत करण्यासाठी मी त्यांना, बायबल आधारित प्रकाशनांतून मला व्यवस्थितरीत्या समजावे म्हणून काही भाग वाचून दाखवायला सांगू लागले. हळूहळू ते बायबल अभ्यास करण्यास प्रवृत्त झाले कारण, मला मायलीनला घेऊन सारखं सारखं मेक्सिकोला जावं लागत असल्यामुळे आणि तेही अनेक दिवस तिथं राहावं लागत असल्यामुळे आमच्या कौटुंबिक नातेसंबंधावर याचा विपरीत परिणाम घडू शकतो, याची त्यांना काळजी वाटत होती. आध्यात्मिकरीत्या आमच्यात एकी असल्यास, आम्हा दोघांची अशी ताटातूट झाली तरी ती आम्ही सहन करू शकू असं त्यांना वाटत होतं. आणि हे खरं ठरलं. १९९७ साली, मायलीनचे पप्पा, तिची थोरली बहीण आणि मी असं आम्ही तिघांनी यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला.

मेक्सिकोत आम्हाला राहावं लागायचं तेव्हा मायलीन म्हणायची, की त्या लहानशा किड्यानं माझा चेहरा खाल्ला नसता तर मला माझ्या पप्पांपासून व बहिणीपासून दूर राहावं लागलं नसतं. कित्येक वर्षांपर्यंत आमच्या कुटुंबाची अशी ताटातूट झाल्यामुळे आम्ही सर्वच दुःखी होतो. पण, मेक्सिकोमधील बेथेल म्हटल्या जाणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला दिलेली भेट मला खासकरून आठवते ज्यामुळे आम्हाला खूप उत्तेजन मिळालं होतं. इथं येण्यापूर्वी मायलीन म्हणायची, की ती पुन्हा शस्त्रक्रिया करू देणार नाही—या वेळेस ही पाचवी शस्त्रक्रिया होती—कारण शस्त्रक्रियेनंतर तिला खूप दुःखायचं. पण शाखा दफ्तरात सेवा करणाऱ्‍या काही बंधूभगिनींनी तिला सांगितलं, की ती जर धाडसी आहे आणि तिनं जर डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रिया करू दिली तर हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर ते तिला पार्टी देतील. यामुळे मायलीन शस्त्रक्रियेसाठी तयारी झाली.

मायलीन आपल्या भावना व्यक्‍त करते: “बेथेलमध्ये मला पार्टी दिली जाईल, हे ऐकूनच मी खूप आनंदी झाले. म्हणून मी धैर्यानं शस्त्रक्रियेसाठी धाडस दाखवलं. बेथेलमधली पार्टी खूप छान होती; किती आध्यात्मिक बंधूभगिनी तिथं होते. त्यांनी मला खूप शुभेच्छा कार्डं दिली, मी अजूनही ती जपून ठेवली आहेत. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला पुढची शस्त्रक्रिया सहन करण्याची शक्‍ती मिळाली.”

प्रगती आणि सहन करीत राहण्यास मिळालेली मदत

मायलीन आता ११ वर्षांची आहे आणि तिचा चेहरा ठीकठाक करण्यासाठी तिच्यावर २० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियांमुळे तिचा चेहरा बऱ्‍यापैकी सुधारला असला तरी, ती पूर्णपणे तिचं तोंड उघडू शकत नाही. तरीपण तिनं नेहमी धाडसी व उत्साही मनोवृत्ती बाळगली आहे. आध्यात्मिक गोष्टींबद्दलही तिनं गुणग्राहकता दाखवली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिनं आमच्या स्थानीय मंडळीत ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपलं नाव दाखल केलं आणि एप्रिल २७, २००३ रोजी तिचा बाप्तिस्मा झाला. तिनं एका वेळेला तीन बायबल अभ्यास चालवले. एकदा मेक्सिकोत असताना ती एका गृहस्थाबरोबर बोलली जो तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला. मायलीननं त्याला ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला आणि मंडळीच्या इतर सभांना उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं तेव्हा तो आनंदानं उपस्थित राहिला.

मायलीन घरोघरी प्रचारकार्याला जाते तेव्हा काही लोक तिच्या तोंडाकडे पाहून तिला विचारतात, की ती भाजली होती का. मायलीन या संधीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या बायबल आधारित आशेविषयी सांगते, की यहोवा तिला येणाऱ्‍या परादीसमध्ये एक नवीन चेहरा देईल.—लूक २३:४३.

शस्त्रक्रियांमुळे आणि इतर मुलांच्या चिडवण्यामुळे मायलीनला जी यातना सहन करावी लागली आहे तिचं वर्णन करणं शक्य नाही. पण कोणत्या गोष्टीमुळे ती हे सर्व सहन करू शकली? मायलीन पूर्ण खात्रीनं उत्तर देते: “यहोवा माझ्यासाठी एक खरी व्यक्‍ती आहे. तो मला बळ देतो, सहनशक्‍ती देतो. मला आणखी शस्त्रक्रिया नकोत, कारण डॉक्टर माझा चेहरा आणखी सुधारू शकत नाहीत. मी लहान असताना जशी दिसायचे तसं ते मला कधीच बनवू शकत नाहीत. पण यहोवा मला नव्या जगात नवीन चेहरा देणार आहे आणि मी पुन्हा सुंदर दिसेन, हे मला निश्‍चित माहीत आहे.” (g०४ ५/२२)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवा मला नव्या जगात नवीन चेहरा देणार आहे”

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

हळूहळू मला समजू लागलं, की मायलीनला जे काही झालं होतं त्यासाठी देव जबाबदार नाही