व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जोपासनेचे महत्त्व

जोपासनेचे महत्त्व

जोपासनेचे महत्त्व

कोणतीही व्यक्‍ती लहानपणी जे शिकते, किंवा शिकत नाही त्याचा तिच्या भावी कौशल्यांवर परिणाम होत असतो. मग, मुलांचा योग्य प्रकारे विकास व्हावा, ती प्रौढपणी समंजस व्हावीत, यशस्वी व्हावीत म्हणून आईवडिलांकडून त्यांना कोणती मदत मिळणे गरजेचे आहे? अलीकडच्या दशकांत या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारावर कोणते निष्कर्ष काढण्यात आले आहेत? पाहुया.

अनुबंधनांची भूमिका

मेंदूच्या कार्याचा अभ्यास करण्यासंबंधीच्या तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली असून, आता शास्त्रज्ञांना पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने मेंदूच्या विकासाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. या अभ्यासांतून असे सुचवले जात आहे, की माहितीचा योग्य अर्थबोध करणे, सामान्य रितीने भावना व्यक्‍त करणे आणि भाषांवर प्रभुत्व मिळवणे यांकरता आवश्‍यक असलेल्या मेंदूतील प्रक्रियांचा योग्य विकास होण्याकरता, सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे. नेशन नियतकालिकातील एका वृत्तानुसार “या सुरुवातीच्या काळात, मेंदूत असाधारण वेगाने अनुबंधने प्रस्थापित केली जात असतात; अर्थात, आनुवांशिक माहिती व वातावरणातून मिळणाऱ्‍या प्रेरणेचा संयोग घडून, क्षणोक्षणी मेंदूची जडणघडण होत असते.”

शास्त्रज्ञांच्या मते या अनुबंधनांपैकी बहुतेक, जीवनाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत प्रस्थापित होतात. याच काळात “एका लहानशा बाळाची भावी बौद्धिक क्षमता, स्वपणाची जाणीव, इतरांवर भरवसा ठेवण्याची वृत्ती, शिकण्याची प्रेरणा इत्यादी गोष्टींवर परिणाम करणारे तंत्रिका मार्ग विकसित होत असतात,” असे बाल विकास क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. टी. बेरी ब्रेझल्टन सांगतात.

पहिल्या काही वर्षांत बाळाच्या मेंदूचा आकार, रचना व कार्य यांत कमालीची वाढ होते. प्रेरणादायी व शिकण्यास भरपूर वाव देणारे वातावरण मिळाल्यास, मुलांच्या मेंदूत नवनवीन अनुबंधने वेगाने प्रस्थापित होत जातात आणि अशारितीने मेंदूत तंत्रिका मार्गांचे एक बहुव्यापक जाळे तयार होते.

याच मार्गांमुळे विचार करणे, शिकणे व तर्क करणे यांसारख्या प्रक्रिया शक्य होतात.

लहान मुलांच्या मेंदूला जितके उद्दीपन मिळेल तितक्याच अधिक तंत्रिका कोशिका उत्तेजित होतात व त्यांच्यामध्ये तितकीच जास्त अनुबंधने निर्माण होतात असे म्हणता येईल. विशेष म्हणजे, यात केवळ बौद्धिक उद्दीपनाचा, म्हणजेच माहिती, आकडे किंवा भाषा यांच्या संपर्कात आल्यामुळे मिळणाऱ्‍या उद्दीपनाचा समावेश नसतो. तर, शास्त्रज्ञांना असे दिसून आले आहे की भावनात्मक उद्दीपनही तितकेच महत्त्वाचे आहे. संशोधनावरून असे आढळले आहे की शिशुंना जवळ घेऊन उबदार स्पर्श केला नाही, त्यांना खेळवले नाही किंवा त्यांना भावनिक उद्दीपन दिले नाही तर त्यांच्या मेंदूत तितकीशी अनुबंधने प्रस्थापित होणार नाहीत.

जोपासना आणि क्षमता

कालांतराने, मुले मोठी होऊ लागतात तशी मेंदूत एकप्रकारची काटछाट केली जाते. ज्या अनुबंधनांची गरज नाही ती शरीराकडून काढून टाकली जातात. याचा मुलाच्या क्षमतेवर विलक्षण परिणाम होऊ शकतो. मेंदू संशोधक मॅक्स सीनाडर म्हणतात, “मुलाला योग्य वयात योग्य प्रकारचे उद्दीपन न मिळाल्यास त्याच्या मेंदूतील तंत्रिका मार्गांचा योग्यरित्या विकास होणार नाही.” परिणामस्वरूप, डॉ. जे. फ्रेजर मस्टर्ड यांच्यानुसार मुलांमध्ये निम्न बुद्धिगुणांक, बोलण्याच्या कौशल्यांत अथवा गणित या विषयांत असमाधानकारक कामगिरी, प्रौढपणी आरोग्य समस्या आणि वर्तनसंबंधी समस्या देखील दिसून येण्याची शक्यता आहे.

तर एकंदरीत, बालपणी आलेल्या अनुभवांचा प्रौढावस्थेत निश्‍चितच परिणाम होत असतो असे या सर्व माहितीवरून दिसून येते. एखादी व्यक्‍ती कणखर आहे की नाजूक; अमूर्त संकल्पनांच्या आधारावर ती विचार करू शकते किंवा नाही; तसेच, ती दुसऱ्‍यांच्या भावना समजून घेऊ शकते किंवा नाही हे सर्व तिला अगदी लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते. त्याअर्थी, आईवडिलांवर असणारी जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. एक बालरोगतज्ज्ञ म्हणाले: “या सुरुवातीच्या अनुभवांतील एक सर्वात आवश्‍यक घटक म्हणजे मुलांची काळजी घेणारी एक संवेदनशील व्यक्‍ती असणे.”

वरवर पाहिल्यास हे सोपे वाटते. आपल्या मुलांची जोपासना करा, त्यांची काळजी घ्या म्हणजे त्यांची वाढ जोमदार होईल. पण हे म्हणावे तितके सोपे नाही. मुलांची योग्य प्रकारे काळजी घेणे म्हणजे नेमके काय हे समजून घेणे नेहमीच सोपे नसते. उत्तम पालक बनण्याचे कौशल्य कोणाही व्यक्‍तीत उपजत नसते.

एका अभ्यासात सहभागी झालेल्या एकूण पालकांपैकी २५ टक्के पालकांना हे माहीत नव्हते, की आपण ज्या पद्धतीने मुलांचे संगोपन करतो त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता, आत्मविश्‍वास तसेच शिकण्याची इच्छा एकतर वाढू शकते किंवा खुंटू शकते. तेव्हा प्रश्‍न उद्‌भवतो की मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण विकसित करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता? आणि, तुम्ही याकरता अनुकूल वातावरण कसे निर्माण करू शकता? याविषयी आता थोडा विचार करूया. (g०४ १०/२२)

[६ पानांवरील चित्र]

लहानपणी ज्यांना कोणी जवळ घेतले नाही, खेळवले नाही अशा मुलांची इतर मुलांइतकी चांगली वाढ होत नाही