व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण

आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण

आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अनेक तरुण आहेत. या तरुणांचे देवावर प्रेम आहे आणि बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या तत्त्वांचे अनुसरण करण्याचा ते सदोदित प्रयत्न करतात. या तरुणांना आपल्या विश्‍वासाविषयी अभिमान वाटतो आणि त्याविषयी ते शाळेत अगदी निःसंकोचपणे बोलतात. काही उदाहरणे येथे देत आहोत.

◼ सहावीत असताना, हॉली व तिच्या वर्गसोबत्यांना, “हिंसाचाराचा वापर न करता दहशतवादाची समस्या तुम्ही कशी सोडवाल?” या प्रश्‍नावर आधारित निबंध लिहिण्याचा उपक्रम देण्यात आला. हॉलीने या संधीचा फायदा घेऊन, भविष्याबद्दल आपल्या बायबल आधारित आशेविषयी लिहिण्याचे ठरवले. सबंध मानवी इतिहासात कशाप्रकारे ‘एका मनुष्याने दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान केले आहे’ याविषयी तिने सुरवातीला खुलासा केला. (उपदेशक ८:९) यानंतर तिने देवाचे राज्य हेच मानवजातीकरता एकमेव आशास्थान असल्याचे स्पष्ट केले. तिने लिहिले, “त्या राज्याचा राजा येशू ख्रिस्त असल्यामुळे, दहशतवादासहित मानवांच्या सर्व समस्यांचे कायमचे निवारण केले जाईल.” कोणताही मानवी शासक जे करू शकला नाही ते येशू कशाप्रकारे साध्य करेल याचे हॉलीने स्पष्टीकरण केले. तिने लिहिले, “पृथ्वीवर असताना येशूने आपण कशाप्रकारचे शासक असू हे दाखवून दिले. तो प्रेमळ होता आणि त्याला लोकांविषयी कळकळ होती. रोग्यांना बरे करून आणि मृतांना पुन्हा जिवंत करून त्याने आपल्याजवळ सामर्थ्य असल्याचे दाखवले. कोणत्याही मानवी शासनाजवळ मृतांना जिवंत करण्याचे सामर्थ्य नाही. पण देवाचे राज्य मात्र हे साध्य करेल.” हॉलीने आपल्या निबंधाच्या शेवटी हे विधान केले, “तेव्हा, समस्येचा उपाय हा मानवांजवळ नव्हे, तर देवाजवळ आहे.”

हॉलीच्या शिक्षिकेने तिच्या निबंधाला असा शेरा दिला: “शाब्बास! हॉली. अप्रतिम, तर्कशुद्ध लेखन.” हॉलीने दिलेल्या शास्त्रवचनांतील संदर्भाबद्दलही तिच्या शिक्षिकेने तिचे कौतुक केले. यामुळे हॉलीला आपल्या शिक्षिकेला ईश्‍वरशासित सेवा प्रशालेविषयी, अर्थात यहोवाच्या साक्षीदारांद्वारे चालवल्या जाणाऱ्‍या साप्ताहिक वक्‍तृत्व व शिक्षण कार्यक्रमाविषयी सांगण्याची संधी मिळाली. हॉलीने दिलेले सेवा प्रशाला पाठ्यपुस्तक शिक्षिकेने आनंदाने स्वीकारले.

जेसिका हिने सुद्धा शाळेत निबंध लिहिताना आपल्या विश्‍वासाविषयी सांगण्याच्या संधीचा बऱ्‍याचदा फायदा घेतला आहे. ती सांगते, “माझ्या विश्‍वासांविषयी मला तीन निबंध लिहिण्याची संधी मिळाली. एकदा यहोवाचे साक्षीदार व धार्मिक हक्क याविषयी मी निबंध लिहिला होता. माझ्या शिक्षिकेने तो ग्रंथालयातील फलकावर लावला, जेणेकरून इतर मुलांनाही इच्छा असल्यास ते हा निबंध वाचू शकतील. अलीकडे मी माझ्या बाप्तिस्म्याविषयी आणि तो दिवस माझ्याकरता किती महत्त्वाचा होता याविषयी निबंध लिहिला. सहसा निबंध सादर करण्याआधी आम्ही विद्यार्थी आपापली कच्ची प्रत एकमेकांना दाखवत असतो, त्यामुळे माझ्या वर्गसोबत्यांनाही माझा निबंध वाचायची संधी मिळाली. एका मुलीने मला म्हटले: ‘छान लिहिलंयस. यहोवाच्या साक्षीदारांतील सदस्य झाल्यामुळे कोणत्या जबाबदाऱ्‍या एका व्यक्‍तीवर येतात हे मला तुझ्या निबंधावरून समजलं. बाप्तिस्मा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन!” दुसऱ्‍या एक मुलीने म्हटले: ‘तुझा निबंध अप्रतिम आहे! तुझा विश्‍वास इतका प्रबळ आहे हे पाहून मला आनंद वाटला!’ एका मुलाने एवढेच लिहिले: ‘विचारी मुलगी आहेस. अभिनंदन.’”

मेलिसा ११ वर्षांची असताना तिला आपल्या विश्‍वासाचे समर्थन करण्याची आगळीवेगळी संधी मिळाली. ती सांगते, “विज्ञानाच्या वर्गात, आमच्या शाळेची नर्स मानवी शरीरातील रोगप्रतिबंधक शक्‍तीविषयी माहिती देण्यास आली होती. चर्चेदरम्यान रक्‍त संक्रमणांचा विषय निघाला. वर्ग संपल्यानंतर मी माझ्या विज्ञान सरांना रक्‍ताविषयी असलेल्या आपल्या संस्थेच्या व्हिडिओबद्दल सांगितले. दुसऱ्‍या दिवशी मी ती कॅसेट शाळेत आणली आणि सरांनी ती घरी नेऊन आपल्या कुटुंबासोबत पाहिली. दुसऱ्‍या दिवशी त्यांनी व्हिडिओ कॅसेट शाळेत आणून आमच्या वर्गाला व आणखी एका वर्गाला दाखवली. मग त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आपले अनुकूल मत व्यक्‍त केले. साक्षीदारांच्या प्रयत्नांशिवाय आज आपल्याला संक्रमणांवर पर्यायी उपाय इतक्या सहजतेने उपलब्ध झाले नसते असे ते म्हणाले. व्हिडिओ कॅसेट मला परत देताना त्यांनी विचारले, ‘शाळेच्या संग्रहाकरता एक प्रत मिळू शकेल का?’ मी त्यांना एक प्रत आणून दिली. त्यांना फार आनंद झाला, आणि अर्थातच मला सुद्धा!”

बायबलमध्ये तरुणांना आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याची आज्ञा देण्यात आली आहे. हॉली, जेसिका व मेलिसा व त्यांच्यासारखे अनेक साक्षीदार तरुण या आज्ञेचे पालन करत आहेत. (उपदेशक १२:१) तुम्हीही करत आहात का? तर मग, तुम्ही यहोवाचे मन आनंदित करत आहात याची खात्री बाळगा.—नीतिसूत्रे २७:११; इब्री लोकांस ६:१०.

तरुणांनो, तुम्ही आपल्या विश्‍वासाविषयी शाळासोबत्यांशी व शिक्षकांशी बोलता तेव्हा यहोवा देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल एक प्रभावी साक्ष दिली जाते. यामुळे तुमचा विश्‍वास देखील बळावला जातो आणि देवाच्या सेवकांपैकी एक असल्याचा अभिमान तुमच्या मनात निर्माण होतो. (यिर्मया ९:२४) शिवाय शाळेत साक्ष दिल्यामुळे तुमचे संरक्षण देखील होते. जेसिका याविषयी म्हणते, “माझ्या विश्‍वासांबद्दल निःसंकोचपणे बोलल्यामुळे एक फायदा असा होतो की इतर विद्यार्थी, बायबलच्या तत्त्वांशी सुसंगत नसलेल्या गोष्टी करण्याचा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाहीत.” (g०४ ९/८)

[१४ पानांवरील चित्रे]

हॉली

[१४, १५ पानांवरील चित्रे]

जेसिका

[१५ पानांवरील चित्रे]

मेलिसा