व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैरोबी “थंड पाण्याचे ठिकाण”

नैरोबी “थंड पाण्याचे ठिकाण”

नैरोबी “थंड पाण्याचे ठिकाण”

केनियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाकडून

“दमट, पाणथळ प्रदेश. अगदी भकास, वाऱ्‍यावर उघडा पडलेला. निर्मनुष्य, पण हजारो प्रकारच्या जंगली जनावरांनी गजबजलेला. ओल्या लिबलिबीत जमिनीच्या या क्षेत्रातून, कधी काळी कडेकडेने गेलेल्या काफिल्याचे पुसट निशाण तेवढेच काय ते मानवाच्या अस्तित्वाची आठवण करून देतात.”केनिया वसाहतीची उत्पत्ती (इंग्रजी).

हे वर्णन आहे सुमारे शंभर वर्षांआधीच्या नैरोबीचे. तेव्हा हे शहर सिंह, गेंडे, वाघ, जिराफ, विषारी सर्प आणि इतर असंख्य जातींच्या जंगली पशूपक्ष्यांचे माहेरघर होते. लढाऊ मसाई टोळीवाले आपल्या गुरांना येथे असलेल्या गोड पाण्याच्या एका झऱ्‍याजवळ आणायचे. भटक्या जमातींचे हे आवडीचे ठिकाण होते. किंबहुना, मसाई टोळीवाल्यांनीच या नदीला उआसो नैरोबी, अर्थात “थंड पाणी” आणि या ठिकाणाला एनकारी नैरोबी अर्थात “थंड पाण्याचे ठिकाण” असे नाव दिले. अशारितीने, केनियाच्या इतिहासाला एक नवे वळण देणाऱ्‍या या ठिकाणाचे नाव पडले—नैरोबी.

नैरोबी शहराच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे केन्यन लोहमार्गाचे बांधकाम. या रेल्वेला एकेकाळी लुनॅटिक एक्सप्रेस म्हटले जात. * १८९९ सालाच्या मध्यापर्यंत मोंबासा या किनारपट्टीवरील शहरापासून नैरोबीपर्यंत तब्बल ५३० किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बांधून पूर्ण झाला होता. पण या बांधकामादरम्यान कामगारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. “त्सावोच्या दोन नरभक्षक सिंहांनी” हैदोस माजवून कित्येक मजूरांना मारल्याची घटना सर्वज्ञात आहे; शिवाय, ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या अतिशय खडतर प्रदेशात त्यांना बांधकाम करावे लागले. लोहमार्ग देशाच्या बऱ्‍याच आतल्या भागापर्यंत जाणार असल्यामुळे, कालांतराने मोंबासा हे पूर्वीप्रमाणे, कामगारांच्या वसाहतीकरता सर्वात सोयीस्कर ठिकाण राहिले नाही. त्याऐवजी नैरोबी, जरी गैरसोयीस्कर वाटत असले, तरीसुद्धा कामगारांना विश्रांतीकरता आणि बांधकामाचे साहित्य साठवण्याकरता सर्वात उत्तम स्थान ठरेल असा निर्णय घेण्यात आला. नैरोबी केनियाची राजधानी बनण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल होते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या पूर्व आफ्रिका संरक्षित प्रदेशाचे, अर्थात सध्याच्या केनियाचे प्रशासकीय केंद्र म्हणून नैरोबी शहरास निवडण्यात आले. अलीकडेच आकार घेऊ लागलेल्या या नव्या शहरात योग्य संयोजन करून बांधकाम करण्यात आले असते, तर प्रगतीच्या दृष्टीने बरे पडले असते. पण त्याऐवजी रेल्वे स्थानकाच्या जवळपास लोकांनी दाटीवाटीने वाटेल तशी बांधकामे केली. लाकूड, लोखंडी पत्रे, आणि तेथे उपलब्ध असलेल्या इतर साहित्याचा वापर करून बांधलेल्या इमारतींमुळे, नैरोबी हे भावी आंतरराष्ट्रीय महानगर दिसण्याऐवजी एखाद्या झोपडपट्टीसारखे दिसू लागले. २० व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलेल्या बोटांवर मोजण्याइतक्या इमारती, भविष्यातील प्रगती लक्षात ठेवून निश्‍चितच बांधण्यात आल्या नव्हत्या. शिवाय, जवळपासच्या परिसरात मुक्‍तपणे विहार करणाऱ्‍या जंगली प्राण्यांचीही भीती सतत इथल्या लोकांना होती.

काही काळातच या नव्या वसाहतींत साथीचे रोग पसरून त्यांनी बऱ्‍याच लोकांचा बळी घेतला. प्लेगचा उद्रेक झाला तेव्हा या शहराच्या नव्या प्रशासनासमोर पहिले मोठे आव्हान उभे ठाकले. या समस्येवर लवकरात लवकर उपाय योजण्याकरता काय करण्यात आले? तर शहरातील ज्या ज्या भागांत प्लेग पसरला होता ते संबंध परिसर जाळून बेचिराख करण्यात आले! पुढच्या ५० वर्षांत हळूहळू नैरोबीच्या कुरूप इतिहासाचे वण पुसट होत गेले आणि त्याठिकाणी पूर्व आफ्रिकेचे व्यापारिक व सामाजिक केंद्रस्थान असलेले समृद्ध शहर उदयास आले.

आधुनिक शहराच्या प्रगतीचा इतिहास

नैरोबी जवळजवळ १,६८० मीटर उंचीवर वसलेले असल्यामुळे येथून सभोवतालच्या भूप्रदेशाचा उत्कृष्ट देखावा पाहायला मिळतो. आकाश निरभ्र असल्यास, आफ्रिकेची दोन मुख्य पर्वत शिखरे येथून सहज दिसतात. उत्तरेकडे, केनियामधील सर्वात उंच व आफ्रिकेतील दुसऱ्‍या क्रमांकाचे, ५,१९९ मीटर उंचीचे केनिया पर्वत आहे. तर दक्षिणेकडे केनिया व टांझानियाच्या सीमेवर आफ्रिकेतील सर्वात उंच किलिमांजारो पर्वत आहे; त्याची उंची ५,८९५ मीटर इतकी आहे. विषुववृत्ताजवळ असूनही किलिमांजारो पर्वत बाराही महिने बर्फाच्छादित कसा असू शकतो, हा १५० वर्षांपूर्वी अनेक युरोपियन भूगोलतज्ज्ञ व शोधक यांच्याकरता कुतूहलाचा विषय होता.

पन्‍नास पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास सांगणाऱ्‍या या शहराचा, आज संपूर्ण कायापालट झाला आहे. येथील गगनचुंबी इमारती पाहून, झालेल्या विकासाची कल्पना येते. चकाकणाऱ्‍या काचेच्या व पोलादाच्या या गगनचुंबी इमारतींवर मावळत्या सूर्याची किरणे पडतात तेव्हा ते दृश्‍य पाहण्यालायक असते. नैरोबी शहराच्या मुख्य भागात आल्यावर, एखाद्याला जर तुम्ही सांगितले, की याच ठिकाणी फक्‍त शंभर वर्षांआधी सर्व प्रकारचे हिंस्र प्राणी मुक्‍तपणे फिरत होते आणि मनुष्याकरता हे क्षेत्र अतिशय धोक्याचे होते, तर तो कदाचित विश्‍वास ठेवणार नाही.

काळाच्या ओघात बरेच काही बदलले. शहरात ठिकठिकाणी सुंदर बोगनवेल, निळा गुलमोहर आणि निलगिरी व बाभुळ यांसारखी लवकर वाढणारी वृक्षे लावण्यात आली. अशारितीने पूर्वीच्या कच्च्या धुळकट पायवाटांच्या जागी दुतर्फा झाडीचे मार्ग तयार झाले; आजही उष्ण हवामानात पादचाऱ्‍यांना या झाडांच्या सावलीतून चालणे अतिशय सोयीचे पडते. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका वृक्षोद्यानात कमीतकमी २७० प्रकारची झाडे आहेत. नैरोबी “एखाद्या नैसर्गिक अरण्याच्या मध्यभागी बांधण्यात आले आहे असे भासते” असे विधान एका लेखकाने का केले असावे हे आपण समजू शकतो. येथील वृक्षवल्लींमुळेच नैरोबीचे हवामान अतिशय आल्हाददायक आहे; दिवसा उष्णता तर रात्री गारवा असतो.

निरनिराळ्या संस्कृतींचा संगम

नैरोबीने एखाद्या मोठ्या चुंबकाप्रमाणे मानवजातीतील निरनिराळ्या पार्श्‍वभूमींच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आज शहराची जनसंख्या २० लाख पेक्षा जास्त आहे. लोहमार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कामगारांना येथेच स्थायिक होण्याचे चांगले निमित्त मिळाले. बांधकामात ज्यांनी हातभार लावला होता त्या भारतीयांनी येथेच राहून उद्योगधंदे स्थापन केले, जे वाढात जाऊन सबंध देशात पसरले. त्यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया, कॅनडा व इतर आफ्रिकन देशांतून आणखी बरेच उद्योजक येथे येऊन वसले.

नैरोबीमध्ये अनेक संस्कृतींचा मिलाफ झालेला आढळतो. रस्त्यावरून जाताना तुम्हाला कधी पायघोळ साडी नेसलेली भारतीय स्त्री शॉपिंग मॉलकडे जाताना दिसेल तर कधी एखादा पाकिस्तानी इंजिनियर एखाद्या बांधकाम प्रकल्पाकडे घाईघाईने जाताना दिसेल; कधी नेदरलंडहून आलेला, व्यवस्थित पोशाखातला विमान कर्मचारी एखाद्या हॉटेलमध्ये दाखल होताना दिसेल तर कधी एखादा जपानी उद्योजक, नैरोबीच्या अतिशय यशस्वी स्टॉक मार्केटमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी लगबगीने जाताना दिसेल. या सर्वांसोबत तुम्हाला स्थानिक रहिवासी बसस्थानकांवर थांबलेले; स्टॉल्सवर, खुल्या बाजारपेठेत किंवा दुकानांत व्यापार करत असलेले; तसेच, कार्यालयांत किंवा नैरोबीच्या अनेक कारखान्यांत काम करत असलेले आढळतील.

गंमत म्हणजे, शहरात राहणाऱ्‍या फार कमी केन्यन लोकांना मूळ “नैरोबीवासी” म्हणता येईल. बहुतेकजण देशाच्या इतर भागांतून येथे “चांगल्या राहणीमानाच्या” शोधात आले आहेत. एकंदरीत, नैरोबीचे लोक मनमिळाऊ व आतिथ्यशील आहेत. म्हणूनच अनेक जागतिक व प्रादेशिक संस्थांचे यजमानपद या शहराला मिळाले आहे. संयुक्‍त राष्ट्र पर्यावरण योजनेचे जागतिक मुख्यालय नैरोबीत आहे.

पर्यटक कशामुळे आकर्षित होतात?

केनिया हे विस्तीर्ण व वैविध्यपूर्ण वन्यजीवनाचे माहेरघर आहे. देशातील अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये दर वर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. अनेक पर्यटन सहलींचे व सफरींचे आयोजन नैरोबीतूनच केले जाते. पण नैरोबी शहरसुद्धा एक पर्यटन स्थळ आहे असे म्हणता येईल. शहरापासून इतक्या कमी अंतरावर मुक्‍त विहार करणारे प्राणी असलेले क्वचितच दुसरे शहर जगात असेल. शहरापासून १० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेले नैरोबी राष्ट्रीय उद्यान हे लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. * येथे नैरोबीच्या मूळ रहिवाशांशी जवळून भेट घडते. मानववस्तीपासून या प्राण्यांना वेगळे करणारे केवळ, तारांचे एक कुंपण आहे. अगदी अलीकडे, २००२ साली सप्टेंबर महिन्यात नैरोबी शहरातील एका घराच्या बैठकीत एक पूर्ण वाढ झालेला बिबळ्या आढळला होता; हा बिबळ्या जवळच्या अरण्यातून वाट चुकून शहरात आला होता!

शहराच्या केंद्रापासून काही मिनिटे पायी चालत गेल्यास नैरोबी पुराण वस्तूसंग्रहालय आहे. केनियाच्या समृद्ध इतिहासाविषयी माहिती मिळवण्याकरता दररोज शेकडो पर्यटक या वस्तूसंग्रहालयाला भेट देतात. वस्तूसंग्रहालयातच असलेल्या सर्पोद्यानात अनेक प्रकारचे सरपटणारे जीवजंतू पाहायला मिळतात. येथे असलेल्या मगरीकडे तुम्ही कितीही वेळ एकटक पाहात राहिला तरी तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जवळच असलेला कासवही आपल्याच तंद्रीत हळूहळू चालत असतो; त्याला बाहेरच्या जगाच्या घाईगडबडीचे जराही भान नाही. अर्थात येथील मुख्य रहिवासी वळवळणारे सर्प आहेत—नाग, अजगर, व्हायपर इत्यादी. तेव्हा, ‘सांभाळा, येथे विषारी सर्प आहेत’ अशी सूचना देणाऱ्‍या फलकाकडे दुर्लक्ष करू नका!

वेगळ्या प्रकारचे पाणी

नैरोबीचे नाव जिच्यावरून पडले ती नदी अखंड वाहत आहे; पण बहुतेक विकसनशील देशांप्रमाणेच येथेही नदीचे पाणी औद्योगिक व घरगुती गाळसाळीमुळे दुषित झाले आहे. मात्र अनेक वर्षांपासून, नैरोबीच्या रहिवाशांना एका श्रेष्ठ स्रोताकडून “पाणी” पुरवले जात आहे. हे पाणी म्हणजे यहोवाचे साक्षीदार ज्याच्याविषयी शिक्षण देतात, तो जीवनदायक संदेश.—योहान ४:१४.

१९३१ साली, नैरोबी शहर अद्याप नावारूपास आले नव्हते, तेव्हा ग्रे व फ्रँक स्मिथ नावाचे दोन भाऊ बायबल सत्यांचा प्रसार करण्याच्या हेतूने दक्षिण आफ्रिकेहून केनियात आले. मोंबासापासून लोहमार्ग ज्या ज्या ठिकाणांहून गेला होता त्या त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली; अर्थात त्यांनाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कधीकधी आसपासच जंगली प्राणी असलेल्या ठिकाणी त्यांना झोपावे लागले. नैरोबीत त्यांनी ६०० पुस्तिकांचा व इतर बायबल साहित्याचा वाटप केला. आज या नैरोबी महानगरात जवळजवळ ५,००० साक्षीदार व एकूण ६१ मंडळ्या आहेत. मंडळीच्या सभा, संमेलने, प्रांतीय अधिवेशने व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांच्या माध्यमाने नैरोबीचे रहिवाशी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांशी परिचित झाले आहेत. शिवाय, अनेकांनी त्यांची बायबलवर आधारित असलेली आशा आनंदाने स्वीकारली आहे.

उज्ज्वल भविष्य

एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात सांगितल्यानुसार, “औद्योगीकरण झालेल्या शहरांत सहसा घरांचा अभाव असतो. . . . शिवाय, कारखान्यांमुळे हवा व पाणीपुरवठा दूषित होतो.” नैरोबी याला अपवाद नाही. त्यातल्या त्यात, दररोज ग्रामीण भागांतून लोक येथे येऊन स्थायिक होत असल्यामुळे या समस्या आणखीनच बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैरोबी शहर मुळात एखाद्या रत्नासारखे असले तरीसुद्धा, या नित्याच्या समस्यांमुळे हे रत्न निस्तेज होऊ शकते.

पण आनंदाची गोष्ट म्हणजे, लवकरच अशी वेळ येत आहे की जेव्हा देवाच्या राज्यशासनाखाली सर्व लोक जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकतील. आजच्या काळात ज्यांमुळे शहरी जीवन अवघड होत चालले आहे त्या सर्व समस्या कायमच्या सुटतील.—२ पेत्र ३:१३. (g०४ ११/८)

[तळटीपा]

^ या लोहमार्गाच्या बांधकामाचे सविस्तर वर्णन सावध राहाच्या! सप्टेंबर २२, १९९८ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे २१-४ वरील “पूर्व आफ्रिकेची ‘लुनॅटिक एक्सप्रेस’” या लेखात प्रकाशित करण्यात आले आहे.

^ सावध राहाच्या! जून ८, २००३ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे २४-७ पाहावीत.

[१६ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

नैरोबी

[१८ पानांवरील चित्र]

किलिमांजारो पर्वत

[१८ पानांवरील चित्र]

केनिया पर्वत

[चित्राचे श्रेय]

Duncan Willetts, Camerapix

[१८ पानांवरील चित्र]

खुली बाजारपेठ

[१९ पानांवरील चित्र]

१९३१ साली फ्रँक व ग्रे स्मिथ

[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Crispin Hughes/Panos Pictures