व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालक म्हणून तुमची भूमिका

पालक म्हणून तुमची भूमिका

पालक म्हणून तुमची भूमिका

“आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठ्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं असं तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल,” असे हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे पीटर गोर्स्की म्हणतात. “पालक म्हणून आपली भूमिका ही मेंदूतील जटिल प्रकिया घडवून आणण्याची नव्हे तर सुदृढ, समंजस व संवेदनशील मानवांचा विकास घडवून आणण्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची आहे.”

आपले मूल मोठे होऊन सत्शील व इतरांबद्दल सहानुभूती असलेली व्यक्‍ती बनलेली पाहणे, पालक म्हणून तुमच्याकरता किती समाधानदायक असेल याची कल्पना करा! पण हे स्वप्न साकार करायचे असेल, तर तुम्ही आपल्या मुलांपुढे कशाप्रकारचा आदर्श ठेवता; त्यांच्यासोबत तुम्ही कितपत वेळ घालवता, त्यांना आपले विचार व भावना मोकळेपणाने सांगता किंवा नाही आणि एक शिक्षक या नात्याने आपली भूमिका तुम्ही कशाप्रकारे निभावता हे विचारात घ्यावे लागेल. मुलांमध्ये उपजतच सद्‌सद्विवेकबुद्धी असते हे खरे असले तरीसुद्धा, मुले जसजशी मोठी होतात तसतशी आईवडिलांनी हळूहळू त्यांच्या मनावर नैतिक मूल्ये बिंबवली पाहिजेत.

मुलांच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देण्याकरता कोण जबाबदार?

मुलांच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान कोणाचे असते याविषयी संशोधकांची

वेगवेगळी मते आहेत. त्यांच्यापैकी काही असे म्हणतात की मुलांच्या व्यक्‍तिमत्त्वावर त्यांच्या सवंगड्यांचा प्रभाव असतो. पण व्यवसायाने बाल विकासाच्या क्षेत्रात असलेल्या डॉ. टी. बेरी ब्रेझल्टन व स्टॅनली ग्रीनस्पॅन यांच्यानुसार, शिशुवस्थेपासून संवेदनशील पद्धतीने मुलांची जोपासना करण्यात पालकांची भूमिकाच सर्वात महत्त्वाची म्हणता येईल.

नंतरच्या जीवनात येणारे अनुभव आणि सवंगड्यांमुळे पडणारा प्रभाव या गोष्टी मुलांच्या शिशुवस्थेतील विकासात भर पाडतात. त्यामुळे कुटुंबात मुलांशी सहानुभूतीने व समजूतदारपणे वागणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या भावनांवर यशस्वीरित्या, विचारशीलपणे कसे नियंत्रण करायचे हे त्यांना शिकवले पाहिजे. ज्या मुलांना अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले जाते ती सहसा इतरांसोबत सहकार्याने व सहानुभूतीने वागतात.

शिशुवस्थेपासून मुलांना प्रशिक्षण देण्याकरता बरेच श्रम घ्यावे लागतात. यशस्वी व्हायचे असेल, आणि खासकरून जर तुम्ही नवीनच आईवडील बनला असाल, तर तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेल्यांचे मार्गदर्शन स्वीकारून मुलांना नेमके कसे वाढवायचे यासंबंधी काहीतरी सुसूत्र विचार करणे शहाणपणाचे ठरेल. जाणकारांनी बाल विकासावर असंख्य पुस्तके लिहिली आहेत. बरेचदा त्यांच्या सल्ल्यातून बायबलमध्ये दिलेल्या विश्‍वासार्ह माहितीचे पडसाद उमटतात. देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन केल्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांचे, त्यांची योग्यरित्या वाढ होईल अशाप्रकारे संगोपन करण्यास मदत मिळाली आहे. पुढील व्यवहारोपयोगी सूचना पडताळून पाहा.

भरभरून प्रेम व्यक्‍त करा

मुले इवल्याशा रोपांसारखी असतात. त्यांची देखभाल केली, वेळोवेळी प्रेमळपणे त्यांच्याकडे लक्ष दिले तर ती वाढतात, बहरतात. लहानशा रोपाला उत्तमरित्या वाढ होण्याकरता व मूळ धरण्याकरता पाणी आणि सूर्यप्रकाश यांची गरज असते. त्याचप्रमाणे, आईवडील आपल्या मुलांबद्दल असलेले प्रेम शब्दांतून व कृतींतून भरभरून व्यक्‍त करतात तेव्हा त्यांच्या मुलांची मानसिक व भावनात्मक दृष्ट्या उत्तम वाढ होते.

“प्रीती उन्‍नती करिते.” या साध्याशा वाक्यातून बायबलमध्ये अगदी हेच तत्त्व व्यक्‍त करण्यात आले आहे. (१ करिंथकर ८:१) मुलांबद्दल भरभरून प्रेम व्यक्‍त करणारे पालक खरे पाहता, आपल्या निर्माणकर्त्याचे, अर्थात यहोवा देवाचे अनुकरण करत असतात. बायबलमध्ये सांगितले आहे की येशूचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा त्याला त्याच्या पित्याची वाणी ऐकू आली. आणि त्या प्रसंगी त्याच्या पित्याने आपल्या या पुत्राबद्दल आपली संमती आणि प्रेम व्यक्‍त केले. येशू तेव्हा काही लहान मूल नव्हता, पण तरीसुद्धा ते शब्द ऐकून त्याला किती आनंद झाला असेल!—लूक ३:२२.

तुम्ही आपल्या मुलांना जे प्रेम देता, रात्री झोपताना त्यांना ज्या गोष्टी सांगता, त्यांच्यासोबत लहान मूल बनून जे निरनिराळे खेळ खेळता ते सर्व त्यांच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावते. डॉ. जे. फ्रेझर मस्टर्ड म्हणतात, ‘मूल जे काही करते, तो त्याच्याकरता एक नवा अनुभव असतो आणि त्याच्या सर्वांगीण विकासात अशा प्रत्येक अनुभवाचे योगदान असते. जर मूल रांगायला लागले असेल तर तुम्ही त्याला कितपत प्रोत्साहन देता आणि त्याच्या या नव्या अनुभवात कितपत रस घेता हे अत्यंत महत्त्वाचे आहे.’ पालकांचे प्रेम व त्यांनी केलेली देखभाल यांमुळे मुलांच्या संपूर्ण आयुष्याची पायाभरणी होते; जबाबदार व समंजस प्रौढ म्हणून त्यांचा विकास होऊ शकतो.

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या

आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—अनुवाद ६:६, ७; ११:१८-२१.

महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल.

शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. (उपदेशक ३:१, ४) मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आहे. डॉ. मस्टर्ड यांच्या मते तर, खेळणे हे मुलांसाठी फक्‍त आवश्‍यकच नव्हे, तर अत्यावश्‍यक आहे. ते म्हणतात: “खेळताना मुलांच्या मेंदूतील तंत्रिका मार्गांचा विकास होतो जेणेकरून त्यांना अनेकविध कार्यक्षमता प्राप्त होतात.” अशा प्रकारच्या स्वयंस्फूर्त खेळांत अगदी साधी खेळणी वापरली जाऊ शकतात, जसे पुठ्ठ्याचा रिकामा डबा. महागड्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांइतकेच मुलांना साध्या घरगुती वस्तूंबद्दलही कुतूहल वाटते. *

तज्ज्ञांच्या मते, सतत कोणातरी प्रौढ व्यक्‍तीच्या निगराणी व मार्गदर्शनाखाली, पूर्वनियोजित खेळ खेळल्यामुळे मुलांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव मिळत नाही. पालकांनी वाजवी असायला हवे. मुलांना आपल्याभोवतीच्या विश्‍वाचे स्वतःहून निरीक्षण करू द्या; लहानसहान अडथळ्यांना तोंड देऊन आपल्या बुद्धीच्या परीने त्यांवर मात करू द्या. सहसा मुले आपले मनोरंजन करण्याकरता स्वतःहूनच काहीतरी शोधून काढतात. अर्थात, आपले मूल काय करत आहे, ते कोठे खेळत आहे आणि त्याला काही इजा तर होणार नाही याची खात्री करण्याची आईवडिलांची जबाबदारी आहेच.

मुलांकरता वेळ काढा

मुले मोठेपणी स्वावलंबी, समजूतदार व्हावीत अशारितीने त्यांचे संगोपन व वाढ करण्यात त्यांना प्रशिक्षण देणे हे आलेच. आपल्या मुलांना दररोज काहीतरी मोठ्याने वाचून दाखवण्याकरता अनेक पालकांनी एक निश्‍चित वेळ ठरवून घेतली आहे. यामुळे नीट वागण्याबोलण्याबद्दल मुलांवर उत्तम संस्कार करण्याची संधी मिळते; तसेच आपल्या निर्माणकर्त्याचे विचार मुलांच्या मनावर बिंबवून त्यांना उत्तम नैतिक मूल्ये दिली जाऊ शकतात. बायबल सांगते की विश्‍वासू शिक्षक व सुवार्तिक असणाऱ्‍या तीमथ्याला ‘बालपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती’ होती.—२ तीमथ्य ३:१५.

शिशुवस्थेपासूनच मुलांना वाचून दाखवण्यास सुरूवात केल्यामुळे त्यांच्या मेंदूतील अनुबंधनांना उद्दीपन मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये रस घेणाऱ्‍या प्रेमळ व्यक्‍तीने हे वाचन केले पाहिजे. काय वाचावे यासंबंधी शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापिका लिंडा सीगल एक सूचना देतात: “मुलांना आनंददायक वाटेल अशाप्रकारचे” हे वाचण्याचे साहित्य असावे. तसेच हे वाचन नियमित आणि दररोज त्याच वेळी करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मूल उत्सुकतेने त्याची वाट पाहू लागते.

शिक्षण देण्यात शिस्त लावणेही अंतर्भूत आहे. प्रेमळपणे वळण लावणे हे लहान मुलांच्या हिताचे आहे. नीतिसूत्रे १३:१ (NW) म्हणते: “बापाची शिस्त मिळाल्यास पुत्र सुज्ञ होतो.” पण शिस्त लावणे यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे हे आठवणीत असू द्या. उदाहरणार्थ, कधी रागवून, तर कधी एखादी आवडीची वस्तू अथवा हक्कापासून वंचित ठेवून किंवा इतर प्रकारच्या शिक्षा देऊन चुका सुधारता येतात. याआधी उल्लेख केलेले डॉ. ब्रेझल्टन म्हणतात की शिस्त लावणे म्हणजे काय, तर “आपल्या भावनांवर योग्य नियंत्रण करून अनियंत्रित वागणूक कशी टाळायची हे मुलांना शिकवणे. चूक काय आणि बरोबर काय यासंबंधी निश्‍चित मर्यादा घालून दिल्या जाण्याची अपेक्षा प्रत्येक मूल करत असते. प्रेमाच्या पाठोपाठ, मुलांना देण्याजोगी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त.”

तुम्ही मुलांना ज्या पद्धतीने शिस्त लावू पाहता, ती परिणामकारक आहे किंवा नाही हे तुम्ही कसे पारखू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला शिक्षा का दिली जात आहे हे मुलांना स्पष्ट समजले पाहिजे. मुलांना शिक्षा देताना, आपल्या आईवडिलांचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांना आपली काळजी वाटते याची मुलांना जाणीव होईल अशा पद्धतीने ती द्या.

प्रयत्नांचे सार्थक होते तेव्हा. . .

फ्रेडने आपल्या मुलीला अगदी बालपणापासूनच दररोज रात्री झोपताना वाचून दाखवण्याची सवय लावली. काही काळानंतर, त्याला लक्षात आले की तिने बऱ्‍याच गोष्टी तोंडपाठ केल्या होत्या आणि तो वाचत असताना ती पुस्तकात पाहून योग्य शब्द आणि ते कोणत्या स्वरात उच्चारायचे हे बरोबर ओळखत असे. ख्रिस यानेही आपल्या मुलांना वाचून दाखवण्याची सवय नेटाने पाळली. तो निरनिराळ्या प्रकारचे साहित्य त्यांना वाचून दाखवी. मुले अगदीच लहान होती तेव्हा तो बायबल कथांचं माझं पुस्तक यातील चित्रांचा उपयोग करून त्यांच्यावर नैतिक आणि आध्यात्मिक संस्कार करत असे. *

वाचनासोबतच, बरेच पालक मुलांसोबत इतर गोष्टी करतात—उदाहरणार्थ, चित्रे काढणे, रंग भरणे, एखादे वाद्य वाजवणे, निरनिराळ्या स्थळांना, जसे की प्राणी संग्रहालयाला कुटुंब मिळून भेट देणे इत्यादी. मुलांच्या संवेदनक्षम मनावर योग्य वागणुकीसंबंधी उत्तम संस्कार करण्यासाठी या प्रसंगांचा उपयोग केला जाऊ शकतो.

हे सर्व श्रम खरोखरच सार्थक ठरतील का? शांतीपूर्ण आणि सुरक्षित अशा वातावरणात, आपण विचारात घेतलेल्या या व्यवहारोपयोगी सूचनांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणारे पालक, आपल्या मुलांना सकारात्मक विचार करणारे प्रौढ बनताना पाहू शकतील. जीवनातील सुरुवातीच्या वर्षांतच जर तुम्ही आपल्या मुलांमध्ये विचार करण्याची आणि आपले विचार व्यक्‍त करण्याची कौशल्ये निर्माण केली तर त्यांचे नैतिक व आध्यात्मिक चरित्र घडवण्यात बराच हातभार लागेल.

कित्येक शतकांआधी बायबलमध्ये नीतिसूत्रे २२:६ यात स्पष्टपणे म्हणण्यात आले: “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” मुलांच्या प्रशिक्षणात पालकांची कळीची भूमिका आहे. तेव्हा पालकांनो, आपल्या मुलांबद्दल भरभरून प्रेम व्यक्‍त करा. त्यांना तुमचा सहवास द्या, त्यांच्या गुणांची जोपासना करा आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करा. हे निश्‍चितच त्यांना आणि तुम्हालाही संतोषदायक ठरेल.—नीतिसूत्रे १५:२०. (g०४ १०/२२)

[तळटीपा]

^ याच नियतकालिकाच्या मार्च २२, १९९३ (इंग्रजी) अंकातील “किफायतशीर आफ्रिकन खेळणी” हा लेख पाहावा.

^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित. त्यांच्याचद्वारे प्रकाशित करण्यात आलेले थोर शिक्षकापासून शिकणे (इंग्रजी) हे पुस्तक देखील बरेचजण मुलांना शिकवण्याकरता उपयोगात आणत आहेत.

[७ पानांवरील चौकट]

बाळाशी खेळताना

◼ लहान बाळ फार कमी वेळपर्यंत एकाच गोष्टीवर लक्ष एकाग्र करू शकते, त्यामुळे ते खेळण्याच्या मूडमध्ये असते तेव्हाच त्याच्याशी खेळा.

◼ लहान बाळांना खेळणी देताना पूर्णपणे सुरक्षित आणि बाळाच्या ज्ञानेंद्रियांना चालना देतील अशीच खेळणी द्या.

◼ ज्यात काहीतरी क्रिया घडते असे खेळ खेळा. एखादी कृती तुम्ही वारंवार करता, उदाहरणार्थ त्यांनी एखादी वस्तू खाली पाडायची आणि तुम्ही ती उचलायची असे पुन्हापुन्हा केल्यास, बाळांना खूप गंमत वाटते.

[चित्राचे श्रेय]

संदर्भ: क्लिनिकल रेफरन्स सिस्टम्स

[१० पानांवरील चौकट/चित्र]

मुलांना मोठ्याने वाचून दाखवताना

◼ शब्दांचे स्पष्टपणे उच्चारण करा. आईवडिलांचे ऐकूनच मूल भाषेवर प्रभुत्व मिळवते.

◼ अगदी लहान मुलांना वाचून दाखवताना गोष्टींच्या पुस्तकातील चित्रांवर, बोट ठेवून त्यातील व्यक्‍तींची व वस्तूंची नावे सांगा.

◼ मूल थोडे मोठे झाल्यावर, त्याच्या आवडीच्या विषयांवरील पुस्तके निवडा.

[चित्राचे श्रेय]

संदर्भ: पालकांकरता बालरोगविज्ञान (इंग्रजी)

[८, ९ पानांवरील चित्रे]

मुलांना तुमचा आनंददायक सहवास मिळू द्या