कोड म्हणजे काय?
कोड म्हणजे काय?
दक्षिण आफ्रिका येथील सावध राहा! लेखकाकडून
◼ सिबाँगिली कधीकधी आपल्या त्वचेविषयी विनोद करते. ती हसत हसत म्हणते: “मी जन्मले होते तेव्हा काळी होते, नंतर गोरी झाले आणि आता काय आहे, हेच कळत नाही.” तिला कोड आहे.
त्वचेतील रंजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे हा विकार होतो. यामुळे त्वचेवर लहान-मोठे पांढरे फटफटीत डाग दिसतात. काही रूग्णांच्या बाबतीत एखादा डाग दिसल्यावर तो वाढत जात नाही. परंतु काहींच्या बाबतीत तो संपूर्ण शरीरभर फार जलद पसरतो. आणि काहींना तर, अनेक वर्षांच्या कालावधीत हळूहळू अंगभर पसरणारा कोड झालेला आढळतो. तो वेदनादायक किंवा संसर्गजन्य नाही.
सिबाँगिलीसारख्या काळसर त्वचेच्या लोकांच्या शरीरावर जसा हा कोड चटकन् उठून दिसतो, तसा सर्वांच्याच त्वचेवर तो दिसून येत नाही. परंतु पुष्कळ लोकांना कमी अधिक प्रमाणात हा त्वचाविकार आहे. आकडेवारीनुसार लोकसंख्येच्या १ व २ टक्के लोकांमध्ये हा त्वचाविकार आढळतो. हा विकार कोणा विशिष्ट जातीच्याच लोकांना होतो असे नाही; स्त्रीपुरूष दोघांनाही तो होतो. याचे कारण अद्याप माहीत झालेले नाही.
या त्वचाविकारावर खात्रीचा उपाय नसला तरी, यशस्वीरीत्या त्याचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की, गौरवर्णीय रूग्णांमध्ये, हा विकार ठळकपणे दिसून येतो; कारण ज्या त्वचेवर याचा परिणाम झालेला नसतो ती उन्हामुळे काळवंडल्यामुळे उठून दिसते. यास्तव, उन्हात जाण्याचे टाळल्याने, त्वचेतील असा फरक दिसण्याची शक्यता कमी होऊ शकते. काळ्या रंगाच्या व्यक्ती, खास सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करून, त्वचेच्या रंगातील फरक कमी करू शकतात. काही रूग्णांनी, रिपेग्मेंटेशन (पुनर्रंजकता) म्हटल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीला चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपचारपद्धतीत, अनेक महिन्यांचा औषधोपचार आणि खास जंबुपार किरणांच्या साधनाचा उपयोग समाविष्ट आहे. काही वेळा या उपचारामुळे ग्रस्त भागाचा रंग पुर्ववत झाला आहे. काही रूग्ण डिपिग्मेंटेशनची उपचार पद्धत निवडतात. रंजक उत्पन्न करणाऱ्या उरलेल्या पेशींचा उपचाराद्वारे नाश करून त्वचेचा रंग समांतर करणे, हा या उपचारपद्धतीचा हेतू असतो.
ग्रस्त व्यक्तीला खासकरून जेव्हा तिच्या चेहऱ्यावर हे डाग पसरतात तेव्हा मानसिकदृष्ट्या अवघड वाटू लागते. सिबाँगिली म्हणते: “अलिकडेच असं झालं, की दोन लहान मुलांनी माझ्याकडे पाहिलं आणि जोरात किंचाळत पळत सुटली. इतरांना माझ्याबरोबर बोलायला भीती वाटते; त्यांना वाटतं, की मला कदाचित एखादा संसर्गजन्य रोग झाला आहे किंवा मी शापित आहे. माझं लोकांना एवढंच म्हणणं आहे, की त्यांना माझ्यासारखा विकार झालेल्या लोकांपासून भिण्याचं काही कारण नाही. स्पर्श केल्यानं किंवा हवेतून त्यांना हा विकार होणार नाही.”
सिबाँगिलीने मात्र नाराज होऊन तिच्या सर्वात आवडत्या कार्यात भाग घेण्याचे थांबवलेले नाही; कोणत्याही यहोवाच्या साक्षीदाराला आवडत असलेल्या बायबल प्रशिक्षणाच्या कार्यात तीही आनंदाचे सहभाग घेते. या कार्यात, लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी अमोरासमोर बोलणे समाविष्ट आहे. ती म्हणते: “मी माझ्या चेहऱ्यावर आलेली विद्रुपता आता स्वीकारली आहे. माझ्या मनात आता कसल्याही प्रकारचा न्यूनगंड नाही. पण मी यहोवा देवानं वचन दिलेल्या परादीस पृथ्वीची आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा मला माझ्या जन्माच्या वेळी लाभलेला रंग पुन्हा मिळेल.”—प्रकटीकरण २१:३-५. (g०४ ९/२२)
[२२ पानांवरील चित्र]
१९६७ साली, हा विकार जडण्याआधी