व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?

मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?

तरुण लोक विचारतात . . .

मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?

“मला आजच माझं प्रगतीपुस्तक मिळालं; मी पुन्हा त्याच चार विषयात नापास झाले. मी खूप प्रयत्न केला होता, तरीपण नापास झाले.”—लॉरेन, वय १५.

“अपयशाच्या भावनांशी झुंज देणं सोपं नाही. आपण सहज नकारात्मक विचार करायला लागतो.”—जेसिका, वय १९.

अपयश. तुम्हाला या शब्दाचा विचारही करायला आवडणार नाही. पण अधूनमधून आपण सर्वच अपयशी होतो. शाळेतील एखाद्या परीक्षेत आपण नापास होतो, समाजात मान खाली घालावी लागेल अशा प्रकारे आपण वागतो, आपण ज्या व्यक्‍तिवर प्रेम करतो तिला नाराज करतो किंवा आपल्या हातून कदाचित एखादे गंभीर पाप होते. या सर्व वेळी आपण मानसिकरीत्या उद्ध्‌वस्त होऊ शकतो.

पण चुका करणारे तुम्ही एकटेच नाही, सर्वच मानव चुका करतात. बायबल म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) पण आपल्यातील काहींना खरे तर पडल्यावर पुन्हा उठायला कठीण वाटते. जेसन नावाचा एक तरुण म्हणतो: “मी स्वतःच स्वतःचा मोठा टिकाकार आहे. मी एखादी चूक केली तर, लोक कदाचित हसतील आणि विसरूनही जातील. पण मी विसरत नाही, मी त्यावर सतत विचार करत बसतो.”

स्वतःच्या चुकांचा विचार करणे नेहमीच वाईट नसते; असे केल्याने जर तुम्हाला सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली तर ते तुमच्या फायद्याचेच ठरेल. परंतु, त्यावर खूप दिवसांपर्यंत आणि सतत विचार करत राहणे हानीकारक आहे व त्यामुळे उलट परिणाम होण्याची शक्यता आहे. नीतिसूत्रे १२:२५ म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते.”

बायबलमध्ये, एपफ्रदीत नावाच्या एका मनुष्याविषयी सांगितले आहे; त्याचा आपण जरा विचार करू या. प्रेषित पौलाचा व्यक्‍तिगत मदतनीस म्हणून सेवा करण्यासाठी त्याला रोमला पाठवण्यात आले होते. पण तिथे गेल्यावर तो आजारी पडला आणि त्याला ज्या कामासाठी पाठवण्यात आले होते ते काम तो करू शकला नाही. उलट पौलालाच त्याची काळजी घ्यावी लागली! पौलाने मग त्याला घरी पाठवण्याची सोय केली आणि स्थानीय मंडळीच्या वडिलांना सांगितले, की हा विश्‍वासू मनुष्य निराश झाला होता. तो निराश का झाला होता? पौलाने म्हटले: “तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले” असावे. (फिलिप्पैकर २:२५, २६) आपण आजारी पडल्याची बातमी सर्वांना समजली असावी व आपण आपले काम करू शकलो नाही हे सर्वांना कळाले असावे, याची जेव्हा एपफ्रदीतला जाणीव झाली तेव्हा आपण किती निकामी आहोत असे त्याला वाटले असावे. साहजिकच तो निराश झाला!

पण अपयशाच्या वेदनादायक भावना टाळण्याचा कोणता मार्ग आहे का?

आपल्या मर्यादा ओळखा

अपयशी होण्याची शक्यता कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे वास्तविक ध्येये ठेवणे. “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते,” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे ११:२; १६:१८) नम्र व्यक्‍तिला आपल्या मर्यादांची जाणीव असते. कधीकधी आपल्या कला व क्षमता सुधारण्यासाठी काही कठीण आव्हाने स्वीकारणे चांगले असते. परंतु वास्तववादी असा. तुम्ही कदाचित चुटकीसरशी गणित सोडवणाऱ्‍यांपैकी किंवा तालबद्ध पद्धतीने खेळणाऱ्‍या खेळाडूप्रमाणे मुळातच नसाल. मायकल नावाचा एक तरुण कबूल करतो: “मी खेळांत इतका काही चांगला नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे मी खेळात भाग घेतो खरा पण जास्त पुढं जात नाही, कारण मला माझ्या मर्यादा माहीत आहेत.” तो पुढे म्हणतो: “आपल्याला साध्य करता येतील अशीच ध्येये आपण ठेवली पाहिजेत.”

स्पायना बायफीडा (द्विखंडीत पृष्ठवंश) आणि सेरेब्रल पाल्सी या विकृती असलेल्या १४ वर्षीय ईवॉनच्या मनोवृत्तीचा विचार करा. ती म्हणते: “मला इतरांप्रमाणे, चालता, नाचता किंवा पळता येत नाही. इतर जे करतात ते मी करू शकत नाही म्हणून मी खूप निराश होते. पुष्कळ लोकांना माझी निराशा कळत नाही. पण मी अशा भावनांना तोंड देऊ शकते.” ती काय सल्ला देते? “प्रयत्न करायचे थांबवू नका. प्रयत्न करीत राहा. तुम्ही अपयशी ठरला तरी किंवा इतके चांगले केले नाही तरी, हार मानू नका. तुमच्याने होईल तितका प्रयत्न करीत राहा.”

तसेच, इतरांबरोबर स्वतःची विनाकारण तुलना करून मनःस्ताप करून घेऊ नका. १५ वर्षीय ॲन्ड्रू म्हणतो: “मी स्वतःची इतरांबरोबर तुलना करत नाही. कारण आपल्या सर्वांची शक्‍ती, क्षमता वेगवेगळ्या असतात.” बायबलमधील गलतीकर ६:४ हे वचन ॲन्ड्रूचे मनोगत व्यक्‍त करते: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”

इतरजण तुमच्याकडून अवाजवी अपेक्षा करतात तेव्हा

परंतु कधीकधी इतरजण—तुमचे आईवडील, शिक्षक किंवा इतर तुमच्याकडून खूप अपेक्षा करतील. तुम्हाला वाटेल, की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना खूष करू शकत नाही. त्यातल्या त्यात, असे लोक जेव्हा आपली नाराजी व्यक्‍त करतात तेव्हा तुम्हाला स्वतःचा राग येईल, तुम्ही पूर्णपणे हताश व्हाल. (ईयोब १९:२) कदाचित तुम्हाला याची जाणीव असेल, की तुमचे आईवडील आणि इतरजण तुम्हाला मुद्दामहून त्रास देत नाहीत. जेसिका म्हणते: “पुष्कळदा, त्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा आपल्याला मानसिक त्रास होतोय, याची त्यांना जाणीव नसते. आणि कधीकधी तर फक्‍त गैरसमज झालेला असतो.”

दुसऱ्‍या बाजूला पाहता, तुम्हाला जे दिसत नाही ते कदाचित त्यांना दिसत असावे का? उदाहरणार्थ, तुम्ही खरोखरच स्वतःला खूपच कमी लेखत असाल व क्षुल्लक समजत असाल. तेव्हा, त्यांच्या आर्जवांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांचा “बोध ऐकून शहाणे” होण्यातच सुज्ञता आहे. (नीतिसूत्रे ८:३३) मायकल म्हणतो: “यात तुमचाच फायदा आहे. तुम्ही सुधारणा करावी, अधिक चांगली कामगिरी करावी, अशी त्यांची इच्छा असते. हे एक आव्हान आहे असे समजा.”

पण तुम्हाला जर असे वाटत असेल, की आपल्या आईवडिलांच्या व इतरांच्या मागण्या अगदीच अवास्तविक आहेत, तुम्ही निश्‍चित अपयशी ठरणार आहेत आणि तरीसुद्धा ते तुम्हाला बळजबरी करत असतील तर काय? अशावेळी त्यांच्याबरोबर आदरपूर्वक परंतु स्पष्टपणे बोलण्यात सुज्ञपणा आहे; तुम्हाला काय वाटते ते त्यांना सांगा. मग कदाचित तुम्ही एकत्र मिळून अधिक वास्तविक असलेली ध्येये ठेवू शकता.

तुमच्या आध्यात्मिक जीवनातील “अपयश”

यहोवाचे साक्षीदार असलेल्या तरुणांना, देवाचे सेवक या नात्याने असलेली आपली नेमणूक पार पाडण्याची कठीण कामगिरी असते. (२ तीमथ्य ४:५) तुम्हीही ख्रिस्ती तरुणांपैकी एक असाल तर कधीकधी तुम्हाला असे वाटेल, की या कामासाठी आपण लायक नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल, की सभांमध्ये आपण इतकी काही चांगली उत्तरे देत नाही. किंवा, तुम्हाला इतरांना बायबलचा संदेश सांगायला जड जात असेल. उदाहरणार्थ, जेसिका एका किशोरवयीन मुलीबरोबर बायबलचा अभ्यास करायची. काही दिवसांपर्यंत या मुलीने चांगली प्रगती केली. पण मग मध्येच या मुलीने देवाची सेवा न करण्याचे ठरवले. तेव्हा जेसिकाला, “आपण शिक्षक या नात्याने पूर्णपणे हारलो” असेच वाटले.

जेसिकाने या भावनांवर कशाप्रकारे मात केली? सर्वात आधी तिला हे समजून घ्यावे लागले, की तिच्या विद्यार्थीनीने तिला नव्हे तर देवाला नाकारले होते. मग तिला, बायबलमधील पेत्राच्या उदाहरणावर मनन केल्याने मदत मिळाली; पेत्र देव-भीरू होता परंतु त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. ती म्हणते: “बायबल दाखवते, की पेत्राने आपल्या कमतरतांवर मात केली आणि राज्याचे कार्य वाढवण्याकरता यहोवाने त्याचा अनेक मार्गांनी उपयोग केला.” (लूक २२:३१-३४; ६०-६२) अर्थात, शिक्षक या नात्याने तुम्हाला जर तुमच्या कौशल्यांत आणखी सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न करू शकता. (१ तीमथ्य ४:१३) तुम्हाला शिकवू शकणाऱ्‍या व प्रशिक्षण देऊ शकणाऱ्‍या मंडळीतील प्रौढ बंधूभगिनींची मदत स्वीकारा.

तुम्हाला कदाचित घरोघरची सेवा खासकरून कठीण वाटत असावी. जेसन कबूल करतो: “ज्या ज्या वेळी घरमालक माझं बोलणं ऐकण्यास नकार देतो त्या त्या वेळेस मला, मी अपयशी ठरल्यासारखं वाटतं.” अशा भावनांचा तो सामना कसा करतो? “मी स्वतःला आठवण करून देतो, की खरं तर मी अपयशी ठरलेलो नाही.” होय, देवाने त्याला प्रचार करण्याची जी आज्ञा दिली आहे ती आज्ञा पूर्ण करण्यात तो यशस्वी झाला आहे! लोक आपले बोलणे ऐकून घ्यायला तयार नसतात तेव्हा आपल्याला कोणालाच आनंद होत नाही हे जरी खरे असले तरी, सर्वच लोक बायबलचा संदेश नाकारणार नाहीत. जेसन पुढे म्हणतो: “जेव्हा मला कोणी लक्ष देऊन ऐकणारं भेटतं तेव्हा मला, माझ्या सर्व प्रयत्नांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.”

गंभीर चुका

पण तुमच्या हातून एखादी गंभीर चूक—किंवा एखादे गंभीर पाप घडले असेल तर? १९ वर्षीय ॲनाने अशी चूक केली होती. * ती कबूल करते: “मी, मंडळीला, माझ्या कुटुंबाला आणि सर्वात अधिक म्हणजे यहोवा देवाला निराश केलं.” आध्यात्मिक ताकद पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पश्‍चात्ताप करून मंडळीतील आध्यात्मिक अर्थाने प्रौढ असलेल्या बांधवांची मदत घ्यावी लागेल. (याकोब ५:१४-१६) ॲना एका वडिलांच्या प्रेमळ शब्दांची आठवण करत सांगते: “त्यांनी मला सांगितलं, की राजा दावीदानं किती गंभीर पातकं केली होती तरीपण यहोवा देव त्याला क्षमा करण्यास तयार होता, आणि दावीद सावरला. या उदाहरणाचा मला खूप फायदा झाला.” (२ शमुवेल १२:९, १३; स्तोत्र ३२:५) तुम्ही देखील स्वतःला आध्यात्मिकरीतीने सावरण्यासाठी तुम्हाला जमेल ते करू शकता. ॲना म्हणते: “मी स्तोत्रसंहितेचे पुस्तक वारंवार वाचून काढते आणि माझ्याजवळ एक वही आहे ज्यात मी, मला प्रोत्साहनदायक वाटणारी वचने लिहिते.” हळूहळू, गंभीर पाप केलेल्या व्यक्‍तीलाही पुन्हा उठून उभे राहण्याची ताकद मिळू शकते. नीतिसूत्रे २४:१६ म्हणते: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.”

अपयशांवर मात करून पुढे जाणे

लहानसहान अपयशसुद्धा आपल्या मनाला खूप लागू शकतात. कोणती गोष्ट तुम्हाला यांच्यावर मात करून पुढे जाण्यास मदत करू शकेल? सर्वप्रथम, आपल्या चुकांबद्दल वास्तविक दृष्टिकोन बाळगून त्या पदरी घ्या. मायकल म्हणतो: “मी काय नेहमीच अपयशी ठरतो, असा स्वतःबद्दल विचार करण्याऐवजी, कोणतं काम करताना मी अपयशी ठरलो, कशामुळे अपयशी ठरलो या विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्या. यामुळे काय होईल, पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही तेच काम पुन्हा कराल तेव्हा तुम्ही ते आणखी चांगल्याप्रकारे करु शकाल.”

तसेच, एखाद्या कामात अपयशी झाल्यावर फाजील काळजी करू नका. “हसण्याचा समय” असतो; तेव्हा, स्वतःच्या चुकांवर हसा! (उपदेशक ३:४) तुम्ही निराश झाला असाल तर तुम्ही ज्यात निपुण आहात असा एखादा छंद किंवा खेळ यांत भाग घ्या. “सत्कर्मांविषयी धनवान” असल्याने अर्थात इतरांना आपला विश्‍वास सांगितल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढू शकेल.—१ तीमथ्य ६:१८.

सरतेशेवटी, यहोवा “दयाळू व कृपाळू आहे, . . . तो सर्वदाच दोष [काढत] राहणार नाही,” हे आठवणीत ठेवा. (स्तोत्र १०३:८, ९) जेसिका म्हणते: “मी यहोवा देवाच्या जितक्या जवळ जाते तितका माझा भरवसा वाढतो, की तो माझ्या पाठीशी आहे आणि मी ज्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्यात तो मला साहाय्य करतो.” होय, तुम्ही चुकत असला तरी तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमची किंमत आहे; किती सांत्वनदायक आहे हे! (g०४ ११/२२)

[तळटीप]

^ तिचे नाव बदलण्यात आले आहे.

[२४ पानांवरील चित्र]

तुमच्याकडून केल्या जाणाऱ्‍या अपेक्षा तुमच्या शक्‍तीपलिकडल्या आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांविषयी आदरपूर्वक पद्धतीने बोला

[२५ पानांवरील चित्र]

तुम्ही ज्या गोष्टीत निपुण आहात त्या गोष्टी केल्याने तुमच्या मनातील अपयशाच्या भावना नाहीशा होऊ शकतात