व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?

तरुण लोक विचारतात . . .

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?

“मी कधीकधी विचार करतो, की लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणं खरंच इतकं चुकीचं आहे का, मी अजूनही संबंध ठेवले नाहीत, याचंच मला आश्‍चर्य वाटतं.”—जॉर्डन. *

“एकदा तरी लैंगिक संबंध ठेवायचा मोह मला खूप होतो. मला वाटतं, की आपल्या सर्वांमध्येच अशी एक नैसर्गिक इच्छा असते. तुम्ही कुठंही जा, सगळीकडे सेक्सच्याच गोष्टी चाललेल्या असतात!” असे केल्ली म्हणते.

जॉर्डन आणि केल्ली यांच्यासारख्या भावना तुमच्याही मनात येतात का? लग्नाआधी लैंगिक संबंधांचा निषेध करणारे पारंपरिक रीतिरिवाज आणि मूल्ये आज कोण मानतंय? (इब्री लोकांस १३:४) एका आशियाई राष्ट्रात घेतलेल्या सर्व्हेत असे आढळून आले, की लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे केवळ स्वीकारणीयच नव्हे तर अपेक्षित आहे, असे १५ ते २४ वयोगटातील बहुसंख्य तरुण मुलांना वाटते. म्हणूनच जगभरात, बहुतेक तरुणांनी १९ वे वर्ष गाठण्याआधीच लैंगिक संबंध ठेवलेले असतात.

असेही काही तरुण आहेत जे लैंगिक संबंध ठेवत नाहीत परंतु पर्यायी लैंगिक वर्तन आचरतात, जसे की एकमेकांच्या लैंगिक अवयवांना कुरवाळणे (याला कधीकधी परस्पर हस्तमैथुन म्हटले जाते). द न्यू यॉर्क टाईम्स बातमीपत्रकातील एका धक्कादायक अहवालात आढळून आले, की “मौखिक सेक्स सहसा लैंगिक कार्यहालचालींचे पहिले पाऊल असते; अनेक तरुणांच्या मते यामुळे लैंगिक संबंधांइतकी जास्त जवळीक होत नाही व ते कमी धोकादायक असते, . . . [आणि] यामुळे अनावश्‍यक गर्भधारणा टाळता येते व आपले कौमार्य टिकवून ठेवता येते.”

पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी लैंगिक संबंधांविषयी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? लैंगिक संबंधांऐवजी जे पर्यायी लैंगिक वर्तन आहे त्याविषयी काय? देवाला हे स्वीकार्य आहे का? ते सुरक्षित आहे का? यामुळे खरोखरच एखाद्याचे कौमार्य टिकते का?

जारकर्मात काय काय समाविष्ट आहे

या प्रश्‍नांची विश्‍वसनीय उत्तरे फक्‍त आपला निर्माणकर्ता यहोवा देव याच्याकडूनच मिळू शकतात. त्याचे वचन आपल्याला “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असे सांगते. (१ करिंथकर ६:१८) याचा नेमका काय अर्थ होतो? जारकर्म असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, केवळ लैंगिक संबंधालाच नव्हे तर विविध अश्‍लील कार्यांना सूचित करतो. तेव्हा, जर दोन अविवाहित व्यक्‍ती मौखिक सेक्स करत असतील किंवा एकमेकांच्या लैंगिक अवयवांना कुरवाळत असतील तर ते जारकर्माचे दोषी आहेत.

परंतु देवाच्या नजरेत, त्यांनी आपले कौमार्य टिकवून ठेवले आहे असे म्हणता येईल का? बायबलमध्ये “कुमारी” हा शब्द नैतिक शुद्धतेचे प्रतिक म्हणून वापरण्यात आला आहे. (२ करिंथकर ११:२-६) परंतु तो शब्द शारीरिक अर्थाने देखील वापरला जातो. बायबलमध्ये रिबका नावाच्या एका तरुण स्त्रीविषयी सांगितले आहे. “ती कुमारी होती; कोणा पुरुषाने तिच्याशी समागम केला नव्हता,” असे बायबल तिच्याविषयी म्हणते. (उत्पत्ति २४:१६, NW) मूळ हिब्रू भाषेत “समागम” या शब्दात, स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक समागमाव्यतिरिक्‍त असलेल्या इतर कार्यांचा देखील समावेश होता. (उत्पत्ति १९:५) तेव्हा, बायबलनुसार, एखादा तरुण अथवा तरुणी कोणत्याही प्रकारचे जारकर्म करत असेल तर त्याने अथवा तिने आपले कौमार्य टिकवून ठेवले आहे असे म्हणता येणार नाही.

केवळ जारकर्मापासूनच नव्हे तर जारकर्माकडे नेऊ शकणाऱ्‍या सर्व प्रकारच्या अशुद्ध वर्तनापासून पळ काढण्याचा कडक सल्ला बायबल ख्रिश्‍चनांना देते. * (कलस्सैकर ३:५) अशी भूमिका घेतल्यामुळे इतर जण तुमची कदाचित थट्टा करतील. “‘तू काय चुकवतेस हे तुला माहीत नाही!’ हे बोलणं मी माझ्या उच्च शाळेदरम्यान सारखं ऐकत आले आहे,” असे केल्ली नावाची एक ख्रिस्ती तरुणी म्हणते. परंतु, लग्नाआधीचे लैंगिक संबंध दुसरे काही नसून “पापाचे क्षणिक सुख” आहे. (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस ११:२५) यामुळे आयुष्यभराची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक हानी होऊ शकते.

गंभीर धोके

राजा शलमोनाने एकदा एका तरुणाला विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी फुसलावले जात असल्याचे पाहिले, असे बायबल आपल्याला सांगते. शलमोनाने या तरुणाची तुलना एका बैलाशी केली ज्याला ‘कापायला नेले जाते.’ कापायला नेल्या जाणाऱ्‍या बैलाला, आपल्याला काय होणार आहे याची जरासुद्धा कल्पना नसते. विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवणारे तरुण काहीसे असेच वागतात—आपल्या कार्यांचे गंभीर परिणाम होतील याबद्दल त्यांना काहीच काळजी नसल्यासारखे ते वागतात! शलमोन त्या तरुणाविषयी म्हणतो, की “आपला जीव” यांत गोवलेला आहे हे तो जाणत नाही. (नीतिसूत्रे ७:२२, २३) होय, तुमचा “जीव” अर्थात तुमचे जीवन धोक्यात आहे.

जसे की, दर वर्षी लाखो तरुणांना लैंगिकरित्या संक्रमित आजार (एसटीडी) होतात. “मला जेव्हा कळलं, की मला हर्पीस आहे तेव्हा मला कुठं तरी दूर पळून जावंसं वाटलं,” असे लिडिया म्हणते. हळहळ व्यक्‍त करीत ती पुढे म्हणते: “हा आजार खूप वेदनादायक आहे, यावर काहीच उपाय नाही.” संपूर्ण जगभरातील सर्व नवीन एचआयव्ही केसेसपैकी (दिवसाला ६,०००) निम्म्याहून अधिक केसेस, १५ व २४ वयोगटातील तरुणांच्या आहेत.

स्त्रिया खासकरून विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवल्यामुळे होणाऱ्‍या आजारांना बळी पडतात. खरे तर, लैंगिकरित्या संक्रमित आजारांचा (आणि एचआयव्हीचा) धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक असतो. एखाद्या अल्पवयीन मुलीला दिवस गेले तर तिला आणि तिच्या पोटात वाढणाऱ्‍या बाळाला पुढे धोका होऊ शकतो. का? कारण तिचे शरीर, बाळाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी अद्याप तयार झालेले नसते.

एखाद्या किशोरवयीन मातेला गंभीर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला नसला तरीसुद्धा पुढे पालक झाल्यामुळे तिच्यावर आलेल्या गंभीर जबाबदाऱ्‍या तिला पेलाव्या लागतील. पुष्कळ मुलींना नंतर समजते, की स्वतःचे पोट भरणे आणि नवजात बाळाची काळजी घेणे हे त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठीण असते.

याशिवाय, आध्यात्मिक व मानसिक परिणामही आहेत. राजा दावीदाने केलेल्या लैंगिक पापामुळे देवाबरोबरची त्याची मैत्री धोक्यात आली आणि त्याचा आध्यात्मिक नाश होता होता वाचला. (स्तोत्र ५१) दावीद आध्यात्मिकरीत्या बरा झाला परंतु त्याच्या पापाचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागले.

आज तरुणांनाही असेच परिणाम भोगावे लागतात. उदाहरणार्थ, शेरी फक्‍त १७ वर्षांची होती तेव्हा तिचे एका मुलाबरोबर संबंध होते. तिला वाटले, की तो तिच्यावर प्रेम करतोय. या गोष्टीला अनेक वर्ष झाली असली तरी आजही तिला तिच्या वागण्याचा पस्तावा होतो. ती खेदाने म्हणते: “मी बायबलमधील सत्याला फारसं महत्त्व दिलं नाही आणि यामुळे गंभीर परिणाम भोगले. सर्वात वाईट म्हणजे मी यहोवाची मर्जी गमावली.” ट्रीश नावाची आणखी एक तरुणीही कबूल करते: “लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्याची सर्वात मोठी घोडचूक मी माझ्या जीवनात केली. माझं कौमार्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.” होय, मनावर झालेले घाव वर्षानुवर्षे ताजे राहू शकतात; यामुळे मानसिक पीडा आणि त्रास होतो.

आत्मसंयम बाळगण्यास शिका

तरुण शॅन्डा हा महत्त्वाचा प्रश्‍न विचारते: “लैंगिक इच्छा या लग्नानंतरच तृप्त केल्या पाहिजेत हे माहीत आहे ना, मग देव अशा इच्छा तरुणांना देतोच का?” हे खरे आहे, की लैंगिक इच्छा “भर तारुण्यात” अतिशय तीव्र असू शकतात. (१ करिंथकर ७:३६, NW) खरे पाहता, किशोरवयीनांना कधीकधी अचानक कोणत्याही कारणाविना लैंगिक इच्छा जागृत झाल्याचा अनुभव येतो. पण असे होणे वाईट नाही. प्रजोत्पादन अंगांचा विकास होत असताना असे होणे नैसर्गिक आहे. *

हेही खरे आहे, की यहोवाने लैंगिक संबंधांतून आनंद मिळावा म्हणून ते निर्माण केले. हे मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या मूळ उद्देशाच्या एकवाक्यतेत होते; मानवांची संपूर्ण पृथ्वीवर संख्या वाढावी असा त्याचा उद्देश होता. (उत्पत्ति १:२८) परंतु, मानवांनी आपल्या जननीय अंगांचा दुरुपयोग करावा, असे देवाने केव्हाही योजिले नाही. बायबल म्हणते: “पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.” (१ थेस्सलनीकाकर ४:५) प्रत्येक लैंगिक इच्छा पूर्ण करणे हे, तुम्हाला प्रत्येक वेळा राग येतो तेव्हा कोणाला तरी ठोसा मारण्यासारखे असेल; हा मूर्खपणा ठरेल.

लैंगिक संबंध हे देवाकडून मिळालेले बक्षीस आहे; एक असे बक्षीस ज्याचा उचित वेळी अर्थात विवाह झाल्यानंतरच उपभोग घेतला पाहिजे. विवाहाबाह्‍य संबंधांचा आपण आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देवाला कसे वाटते? समजा, तुम्ही तुमच्या मित्रासाठी एखादी भेटवस्तू विकत घेतली आहे. पण तुम्ही ती त्याला देण्याआधीच तो, ती भेटवस्तू चोरतो! तुम्हाला निश्‍चित्तच त्याचा राग येईल. आता विचार करा, एखादी व्यक्‍ती विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवण्याद्वारे देवाने दिलेल्या बक्षीसाचा गैरवापर करते तेव्हा देवाला कसे वाटत असावे?

तुमच्या मनात लैंगिक इच्छा जागृत होतात तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्यांच्यावर ताबा ठेवायला शिका. “जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो [देव] राहणार नाही” ही स्वतःला आठवण करून द्या. (स्तोत्र ८४:११) गॉर्डन नावाचा एक तरुण म्हणतो: “लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात इतकं काही वाईट नाही, असं जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा मी लगेच यामुळे होणाऱ्‍या वाईट आध्यात्मिक परिणामांचा विचार करतो; मग मला ही जाणीव होते, की यहोवाबरोबरचा माझा नातेसंबंध गमावण्याइतकं कोणतंही पाप सुखदायक नाही.” आत्मसंयम ठेवणे सोपे नसेल. पण “यामुळे तुमचा विवेक शुद्ध राहतो, यहोवाबरोबरचा तुमचा नातेसंबंध टिकतो आणि तुमच्या कार्यांबद्दल कसलीही अपराधी भावना न बाळगता तुम्ही अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित ठेवू शकता,” अशी एड्रीन नावाच्या एक तरुणाने आठवण करून दिली.—स्तोत्र १६:११.

सर्व प्रकारच्या “जारकर्मापासून स्वतःला अलिप्त” ठेवण्यासाठी अनेक सबळ कारणे आहेत. (१ थेस्सलनीकाकर ४:३) कबूल आहे, सर्वच प्रसंगी हे सोपे नसेल. आगामी लेखात, ‘स्वतःला शुद्ध राखण्याच्या’ व्यावहारिक मार्गांची चर्चा करण्यात येईल.—१ तीमथ्य ५:२२. (g०४ ७/२२)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ जारकर्म, अशुद्धता, स्वैरवर्तन यांविषयी अधिक माहितीसाठी, “यंग पिपल आस्क . . . हाऊ फार इज ‘टू फार’?” हा सावध राहा! याच्या ऑक्टोबर २२, १९९३ अंकातील लेख पाहा.

^ आमच्या या नियतकालिकाच्या अर्थात सावध राहा! याच्या फेब्रुवारी ८, १९९० च्या अंकातील, “यंग पिपल ऑस्क . . . वाय इज धीस हॅपनींग टू माय बॉडी?” हा लेख पाहा.

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

कोणत्याही प्रकारचे जारकर्म करणाऱ्‍या तरुणाने देवाच्या नजरेत आपले कौमार्य टिकवून ठेवले आहे असे म्हणता येईल का?

[१७ पानांवरील चित्र]

देवाला भिऊन वागणाऱ्‍या तरुणाने लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याचा विवेक डागाळला जाईल

[१८ पानांवरील चित्र]

लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणाऱ्‍यांना लैंगिकरित्या संक्रमित आजार होण्याची दाट शक्यता आहे