व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भेदभावांचा अंत

भेदभावांचा अंत

भेदभावांचा अंत

आपल्या स्वतःच्या वर्तनात भेदभाव करण्याच्या प्रवृत्तीची लक्षणे आपल्याला ओळखता येतात का? उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीला नीट ओळखत नसूनही, आपण तिच्या वर्णावरून, राष्ट्रावरून, वंशावरून अथवा जमातीवरून तिच्या चरित्राविषयी निष्कर्ष काढतो का? की आपण प्रत्येक व्यक्‍तीचा तिच्या अंगभूत गुणांमुळे आदर करतो?

येशूच्या काळात, यहुदिया व गालील येथे राहणारे लोक सहसा ‘शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसत.’ (योहान ४:९) तालमुद यात, “माझी नजर चुकूनही शोमरोन्यावर न पडो” अशी एक म्हण होती; त्यावरून बऱ्‍याच यहुद्यांना शोमरोन्यांविषयी कसे वाटायचे हे दिसून येते.

येशूच्या शिष्यांच्या मनातही कदाचित काही प्रमाणात शोमरोन्यांविषयी असाच दुजाभाव असावा. एके प्रसंगी शोमरोनातल्या एका गावात त्यांचे योग्यप्रकारे स्वागत करण्यात आले नाही. तेव्हा याकोब व योहान यांनी आकाशातून अग्नी पडून त्या लोकांचा नाश व्हावा अशी आज्ञा करण्याची येशूला परवानगी मागितली. पण येशूने त्यांचे ताडन केले आणि ही प्रवृत्ती अयोग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.—लूक ९:५२-५६.

नंतर, येशूने एका माणसाचा दृष्टान्त सांगितला. जेरूसलेमपासून जेरिकोला जात असताना या माणसावर लुटारूंनी हल्ला केला. दोन धार्मिक यहुदी त्या वाटेने गेले पण त्यांना या माणसाला मदत करावीशी वाटली नाही. पण एका शोमरोन्याने मात्र या माणसाला पाहिले तेव्हा तो थांबला आणि त्याने या माणसाच्या —जखमांवर पट्ट्या बांधल्या. मग त्याने त्याच्या सुश्रृषेची व्यवस्था केली. या शोमरोन्यानेच खरा शेजारधर्म पाळला. (लूक १०:२९-३७) येशूच्या या दृष्टान्तावरून त्याच्या श्रोत्यांना कदाचित याची जाणीव झाली असावी, की आपल्या भेदभावांमुळे आंधळे होऊन आपण कसे कधीकधी इतरांचे चांगले गुण पाहू शकत नाही. काही वर्षांनंतर योहान परत शोमरोनात आला तेव्हा त्याने येथे कित्येक गावांत प्रचार केला; एकेकाळी ज्या गावाचा तो नाश करू इच्छित होता त्या गावातही कदाचित त्याने प्रचार केला असावा.—प्रेषितांची कृत्ये ८:१४-१७, २५.

प्रेषित पेत्राला जेव्हा एका देवदूताने रोमी शताधिपती कर्नेल्य याच्याकडे जाऊन येशूविषयी सांगण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याला देखील आपले भेदभाव बाजूला सारून कार्य करावे लागले. पेत्राचा यापूर्वी गैरयहुद्यांशी फारसा संबंध आलेला नव्हता; शिवाय, बहुतेक यहुदी रोमी सैनिकांचा तिरस्कार करत होते. (प्रेषितांची कृत्ये १०:२८) पण विदेश्‍यांना प्रचार करण्याची आज्ञा देवाकडून आहे हे पेत्राला कळले तेव्हा त्याने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

भेदभावांवर मात करण्यामागचा हेतू

भेदभाव करण्याची प्रवृत्ती ही येशूने शिकवलेल्या एका मूलभूत तत्त्वाच्या विरोधात आहे: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) केवळ आपल्या जन्माच्या ठिकाणामुळे, वर्णामुळे किंवा पार्श्‍वभूमीमुळे आपल्याला तुच्छ लेखले जावे अशी कोणाचीही इच्छा असेल का? भेदभावांमुळे देवाच्या निःपक्षपाती आदर्शांचाही भंग होतो. बायबल सांगते की यहोवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६) त्याअर्थी सर्व माणसे भाऊभाऊ आहेत.

शिवाय, देव प्रत्येक व्यक्‍तीचा वैयक्‍तिकरित्या न्याय करतो. तिच्या आईवडिलांनी किंवा पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी तो तिला जबाबदार ठरवत नाही. (यहेज्केल १८:२०; रोमकर २:६) एखाद्या देशाने अत्याचार केला असला तरीसुद्धा त्या देशातील लोकांचा द्वेष करणेही निरर्थक आहे कारण झालेल्या अन्यायाला ते सहसा जबाबदार नसतात. येशूने आपल्या अनुयायांना, “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा,” असे शिकवले.—मत्तय ५:४४, ४५.

अशा शिकवणुकींमुळेच पहिल्या शतकातील ख्रिस्ती त्यांच्या मनात असलेले भेदभाव मिटवू शकले आणि एक अनन्यसाधारण आंतरराष्ट्रीय बंधूसमाज उभारू शकले. अनेकविध संस्कृतींचे असूनही ते एकमेकांना बंधू व भगिनी म्हणून संबोधत होते आणि केवळ संबोधत नव्हते तर ते एकमेकांना खरोखर भाऊ मानत होते. (कलस्सैकर ३:९-११; याकोब २:५; ४:११) ज्या तत्त्वांनी त्याकाळी असा चमत्कार घडवून आणला ती आज देखील तितकीच उपयुक्‍त आहेत.

आजच्या काळात भेदभावांचा प्रतिकार

तसे पाहिल्यास, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्‍तीच्या मनात काही पूर्वधारणा असतातच, पण या सर्वच धारणांचे रूपांतर द्वेषपूर्ण भेदभावात होत नाही. “नवी माहिती मिळाल्यावरही जेव्हा पूर्वधारणा बदलत नाही तेव्हा तिचे भेदभावांत रूपांतर होते,” असे द नेचर ऑफ प्रेजुडिस यात म्हटले आहे. बरेचदा, लोकांनी एकमेकांची चांगल्याप्रकारे ओळख करून घेतल्यास हा दुजाभाव नष्ट होऊ शकतो. पण याच पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “केवळ संपर्कात येणे पुरेसे नाही, तर त्यांना एकमेकांसोबत मिळून काही करण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या मनोवृत्तींत बदल होण्याची शक्यता आहे.”

आयबो जमातीच्या जॉन नावाच्या एका नायजेरियन मुलाने अशाचप्रकारे हाऊसा जमातीच्या लोकांविरुद्ध आपल्या मनात असलेल्या भेदभावावर विजय मिळवला. तो सांगतो, “विद्यापीठात माझी काही हाऊसा विद्यार्थ्यांशी भेट झाली, नंतर मैत्री झाली आणि मला जाणवले की या मुलांची जीवनात चांगली तत्त्वे होती. एका हाऊसा विद्यार्थ्यासोबत मला एका संयुक्‍त प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली; आमच्या दोघांची छान जोडी जमली. पूर्वीचा माझा सोबती आयबो होता पण तो स्वतःच्या वाट्याचे काम कधीच करत नसे.”

भेदभावाला तोंड देण्याचे साधन

युनेस्को अगेंस्ट रेसिझम या वृत्तानुसार, “नव्या रूपांतील जातीयवाद, दुजाभाव आणि बहिष्कृती यांना तोंड देण्याकरता शिक्षण हे एक अतिशय अनमोल साधन ठरू शकेल.” यहोवाचे साक्षीदार मानतात की या संदर्भात सर्वात उत्तम साहाय्य देणारे शिक्षण म्हणजे बायबलचे शिक्षण. (यशया ४८:१७, १८) बायबलमधील शिकवणुकींचा जेव्हा लोक अवलंब करतात तेव्हा संशयाच्या ऐवजी आदर आणि द्वेषाच्या ऐवजी प्रेम उत्पन्‍न होते.

भेदभाव मिटवण्याकरता बायबल किती साहायक आहे हे यहोवाचे साक्षीदार अनुभवत आहेत. बायबलमुळेच त्यांना वेगवेगळ्या संस्कृतींच्या व जाती-धर्माच्या लोकांसोबत मिळून कार्य करण्याची प्रेरणा व संधी देखील मिळाली आहे. या लेखमालिकेतील पहिल्या लेखात जिचे शब्द उद्धृत करण्यात आले होते ती क्रिस्टिना यहोवाची साक्षीदार आहे. ती म्हणते, “राज्य सभागृहातील आमच्या सभा माझ्या आत्मविश्‍वासात भर पाडतात. तिथे मला अगदी सुरक्षित वाटते कारण कोणीही माझ्याकडे भेदभावाच्या दृष्टीने पाहते असे मला कधीही जाणवत नाही.”

जासमिन ही देखील एक साक्षीदार आहे. ती अवघ्या नऊ वर्षांची होती तेव्हा तिला जातीयवादामुळे पहिल्यांदा अन्याय सोसावा लागल्याचे आठवते. ती म्हणते, “गुरुवारची संध्याकाळ ही मला आठवड्यातली सर्वात सुखद संध्याकाळ वाटते कारण त्या दिवशी मी राज्य सभागृहात जाते. तिथे सर्वजण माझ्याशी प्रेमाने वागतात. मला तुच्छ लेखण्याऐवजी मी कोणीतरी विशेष आहे अशी मला जाणीव करून देतात.”

यहोवाच्या साक्षीदारांनी राबवलेल्या स्वयंसेवक कार्यक्रमांतही अनेक वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींचे लोक एकत्र येतात. सायमन याचा जन्म ब्रिटनमध्ये झाला; मुळात त्याचे कुटुंब कॅरिबियनचे आहे. बांधकाम कंपन्यांमध्ये गवंडीकाम करताना त्याला अनेकांकडून दुजाभाव सहन करावा लागला. पण आपल्या विश्‍वासातील बांधवांसोबत अनेक वर्षे स्वयंसेवक प्रकल्पांत काम करताना मात्र असे घडले नाही. सायमन सांगतो, “मी अनेक देशांच्या साक्षीदारांसोबत काम केले आहे, पण आम्ही एकमेकांसोबत जुळवून घेण्यास शिकलो. माझे सर्वात जवळचे मित्र इतर देशांचे व इतर पार्श्‍वभूमींचे होते.”

अर्थात यहोवाचे साक्षीदार देखील अपरिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांनाही भेदभावाकडे झुकणाऱ्‍या प्रवृत्तींचा प्रतिकार करावा लागू शकतो. पण देव पक्षपाती नाही हे नेहमी मनात बाळगल्यामुळे त्यांना असे करण्याची स्फूर्ती व प्रेरणा मिळते.—इफिसकर ५:१, २.

भेदभावाचा प्रतिकार केल्याने अनेक उत्तम परिणाम घडून येतात. इतर पार्श्‍वभूमींच्या लोकांसोबत आपण उठतो बसतो तेव्हा आपल्याला जीवनात बरेच काही नवनवीन शिकायला मिळते. शिवाय देव लवकरच आपल्या राज्याच्या माध्यमाने एका नव्या मानवी समाजाची उभारणी करेल जेथे कधीही कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. (२ पेत्र ३:१३) तेव्हा, भेदभावाचे कायमचे उच्चाटन झालेले असेल. (g०४ ९/८)

[११ पानांवरील चौकट]

मी भेदभावांना थारा देतो का?

तुम्ही नकळत काही भेदभाव बाळगता का हे जाणून घेण्याकरता खालील प्रश्‍न स्वतःला विचारा:

१. विशिष्ट जातीच्या, प्रदेशाच्या अथवा राष्ट्राच्या लोकांत, बुद्धूपणा, आळशीपणा किंवा कंजुषपणा यांसारखे अवगुण हमखास असतात असे मी गृहीत धरतो का? (विनोदाकरता सांगितल्या जाणाऱ्‍या अनेक चुटक्यांमुळे अशाप्रकारचे भेदभाव पसरतात.)

२. माझ्या आर्थिक अथवा सामाजिक समस्यांकरता मी इतर देशांतून स्थाईक झालेल्यांना किंवा इतर वांशिक गटाच्या लोकांना जबाबदार ठरवतो का?

३. माझ्या राहत्या प्रदेशाचे दुसऱ्‍या एखाद्या देशाशी ऐतिहासिक शत्रुत्व असल्यास मी यामुळे त्या देशाच्या लोकांचा द्वेष करतो का?

४. मी ज्या कोणाला भेटतो त्याचा वर्ण, संस्कृती किंवा वांशिक पार्श्‍वभूमी कोणतीही असली तरीसुद्धा, मी त्याला एक स्वतंत्र व्यक्‍ती म्हणून पाहू शकतो का?

५. माझ्यापेक्षा वेगळ्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाल्यास मी तिचा फायदा घेतो का? अशा लोकांशी ओळख वाढवण्याचा मी प्रयत्न करतो का?

[८ पानांवरील चित्र]

चांगल्या शोमरोन्याच्या दृष्टान्तातून येशूने भेदभावावर कशी मात करायची ते शिकवले

[८ पानांवरील चित्र]

कर्नेल्याच्या घरी, पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे”

[९ पानांवरील चित्र]

बायबलचे शिक्षण अनेक वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांना जवळ आणते

[९ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार जे शिकतात त्याचे पालन करतात

[१० पानांवरील चित्र]

क्रिस्टिना“राज्य सभागृहातील सभा माझ्या आत्मविश्‍वासात भर पाडतात”

[१० पानांवरील चित्र]

जासमिन“लोक माझ्याशी प्रेमाने वागतात. मला तुच्छ लेखण्याऐवजी मी कोणीतरी विशेष आहे अशी मला जाणीव करून देतात”

[१० पानांवरील चित्रे]

सायमन, बांधकाम स्वयंसेवक“आम्ही एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकलो”