व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कीर्तिपेक्षा काहीतरी उत्कृष्ट

कीर्तिपेक्षा काहीतरी उत्कृष्ट

कीर्तिपेक्षा काहीतरी उत्कृष्ट

चार्ल्स सिनेटकोयांच्या द्वारे कथित

१९५७ साली मला, अमेरिका, नेवाडा मधील लास वेगास येथे, एक आठवड्याला एक हजार डॉलर अशा १३ आठवड्यांसाठी गाण्याचे कॉन्ट्रॅक्ट सादर करण्यात आले. हा कार्यक्रम सफल ठरल्यावर मला आणखी ५० आठवडे मिळणार होते. याचा अर्थ, आणखी ५०,००० डॉलर! त्या काळी पन्‍नास हजार डॉलर म्हणजे विचार करा किती पैसा! पण ही भली मोठी संधी मला कशी मिळाली होती आणि ही संधी स्वीकारायची की नाही, हा निर्णय घेणे मला कठीण का वाटत होते ते आधी मी तुम्हाला सांगतो.

बाबा युक्रेनचे होते; १९१० साली पूर्व युरोपमध्ये त्यांचा जन्म झाला होता. १९१३ साली त्यांच्या आईने त्यांना, ती जेव्हा आपल्या नवऱ्‍याकडे पुन्हा राहायला गेली तेव्हा संयुक्‍त संस्थानांत नेले. १९३५ साली बाबांनी लग्न केलं आणि त्यानंतर एक वर्षानंतर पेनन्सिल्व्हानिया, ॲम्ब्रीज येथे माझा जन्म झाला. त्या वेळी, बाबांचे दोन थोरले भाऊ यहोवाचे साक्षीदार बनले होते.

माझे तीन भाऊ आणि मी लहान होतो तेव्हा आमचं कुटुंब पेनन्सिल्व्हानियातील न्यू कॅसलजवळ राहत होते; तिथंच आईनं साक्षीदारांबरोबर काही काळ बायबलचा अभ्यास केला. आई किंवा बाबा तेव्हा साक्षीदार झाले नाहीत परंतु बाबांना वाटायचं, की त्यांच्या भावांना आपल्या मर्जीनुसार धर्म निवडण्याची मोकळीक आहे. बाबांनी आम्हाला देशभक्‍त म्हणून लहानाचं मोठं केलं होतं तरीपण, इतरांना आपल्या मर्जीनुसार उपासना करण्याची मोकळीक आहे, असं ते नेहमी मानत.

संगीत क्षेत्रात करिअर

आईबाबांना वाटायचं, की मला गोड गळा लाभला आहे त्यामुळे मी त्या क्षेत्रात पुढं जावं. म्हणून त्यांनी त्यांच्यापरीने बरेच प्रयत्न केले. मी सहा की सात वर्षांचा असताना बाबा मला नाईटक्लबमध्ये न्यायचे आणि तिथल्या बारवर उभं करून मला गिटार वाजवत गायला लावायचे; मी तेव्हा “मदर” हे गाणं गायचो. या गाण्यातले बोल “मदर” या इंग्रजी शब्दाच्या पहिल्या अक्षरापासून सुरू होतात. हे गीत एका प्रेमळ आईचं वर्णन करते आणि त्याचा शेवट काळजाला भिडणारा आहे. बारमधली पुरुष मंडळी जी पिऊन तर्रर झालेली असायची ती रडू लागायची आणि बाबांनी पुढं केलेल्या टोपीत पैसे टाकायची.

१९४५ साली, न्यू कॅसलमधील डब्ल्यूकेएसटी आकाशवाणी केंद्रावर माझा पहिला कार्यक्रम होता; तेव्हा मी लोकगीत गायलं होतं. त्यानंतर मग मी हिट परेड मध्येही लोकप्रिय गाणी गाऊ लागलो; हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा व्हायचा आणि यात आठवड्यातली दहा टॉप गाणी ऐकवली जायची. १९५० साली पॉल व्हाईटमन यांच्या शोमध्ये मी पहिल्यांदा टीव्हीवर आलो. पॉल व्हाईटमन यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज घर्श्‍वीन यांनी लिहिलेले “रॅपसॉडी इन ब्ल्यू” हे गीत आजही लोकप्रिय आहे. त्यानंतर काही काळातच बाबांनी पेनन्सिल्व्हानियातील आमचं घर विकलं आणि आम्ही कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलीझ येथे राहायला आलो; तिथं मला माझं करिअर वाढवण्याचा वाव होता, असं त्यांना वाटलं.

बाबांच्या चिकाटीमुळेच पासअडिना येथील आकाशवाणीवर माझा स्वतःचा साप्ताहिक कार्यक्रम आणि हॉलीवूडमध्ये टीव्हीवर अर्ध्या तासाचा साप्ताहिक कार्यक्रम सुरू झाला. टेड डेल यांच्या शंभर सदस्य असलेल्या ऑर्केस्ट्राबरोबर मी कॅपिटॉल रेकॉड्‌र्समध्ये माझ्या गाण्यांचे रेकॉर्डींग केले आणि सीबीएस रेडिओ नेटवर्कवर गायकही झालो. १९५५ साली मी उत्तर कॅलिफोर्नियातील लेक टाहोए येथे संगीत, नृत्य आणि विनोद यांचा मिलाफ असलेला करमणुकीचा एक कार्यक्रम केला. तिथं असताना मात्र माझ्या जीवनातले ध्येय बदलले.

नवीन ध्येयाकडे वाटचाल

त्याच सुमारास, पेनन्सिल्व्हानियाहून कॅलिफोर्नियात राहायला आलेले बाबांचे थोरले बंधू, जॉन काका यांनी मला “लेट गॉड बी ट्रू” नावाचं पुस्तक दिलं. * * मी ते माझ्यासोबत लेक टाहोला नेलं. शेवटल्या कार्यक्रमानंतर म्हणजे मध्यरात्री, निजण्याआधी मी ते पुस्तक वाचू लागलो. इतक्या दिवसांपासून माझ्या मनात असलेल्या प्रश्‍नांची बायबलमधून उत्तरं वाचून मला किती आनंद झाला.

त्यानंतर, काम आटोपल्यावर मी नाईटक्लबमध्ये माझ्यासोबतीच्या इतर कलाकारांबरोबर पहाटेपर्यंत चर्चा करत बसायचो. मृत्यूनंतर जीवन आहे का, देवाने दुष्टाईला परवानगी का दिली, मानव शेवटी स्वतःचा आणि पृथ्वीचा नाश करेल का, यांसारख्या विषयांवर आम्ही चर्चा करायचो. काही महिन्यांनंतर, लॉस एंजेलीझमधील रिग्ली फिल्ड येथे भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रांतीय अधिवेशनात जुलै ९, १९५५ रोजी मी यहोवा देवाला माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला.

माझ्या बाप्तिस्म्याला सहा महिनेही पूर्ण झाले नव्हते, १९५५ सालच्या नाताळाच्या सकाळी मला हेन्री रसल नावाच्या एका साक्षीदार बांधवानं, करमणूक व्यापारात असलेल्या जॅक मकोई यांना भेट द्यायला सोबत नेलं. हेन्री स्वतः एनबीसीसाठी संगीत दिग्दर्शक होता. तिथं पोहंचल्यावर, जॅकनं आपल्या तीन मुलांना आणि बायकोला, जे त्यांची नाताळाच्या भेटवस्तू उघडून पाहत होते, त्यांना बसायला सांगून आम्ही जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐकायला सांगितलं. काही काळानंतर, जॅक आणि त्याच्या कुटुंबातले सदस्य देखील साक्षीदार बनले.

या दरम्यान, मी आईबरोबर अभ्यास केला आणि तिनं बायबलमधील सत्य स्वीकारलं. तीही यहोवाची साक्षीदार बनली आणि नंतर पायनियर अर्थात पूर्ण वेळेची सुवार्तिक बनली. कालांतरानं, माझ्या तिन्ही भावांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांनीही काही काळासाठी पायनियर सेवा केली. १९५६ सालच्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या २० व्या वर्षी मी पायनियर झालो.

कामासंबंधाने निर्णय

याच सुमारास, माझ्या एजंटच्या एका मित्रानं, जॉर्ज मर्फीनं मला पुढं आणण्याची इच्छा दाखवली. जॉर्जनं १९३० च्या व १९४० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मर्फीच्या ओळखींमुळे १९५६ सालच्या डिसेंबरमध्ये मी न्यू यॉर्कमध्ये सीबीएस-टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या जॅकी ग्लीसन शोमध्ये काम केलं. यामुळे माझ्या करिअरला खूप वाव मिळणार होता कारण हा कार्यक्रम अंदाजे २,००,००,००० श्रोत्यांपर्यंत पोहंचत होता. न्यू यॉर्कमध्ये असताना, मी ब्रुकलिनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त मुख्यालयाला पहिल्यांदा भेट दिली.

ग्लीसन शोमध्ये काम केल्यानंतर मी एमजीएम स्टुडिओजबरोबर सात वर्षांच्या चित्रपट कॉन्ट्रक्टवर सही केली. मला, टीव्ही वेस्टर्नवर नियमितपणे भूमिका मिळण्याची ऑफर देण्यात आली. पण काही काळानंतर, माझा विवेक मला बोचू लागला, कारण मला, जुगाऱ्‍याची, बंदुक धारण करणाऱ्‍याची भूमिका वठवावी लागणार होती—या अशा भूमिका होत्या ज्या अनैतिकतेला आणि ख्रिश्‍चनांना न शोभणाऱ्‍या वर्तनाला बढावा देत होत्या. त्यामुळे मी या शोमध्ये काम करायचं सोडून दिलं. करमणुकीच्या क्षेत्रात असलेल्यांना वाटलं, की माझं डोकं फिरलं आहे.

याच वेळेला, मी लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, लास वेगास येथे कार्यक्रम करण्याची आकर्षक संधी मला मिळाली होती. आमच्या प्रवासी पर्यवेक्षकांची भेट ज्या आठवड्यात सुरू होणार होती त्याच आठवड्यापासून मला काम सुरू करायचं होतं. मी जर हे काम स्वीकारलं नाही तर ते काम सुटणार होतं. मला काय करावं समजत नव्हतं; कारण मी बक्कळ पैसा कमवेन अशी बाबांना आशा लागून होती! माझं करिअर बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या सर्व परिश्रमांचं त्यांना फळ मिळालं पाहिजे असं मला वाटत होतं.

मी आमच्या मंडळीचे अध्यक्षीय पर्यवेक्षक, बंधू कार्ल पार्क यांच्याकडे गेलो. ते स्वतः एक संगीतकार होते आणि १९२० च्या दशकात न्यू यॉर्कमधील डब्ल्यूबीबीआर आकाशवाणी केंद्रावर ते व्हायोलिनवादक होते. मी त्यांना सांगितलं, की जर मी हे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारले तर, मला आयुष्यभर पायनियरींग करता येईल इतका पैसा मी मिळवू शकेन. ते मला म्हणाले: “तू काय केलं पाहिजेस, हे मी तुला सांगणार नाही, पण निर्णय घ्यायला मी तुला मदत करू शकेन.” मग त्यांनी मला विचारलं: “या आठवडी प्रेषित पौल आपल्या मंडळीला भेट द्यायला आला असता तर तू गेला असतास का? तू काय करावंस अशी येशूची इच्छा असती?”

झालं, मला मुद्दा समजला. बाबांना जेव्हा मी सांगितलं, की मी लास वेगास इथल्या कामाची संधी स्वीकारणार नाही तेव्हा बाबा मला म्हणाले, तू तुझं आयुष्य बरबाद करत आहेस. त्या रात्री तर ते .३८ कॅलिबर पिस्तुल घेऊन माझी वाट पाहत थांबले होते. मला ठार मारायचा त्यांचा विचार होता; पण दारू प्यायल्यामुळे ते झोपी गेले. नंतर त्यांनी, गराजमध्ये गाडीतून निघणाऱ्‍या धुरानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला. मी लगेच बचाव पथकाला बोलवलं आणि ते त्यांना वाचवू शकले.

बाबांच्या तापट स्वभावामुळे मंडळीतील पुष्कळ जण त्यांना घाबरायचे, पण आमचे विभागीय पर्यवेक्षक, बंधू रॉय डेयुल मात्र त्यांना घाबरायचे नाहीत. बंधू रॉय बाबांना भेटायला गेले तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं, की माझा जन्म झाला तेव्हा काही कारणास्तव माझी जगण्याची शक्यता खूप कमी होती. पण बाबांनी म्हणे देवाला वचन दिलं होतं, की जर मी जिवंत राहिलो तर ते मला त्याच्या सेवेसाठी वाहतील. तेव्हा बंधू रॉय यांनी बाबांना विचारलं, की तुम्हाला नाही वाटत की देव हे वचन पूर्ण करण्याची तुमच्याकडून अपेक्षा करत असावा? बाबा चकित झाले. मग बंधू रॉयनी त्यांना विचारलं: “देवाच्या पुत्रासाठी पूर्ण वेळेची सेवा सर्वात उत्कृष्ट होती, तर ती तुमच्या मुलासाठी असू शकत नाही का?” या घटनेनंतर, बाबांनी जणू माझा निर्णय स्वीकारला.

या दरम्यान, १९५७ सालच्या जानेवारी महिन्यात, शर्ली लार्ज आपल्या पायनियर सोबतीणीबरोबर आपल्या मित्रपरिवाराला भेटण्यासाठी म्हणून कॅनडाहून आली होती. मी तिच्याबरोबर आणि तिच्या सोबतीणीबरोबर घरोघरच्या कार्यासाठी गेलो तेव्हा शर्लीची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर, शर्ली माझ्याबरोबर हॉलीवूड बोलला आली; तिथं मी पर्ल बेलीबरोबर गायलो.

माझ्या निर्णयानुसार कार्य

१९५७ सालच्या सप्टेंबर महिन्यात मला आयव्ह राज्यात खास पायनियर म्हणून सेवा करण्याची नेमणूक मिळाली. मी ही नेमणूक स्वीकारायचं ठरवलं आहे, असं जेव्हा मी बाबांना सांगितलं, तेव्हा ते फक्‍त रडले. सर्वात महत्त्वाचं काय आहे याबाबतीत माझं बदललेलं मत त्यांना समजत नव्हतं. मी हॉलीवूडला गेलो आणि माझे सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आणि वृंदगायनाचे प्रमुख फ्रेड वॉरींग यांच्याबरोबर माझा कॉन्ट्रॅक्ट होता. मी माझा करार पूर्ण केला नाही तर मी गायक म्हणून पुन्हा काम करू शकणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यांना समजावून सांगितलं, की यहोवा देवाच्या सेवेत आणखी वेळ खर्च करता यावा म्हणून मी माझं गायन करिअर सोडत आहे.

मी मि. वॉरींगना सर्व काही सविस्तर सांगत होतो तेव्हा ते आदरपूर्वक माझं बोलणं ऐकत होते; त्यानंतर मग अगदी कोमल आवाजात ते मला जे म्हणाले ते ऐकून मी चकित झालो. ते मला म्हणाले: “बेटा, तू तुझं इतकं यशस्वी करिअर सोडत आहेस म्हणून मला वाईट वाटतंय; मीही आयुष्यभर गायन क्षेत्रात आहे, पण एक गोष्ट मला समजली आहे ती म्हणजे, संगीत हेच जीवन नाही. तू जे काही करशील त्यात देव तुझं भलं करो.” तिथून मी गाडी चालवत घरी येत होतो तेव्हा यहोवाच्या सेवेत माझं जीवन खर्च करण्यास मी मुक्‍त झालो होतो, या जाणीवेनं माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे मला अजूनही आठवतं.

“तुमचा विश्‍वास कुठं गेला?”

ऑगस्टमध्ये माझा पायनियर सोबती, जो ट्रीफ आणि मी आयव्हमधील स्ट्रॉबेरी पॉईन्ट नावाच्या १,२०० जनसंख्या असलेल्या एका लहानशा नगरात सेवा करत होतो. शर्ली तिथं आम्हाला भेटायला आली तेव्हा आम्ही लग्नाच्या गोष्टी केल्या. माझ्याजवळ एक नया पैसा नव्हता आणि तिच्याकडेही नव्हता. मी कमवलेला सर्व पैसा माझ्या बाबांकडे होता. त्यामुळे मी तिला म्हणालो: “मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, पण मग आपलं भागणार कसं? मला महिन्याला फक्‍त ४० डॉलर इतका पायनियर अलाऊन्स मिळतो.” तिच्या नेहमीच्या शांत परंतु अगदी सडेतोड पद्धतीत तिनं मला म्हटलं: “चार्ल्स, तुमचा विश्‍वास कुठं गेला? येशूनं म्हटलं नाही का, की जर आपण राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व यांना प्रथम स्थान दिलं तर आपल्या सर्व गरजा भागवल्या जातील?” (मत्तय ६:३३) आम्ही लग्न करायचं ठरवलं. १९५७ सालच्या नोव्हेंबर १६ तारखेला आम्ही लग्न केलं.

स्ट्रॉबेरी पॉईन्ट नगराबाहेर राहणाऱ्‍या एका शेतकऱ्‍याबरोबर मी बायबलचा अभ्यास करीत होतो; या शेतकऱ्‍याच्या मालकीच्या जागेत जंगलात एक १२ बाय १२  फुटांची लाकडी केबीन होती. त्यात वीजेची, पाण्याची किंवा संडासाची सोय नव्हती. पण आम्हाला हवं तर आम्ही तिथं फुकट राहू शकत होतो. हे अगदी साधं जुन्या पद्धतीचं घर होतं, पण आम्ही विचार केला, की दिवसभर तर आपण सेवेत असू मग आपल्याला फक्‍त रात्री अंग टेकायला जागा हवी आहे.

जवळच एक झरा होता तिथून मी पाणी आणायचो. केबीनमध्ये उष्णतेसाठी आम्ही स्टोव्ह पेटवायचो, केरोसीनच्या प्रकाशात वाचायचो; शर्ली केरोसीनच्या स्टोव्हवर स्वयंपाक करायची. अंघोळीसाठी आम्ही एक जुना वॉशटब वापरायचो. रात्री आम्ही कोल्हेकुई ऐकायचो. आम्ही एकमेकांना साथ द्यायला होतो आणि ख्रिस्ती सेवकांची गरज असलेल्या ठिकाणी आम्ही दोघं मिळून यहोवाची सेवा करत होतो, म्हणून आम्हाला खूप आनंद वाटत होता. ब्रुकलिन मुख्यालयात आता सेवा करणारे बिल मॅलनफॉन्ट आणि त्यांची पत्नी सॅन्ड्रा तेव्हा, सुमारे १०० किलोमीटर दूर आयव्हमधील डिकोर येथे खास पायनियर म्हणून सेवा करत होते. अधूनमधून ते यायचे आणि आमच्याबरोबर संपूर्ण दिवस क्षेत्र सेवा करायचे. हळूहळू, स्ट्रॉबेरी पॉईन्टमध्ये एक लहानशी मंडळी स्थापन झाली; या मंडळीत जवळपास २५ सदस्य होते.

प्रवासी कार्यात

१९६० सालच्या मे महिन्यात आम्हाला विभागीय कार्यासाठी अर्थात प्रवासी सेवेचं आमंत्रण मिळालं. आमचा पहिला विभाग, उत्तर कॅरोलिना होता; आणि यात, रॉली, ग्रीन्झबर, डर्हम ही शहरे आणि अनेक लहान लहान गावे समाविष्ट होती. आमची परिस्थिती जरा सुधरली; म्हणजे आम्ही अनेक कुटुंबांबरोबर राहू लागलो ज्यांच्या घरात वीजेची आणि काही घरात तर आतच संडासाची सोय होती. पण ज्यांच्या घरात संडासं बाहेर होती ते मात्र सावधगिरीचा इशारा द्यायचे. वाटेवर, कॉपरहेड (पीट व्हायपर), खडखड्या साप (रॅटल स्नेक) या विषारी सर्पांपासून सावध राहायला ते आम्हाला सांगायचे!

१९६३ सालच्या सुरवातीला आमची फ्लोरिडामधील एका विभागात बदली झाली तेव्हा मला पेरिकार्डायटिस म्हणजे हृदयावरणाचा दाह झाला; या विकारानं माझी तब्येत अगदीच गंभीर झाली, म्हणजे माझी जगण्याची शक्यताच नव्हती. टंपाच्या बॉब आणि जिनी मॅके यांनी आम्हाला मदत केली नसती तर मी गेलोच असतो. * त्यांनी मला त्यांच्या डॉक्टरांकडे नेलं आणि आमची सर्व बिलं त्यांनीच भरली.

मला मिळालेल्या बाळकडूचा पुढे उपयोग होतो

१९६३ सालच्या उन्हाळ्यात मला, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मोठ्या अधिवेशनाच्या संबंधाने न्यू यॉर्कला बोलवण्यात आलं. यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवक्‍ते, बंधू मिल्टन हेन्शल यांच्याबरोबर मी एका आकाशवाणी केंद्रावरील मुलाखतीसाठी गेलो; लॅरी किंग ही मुलाखत घेणार होते. मि. किंग आजही टीव्हीवरील मुलाखतींचा कार्यक्रम करणारे सुप्रसिद्ध व्यक्‍ती आहेत. ते आमच्याशी अतिशय आदरानं वागले आणि शोनंतर जवळजवळ एक तासभर त्यांनी आम्हाला आमच्या कार्याविषयी अनेक प्रश्‍न विचारले.

त्याच उन्हाळ्यात, कम्युनिस्ट चीनमधील तुरुंगातून नुकतेच सुटून आलेले हॅरल्ड किंग नावाचे एक मिशनरी बंधू साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयातील पाहुणे होते. एके संध्याकाळी जवळजवळ ७०० लोकांसमोर उभं राहून त्यांनी आपले अनुभव सांगितले; चार पेक्षा अधिक वर्षे एकांतवासात असताना त्यांचा विश्‍वास कसा मजबूत झाला होता तेही त्यांनी सांगितले. तुरुंगात असताना त्यांनी बायबल आणि ख्रिस्ती सेवेशी संबंधित असलेल्या विषयांवर गाणी रचली होती.

त्या अविस्मरणीय संध्याकाळी मी ऑड्री नॉर, कार्ल क्लाईन व अनेक वर्षांपासून साक्षीदार असलेले आणि मध्य स्वन गायक म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या फ्रेड फ्रान्झ यांच्यासह “फ्रॉम हाऊस टू हाऊस” हे गीत गायलं; नंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या गीतपुस्तकात या गाण्याचा समावेश करण्यात आला. साक्षीदारांच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्‍या बंधू नेथन नॉर यांनी मला पुढील आठवडी यांकी स्टेडियममध्ये होणाऱ्‍या “सार्वकालिक सुवार्ता” संमेलनात हे गीत गाण्यास सांगितले आणि मी ते गायिले.

प्रवासी कार्यातील अनुभव

इलिनॉयमधील शिकागोत सेवा करत असताना दोन अविस्मरणीय घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे, एका विभागीय संमेलनात, शर्लीनं विरा स्टीवर्टला पाहिलं; विरानं म्हणे शर्ली आणि तिच्या आईला १९४० च्या दशकात कॅनडात साक्ष दिली होती. शर्ली त्या वेळी ११ वर्षांची होती आणि बायबलमधील देवाने दिलेल्या अभिवचनांबद्दल ऐकल्यावर तिला खूप आनंद झाला होता. तिनं विराला विचारलं होतं, “मी त्या नव्या जगात जाऊ शकेन असं वाटतं तुम्हाला?” आणि विरानं तिला उत्तर दिलं होतं: “का नाही, शर्ली!” दोघीही हे शब्द विसरल्या नव्हत्या. विराशी झालेल्या त्या पहिल्या भेटीपासूनच शर्लीला वाटत होतं, की आपण यहोवाची सेवा केली पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे, १९५८ सालच्या हिवाळ्यात, आमच्या घरासमोरच्या देवडीत २५ किलो बटाट्यांचं पोतं ठेवलेलं आठवतं का, असं एका साक्षीदारानं मला विचारलं. मला ते नक्कीच आठवत होतं. एके संध्याकाळी खूप जोराचा बर्फ पडत असताना आम्ही कसेबसे घरी पोहंचलो तेव्हा आम्हाला ते पोतं दिसलं होतं. हे बटाट्यांचं पोतं कोणी ठेवलं हे आम्हाला माहीत नव्हतं; अर्थात आम्ही त्यासाठी यहोवाचेच आभार मानले. पुढच्या पाच दिवसांपर्यंत हिमवर्षावामुळे आम्ही घराबाहेर पडू शकत नव्हतो; तेव्हा आम्ही घरात आनंदानं बसून बटाट्यांचं पॅनकेक, भाजलेले बटाटे, तळलेले बटाटे, कुसकरलेले बटाटे आणि बटाट्याचं सूप खात होतो! आमच्याकडे दुसरं काही नव्हतं! हा साक्षीदार आम्हाला ओळखत नव्हता, आम्ही कुठं राहतो हे देखील त्याला माहीत नव्हतं; पण जवळपासच कुठंतरी राहत असलेले काही पायनियर कष्टात दिवस काढत होते, फक्‍त इतकंच त्यानं ऐकलं होतं. तो म्हणाला, माहीत नाही कोणत्या तरी कारणासाठी मी हे तरुण जोडपं कुठ राहतं, याची चौकशी सुरू केली. शेतकऱ्‍यांना सहसा आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी माहिती असते तेव्हा त्यांनी त्याला आमच्या केबीनकडे पाठवलं होतं आणि त्यानंच ते इतक्या बर्फात आमच्या केबीनसमोर आणून ठेवलं होतं.

केलेल्या निवडींबद्दल मी आभारी आहे

१९९३ साली मला, प्रवासी कार्यात ३३ वर्षं पूर्ण झाली; पण माझी तब्येत बिघडत चालल्यामुळे मला सेवेचा हा सुहक्क सोडावा लागला. शर्ली आणि मी आजारी खास पायनियरांच्या श्रेणीत सामील झालो आणि अजूनही तेच आहोत. प्रवासी कार्य करण्याची ताकद आता माझ्यात उरली नाही याचे मला वाईट वाटत असले तरी, माझ्या तरुणपणाची शक्‍ती मी पूर्ण वेळेच्या सेवेत खर्च केल्याचं समाधान मला आहे.

माझ्या तिन्ही भावांनी वेगवेगळ्या निवडी केल्या. प्रत्येकानं पुढे जाऊन पैसा मिळवण्याचं ठरवलं आणि आज त्यांच्यापैकी एकही यहोवाची सेवा करत नाही. १९५८ साली बाबांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी व आईनं पुष्कळ लोकांना यहोवाला जाणण्यास, आपले जीवन त्याला समर्पित करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास मदत केली. दोघंही १९९९ साली मरण पावले. मी जगिक कीर्ति आणि पैसा मिळवण्यास नकार दिल्यामुळेच माझ्या बाबांना आणि त्यांनी व आईनं ज्यांना बायबल सत्य सांगितलं त्या सर्वांना सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली असं म्हणता येईल. मी पुष्कळदा विचार करतो, की ‘जर मी हा निर्णय घेतला नसता तर मी यहोवाची सेवा करीत राहिलो असतो का?’

विभागीय कार्य सोडल्यानंतर सुमारे पाच वर्षांनंतर माझ्या तब्येतीत जरासा सुधार झाला व मी माझी सेवा पुन्हा वाढवू शकलो. सध्या मी कॅलिफोर्नियातील डेझर्ट हॉट स्प्रिंग्समधील एका मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत आहे. या व्यतिरिक्‍त मला, पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करण्याचा, न्यायदान समितीत सेवा करण्याचा आणि कधीकधी पायनियर सेवा प्रशालेत प्रशिक्षक म्हणून सेवा करण्याचा सुहक्क मिळतो.

आजही शर्ली माझी जीवश्‍च सोबतीण आहे. तिच्या सहवासात मी नेहमी आनंदी असतो. आमच्या दोघांत नेहमी स्फूर्तीदायक आध्यात्मिक संभाषण होत असतं; आम्ही दोघंही उत्साहानं बायबल सत्यांविषयीची चर्चा करतो. ४७ वर्षांपूर्वी शर्लीनं शांत मुद्रेनं मला विचारलेला तो प्रश्‍न मी आजही कृतज्ञतापूर्वक आठवतो: “चार्ल्स, तुमचा विश्‍वास कुठं गेला?” तरुण ख्रिस्ती जोडप्यांनी जर एकमेकांना असा प्रश्‍न विचारला, तर मला वाटतं, पुष्कळांना आमच्याप्रमाणे पूर्ण वेळेच्या सेवेतील आनंदाचा आणि आशीर्वादांचा उपभोग घेता येईल. (g०४ ८/२२)

[तळटीपा]

^ जॉन सिनटको १९९६ साली वयाच्या ९२ व्या वर्षी मरण पावले; ते शेवटपर्यंत यहोवाचे विश्‍वासू साक्षीदार होते.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, परंतु सध्या छापले जात नाही.

^ सावध राहा! याच्या फेब्रुवारी २२, १९७५ च्या इंग्रजी अंकातील १२-१६ पृष्ठांवर, बॉब मॅकेंनी अर्धांगवायुशी सामना कसा केला त्याचे आत्मकथन देण्यात आले आहे.

[२० पानांवरील चित्र]

जॉन काका, १९३५ साली त्यांचा बाप्तिस्मा झाला

[२२ पानांवरील चित्र]

आमची लाकडी केबीन

[२३ पानांवरील चित्र]

१९७५ साली घेतलेला आईबाबांचा फोटो; त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते विश्‍वासू राहिले

[२३ पानांवरील चित्र]

आज शर्लीबरोबर