व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टमाटा एक बहुपयोगी “भाजी”

टमाटा एक बहुपयोगी “भाजी”

टमाटा एक बहुपयोगी “भाजी”

ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाकडून

“बिन टमाट्याचा माझा स्वयंपाक होईल का?” असा प्रश्‍न एक महाराष्ट्रीयन गृहिणी करेल. संपूर्ण जगातील असंख्य गृहिणींना देखील असेच वाटते. खरेच, टमाट्याने अनेक संस्कृतींच्या पाककृतीत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. परसांत फळभाज्या वाढवणारे, इतर भाज्यांपेक्षा टमाटाच जास्तीकरून लावतात. पण टमाटा हे फळात मोडते की भाजीत?

शास्त्रीयरीत्या, टमाटा हे एक फळ आहे कारण त्यात बेरीसारख्या लहानलहान बिया असतात. परंतु पुष्कळ लोक टमाट्याला भाजीच समजतात. कारण तो सहसा मुख्य अन्‍नपदार्थाबरोबर खाल्ला जातो. या रुचकर अन्‍नाचा इतिहासही रोचक आहे.

रंगीबेरंगी इतिहास

मेक्सिकोत ॲझटेक्स लोक अन्‍नासाठी या वनस्पतीची लागवड करत असत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, माघारी परतणाऱ्‍या स्पॅनिश विजेत्यांनी ही वनस्पती स्पेनला नेली आणि टोमॅटल हा नाव्हातल शब्दही उसना घेऊन त्यांनी त्याला टोमॅटे असे नाव दिले. हळूहळू, इटली, उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील स्पॅनिश लोकसमाजाला या नवीन अन्‍नपदार्थाची चटक लागली.

याच शतकात, टमाटा उत्तर युरोपात पोहंचला. सुरुवातीला पुष्कळ लोकांचा असा समज होता, की ही वनस्पती विषारी आहे. त्यामुळे लोक शोभेकरीता ती आपल्या बागांत लावत असत. ही नाईटशेड अर्थात सोलॅनेसी कुलातील वनस्पती आहे जिच्या पानांना एकप्रकारचा उग्र वास असतो आणि हिचे खोड विषारी असते. परंतु तिचे फळ मात्र पूर्णपणे बिनविषारी आहे.

युरोपातून आणलेल्या टमाट्याचा रंग पिवळा असावा. कारण इटालियन लोक याला पोमोडोरो (सोनेरी सफरचंद) असे म्हणायचे. इंग्रज याला टोमॅटे आणि नंतर टोमॅटो म्हणू लागले. पण, “लव्ह ॲपल” हे नावही रूढ झाले. युरोपातून कालांतराने टमाटा अटलांटिकहून पुन्हा उत्तर अमेरिकेत आणण्यात आला. येथेही त्याने १९ व्या शतकात महत्त्वाचे स्थान पटकावले.

टमाट्याचे नाना प्रकार आणि लोकप्रियता

टमाटे कोणत्या रंगाचे असतात असे कोणालाही विचारल्यावर, ते सहसा “लाल” असेच उत्तर देतील. पण, पिवळे, नारिंगी, गुलाबी, जांभळे, तपकिरी, सफेद, हिरवे आणि काही तरी पट्टेदार असतात, हे तुम्हाला माहीत होते का? सर्वच आकाराने गोल नसतात. काही चपटे असतात तर काही नासपतीच्या आकाराचे असतात. ते वाटाण्याइतके लहान किंवा माणसाच्या मुठीइतके मोठेही असतात.

या वनस्पतीची लागवड, उत्तरेपासून म्हणजे आईसलँडपासून दक्षिणेपर्यंत म्हणजे न्यूझीलंडपर्यंत केली जाते. संयुक्‍त संस्थाने आणि दक्षिणी युरोपियन राष्ट्रे टमाट्यांचे प्रमुख उत्पादक आहेत. थंड हवामान असलेल्या ठिकाणी, हरितगृहात टमाट्याची लागवड केली जाते. आणि कोरड असलेल्या भागात टमाट्याच्या रोपट्यांना मातीत लावण्याऐवजी पोषक द्रव्यात ठेवून अर्थात मुद्‌हीन कृषिपद्धतीने त्यांचे पीक काढले जाते.

छंद म्हणून बागकाम करणाऱ्‍यांना आपल्या बागेत टमाटा लावायला आवडतो. तो लवकर वाढतो आणि काही रोपांतून एका लहान कुटुंबाला पुरतील इतके भरपूर टमाटे मिळू शकतात. जागा कमी असेल तर घराबाहेर असलेल्या थोड्याफार अंगणाच्या जागेत आणि खिडक्यांमध्ये कुंडीत वाढणारे प्रकार तुम्ही लावू शकता.

सूचना आणि आरोग्य मंत्र

थंड हवामानामुळे टमाट्याची चव बिघडते, त्यामुळे टमाटे फ्रीजमध्ये साठवू नका. टमाटे लवकर पिकवण्यासाठी पुढे काही मार्ग सुचवले आहेत. एक तर तुम्ही कच्चे टमाटे, ऊन लागेल अशाठिकाणी खिडकीतही ठेवू शकता किंवा कच्च्या टमाट्यांबरोबर एखादा पिकलेला टमाटा किंवा केळ ठेवा. किंवा मग काही दिवसांपर्यंत, कच्चे टमाटे जाड तपकिरी रंगाच्या कागदाच्या पिशवीत ठेवा.

टमाटे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. त्यात अ, क आणि ई जीवनसत्व तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि खनिज क्षार असते. संशोधकांना असे दिसून आले आहे, की टमाट्यात लायकोपीन असते जे एक शक्‍तिशाली प्रतिऑक्सिडीकारक आहे की ज्यामुळे कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या विशिष्ट आजारांचा धोका कमी करता येतो. टमाट्यात ९३ ते ९५ टक्के जलांश असते आणि वजन कमी करणाऱ्‍यांना हे ऐकून आनंद वाटेल, की टमाट्यात कॅलरींचे प्रमाण कमी असते.

चवदार बहुगुणी

टमाटे विकत घेताना तुम्ही कोणत्या प्रकारचे टमाटे घेता? आपला नेहमीचा लाल टमाटा, कोशिंबीर, सूप आणि सॉस बनवण्यासाठी उत्तम आहे. लहान आकाराचे लाल, नारिंगी किंवा पिवळे चेरी टमाटे खूप गोड असतात कारण त्यांत शर्करेचे प्रमाण जास्त असते आणि हे टमाटे कच्चे खाण्यातच मजा आहे. तुम्ही पिझा किंवा पास्ता बनवणार असाल तर, मांसल, अंडाकृती प्लम टमाटेच उत्तम. बीफस्टेक टोमॅटो नावाचा आणखी एक टमाटा जो घट्ट, मांसल असतो तो सारण भरून करण्यासाठी किंवा बेक करण्यासाठी छान आहे. हिरव्या टमाट्यावर कधीकधी पट्टे असतात. या टमाट्यांची तोंडाला पाणी आणणारी चटणी बनवता येईल. होय, टमाट्याच्या वेगवेगळ्या चवींमुळे व रंगामुळे, तो भाज्यांमध्ये, अंड्यात, पास्तात, मटणात, माशांच्या पदार्थांत घालून नाना तऱ्‍हेचे चवदार पदार्थ बनवता येतात. तुम्हाला कदाचित ताजे टमाटे मिळत नसतील पण निदान तुमच्या जवळच्या दुकानात, टमाट्याचे डबाबंद प्रकार तर जरूर मिळत असतील.

प्रत्येक स्वयंपाकी आपापल्या पद्धतीने टमाट्याचे पदार्थ बनवतो. पुढे काही पाककृती दिल्या आहेत, तुम्हाला त्या करून पाहायला आवडतील.

१. झटपट आणि रंगीबेरंगी ॲपीटायझर बनवण्यासाठी प्लेटमध्ये टमाटा, मॉझरेला चीज आणि ॲव्हकॅडोच्या चकत्या एकावर एक अशा सजवून ठेवा. त्यावर ऑलिव्ह ऑईलचा सॉस आणि काळ्या मिरीची पूड शिंपडा. वरून बारीक चिरलेली बेसीलची पाने पेरा.

२. ग्रीक कोशिंबीर बनवण्यासाठी बारीक चिरलेला टमाटा, काकडी, फेटा चीज आणि ब्लॅक ऑलिव्ह्स एकत्र करा. वरून मीठ आणि काळी मिरी पूड घाला. त्यानंतर वरून ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू रस मिसळून बनवलेला सॉस घाला.

३. मेक्सिकन सल्सा बनवण्यासाठी, पुढील सर्व गोष्टी बारीक चिरा. टमाटा, कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर. चिरून झाल्यावर सर्व एकत्र करा आणि वरून लिंबू रस पिळा.

४. पास्तासाठी एक साधासोपा आणि चटकदार टोमॅटो सॉस बनवण्याची पद्धत अशी: एका कढईत डबाबंद चिरलेला टमाटा, चिमूटभर साखर (किंवा फोडणी दिलेले टमाटो प्यूरी), चवीनुसार ऑलिव्ह ऑईल, एक ठेचलेली लसणाची पाकळी, बेसील, तेजपत्ता किंवा ओरीगानोची पाने आणि मीठ व मिरीपूड. हे सर्व एकत्र करून त्याची उकळी येऊ द्या. जवळजवळ २० मिनिटांनंतर सॉस घट्ट होईपर्यंत हे गार होऊ द्या. नंतर, शिजवलेल्या व गाळून घेतलेल्या पास्त्यावर हा सॉस घाला.

आपल्यासाठी बनवण्यात आलेल्या तऱ्‍हेतऱ्‍हेच्या लज्जतदार अन्‍नपदार्थांच्या प्रकारांपैकी टमाटा केवळ एक उदाहरण आहे. (g०५ ३/८)