व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

असे करतात पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण

असे करतात पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण

असे करतात पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण

स्पेन येथील सावध राहा! लेखकाकडून

मानवांच्या बाबतीत पाहिल्यास, पालक जवळजवळ वीस वर्षांपर्यंत आपल्या मुलांचे संगोपन व पालनपोषण करतात. पण बऱ्‍याच पशूपक्षांना मात्र उन्हाळ्याच्या दोन चार महिन्यांच्या लहानशा कालावधीतच आपल्या पिलांचे पालनपोषण करावे लागते आणि त्यांना प्रशिक्षितही करावे लागते. काही पशूपक्षी कशाप्रकारे दर वर्षी हे कठीण काम करतात याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

१. श्‍वेत बलाक सोबतच्या चित्रात दाखवलेल्या बलाक पक्ष्याला उन्हाळ्याची सुटी घ्यायला मिळतच नाही. आपल्या वाढत्या पिलांची भूक भागवण्यासाठी त्याला जवळपासच्या तलावातून बेडूक, लहान मासे, सरडे किंवा नाकतोडी इत्यादी वारंवार पुरवावी लागतात. शिवाय वरचेवर घरट्याची डागडुजी पण करावी लागते. नर व मादी दोघेही दिवसभरात कितीतरी वेळा घरट्यात ये-जा करतात. लहान पिलांना भरपूर भूक लागते. पहिल्या दोन चार आठवड्यात तर ते एका दिवसात, आपल्या शरीराच्या अर्ध्या वजनाइतक्या अन्‍नाचा फडशा पाडतात! पिले उडायला शिकल्यावरही, नर व मादीला कित्येक आठवड्यांपर्यंत आपल्या पिलांना खायला आणून द्यावे लागते.

२. चित्ता नर व मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेत नाहीत; सहसा ही जबाबदारी मादीच पार पाडते. सर्वसामान्यपणे तीन ते पाच बछड्यांना दूध पाजण्याच्या काळात तिला स्वतःचे पोषण करण्याकरता जवळजवळ दररोजच शिकार करावी लागते. हे काही साधेसोपे काम नसते, कारण शिकारीचे प्रयत्न सहसा व्यर्थ ठरतात. शिवाय, तीन चार दिवसांच्या अंतराने तिला आपल्या पिलांना दुसऱ्‍या ठिकाणी न्यावे लागते कारण तिच्या असहाय्य पिलांना फस्त करण्यासाठी सिंह सतत पाळत ठेवून असतात. बछडे सात महिन्यांचे झाल्यावर ती त्यांना स्वतःहून शिकार करण्याचे प्रशिक्षण देऊ लागते. यात जवळजवळ एक वर्षांचा काळ जातो. बछडे सहसा आपल्या आईसोबत एक ते दीड वर्षे राहतात.

३. डुबडुबी डुबडुबी हा पक्षी सतत आपल्या पिलांबरोबरच असतो. अंड्यांतून बाहेर पडल्यानंतर पिले आपल्या तरंगत्या घरट्याला सोडून आपल्या पालकाच्या पाठीवर आरामशीर बसतात. सगळी पिले नर किंवा मादा पक्ष्याच्या पाठीवर, पंखाच्या व मागच्या बाजूला असलेल्या पिसांच्या मधोमध जाऊन बसतात. डुबडुबी पक्षी पाण्यात पोहतो तेव्हा पिले उबदार आणि अगदी सुरक्षित असतात. नर व मादी यांपैकी एकजण पाण्यात डुबकी मारून पिलांसाठी खायला आणतो; तोपर्यंत दुसरा पिलांना पाठीवर घेऊन फिरतो. लवकरच पिले पाण्यात सूर मारून स्वतःसाठी अन्‍न मिळवण्यास शिकतात; पण तरीसुद्धा आपल्या पालकांशी त्यांचे नाते यानंतरही काही काळ कायम राहते.

४. जिराफ जिराफांना सहसा एका खेपेला एकापेक्षा जास्त पिले होत नाहीत. कारण अगदी स्पष्टच आहे. नुकत्याच जन्मलेल्या जिराफच्या पिलाचे (चित्रात दाखवल्याप्रमाणे) वजन ६० किलो असून त्यांची उंची तब्बल सहा फुटांची असते! जन्मानंतर एका तासाने हे पिलू आपल्या पायावर उभे राहते आणि काही वेळातच आईचे दूध पिऊ लागते. पिलू जन्मल्यानंतर लगेच चरायला लागते तरीसुद्धा, मादी जवळजवळ नऊ महिने त्याला दूध पाजते. या लहानशा जिराफला कोणताही धोका संभवल्यास, ते लगेच येऊन आपल्या आईच्या पायांच्या मधोमध उभे राहते कारण स्वसंरक्षणासाठी जिराफ शत्रूला पायांनी जबरदस्त फटकारे मारतो.

५. खंड्या पिलांसाठी मासे पकडताना खंड्या या पक्षाला अतिशय तरबेज असावे लागते; शिवाय कोणताही मासा धरून चालत नाही. पक्षीवैज्ञानिकांना असे आढळले की अंड्यांतून नुकत्याच बाहेर पडलेल्या पिलांसाठी खंड्या पक्षी एक ते दोन सेंटीमीटर लांबीचेच मासे आणतो. तो अतिशय सावधगिरीने प्रत्येक मासा चोचीत अशाप्रकारे धरतो की ज्यामुळे त्याचे डोके बाहेर राहावे. यामुळे भुकाळलेल्या पिलांना मासा खाण्यास अधिक सोपे जाते कारण माशाचा डोक्याचा भाग प्रथम तोंडात आल्यामुळे ते सहज मासा गिळू शकतात. पिले मोठी होऊ लागतात तसे नर व मादी त्यांच्याकरता थोडे मोठे मासे आणू लागतात. तसेच मासे आणून देण्याच्या त्यांच्या खेपाही वाढतात. सुरुवातीला पिलाला दर ४५ मिनिटांनी मासा आणून दिला तरी चालतो. पण ही पिले १८ दिवसांची झाल्यावर मात्र त्यांना सपाटून भूक लागते आणि तेव्हा दर १५ मिनिटांना त्यांना मासा आणून द्यावा लागतो! चित्रात दाखवलेल्या पिलाने आपले घरटे सोडले आहे आणि लवकरच ते स्वतःहून मासे पकडू लागेल. कदाचित, नर व मादीला आता थोडा आराम मिळेल असा कदाचित तुम्ही विचार कराल. पण खंड्या पक्षांच्या बाबतीत असे घडत नाही! त्याच उन्हाळ्यात त्यांच्या विणीचा हंगाम पुन्हा एकदा सुरू होतो आणि त्यांना पुन्हा कामाला लागावे लागते.

अर्थात, वेगवेगळे पशूपक्षी आपल्या पिलांचे पालनपोषण कसे करतात याविषयीची बरीच माहिती अजूनही अज्ञात आहे. पण निसर्गाचा अभ्यास करणारे जितके नवनवीन शोध लावतात तितकेच हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे की पिलांचे पालनपोषण करण्याची उपजतबुद्धी प्राणीजगतात अतिशय प्रबळ आहे. जर पशूपक्षांना देवाने ही उपजतबुद्धी दिली आहे तर साहजिकच मानवांनीही आपल्या मुलांचे पालनपोषण करावे अशीच त्याची इच्छा आहे यात शंका नाही. (g०५ ३/२२)