व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मुलांना वाचनाची गोडी लावा

“वाचण्याचा छंद असलेल्या पालकांची मुले आपल्या पालकांच्या उदाहरणाचे अनुकरण करणारी बनतात असे दिसून आले आहे”, असे न्यूरोलिंग्वीस्टक्सच्या तज्ज्ञ बट्रीझ गोन्साल्झ ओरट्युन्यो, यांचे म्हणणे आहे. रिफॉर्मा या मेक्सिकन बातमीपत्रकातील अहवालात असे सांगण्यात आले आहे, की मुलांमध्ये शिकण्याची बरीच क्षमता असल्यामुळे, त्यांना स्वरव्यंजनांची ओळख होण्याआधीच वाचनाची गोडी लावली पाहिजे. जसे की, त्यांना गोष्टी वाचून दाखवता येऊ शकतात. गोष्टी वाचून दाखवल्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्‍तीला चालना मिळू शकेल. कशी सुरुवात करायची त्याबद्दल बातमीपत्रात पुढील मुद्दे सुचवले होते: “मुलांना जवळ घेऊन बसा. . . . त्यांना पुस्तकांची पाने उलगडू द्या, ते मधे बोलतात, प्रश्‍न विचारतात तेव्हा त्यांना अडवू नका. . . . गोष्टीतील वस्तू, पात्र यांच्याविषयी बोलायला सांगा. त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्या . . . पुस्तकात त्यांनी वाचलेल्या गोष्टींचा मुलांच्या जीवनाशी संबंध जोडा.” (g०५ १/८)

हत्तीच्या नाकाला झिणझिण्या!

आफ्रिकेच्या अभयारण्यातील हत्तींमुळे, पर्यावरणवादी आणि शेतकरी यांच्यामध्ये कित्येक वर्षांपासून झगडे होत आहेत. हत्तींचा पाय अभयारण्याच्या हद्दीत टिकून राहावा म्हणून नाही नाही ते प्रयत्न करण्यात आले. कुंपणे, आग, ढोल, यासर्वांचा उपयोग करून पाहण्यात आला. पण भटकत राहणाऱ्‍या हत्तींनी वारंवार पिकांची नासाडी केली आहे व पुष्कळ लोकांना पायाखाली चिरडले देखील आहे. आणि सरतेशेवटी, हत्तींना दूर ठेवणारा उपाय सापडला—मिरचीचे झाड. अभयारण्याच्या सीमेजवळील जे शेतकरी आपल्या शेतात ही झाडे लावतात तिथे हत्ती फिरकतही नाहीत कारण, “या झाडाच्या विशिष्ट वासाने ते दूर पळतात,” असा द विटनेस या दक्षिण आफ्रिकेच्या बातमीपत्रकाने अहवाल दिला. सुंठेवाचून खोकला गेला असेच वनरक्षकांना वाटत आहे. त्यांना “हत्तींना पुन्हा अभयारण्यात हुसकावून लावावे लागत नाही” शिवाय, स्थानीय शेतकऱ्‍यांच्या पीकांचेही नुकसान कमी झाले आहे. आणि मिरचीच्या पीकामुळे चार पैसेही मिळू लागले आहेत. (g०५ १/८)

वृद्धजन, बोजा नाहीत

“वृद्धांवर होणाऱ्‍या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, या बिनपगारी वृद्धांच्या कामामुळे किती पैसा वाचतो, आणि आपल्याला त्यांचा किती लाभ होतो, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे,” असे कौटुंबिक अभ्यासाच्या ऑस्ट्रेलियन संस्थेने दिलेल्या एका अहवालात म्हटले होते. “जी कामे पैसे देऊनही होऊ शकत नाहीत अशी बहुतेक कामे करून ही वृद्ध मंडळी आपल्याला साहाय्य करत असतात.” या अभ्यासात असे दिसून आले, की “६५ वर्षे ओलांडलेल्या ऑस्ट्रेलियन वृद्धांनी आपल्या कुटुंबातली कामे केली होती ज्यामुळे दर वर्षी जवळजवळ ३,९०० कोटी (ऑस्ट्रेलियन) डॉलरची समाजासाठी बचत झाली होती.” अशा स्वेच्छिक कार्यांत, मुलांना सांभाळणे, आजारी प्रौढांची शुश्रृषा करणे आणि घरातील छोटी-मोठी कामे करणे यांचा समावेश होतो. हे बिनपगारी काम, जणू काय “समाजाला एकत्र बांधून ठेवण्यास मदत करणारा सामाजिक ‘डिंक’ ठरू शकते,” असे अधिकाऱ्‍यांचे म्हणणे आहे. याची किंमत पैशाने मोजता येत नाही. (g०५ १/८)

एका वर्षात कळस गाठणाऱ्‍या एड्‌सची उदाहरणे

२००३ साली पन्‍नास लाख लोकांना एड्‌स विषाणूची बाधा झाली; “वीस वर्षांपूर्वी या साथीला सुरुवात झाली, पण केवळ एका वर्षांत इतक्या संख्येच्या लोकांना या साथीची बाधा झाली,” असे द वॉल स्ट्रीट जर्नल अहवाल देते. “संपूर्ण जगभरातील विकसनशील राष्ट्रांत एचआयव्हीविरुद्ध जोमाने लढा चालू आहे तरीसुद्धा, दर वर्षी वाढत्या संख्येच्या लोकांना एड्‌सच्या विषाणूंची बाधा होत आहे आणि अनेक जण बळी पडत आहेत.” संयुक्‍त राष्ट्र आणि इतर गट, युएनएड्‌स या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. त्यांनी एड्‌सवर तयार केलेल्या अहवालानुसार, दर वर्षी जवळजवळ ३० लाख लोक एड्‌सला बळी पडत आहेत आणि १९८१ साली या आजाराचा पहिल्यांदा शोध लागला तेव्हापासून २ कोटीपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या, युएन एजन्सीचा असा अंदाज आहे, की ३.८ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. सर्वात पहिल्या क्रमांकावर आफ्रिकेच्या दक्षिणेकडील सहारा वाळवंटी प्रदेश आहे जिथे २.५ कोटी उदाहरणे मिळाली आहेत; यानंतर दक्षिण आणि आग्नेय आशियाचा क्रमांक लागतो जिथे ६५ लाख एड्‌सची बाधा झालेले रुग्ण आहेत. “जगभरात, नव्यानेच एचआयव्ही झालेल्या सर्व उदाहरणांतील निम्मेअधिक रुग्ण, १५ ते २४ वयोगटातील तरुण आहेत,” असे बातमीपत्रकात म्हटले होते. (g०५ २/२२)

झाडांसाठी उंचीची मर्यादा

“रेडवुड झाडे पृथ्वीवरील सर्वात उंच वाढणारी झाडे आहेत पण त्यांनाही मर्यादा आहेत. वातावरण कितीही अनुकूल असले तरीही त्यांना एका मर्यादित उंचीपर्यंतच वाढता येते,” असे लास वेगास रिव्ह्यू-जर्नल या बातमीपत्रकात म्हटले होते. सध्या जगातील सर्वात उंच झाडांच्या (११०, मीटर उंचीची म्हणजे एका ३० मजली इमारतीच्या उंचीची झाडे) आणि त्यांच्या जातीतील इतर चार जातीच्या झाडांच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे, की रेडवुडचे झाड जास्तीतजास्त जवळजवळ १३० मीटर उंच वाढू शकते. पानांतील जलांश कमी होतो तेव्हा, झाडाला आपल्या मुळांपासून पाणी उपसून झाडाच्या अगदी शेंड्यापर्यंत पोहंचवावे लागते. हे गुरुत्वाकर्षण शक्‍तीच्या विरुद्ध कार्य आहे. यासाठी जास्तीतजास्त २४ दिवस लागू शकतात, असा संशोधकांचा अंदाज आहे. प्रकाष्ठ वाहिन्या म्हटल्या जाणाऱ्‍या नलिकाकार वाहिन्यांतून पाणी शोषले जाते तेव्हा मूल-दाब वाढतो आणि पाण्याच्या पुरवठ्यात खंड पडून झाडाची उंची मर्यादित राहते. ज्याची नोंद करण्यात आली, ते डग्लस फर नावाचे एक झाड सर्वात उंच असल्याची नोंद करण्यात आली आहे. ते सुमारे १२६ मीटर उंच वाढले होते. (g०५ २/२२)

पँडा आणि त्यांचा बांबू

“चीन देशाचे आणि वन्यजीव पर्यावरणवाद्यांचे प्रतिक असलेला जायंट पँडा, पूर्वी विचार केला जायचा त्याप्रमाणे आता नामशेष होण्याच्या मार्गावर नाहीत,” असे लंडनच्या द डेली टेलिग्राफने म्हटले. वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर आणि चीन सरकार यांनी केलेल्या चार वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले, की जंगलात १,००० ते १,१०० पँडा अस्तित्वात असल्याचा पूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा आता १,५९० पेक्षा अधिक पँडा आहेत. सुधारित तंत्रज्ञानामुळे तसेच उपग्रह पोझिशनिंग सिस्टममुळे, पँडांचे वास्तव्य असलेल्या परिसराचा कसून शोध घेऊन त्यांची अचूक संख्या प्राप्त करता आली. ही पर्यावरणवाद्यांसाठी आनंदाची बातमी असली तरी, इंग्लंडच्या केंब्रीजमधील वर्ल्ड कन्झर्वेशन मॉनिटरींग सेंटरने अशी ताकीद दिली आहे, की पँडांचे मुख्य खाद्य असलेल्या बांबूची मोठ्या प्रमाणावर तोडणी होत आहे. प्रत्येक २० ते १०० वर्षांतून एकदाच बांबूना फुले येतात आणि नंतर ते मरून जात असल्यामुळे, बांबूंची मोठ्या प्रमाणावर तोडणी उचित नाही,” असा टेलिग्राफने अहवाल दिला. (g०५ ३/८)

चुटकीसरशी सावज धरणारा सरडा

सरडा आपल्या जीभेने एका चुटकीसरशी आपले भक्ष्य कसे धरू शकतो? “गलोल मारण्यापूर्वी जशी ती ताणून धरली जाते तसे सावज धरण्यापूर्वी सरडा आपल्या जीभने जणू काय आपली ताकद ताणून धरतो,” असे न्यू साईंटिस्ट नावाचे मासिक म्हणते. सरड्याच्या जीभेवर आवरणे असतात व यांभोवती एक वेगवर्धक स्नायू असतो हे, वैज्ञानिकांना माहीत होते. आता डच संशोधकांनी स्लो-मोशन व्हिडिओद्वारे हे शोधून काढले आहे, की सरडा भक्ष्य पकडण्यासाठी आपली जीभ तोंडाबाहेर काढण्याच्या केवळ २०० मिलीसेकंदाआधी, “दुर्बिणीची लेन्स जशी एकात एक असते त्याप्रमाणे वेगवर्धक स्नायूच्या साहाय्याने तो जीभेच्या आवरणांना ओढून घेतो. सरडा जेव्हा सावज धरतो तेव्हा त्याची जीभ, केवळ २० मिलीसेकंदात ताणून धरलेली ताकद मोकळी करून” सावजाला धरते. (g०५ ३/२२)