व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काचबिंदू—दृष्टिचोर

काचबिंदू—दृष्टिचोर

काचबिंदू—दृष्टिचोर

एका क्षणासाठी या वाक्यातील शेवटल्या शब्दावर आपले लक्ष केंद्रित करा. डोळे न हलवता, तुम्हाला या मासिकाचा वरचा, खालचा किंवा बाजूचाही भाग दिसतो का? नक्कीच दिसत असावा; परिघीय दृष्टीमुळे हे शक्य होते. यामुळे, संशयित दिसणारी एक व्यक्‍ती तुमच्या बाजूने तुमच्या दिशेने चालत येत असल्याची तुम्हाला जाणीव होते. परिघीय दृष्टिमुळेच तुम्ही, पायाखाली येणाऱ्‍या वस्तू ओलांडून जाऊ शकता किंवा तुम्ही भिंतीवर जाऊन आदळत नाही. तुम्ही कार चालवत असाल तर परिघीय दृष्टिमुळे तुम्ही, रस्त्याच्या कडेने चाललेला एक पादचारी आता रस्त्यावर आला आहे हे दिसल्यामुळे सावध होता.

पण तुम्ही हे वाचत असतानाच तुमची परिघीय दृष्टी—तुम्हाला जाणीव नसताना हळूहळू नाहीशी होऊ शकते. संपूर्ण जगभरात, अंदाजे ६.६ कोटी लोकांना, काचबिंदूच्या गटातच समाविष्ट असलेल्या डोळ्यांचे विकार होतात. यांपैकी, ५० लाखांपेक्षा अधिक लोकांना पूर्णपणे अंधत्व आले आहे; यामुळे काचबिंदूचा, कायमचे अंधत्व आणणाऱ्‍या विकारांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. पण, “विकसित राष्ट्रांत, काचबिंदूविषयी जनजागृती कार्यक्रमांद्वारे शिक्षण देऊनही काचबिंदूचा विकार असलेल्या अर्ध्या लोकांना डॉक्टरांनी तपासलेले नसते,” असे द लॅन्सेट नावाचे वैद्यकीय मासिक म्हणते.

काचबिंदू कोणाला होण्याची शक्यता आहे? त्याचे निदान कसे केले जाते आणि त्यावर कोणता उपचार दिला जातो?

काचबिंदू म्हणजे काय?

आधी आपण आपल्या डोळ्यांविषयी थोडे माहीत करून घेतले पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या काचबिंदू संस्थेने बनवलेल्या एका माहितीपत्रकात असे म्हटले आहे: “डोळ्याला त्याचा आकार, दाबामुळे मिळतो—एखाद्या टायरप्रमाणे किंवा फुग्याप्रमाणे तसेच डोळ्याच्या मृदू कोशिका फुगलेल्या असतात.” डोळ्याच्या आत, मांसपेशी, रक्‍तवाहिन्यांतून नेत्रजल डोळ्यात खेळवतात. “हे द्रव्य डोळ्याच्या अगदी आतपर्यंत जाऊन डोळ्यातील जिवंत रचनांना पोषण देते व ट्रॉबेक्यूलर मेशवर्क म्हटल्या जाणाऱ्‍या गाळणीसारख्या नलिकांच्या जाळ्यांतून नेत्रांतील नीलांमध्ये पुन्हा वाहून नेले जाते.”

या द्रव्यशोषणाला कोणत्याही कारणास्तव रोध उत्पन्‍न झाला तर नेत्रजलाचा दाब वाढतो व त्यामुळे डोळ्याच्या मागे असलेल्या नाजूक मज्जापेशींचा हळूहळू ऱ्‍हास होऊ लागतो. या अवस्थेला ओपन अँगल ग्लॉकोमा (चिरकारीकाचबिंदू) असे म्हणतात आणि सर्व केसेसपैकी ९० टक्के रोग्यांना हा विकार होतो.

तुमच्या डोळ्यातील अंतर्दाब, ज्याला इन्ट्राऑक्यूलर प्रेशर (आयओपी) म्हणतात, यात दिवसाच्या चोवीस तासात फरक पडू शकतो. आणि तुमचे हृदयस्पंदन, तुम्ही जितके जलयुक्‍त पेये प्राशन करता त्याचा आणि तुमच्या शरीराची स्थिती अशा अनेक कारणांचा या अंतर्दाबावर परिणाम होतो. या प्राकृत फरकांमुळे तुमच्या डोळ्याला हानी होत नाही. डोळ्यातील दाब वाढलेला असेल तर तुम्हाला काचबिंदू आहे असा आपोआप निष्कर्श काढता येत नाही कारण प्रत्येक व्यक्‍तीच्या डोळ्यातील प्राकृत अंतर्दाब वेगवेगळा असतो. तरीपण, उच्च अंतर्दाब, हे काचबिंदूच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे.

या विकारांपैकी, अँगल-क्लोजर ग्लॉकोमा हा विकार, क्वचित होणारा विकार आहे. तो ओपन-अँगल ग्लॉकोमापेक्षा वेगळा विकार आहे; या विकारात, डोळ्यातील अंतर्दाब अचानक वाढतो. यामुळे डोळ्यात भयंकर वेदना होऊन दृष्टी अंधूक होते व उलट्या वगैरे लक्षणे दिसू लागतात. लक्षणे दिसल्यावर वेळच्या वेळी उपचार न झाल्यास पूर्ण अंधत्व येऊ शकते. आणखी एक प्रकार आहे सेकंड्री ग्लॉकोमा. या नावावरून सूचित होते त्याप्रमाणे, हा विकार, डोळ्यांतील इतर अवस्थांमुळे जसे की डोळ्यांत गाठी आल्यामुळे, मोतीबिंदूमुळे किंवा डोळ्याला इजा झाल्यामुळे होतो. फार कमी संख्येच्या लोकांना कॉन्जेनीटल ग्लॉकोमा (जन्मजात प्रकार) नावाचा चवथा प्रकार होतो. जन्मतःच किंवा जन्म झाल्यानंतर काही कालावधीतच हा विकार होतो; यामुळे बाळाचे नेत्रगोल सामान्य आकारापेक्षा मोठे असतात आणि त्याला प्रकाश सहनच होत नसतो.

तो दृष्टी कसा ‘चोरतो’?

काचबिंदू तुमच्या एका डोळ्याची ९० टक्के दृष्टी तुमच्या नकळत चोरू शकतो. हे कसे शक्य आहे? आपल्या सर्वांच्या डोळ्यात, मागच्या बाजूला एक काळा ठिपका असतो. दृष्टिपटलावरील हा ठिपका अर्थात अंधबिंदू येथे प्रकाशग्राही कोशिका अजिबात नसतात; याच ठिकाणी पेशींचे तंतू एकत्र येऊन दृष्टिपेशी तयार होते. तुम्हाला या काळ्या ठिपक्याची मुळीच जाणीव नसते, कारण तुमच्या मेंदूत, एखाद्या चित्राचे न दिसणारे भाग ‘घालण्याची’ क्षमता आहे. मेंदूत असलेल्या या क्षमतेमुळेच खरे तर काचबिंदू चोरपावलांनी डोळ्याचा नाश करू लागतो.

ऑस्ट्रेलियातील नामवंत नेत्ररोगविशारद डॉ. आयव्हन गोल्डबर्ग यांनी सावध राहाला! सांगितले: “काचबिंदू, एखाद्या व्यक्‍तीच्या न कळत तिची दृष्टी चोरतो; कारण त्या व्यक्‍तिला या विकाराची कसलीच लक्षणे आधी दिसत नाहीत. काचबिंदूच्या सर्वात सामान्य प्रकारातील एक प्रकार आहे जो हळूहळू वाढत जातो; यात कसलीच लक्षणे दिसत नाहीत. डोळ्याला मेंदूशी जोडणाऱ्‍या तंत्रिकांचा ऱ्‍हास होऊ लागतो. तुमच्या डोळ्यातून पाणी येते किंवा येत नाही, तुमचे डोळे कोरडे झाले आहेत किंवा झाले नाहीत, तुम्हाला स्पष्ट वाचता येते किंवा येत नाही याचा काचबिंदूशी कसलाच संबंध नसतो. वरून तुमचे डोळे अगदी निरोगी दिसतील परंतु तुम्हाला कदाचित गंभीरप्रकारचा काचबिंदूचा विकार असू शकतो.”

चोराला शोधून काढणे

तुम्हाला काचबिंदूचा विकार आहे किंवा नाही हे एकाच चाचणीत सांगता येईल अशाप्रकारची एकही चाचणी उपलब्ध नाही. टोनोमीटर नावाच्या उपकरणाचा उपयोग करून नेत्ररोगतज्ज्ञ तुमच्या डोळ्यांतील द्रव्यदाबाचे परीक्षण करून सुरुवात करतील. या उपकरणाद्वारे तुमच्या डोळ्याच्या समोरचा भाग अर्थात स्वच्छमंडल हळूहळू चपटे केले जाते. असे करण्यासाठी लागणाऱ्‍या दाबाची मोजणी केली जाते; अशाप्रकारे तुमच्या डोळ्यांतील दाब तपासता येतो. नेत्ररोगतज्ज्ञ तुम्हाला काचबिंदूचा विकार आहे की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा उपयोग करून, डोळ्याला मेंदूशी जोडणाऱ्‍या तंत्रिकांमध्ये एखादी तंत्रिका खराब झाली आहे का, हे पाहतील. डॉ. गोल्डबर्ग म्हणतात: “डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेले तंत्रिका तंतू किंवा रक्‍त कोशिका फुगलेल्या आहेत का, हे आम्ही पाहतो; कारण तंत्रिका खराब होत असल्याचे हे एक लक्षण आहे.”

दुसरी एक तपासण्याची पद्धत आहे जिला, दृष्टिक्षेत्र तपासणी म्हणतात. डॉ. गोल्डबर्ग म्हणतात: “या पद्धतीत, एका व्यक्‍तीला पांढरा प्रकाश असलेल्या एका वाटीत पाहायला सांगितले जाते; वाटीच्या आत एका लहानशा बिळातून खूपच तेजस्वी असलेला पांढरा प्रकाश येत असतो. रुग्ण जेव्हा हा पांढरा शुभ्र लहानसा प्रकाश ठिपका पाहतो तेव्हा एक बटन दाबतो.” हा प्रकाश ठिपका दृष्टिक्षेत्राच्या बाहेरच्या बाजूला नेल्यावर जर तो रुग्णाला दिसला नाही तर याचा अर्थ रुग्णाला काचबिंदूचा विकार झाला आहे. परंतु, या लांबलचक उपचारपद्धतीपेक्षा अधिक सोपी पद्धत काढण्यासाठी नवनवीन उपकरणांचा शोध लावला जात आहे.

काचबिंदू कोणाला होण्याची शक्यता आहे?

पॉलला नुकतेच चाळीसाव्वे लागले आहे; तो अगदी ठणठणीत आहे. तो म्हणतो: “मी, नवीन चष्मा बनवण्यासाठी म्हणून चष्म्याच्या दुकानात गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं, की तुमच्या घरात कुणाला काचबिंदू आहे का. मी घरी आल्यावर विचारपूस केल्यावर कळलं, की माझ्या मावशीला आणि मामाला दोघांनाही काचबिंदू होता. त्यानंतर मग मला एका नेत्रतज्ज्ञांकडे पाठवण्यात आले ज्यांनी, मला काचबिंदू असल्याचे सांगितले.” डॉ. गोल्डबर्ग म्हणतात: “तुमच्या आईला किंवा वडिलांना काचबिंदू असेल तर तुम्हाला काचबिंदू होण्याची तीन ते पाच पट शक्यता आहे. तुमच्या भावाला किंवा बहिणीला काचबिंदू असेल तर तुम्हाला काचबिंदू होण्याची पाच ते सात पट शक्यता आहे.”

अमेरिकेतील काचबिंदू संस्थेचे डॉ. केव्हीन ग्रीनीज इतर लक्षणांविषयी देखील सांगतात: “तुम्ही चाळीशी ओलांडली असेल आणि आफ्रिकन वंशाचे असाल किंवा पुढील कोणत्याही प्रवृत्ती असतील, जसे की—कुटुंबात कोणाला तरी काचबिंदू आहे, लघुदृष्टीदोष, मधुमेह आहे, पूर्वी कधीतरी डोळ्याला इजा झाली असेल किंवा कोर्टीसोन/स्टीरॉईड्‌स असलेल्या औषधांचा सतत वापर केला असेल तर दर वर्षी आपले डोळे आवश्‍य तपासून घ्या.” धोका नसला व तुम्ही ४५ वर्षांखाली असला तरीसुद्धा दर चार वर्षांनी, काचबिंदू आहे की नाही हे पाहण्यासाठी आपले डोळे तपासून घ्या, असा सल्ला संस्था देते. तुम्ही जर पंचेचाळीशी ओलांडली असेल तर तुम्ही दर दोन वर्षींनी ही तपासणी केली पाहिजे.

उपचार करा आणि चोराला पिटाळून लावा

पॉलला काचबिंदूसाठी दिलेल्या उपचारात त्याला दिवसातून एकदा एक खासप्रकारचे औषध डोळ्यात घालावे लागते. पॉल म्हणतो: “मी डोळ्यात जे औषध घालतो त्यामुळे, नेत्रगोलात नेत्रजलाचे उत्पन्‍न कमी होते.” याशिवाय पॉलने आणखी एक उपचार घेतला; यात एका लेसर शाल्यक्याने त्याच्या डोळ्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या प्राकृत पोकळ्यांजवळ जवळजवळ दहा बारीक पोकळ्या ‘करण्यात’ आल्या. तो म्हणतो: “पहिल्यांदा जेव्हा मी हा लेसर उपचार घेतला तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, मला भीती वाटत होती; यामुळे मला जरा जास्तच त्रास झाला. पण काही दिवसांनंतर जेव्हा माझ्या दुसऱ्‍या डोळ्यावर उपचार करण्यात आले तेव्हा मी व्यवस्थित होतो; कारण, डॉक्टर काय करतील हे मला माहीत होतं. मी अगदी निश्‍चिंत होतो आणि मला काही कळायच्या आतच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून टाकली होती.” या उपचारामुळे पॉलच्या डोळ्यांतील अंतर्दाब स्थिर राहण्यास मदत झाली आहे.

यामुळे पॉलला आशा आहे; तो म्हणतो: “माझ्या दृष्टिपटलाला थोडीशी इजा झाली आहे खरी परंतु माझी परिघीय दृष्टी अजूनही शाबूत आहे म्हणून मला आनंद वाटतो. मला जर रोज डोळ्यांत औषध टाकण्याची आठवण राहिली तर कदाचित माझी परिघीय दृष्टी अशीच शाबूत राहील.”

हा ‘दृष्टिचोर’ तुमची दृष्टी चोरत आहे का? तुम्हाला काचबिंदू आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमचे डोळे कधी तपासले नसतील—आणि खासकरून तुम्ही कोणत्याही रिस्क गटातील असाल तर, आपल्या नेत्रवैद्याला काचबिंदूची तपासणी करण्यास सांगणे सुज्ञपणाचे ठरेल. डॉ. गोल्डबर्ग म्हणतात: “वेळीच व उचित उपचार घेऊन काचबिंदूमुळे होणारी इजा टाळता येऊ शकते.” होय, या दृष्टीचोराला तुम्ही पकडू शकता! (g०४ १०/८)

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्हाला काचबिंदूचा विकार होण्याची शक्यता वाढते जर

● तुम्ही आफ्रिकन वंशाचे आहात

● तुमच्या कुटुंबात कोणाला तरी काचबिंदूचा विकार आहे

● तुम्हाला मधुमेह आहे

● तुम्हाला लघुदृष्टिविकार आहे

● काही मलमांमध्ये व दम्याच्या फवाऱ्‍यांमध्ये वापरले जाणारे कोर्टीसोन/स्टरॉईड, नियमित व दीर्घकाळापासून घेत असाल

● तुमच्या डोळ्याला इजा झाली असेल

● तुम्ही पंचेचाळीशी ओलांडली आहे

[चित्र]

नियमितरीत्या डोळ्यांची तपासणी केल्याने दृष्टिनाश होण्याचे टाळता येऊ शकते

[२७ पानांवरील रेखाचित्र/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

ओपन अँगल ग्लॉकोमा

स्वच्छमंडल

कृष्णमंडल

भिंग

दृष्टिपटल

दृग्‌बिंबाजवळ किंवा काळ्या ठिपक्याजवळ मज्जापेशी एकत्र येतात; तेथे दृष्टिपेशी तयार होते

दृष्टिपेशी मेंदूकडे दृश्‍य संवेदना नेतात

लोमशकायेमध्ये नेत्रजलाची उत्पत्ती होते

१ नेत्रजल या पाण्यासारख्या द्रव्यातून, काच, कृष्णमंडल आणि स्वच्छमंडलाच्या आतील भागाला पोषणद्रव्ये मिळतात. हे जल, डोळ्याची बाहेरची बाजू ओलसर ठेवणारे अश्रू नव्हे.

२ ट्रॉबेक्यूलर मेशवर्क नेत्रजल वाहून नेते

३ हे जाळे तुंबले किंवा त्याच्यातून नेत्रजलास रोध उत्पन्‍न झाला तर डोळ्यातील अंतर्दाब वाढतो

४ डोळ्यातील अंतर्दाब वाढला तर डोळ्याच्या मागील बाजूला असलेल्या नाजूक मज्जापेशींचा हळूहळू ऱ्‍हास होऊन काचबिंदूचा विकार होतो; अर्थात दृष्टी कमजोर होते

[२७ पानांवरील चित्रे]

दृग्‌बिंब

तुम्हाला काय दिसले असते

सामान्य दृष्टी

मूलभूत प्रकार

गौण प्रकार

[चित्राचे श्रेय]

दृष्टीपेशी नेत्रगोलकाची चित्रे: Courtesy Atlas of Ophthalmology