व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लग्न पवित्र का समजावे?

लग्न पवित्र का समजावे?

बायबलचा दृष्टिकोन

लग्न पवित्र का समजावे?

आज बहुतेक लोक म्हणतील की, लग्न एक पवित्र बंधन असण्यावर त्यांचा विश्‍वास आहे. तर मग, इतके घटस्फोट का होतात? काहींना वाटते की, लग्न केवळ प्रेमाचे एक वचन, एक कायदेशीर करार आहे व हे वचन मोडता येते. लग्नाबद्दल असा विचार करणारे लोक समस्या निर्माण होताच लग्न मोडायचा विचार करू लागतात.

लग्नाच्या व्यवस्थेबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? याचे उत्तर, त्याच्या वचनात अर्थात बायबलमध्ये इब्री लोकांस १३:४ येथे सापडते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे.” “आदरणीय” असे भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दामधून मौल्यवान आणि बहुमोलाची गोष्ट असा अर्थ सूचित होतो. एखादी बहुमोल गोष्ट आपण नेहमी जपून ठेवायचा प्रयत्न करतो; ती कधीच, अगदी अनपेक्षितपणेही कोठे हरवणार नाही याची आपण दक्षता घेतो. लग्नाच्या बाबतीत देखील असेच असले पाहिजे. ख्रिश्‍चनांनी त्यास आदरणीय समजावे—जपून ठेवण्याची बहुमोल गोष्ट समजावी.

स्पष्टतः, यहोवा देवाने लग्न हे पती-पत्नीमधील एक पवित्र बंधन असे निर्माण केले. तर लग्नाबद्दल आपलाही असाच दृष्टिकोन आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

प्रेम आणि आदर

लग्नाच्या बंधनाला आदरणीय समजण्यासाठी वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. (रोमकर १२:१०) प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिसकर ५:३३.

मान्य आहे की, काही वेळा एखादा सोबती एकदम प्रेमाने किंवा आदराने वागणार नाही. तरीही, ख्रिश्‍चनांनी असे प्रेम आणि असा आदर दाखवला पाहिजे. पौलाने लिहिले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”—कलस्सैकर ३:१३.

वेळ आणि लक्ष देण्याची गरज

आपले बंधन पवित्र आहे असे समजणारे वैवाहिक सोबती एकमेकांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ काढतात. यामध्ये लैंगिक जवळीकीचाही समावेश होतो. बायबल म्हणते: “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा.”—१ करिंथकर ७:३.

परंतु काही बाबतीत, पतीला अधिक पैसा कमवण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी घरापासून दूर जाण्याची गरज आहे असे दोघा सोबत्यांना वाटत असेल. काही वेळा, पती-पत्नीचे हे वेगळे राहणे अनपेक्षित काळासाठी लांबवले जाते. सहसा, अशारितीने वेगळे राहिल्यामुळे लग्नाच्या बंधनावर तणाव येऊन याचे पर्यवसान काही वेळा जारकर्म आणि घटस्फोट यांत झाले आहे. (१ करिंथकर ७:२, ५) या कारणासाठी, अनेक ख्रिस्ती दांपत्यांनी पवित्र मानलेला आपला विवाह धोक्यात घालण्याऐवजी भौतिक सुखांचा त्याग केला आहे.

समस्या येतात तेव्हा

समस्या येतात तेव्हा, लग्नाला आदरणीय समजणारे ख्रिस्ती पुढचा-मागचा विचार न करता कायदेशीरपणे वेगळे होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत नाहीत. (मलाखी २:१६; १ करिंथकर ७:१०, ११) येशूने म्हटले: “जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकितो, तो तिला व्यभिचारिणी करितो आणि जो कोणी अशा टाकिलेल्या बायकोबरोबर लग्न करितो तो व्यभिचार करितो.” (मत्तय ५:३२) उचित शास्त्रवचनीय आधार नसताना घटस्फोट किंवा फारकत घेण्याचा निर्णय घेणे म्हणजे लग्नाचा अनादर करणे होय.

गंभीर वैवाहिक समस्या असलेल्यांना आपण काय सल्ला देतो यावरूनही लग्नाविषयी आपला काय विचार आहे हे प्रकट होते. आपण लगेच फारकत किंवा घटस्फोट घेण्याचा सल्ला देतो का? हे खरे आहे की, फारकत घेण्यासाठी योग्य कारणे असतील; जसे की, तीव्र स्वरूपाचा शारीरिक अत्याचार करणे किंवा सांभाळण्याची जबाबदारी मुद्दामहून नाकारणे. * त्याचप्रमाणे, वर दाखवल्याप्रमाणे, बायबलनुसार केवळ व्यभिचार झाला असेल तरच घटस्फोट दिला जाऊ शकतो. तरीसुद्धा, अशा परिस्थितींमध्ये ख्रिश्‍चनांनी इतरांच्या निर्णयाला अनावश्‍यकपणे प्रभावित करू नये. कारण शेवटी, या निर्णयाचे परिणाम वैवाहिक समस्या असलेल्या व्यक्‍तीला भोगावे लागतील—सल्ला देणाऱ्‍याला नव्हे.—गलतीकर ६:५, ७.

उदासीन मनोवृत्ती टाळा

काही ठिकाणी, दुसऱ्‍या देशातले कायदेशीर नागरिकत्व मिळवण्यासाठी लग्न करण्याची प्रथा फार सामान्य आहे. सहसा अशा व्यक्‍ती त्या देशातल्या नागरिकाला पैसे देऊन त्यांच्याशी लग्न करायचा करार करतात. आणि अशी ही जोडपी विवाहित असली तरी ती वेगवेगळी राहतात, इतकेच नव्हे तर त्यांच्यात मित्रत्वाचे संबंधही नसतात. त्यांना हवे असलेले कायदेशीर नागरिकत्व प्राप्त होताच ते घटस्फोट घेतात. त्यांचे हे लग्न म्हणजे जणू व्यापारी करार असतो.

लग्नाचे गांभीर्य नसलेला असा दृष्टिकोन बाळगण्यास बायबल उत्तेजन देत नाही. लग्न करणाऱ्‍या व्यक्‍ती, कोणत्याही हेतूने लग्न करत असल्या तरी, त्या एका पवित्र बंधनात जोडल्या जातात जे देवाच्या नजरेत कायमचे बंधन आहे. अशा करारातले भागीदार पती-पत्नी म्हणून राहतात, आणि त्यांना दुसऱ्‍या व्यक्‍तीशी लग्न करण्याच्या शक्यतेसह उचित कारणाने घेतलेल्या घटस्फोटाचे बायबलमधील नियम लागू होतात.—मत्तय १९:५, ६, ९.

कोणत्याही यशस्वी प्रयत्नाप्रमाणे, यशस्वी विवाहासाठी देखील मेहनत करण्याची आणि चिकाटीची आवश्‍यकता असते. ज्यांना त्याच्या पवित्रतेचे मूल्य वाटत नाही ते लवकर हार मानतात. किंवा ते, दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून निरस वैवाहिक बंधनात अडकून राहतात. परंतु, ज्यांना लग्नाचे पावित्र्य कळते त्यांना माहीत असते की, त्यांनी एकत्र राहावे अशी अपेक्षा देव त्यांच्याकडून करतो. (उत्पत्ति २:२४) त्यांना हे देखील कळते की, त्यांनी एकत्र मिळून आपला विवाह यशस्वी बनवला तर ते वैवाहिक बंधनाचा रचनाकार असलेल्या देवाची स्तुती करतात. (१ करिंथकर १०:३१) ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांना आपले लग्न यशस्वी बनवण्यासाठी धीर धरण्याची आणि प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा मिळते. (g०४ ५/८)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील १३ वा अध्याय, परिच्छेद १४-२० पाहा.