व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आईची भूमिका आदरास पात्र

आईची भूमिका आदरास पात्र

आईची भूमिका आदरास पात्र

कुटुंबात, आईच्या भूमिकेची सहसा तितकिशी कदर केली जात नाही; किंबहुना, बरेचदा त्याविषयी हेटाळणीच्या सुरात भाष्य केले जाते. काही दशकांपूर्वी, मुलांचे संगोपन करणे काहीजणांना कमीपणाचे वाटू लागले होते. त्यांच्या मते, मुलाबाळांची काळजी घेणे हे आईच्या करियरपेक्षा महत्त्वाचे नाही, उलट हा आईवर एकप्रकारचा अन्याय आहे. ही टोकाची भूमिका बऱ्‍याच जणांना कदाचित भावणार नाही; पण एक गोष्ट मात्र खरी, ती अशी की, घरकाम करणे आणि मुलाबाळांचे पालनपोषण करणे हे दुय्यम दर्जाचे काम आहे असेच सहसा आयांना भासवले जाते. काहीजणांचे असेही मत आहे की घराबाहेर पडून स्वतःचे करियर बनवल्याशिवाय स्त्रीला आपल्या गुणांचे चीज करता येत नाही.

पण असेही बरेच पती व मुले आहेत की जे आपल्या कुटुंबात आईच्या भूमिकेची मनापासून कदर करतात. फिलिपाईन्स येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करणारा कार्लो असे म्हणतो: “आज मी इथं आहे हे केवळ माझ्या आईने दिलेल्या तालमीमुळे. माझे वडील अतिशय कडक होते आणि कोणतीही चूक झाली की लगेच शिक्षा द्यायचे. पण आई मात्र आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा, स्वतःहून विचार करायला लावण्याचा प्रयत्न करायची. तिची शिकवण्याची पद्धत खरोखरच प्रशंसास्पद होती.”

दक्षिण आफ्रिकेत राहणारा पीटर सहा भावंडांपैकी एक आहे. त्यांच्या आईचे फारसे शिक्षण झालेले नव्हते. वडील मुलाबाळांना वाळीत टाकून निघून गेले होते. पीटर सांगतो: “आई चार घरी मोलकरणीचं काम करून थोडेबहुत पैसे कमवायची. आम्हा सर्वांच्या शाळेची फी ती कशीबशी भरायची. बरेचदा आम्ही उपाशीच झोपी जायचो. निदान आमच्या डोक्यावर छत राहावं म्हणून तिला धडपड करावी लागे. या सर्व अडचणी असूनही आईने परिस्थितीपुढे कधीही हात टेकले नाहीत. तिनं आम्हाला शिकवलं की कधीही स्वतःची दुसऱ्‍यांशी तुलना करू नये. तिच्याच धैर्यशील, समर्पित वृत्तीमुळेच आम्ही जीवनात यशस्वी होऊ शकलो.”

अहमद नावाचा एक नायजिरियन पती, मुलांच्या संगोपनात त्याच्या पत्नीने केलेल्या सहकार्याविषयी आपल्या भावना या शब्दांत व्यक्‍त करतो: “माझ्या पत्नीच्या भूमिकेची मी कदर करतो. मी घरात नसतानाही, ती मुलांची चांगल्याप्रकारे काळजी घेईल अशी मला खात्री वाटते. ती माझ्याशी स्पर्धा करतेय असे मला कधीही वाटत नाही, उलट मी तिचे आभार मानतो आणि मुलांना नेहमी सांगतो की जसा ते माझा आदर करतात तसाच तिचाही त्यांनी आदर केला पाहिजे.”

आपली पत्नी, आईची भूमिका अगदी यशस्वीपणे निभावत असल्याबद्दल एक पॅलेस्टेनियन पती तिची अशाप्रकारे स्तुती करतो: “लीनाने आमच्या मुलीला अतिशय उत्तम वळण लावले आहे; आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिकतेत तिचा महत्त्वाचा वाटा आहे. माझ्या मते तिच्या धार्मिक विश्‍वासांमुळेच ती असे करू शकली.” लीना ही एक यहोवाची साक्षीदार असून आपल्या मुलीला शिकवताना ती बायबल तत्त्वांचा आधार घेते.

यांपैकी काही तत्त्वे कोणती आहेत? आईची भूमिका निभावणाऱ्‍या स्त्रियांबद्दल बायबलचा दृष्टिकोन काय आहे? प्राचीन काळात आईची भूमिका निभावणाऱ्‍या स्त्रियांना, आपल्या मुलांना तालीम दिल्याबद्दल कशाप्रकारे आदर व सन्मान दिला जायचा?

मातांविषयी योग्य दृष्टिकोन

स्त्रीला निर्माण करण्यात आले तेव्हा तिला कौटुंबिक व्यवस्थेत सन्मानाचे स्थान देण्यात आले होते. बायबलच्या पहिल्या पुस्तकात असे म्हटले आहे: “परमेश्‍वर देव बोलला, ‘मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरुप साहाय्यक मी करीन.’” (उत्पत्ति २:१८) अशारितीने पहिली स्त्री हव्वा हिला एक साहाय्यक किंवा पूरक म्हणून आदामाला देण्यात आले होते. त्याला साहाय्य करता येईल या दृष्टीनेच तिची रचना करण्यात आली होती. त्यांनी संतती उत्पन्‍न करून त्यांची देखभाल करावी तसेच या पृथ्वीची व त्यातील पशुपक्ष्यांची देखभाल करावी या देवाच्या उद्देशात तिचीही महत्त्वाची भूमिका होती. एका उत्तम साथीदाराकडून ज्या गोष्टींची अपेक्षा केली जाते, अर्थात वैचारिक प्रेरणा आणि आधार ती आदामाला पुरवणार होती. आपल्या निर्माणकर्त्याकडून हव्वेच्या रूपात एक अप्रतिम देणगी मिळाल्यावर आदामाला किती आनंद झाला असेल!—उत्पत्ति १:२६-२८; २:२३.

कालांतराने, स्त्रियांशी कशाप्रकारे व्यवहार केला जावा याविषयी देवाने सुस्पष्ट सूचना दिल्या. उदाहरणार्थ, इस्राएलीयांना सांगण्यात आले होते, की त्यांनी आपल्या मातेला आदर दाखवावा आणि कधीही तिला तुच्छ लेखू नये. “आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला” मृत्यूदंड दिला जाईल असे सांगण्यात आले होते. ख्रिस्ती मुलांनाही “आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा,” असे सांगण्यात आले.—लेवीय १९:३; २०:९; इफिसकर ६:१; अनुवाद ५:१६; २७:१६; नीतिसूत्रे ३०:१७.

पतीच्या नेतृत्त्वाखाली, आईला आपल्या मुलांना व मुलींना शिकवण्यास सांगण्यात आले होते. मुलाला अशी आज्ञा देण्यात आली होती की त्याने “आपल्या आईची शिस्त सोडू” नये. (नीतिसूत्रे ६:२०) तसेच नीतिसूत्रे अध्याय ३१ यात “[राजा लमुवेलाच्या] आईने त्याला शिकविलेली देववाणी” आपण वाचू शकतो. तिने सुज्ञपणे आपल्या मुलाला मद्यपानाचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला. तिने म्हटले: “द्राक्षारस पिणे राजांस शोभत नाही, राजांस ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांस शोभत नाही. ते ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पीडलेल्यांचा न्याय विपरीत करितील.”—नीतिसूत्रे ३१:१, ४, ५.

तसेच, लग्न करू इच्छिणाऱ्‍या प्रत्येक मनुष्याने राजा लमुवेलाच्या आईने केलेले ‘सद्‌गुणी स्त्रीचे’ वर्णन जरूर वाचावे. तिने म्हटले: “[सद्‌गुणी स्त्रीचे] मोल मोत्यांहून अधिक आहे.” एक सद्‌गुणी पत्नी कशाप्रकारे आपल्या घरातील कारभारात महत्त्वाचे योगदान देते याविषयी वर्णन केल्यावर राजाची आई म्हणते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” (नीतिसूत्रे ३१:१०-३१) यावरून अगदी स्पष्ट होते की आपल्या निर्माणकर्त्याने स्त्रियांना कुटुंबात सन्मानाचे व जबाबदारीचे पद दिले आहे.

ख्रिस्ती मंडळीत पत्नींचा व मातांचा आदर केला जातो व त्यांची कदर केली जाते. इफिसकर ५:२५ म्हणते: “पतींनो, . . . आपआपल्या पत्नीवर प्रीति करा.” तीमथ्य, ज्याच्या आईने व आजीने त्याला लहानपणापासून ‘पवित्र शास्त्राचा’ आदर करण्यास शिकवले होते, त्याला हा प्रेरित सल्ला देण्यात आला होता: ‘वडील स्त्रियांस मातासमान मान.’ (२ तीमथ्य ३:१५; १ तीमथ्य ५:१, २) त्याअर्थी, पुरुषाने आपल्यापेक्षा वयस्क स्त्रियांना मातेसमान मानून त्यांचा आदर केला पाहिजे. खरोखर देव स्त्रियांची कदर करतो आणि त्यांना आदराचा दर्जा देतो.

प्रशंसा व्यक्‍त करा

स्त्रियांना जेथे दुय्यम दर्जाचे मानले जाते अशा संस्कृतीत वाढलेला एक जण असे म्हणतो: “मला लहानपणापासून असेच शिकवण्यात आले होते, की पुरुष स्त्रियांपेक्षा वरचढ आहे. स्त्रियांना दिली जाणारी गैरवागणुक आणि त्यांचा केला जाणारा अनादर मी प्रत्यक्ष पाहिला आहे. त्यामुळे निर्माणकर्त्याच्या दृष्टिकोनाने स्त्रियांकडे पाहणे, अर्थात कुटुंबात स्त्री एक साहाय्यक व पूरक म्हणून आहे, व मुलांवर संस्कार करण्यात तिचाही वाटा आहे असा दृष्टिकोन बाळगणे मला सुरुवातीला जड गेले. माझ्या पत्नीबद्दल प्रशंसा शब्दांत व्यक्‍त करणे मला कठीण जाते पण मनोमन मला जाणीव आहे की माझ्या मुलांमध्ये जे काही चांगले गुण आहेत ते तिच्याच मेहनतीमुळे आहेत.”

खरोखर मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणाऱ्‍या स्त्रिया आपण केलेल्या योगदानाविषयी अभिमान बाळगू शकतात. हे एक संतुष्टीदायक करियर आहे. या स्त्रिया खरोखर प्रशंसेस पात्र आहेत आणि त्यांच्याविषयी वाटणारी प्रशंसा मनःपूर्वक व्यक्‍त करणे महत्त्वाचे आहे. आई आपल्याला किती काही शिकवते—आयुष्यभर कामी पडतील अशा चांगल्या सवयी, उत्तम नातेसंबंधांना पोषक ठरणारे शिष्टाचार, आणि बरेचदा, तरुण वयात उत्तम आचरण राखण्यास मदत करतील अशाप्रकारचे नैतिक व आध्यात्मिक संस्कार देखील. तुमच्या आईने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुम्ही अलीकडे तिचे आभार मानले आहेत का? (g०५ २/२२)

[९ पानांवरील चित्र]

पीटरच्या आईने त्याला शिकवले की परिस्थितीपुढे कधीही हात टेकायचे नाहीत

[१० पानांवरील चित्र]

मुलांच्या संगोपनात आपल्या पत्नीच्या योगदानाची अहमद मनापासून कदर करतात

[१० पानांवरील चित्र]

लीनाचा पती त्यांच्या मुलीच्या उत्तम वळणाचे श्रेय आपल्या पत्नीच्या धार्मिक विश्‍वासांना देतो