व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोगांविरुद्धच्या लढाईत यश व अपयश

रोगांविरुद्धच्या लढाईत यश व अपयश

रोगांविरुद्धच्या लढाईत यश व अपयश

ऑगस्ट ५, १९४२ रोजी डॉ. ॲलेक्सझँडर फ्लेमिंग यांचा मित्र असणारा त्यांचा एक रुग्ण, अगदी मरणासन्‍न अवस्थेत आला होता. या ५२ वर्षीय गृहस्थाला मेरुरज्जू परिमस्तिष्क ज्वर झाला होता. फ्लेमिंगने बरेच प्रयत्न करूनही त्यांचा हा मित्र कोमामध्ये गेला होता.

पंधरा वर्षांपूर्वी, फ्लेमिंग यांना एका निळसर-हिरवट बुरशीतून तयार होणाऱ्‍या एका उल्लेखनीय पदार्थाचा अनपेक्षितपणे शोध लागला होता. त्यांनी त्याला पेनिसिलिन हे नाव दिले. या पदार्थात जिवाणूंचा नाश करण्याची शक्‍ती असल्याचे त्यांना आढळले पण विशुद्ध रूपात पेनिसिलिन हा पदार्थ वेगळा करण्यात त्यांना यश आले नाही; शिवाय त्यांनी केवळ त्याच्या पूतिरोधक गुणधर्मांविषयी प्रयोग केले होते. पण १९३८ साली मात्र हावर्ड फ्लोरी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातील आपल्या संशोधन गटासोबत मिळून मानवांवर चाचणी करता येईल इतक्या पुरेशा प्रमाणात पेनिसिलिनचे उत्पादन करण्याचे आव्हान हाती घेतली. फ्लेमिंग यांनी फ्लोरी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आणि फ्लोरी आपल्याजवळ जितके पेनिसिलिन होते ते सर्व पाठवून देण्यास तयार झाले. आपल्या मित्राचा जीव वाचवण्याची ही शेवटली संधी फ्लेमिंग यांच्याजवळ होती.

स्नायूत दिलेले पेनिसिलिनचे इंजेक्शन पुरेसे नसल्यामुळे फ्लेमिंग यांनी हे औषध सरळ आपल्या मित्राच्या मेरूरज्जूत टोचले. पेनिसिलिनने सर्व रोगजनक जंतूंचा विनाश केला आणि काय आश्‍चर्य, फ्लेमिंगचा रुग्ण एका आठवड्याभरात पूर्णपणे बरा होऊन घरी गेला! प्रतिजैवांच्या युगाची ही पहाट होती आणि रोगांविरुद्धच्या लढाईत मानवजातीने नुकताच एक महत्त्वाचा गड जिंकला होता.

प्रतिजैवांचे युग

प्रतिजैवांचा प्रथम शोध लागला तेव्हा ती अद्‌भुत औषधे म्हणून ओळखली गेली. कारण तोवर असाध्य समजल्या जाणाऱ्‍या जिवाणूंच्या, फंगसच्या किंवा इतर जंतूंच्या संसर्गावर आता प्रभावीरित्या उपचार करणे शक्य झाले. या नव्या औषधांमुळेच मेनिन्जॉयटिस, न्यूमोनिया आणि लोहितांग ज्वर यांमुळे बळी पडणाऱ्‍यांची संख्या लक्षणीयरित्या घसरली. इस्पितळात राहताना काही संसर्ग झाल्यास रोग्याचा मृत्यू अटळ समजला जात असे, पण आता मात्र दोन चार दिवसांत तो बरा होऊ लागला.

फ्लेमिंगच्या काळापासून आजतागायत संशोधकांनी कित्येक नवे प्रतिजैव पदार्थ शोधून काढले आहेत आणि आणखी नव्या औषधांचा शोध घेणे सुरू आहे. मागील ६० वर्षांच्या काळात, रोगांविरुद्धच्या लढाईत प्रतिजैवी औषधे अनिवार्य बनली आहेत. जॉर्ज वॉशिंग्टन आज जिवंत असते तर डॉक्टरांनी नक्कीच त्यांच्या घशाचा इलाज प्रतिजैवांच्या साहाय्याने केला असता आणि एखाद्या आठवड्यात ते बरे झाले असते. या प्रतिजैव औषधांच्या साहाय्याने कित्येक संसर्गांना किती सहज छूमंतर करता येते याचा प्रत्येकजणाला कधी न कधी अनुभव आला असेल. पण काळाच्या ओघात, या प्रतिजैव औषधांचेही काही दुष्परिणाम असल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

प्रतिजैवांचा उपचार विषाणूंमुळे होणारे रोग, उदाहरणार्थ एड्‌स किंवा फ्लू यांवर निरुपयोगी ठरतो. शिवाय काही लोकांना विशिष्ट प्रतिजैवांमुळे अलर्जीजन्य प्रतिक्रिया होते. तसेच, बहुजीवरोधी प्रतिजैवांमुळे शरीरातील उपयोगी सूक्ष्मजीवही नष्ट होण्याचा संभव असतो. पण प्रतिजैवांच्या उपयोगासंबंधी सर्वात मोठी समस्या एकतर त्यांच्या अतिवापरामुळे किंवा अल्पवापरामुळे उद्‌भवते.

अल्पवापर म्हणजे, जेव्हा डॉक्टरनी सांगितल्यानुसार रुग्ण प्रतिजैव उपचार पूर्ण करत नाही; एकतर बरे वाटू लागले म्हणून किंवा बरेच दिवस औषध घ्यावे लागते म्हणून काहीजण मध्येच औषध बंद करतात. यामुळे शरीरावर हल्ला करणाऱ्‍या जिवाणूंपैकी सर्वांचा नाश होत नाही आणि परिणामी प्रतिरोध करणारे सूक्ष्मजंतू शरीरातच राहतात आणि बहुगुणित होतात. टीबीच्या उपचारासंबंधी सहसा असे घडते.

या नव्या औषधांच्या अतिवापराला डॉक्टर आणि शेतकरी जबाबदार आहेत. मॅन ॲण्ड मायक्रोब्स या पुस्तकात स्पष्ट केल्यानुसार, “संयुक्‍त संस्थानांत कित्येकदा आवश्‍यकता नसताना ॲन्टिबायोटिक्स लिहून दिली जातात आणि इतर देशांत तर ॲन्टिबायोटिक्सचा गैरवापर याहूनही अधिक प्रमाणात दिसून येतो. कित्येकदा गुरांना रोग बरे करण्यासाठी नव्हे तर त्यांची अधिक जलद वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲन्टिबायोटिक्स दिली जातात; सूक्ष्मजंतूंमध्ये प्रतिरोध उत्पन्‍न होण्याचे हेच मुख्य कारण आहे.” असे करण्याद्वारे “कदाचित आपण नव्या ॲन्टिबायोटिक्सचा साठा हळूहळू संपवत असू,” असा इशारा या पुस्तकात देण्यात आला आहे.

पण प्रतिजैवांना प्रतिरोध उत्पन्‍न होण्यासंबंधी काळजी वगळता, २० व्या शतकाचे उत्तरार्ध मुख्यत्वे वैद्यकीय विजयांचे पर्व म्हणावे लागेल. वैद्यकीय संशोधकांना जवळजवळ सर्व रोगांवरील औषधे सापडली आहेत असे भासू लागले. शिवाय, लशींमुळे भविष्यातही रोगांना प्रतिबंध करणे सुसाध्य झाले.

वैद्यकीय शास्त्राने मिळवलेले विजय

“लशीकरणाला सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वात मोठे यशस्वी पाऊल म्हणता येईल” असे द वर्ल्ड हेल्थ रिपोर्ट १९९९ यात म्हणण्यात आले. जगव्याप्त लशीकरण मोहिमांमुळे लाखो लोकांना जीवनदान मिळाले आहे. देवी (स्मॉलपॉक्स) या भयंकर रोगाने, २० व्या शतकातील सर्व युद्धांनी मिळून घेतले नाहीत इतके बळी घेतले आहेत; पण जागतिक लशीकरण कार्यक्रमामुळे देवी (स्मॉलपॉक्स) या रोगाचा संपूर्ण नायनाट झाला आहे. अशाच प्रकारच्या मोहीमेमुळे पोलिओ या रोगाचे देखील जवळजवळ संपूर्ण निर्मूलन झाले आहे. (“देवी व पोलिओवर विजय” या शीर्षकाची चौकट पाहा.) सर्वसामान्य जीवघेण्या रोगांपासून संरक्षणासाठी बऱ्‍याच मुलांना आता लस टोचली जाते.

इतर आजारांवर विजय मिळवण्याकरता अशी उल्लेखनीय पावले उचलण्याची गरज पडली नाही. स्वच्छता व शुद्ध पाणी पुरवठा असल्यास, कॉलेरा यासारख्या दूषित पाण्याने पसरणाऱ्‍या संसर्गजन्य रोगांचा फैलाव सहज रोखता येतो. बऱ्‍याच देशांत, डॉक्टर व इस्पितळातील उपचार सहज उपलब्ध झाल्यामुळे बऱ्‍याच रोगांचे, ते भयानक स्वरूप घेण्याआधी निदान व उपचार होणे शक्य झाले आहे. उत्तम आहार व राहणीमान, तसेच खाण्याचे पदार्थ हाताळण्यासंबंधी व ते साठवण्यासंबंधी कायदे अंमलात आणल्यामुळेही सार्वजनिक आरोग्यात भर पडली आहे.

शास्त्रज्ञांनी संसर्गजन्य रोगांची कारणे शोधून काढल्यावर, आरोग्य अधिकाऱ्‍यांना या रोगांना आळा घालण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलणे शक्य झाले. एक उदाहरण लक्षात घ्या. सॅन फ्रॅन्सिस्को येथे १९०७ साली गाठींच्या प्लेगची साथ आली होती. हा रोग घुशींच्या शरीरावर राहणाऱ्‍या पिसवांमुळे पसरतो. पण घुशींची विल्हेवाट लावण्याकरता शहरात लगेच पावले उचलण्यात आल्यामुळे फार कमी रुग्ण या साथीने दगावले. पण याच रोगाची साथ १८९६ साली भारतात आली होती तेव्हा बारा वर्षांच्या कालावधीत एक कोटी लोक त्याला बळी पडले कारण तोपर्यंत या रोगाचे मूळ कारण शोधून काढण्यात आले नव्हते.

रोगांवर विजय मिळवण्यात अपयश

रोगांविरुद्धच्या लढाईत बरेच मोठमोठे विजय मिळवण्यात आले यात शंका नाही. पण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील काही विजय केवळ जगातल्या श्रीमंत राष्ट्रांपुरते मर्यादित राहिले आहेत. उपचारांनी ज्यांना बरे करणे शक्य आहे असे कित्येक रोग आजही कोट्यवधी लोकांचा बळी घेतात. का? तर पुरेशा अर्थबळाच्या अभावामुळे. विकसनसील देशांत आजही लोकांना राहण्याकरता स्वच्छ परिसर व स्वच्छतेच्या सवलती, वैद्यकीय औषधोपचार आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. या विकसनशील देशांतील ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने लोक गजबजलेल्या शहरांत येऊन स्थाईक झाल्यामुळे या मूलभूत गरजा भागवणे आणखीनच कठीण होऊन बसले आहे. या व अशा इतर कारणांमुळे जगातल्या गरीब लोकांना, जागतिक आरोग्य संघटनेच्या शब्दांत, “रोगराईच्या ओझ्याचा असमान वाटा” वाहावा लागतो.

केवळ आपल्यापुरता व आतापुरता विचार करण्याच्या स्वार्थी वृत्तीमुळेच आरोग्याच्या बाबतीत असे असंतुलन घडून आले आहे. मॅन ॲण्ड मायक्रोब्स या पुस्तकात म्हटले आहे, “जगातल्या सर्वात भयंकर प्राणघातक संसर्गजन्य रोगांपासून आपण फार दूर आलो आहोत असे भासते. यांपैकी काही केवळ, किंवा मुख्यतः उष्ण कटिबंधी व उपोष्ण कटिबंधी प्रदेशांतील गरीब देशांपुरतेच मर्यादित आहेत.” श्रीमंत विकसित देशांना व औषधी कंपन्यांना थेट नफा मिळण्याचा संभव नसल्यामुळे ते अशा रोगांच्या उपचाराकरता निधी देण्यास मागेपुढे पाहतात.

रोगांचा फैलाव होण्याला मनुष्याचा बेजबाबदारपणा देखील कारणीभूत आहे. या कटू सत्याचा प्रत्यय देणारे सर्वात ज्वलंत उदाहरण कोणते असेल, तर ते शरीरद्रवांच्या माध्यमाने एका व्यक्‍तीपासून दुसऱ्‍या व्यक्‍तीला बाधणाऱ्‍या एड्‌स व्हायरसचा संसर्ग. काही वर्षांच्या कालावधीतच या जगद्व्‌यापी साथीने सबंध पृथ्वीला आपल्या विळख्यात जखडले. (“एड्‌स—आधुनिक काळातील पीडा” या शीर्षकाची चौकट पाहा.) रोगपरिस्थितीविज्ञान तज्ज्ञ, जो मकॉर्मिक हे निग्रही विधान करतात की “मनुष्याने आपल्याच पायावर कुऱ्‍हाड मारून घेतली आहे. हे नीतिविषयक भाष्य नाही तर निव्वळ वस्तुस्थिती आहे.”

मनुष्याने कशाप्रकारे नकळत एड्‌स व्हायरसचे काम सोपे केले आहे? द कमिंग प्लेग या पुस्तकात पुढील कारणांची यादी दिली आहे: सामाजिक बदल—खासकरून एकापेक्षा अधिक व्यक्‍तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे चलन वाढल्यामुळे लैंगिकरित्या संक्रमित रोगांचा जणू डोंब उसळला, ज्यामुळे एड्‌स व्हायरसचा पूर्ण विकास होऊन एका व्यक्‍तीच्या माध्यमाने कित्येक जणांना सहज त्याची बाधा होण्यास सुरवात झाली. विकसनशील देशांत वैद्यकीय उपचाराकरता किंवा ड्रग्सच्या व्यसनाकरता एकच इंजेक्शनची दूषित सुई वारंवार वापरल्यामुळेही असाच परिणाम घडून आला. तसेच, अब्जावधी डॉलरच्या जागतिक रक्‍त व्यापारामुळेही एड्‌स व्हायरस एका रक्‍तदात्याकडून कित्येक ग्राहकांच्या शरीरात पोचण्याचा मार्ग मोकळा झाला.

याआधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिजैवांच्या अतिवापरामुळे किंवा अल्पवापरामुळे कित्येक प्रतिरोधी सूक्ष्मजंतूचा उद्‌भव झाला आहे. ही समस्या गंभीर असून दिवसेंदिवस ती आणखी उग्र स्वरूप धारण करू लागली आहे. जखम झालेल्या ठिकाणी जंतूसंसर्ग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या स्टॅफिलोकॉकस जिवाणूंचा, पूर्वी पेनिसिलिनपासून तयार केलेल्या औषधांनी अगदी सहजरित्या बिमोड होत असे. पण आता मात्र ही नेहमीची प्रतिजैव औषधे निकामी ठरू लागली आहेत. परिणामी, डॉक्टरांना नवी व महागडी प्रतिजैव औषधे वापरणे भाग पडते, की जी विकसनशील देशांतील इस्पितळांना सहसा परवडण्यासारखी नसतात. बरे, ही औषधे वापरली तरी काही सूक्ष्मजंतू इतके बिलंदर असतात की या नव्या प्रतिजैवांनाही ते बधत नाहीत; यामुळे इस्पितळात होणारे संसर्ग अधिक वाढण्याची व अधिक घातक ठरण्याची शक्यता वाढते. यु.एस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी ॲण्ड इन्फेक्शस डिसीजेसचे भूतपूर्व संचालक डॉ. रिचर्ड क्राऊस सध्या प्रतिजैवसंबंधी ही जी कोंडी निर्माण झाली आहे, तिचे, “प्रतिरोधी सूक्ष्मजंतूंची साथ” असे स्पष्ट वर्णन करतात.

“आज आपली स्थिती बरी आहे का?”

आज, २१ व्या शतकाच्या सुरवातीला रोगराईचा शाप अजूनही मानवजातीपासून दूर झालेला नाही हे अगदीच स्पष्ट आहे. एड्‌सचा अबाधित फैलाव, औषधांना न जुमानणाऱ्‍या सूक्ष्मजंतूंचा उद्‌भव, आणि टीबी व मलेरिया यांसारख्या जुन्या प्राणघातक रोगांचे पुनरागमन हेच दाखवते की रोगराईविरुद्धची लढाई निश्‍चितच अजून संपलेली नाही.

“एका शतकापूर्वी होती त्यापेक्षा आज आपली स्थिती बरी आहे का?” असा प्रश्‍न नोबेल पारितोषिक विजेता जोशुआ लेडरबर्ग विचारतात. उत्तर देताना ते म्हणतात, “उलट, बऱ्‍याच संदर्भात आज आपली स्थिती आणखी बिघडली आहे. रोगजनक सूक्ष्मजंतूंकडे आपण दुर्लक्ष केले आणि यामुळे घडलेल्या दुष्परिणामांनी आज आपल्याला त्राही त्राही करून सोडले आहे.” वैद्यकीय शास्त्राने व सर्व राष्ट्रांनी एकजूट होऊन निश्‍चयी प्रयत्न केल्यास गतकाळात केलेल्या चुका सुधारता येतील का? देवी या रोगाचे निर्मूलन करण्यात यश आले त्याप्रमाणे प्रमुख संसर्गजन्य रोगांचे नामोनिशाण काळाच्या ओघात मिटवता येतील का? या प्रश्‍नांवर शेवटल्या लेखात चर्चा केली आहे. (g०४ ५/२२)

[८ पानांवरील चौकट/चित्र]

देवी व पोलिओवर विजय

जागतिक आरोग्य संघटनेने १९७७ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी, नैसर्गिकरित्या होणाऱ्‍या देवी रोगाच्या शेवटल्या रुग्णाचा शोध लावला. इस्पितळात स्वयंपाक्याचे काम करणारा आली माओ मालीन नावाचा हा इसम होता. त्याचा रोग बळावला नाही आणि काही आठवड्यांतच तो पूर्णपणे बरा झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना या रोगाची प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

तब्बल दोन वर्षे डॉक्टरांना वाट पाहावी लागली. “सक्रिय रूपात देवी रोगाने” पीडित असलेल्या रुग्णाची माहिती देणाऱ्‍याला १,००० डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कोणीही या बक्षीसाकरता दावा केला नाही आणि शेवटी ८ मे, १९८० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने “जग व त्यातील सर्व रहिवाशी देवी रोगापासून मुक्‍त” झाले असल्याची औपचारिक घोषणा केली. केवळ दहा वर्षांआधी देवीमुळे वर्षाला जवळजवळ वीस लाख लोकांचा बळी जात होता. इतिहासात पहिल्यांदाच, एका प्रमुख संसर्गजन्य रोगाचे कायमचे निर्मूलन करण्यात आले होते. *

पोलिओ किंवा पोलिओमायलायटिस या लहानपणी होणाऱ्‍या व अपंगत्व आणणाऱ्‍या रोगावरही अशाचप्रकारे मात करण्याची शक्यता दिसू लागली. १९५५ साली जोनास साक याने पोलिओवर प्रभावी ठरणारी लस तयार केली आणि संयुक्‍त संस्थाने व इतर देशांत लगेच ही लस टोचण्याची मोहीम हाती घेण्यात आली. नंतर ही लस पोटात घेण्याच्या औषधाच्या माध्यमातही आली. १९८८ साली जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ निर्मूलनाचा जागतिक कार्यक्रम राबवला.

जागतिक आरोग्य संघटनेचे तेव्हाचे मुख्य संचालक डॉ. ग्रो हार्लेम ब्रन्टलान सांगतात, की “पोलिओच्या निर्मूलनाचा कार्यक्रम राबवण्यास, १९८८ साली आम्ही सुरवात केली तेव्हा या रोगामुळे दररोज १,००० लहान मुलांना अपंगत्व येत होते. २००१ साली मात्र संपूर्ण वर्षभरात पोलिओच्या १,००० पेक्षा कितीतरी पटीने कमी केसेस पाहण्यात आल्या.” आता पोलिओ दहापेक्षा कमी देशांपुरताच मर्यादित आहे. अर्थात, या देशांतून पोलिओचे नामोनिशाण मिटवण्याकरता पुरेशा आर्थिक निधीची गरज आहे.

[तळटीप]

^ आंतरराष्ट्रीय लशीकरण मोहिमेच्या साहाय्याने रोगाचा बिमोड करण्याकरता देवी हा रोग अगदी आदर्श होता. कारण उंदीर-घुशी व कीटकांसारख्या त्रासदायक वाहकांद्वारे फैलावणाऱ्‍या रोगांपेक्षा हा वेगळा होता. देवी रोगाचे विषाणू जिवंत राहण्याकरता मानवी वाहकावर अवलंबून असतात.

[चित्र]

एका इथियोपियन मुलाला पोलिओ लशीचे औषध देताना

[चित्राचे श्रेय]

© WHO/P. Virot

[१० पानांवरील चौकट/चित्र]

एड्‌स—आधुनिक काळातील पीडा

एड्‌स एक नवा जगद्व्‌यापी प्राणघातक रोग ठरला आहे. या रोगाची प्रथम ओळख घडल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी, सहा कोटी पेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. आणि आरोग्य अधिकारी इशारा देत आहेत की एड्‌सची जगद्व्‌यापी साथ अजून “सुरवातीच्या टप्प्यातच आहे.” “पूर्वी अशक्य वाटत होते” इतक्या मोठ्या प्रमाणात, नव्हे, “त्याहूनही अधिक” प्रमाणात या रोगाचा फैलाव होत आहे; आणि जगाच्या ज्या काही भागांना या रोगाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे तेथे याचे विध्वंसक परिणाम दिसून येत आहेत.

संयुक्‍त राष्ट्रांच्या एका वृत्तानुसार, “जगभरात एचआयव्ही/एड्‌सच्या बहुतेक रुग्णांना आपल्या जीवनाच्या उमेदीच्या काळातच या रोगाची लागण झाली आहे.” यामुळे २००५ साल उजाडेपर्यंत, दक्षिण आफ्रिकेचे कित्येक देश आपल्या कर्मचारी वर्गापैकी १० ते २० टक्के गमावतील असे म्हटले जाते. या वृत्तात पुढे म्हटले आहे: “आफ्रिकेच्या बहुतेक देशांतील नागरिकांचे सध्याचे सरासरी आयुष्यमान ४७ वर्षे आहे. एड्‌स नसता तर ते ६२ वर्षे असते.”

या रोगाकरता गुणकारी ठरेल अशी प्रतिबंधक लस शोधून काढण्याचे प्रयत्न निदान आतापर्यंत तरी निष्फळच ठरले आहेत आणि विकसनशील जगातील साठ लाख एड्‌स रुग्णांपैकी केवळ ४ टक्के रुग्णांनाच औषधोपचार मिळतो. सध्या तरी एड्‌स बरा करू शकेल असे औषध उपलब्ध नाही आणि डॉक्टरांना भीती आहे की एचआयव्ही विषाणूची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना आज न उद्या एड्‌स होईल.

[चित्र]

एचआयव्ही विषाणूची लागण झालेल्या टी-लसीका कोशिका

[चित्राचे श्रेय]

Godo-Foto

[७ पानांवरील चित्र]

प्रयोगशाळेत एक कर्मचारी अतिशय चिवट जातीच्या विषाणूचे परीक्षण करताना

[चित्राचे श्रेय]

CDC/Anthony Sanchez