मगरीशी तुम्ही दोस्ती करू शकता?
मगरीशी तुम्ही दोस्ती करू शकता?
भारतातील सावध राहा! लेखकाकडून
मगरीशी दोस्ती? पिटर पॅन, या बालकथेत कॅप्टन हूक नावाचे एक पात्र, ‘मगरीकडे पाहून स्मितहास्य का करू नये,’ याचे कारण सांगतो. तुम्ही तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न कराल, पण ती, ‘तुम्हाला तिच्या जबड्यात कसे घेता येईल, याचा विचार करत असते,’ असे तो म्हणतो.
जगभरात, अनेक जातींच्या मगरींपैकी काही जाती मानवांवर हल्ला करतात हे खरे असले तरी, ‘असे फार क्वचित घडते, त्यामुळे मगरींना मनुष्यभक्षक म्हणता येणार नाही.’ (एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका) काही लोकांना मगर हा कुरूप आणि भयानक प्राणी वाटतो तर काहींना कुतूहल वाटते. भारतात आढळणाऱ्या तीन जातींच्या मगरींची आपण माहिती घेऊ या. या तीन जातींपैकी, एक आहे खाऱ्या पाण्यात राहणारी मगर, दुसरी आहे, गोड्या पाण्यात राहणारी मगर आणि तिसरी आहे, घडियाल.
मोठाल्या “खाऱ्या”
खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या मगरींना “खाऱ्या” असेही म्हटले जाते. या मगरी सरीसृप वर्गातील सर्वात मोठ्या आकाराचे जीव आहेत. त्या ७ मीटर किंवा त्याहूनही लांब वाढू शकतात आणि त्यांचे वजन १,००० किलोग्रॅम असू शकते. या मोठाल्या मगरींचे वास्तव्य, भारताच्या पूर्वेपासून फिजीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यालगत, नदीमुखाजवळ व समुद्रात असलेल्या कच्छवनश्रींमध्येच केवळ असते. मासांहारी असलेल्या या प्राण्याचे भक्ष्य, उंदीर, बेडूक, मासे, साप, खेकडे, सुमद्रातील कासव, हरीण हे होय. त्यांचे अन्न लहान मात्रेत असते. मोठे नर सरासरी, दिवसाला फक्त ५०० ते ७०० ग्रॅम अन्न खातात. उन्ह खात पडल्यामुळे किंवा पाण्यावर तरंगत राहिल्यामुळे व त्यांची पाचन क्रिया चांगली असल्यामुळे त्यांना कमी प्रमाणात अन्न लागते. एखाद वेळी, एक मोठा “खाऱ्या” बेसावध मनुष्यावर हल्ला करू शकतो. संपूर्ण शरीर पाण्याखाली ठेवून फक्त नाकपुड्या आणि डोळे पाण्याबाहेर काढून हा प्राणी, शेपूट डाव्या व उजव्या बाजूंना वरचेवर वळवून पाण्यात पोहू शकतो. जमिनीवर असताना तो आपल्या आखूड पायांवर शरीर उचलून चालतो. भक्ष्य धरण्यासाठी हे प्राणी सूरही मारू शकतात आणि कधीकधी तर भक्ष्य धरण्यासाठी ते वेगाने पळाल्याचे सांगितले जाते. इतर मगरींप्रमाणे या प्राण्यांची गंध, दृष्टी आणि श्रवणशक्ती चांगली असते. विणीच्या हंगामात, खाऱ्या नर अतिशय हिंसक बनतो; आपल्या क्षेत्रात कोणा तिऱ्हाईताला तो येऊच देत नाही. खाऱ्या मादी आपल्या अंड्यांचे रक्षण करताना नरासारखीच हिंसक बनते.
कर्तव्यदक्ष माता
मादी मगर पाण्याजवळ एक घरटे तयार करते. घरटे म्हणजे सहसा, कुजलेल्या पालापाचोळ्याचा एक ढीग असतो. ती एका वेळेला जवळजवळ १०० लंबवर्तुळाकृती आणि जाड कवचाची अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती त्यांना झाकते आणि परभक्षकांपासून त्यांचे संरक्षण करते. पालापाचोळ्याच्या ढीगाऱ्यावर ती पाण्याचा हबका
मारते जेणेकरून पालापाचोळा कुजू लागतो व यामुळे अंड्यांना उब लागते.आता एक चमत्कारच घडतो. अंड्याला मिळणाऱ्या उबेनुसार, आतील पिल्लं नर असेल की मादी हे ठरवले जाते. कल्पना करा! २८ ते ३१ डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान मिळालेल्या अंड्यातून जवळजवळ १०० दिवसांत मादी पिल्ले निघतात तर ३२.५ डिग्री सेल्सियसपर्यंत उब मिळालेल्या अंड्यांतून ६४ दिवसांत नर पिल्ले बाहेर पडतात. ३२.५ ते ३३ डिग्री सेल्सियसपर्यंतच्या उष्णतेत उबवलेल्या अंड्यांतून नर किंवा मादी दोन्ही प्रकारची पिल्ले बाहेर येऊ शकतात. पाण्याच्या किनाऱ्याजवळ बांधलेल्या घरट्यातून, पाण्याच्या बाजूने असलेल्या थंड बाजूकडून मादी पिल्ले निघतील तर त्याच घरट्याच्या दुसऱ्या बाजूकडून जी कडक उन्हात आहेत, तिथून नर पिल्ले निघतील.
मादी मगर जेव्हा पिल्लांचा एक विशिष्ट आवाज ऐकते तेव्हा ती पालापाचोळा दूर करते. कधीकधी जेव्हा अंड्यातल्या पिल्लाने त्याच्या अंड-दंताने कवच फोडले नसेल तर मादी ते कवच फोडून पिल्लाला बाहेर काढते. यानंतर ती पिल्लांना आपल्या भल्या मोठ्या जबड्यात अगदी हळूवारपणे उचलते. तिच्या जिबेखालच्या एका पिशवीत ती त्यांना उचलून पाण्याच्या किनाऱ्यावर नेते. पिल्ले जन्मतःच स्वतंत्र असतात. आणि ती लगेच, किडे, लहान बेडूक, मासे यांच्या शोधात निघतात. परंतु काही माद्या आपल्या पिल्लांचे अनेक महिन्यांपर्यंत संरक्षण करतात; त्या आपल्या पिल्लांना दलदलीतच राहू देतात व नर मगरही त्यांची काळजी घेत, त्यांच्यावर पाळत ठेवतात.
गोड्या पाण्यातील मगर आणि लांब मुस्कटाचा घडियाल
गोड्या पाण्यातील मगर आणि घडियाल केवळ भारताच्या उपखंडात आढळतो. सुमारे चार मीटर लांबीचा गोड्या पाण्यात राहणारा मगर हा प्राणी, भारतभर तळे, नद्या येथे आढळतो. तो खाऱ्या पाण्यातील मगरीपेक्षा खूप लहान असतो. लहान प्राण्यांना तो आपल्या शक्तिशाली जबड्यांत पकडतो, त्यांना पाण्याखाली ओढत नेतो आणि झटके मारत प्राण्याचे लचके तोडून त्याचा फडशा पाडतो.
या प्राण्यांचा विणीचा हंगाम कसा असतो? मादीचा माग काढत असताना नर मगर पाण्यावर आपला जबडा आपटतो आणि गुरगुरतो. नंतर, मादीने अंडी घातल्यावर तोही मादीबरोबर घरट्याचे संरक्षण करतो, पिल्लांना अंड्यांतून बाहेर यायला मदत करतो आणि काही काळपर्यंत पिल्लांबरोबर राहतो.
क्वचित आढळणारा घडियाल हा खरे पाहता मगर जातीतला नाही, पण अनेक प्रकारे तो अनोखा आहे. त्याचे मुख्य खाद्य असलेले मासे धरण्यासाठी अगदी उत्तम असलेल्या त्याच्या लांब, चिंचोळ्या मुस्कटामुळे तो लगेच ओळखता येतो. घडियालाची लांबी खाऱ्या मगरी इतकीच असली तरी, मनुष्यावर हल्ला केल्याचे वृत्त ऐकिवात नाही. घडियालांच्या गुळगुळीत, सडपातळ शरीरामुळे त्यांना उत्तर भारतातील खोल, वेगाने वाहणाऱ्या नदीत जलद हालचाल करता येते. प्रजोत्पादनाच्या काळात, नर घडियालाच्या मुस्कटाच्या टोकावर एक गोळा वाढतो. या गोळ्यामुळे, मादींना आकर्षित करण्यासाठी ते जो आवाज काढतात तो आणखी मोठा होतो.
पर्यावरणातील त्यांची भूमिका
पर्यावरणात मगरींचे किती महत्त्व आहे? मगर, कुजलेले मांस खाणारा प्राणी असल्यामुळे,
मेलेले मासे व प्राणी खाऊन तो नद्या, सरोवरे आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवतो. यामुळे पाणी देखील स्वच्छ राहते. भक्षक असल्यामुळे ते अशक्त, जखमी आणि आजारी प्राण्यांना खातात. ते, कॅटफिश (मर्जारमीन) सारख्या नाशकारक माशांना खातात जे मानवाला उपयोगी असलेले कार्प आणि तिलापिया सारखे मासे खातात.जिवंत राहण्याची धडपड—नक्राश्रू नव्हे
तुम्ही कधी, ‘तो नक्राश्रू ढाळत होता,’ असे कोणाला म्हणताना ऐकले आहे का? याचा अर्थ, खोटे किंवा मायावीपणाने रडणे. खरे तर मगर अश्रू ढाळतात तेव्हा ते शरीरातील ज्यादा क्षार काढत असतात. १९७० दशकाच्या सुरवातीला मगरींसाठी खरोखरच अश्रू ढाळण्याची पाळी आली होती. भारतात मगरींची संख्या केवळ काही हजार, म्हणजे पूर्वीच्या त्यांच्या संख्येच्या केवळ १० टक्के इतकीच राहिली होती. का? मानव मगरींच्या नैसर्गिक वस्तीवर अतिक्रमण करून अनेक मगरींची कत्तल करत होता. गुराढोरांची पिल्ले आणि अशक्त गुराढोरांसाठी त्या एक धोका आहेत असे समजले जायचे. पुष्कळ लोकांना त्यांच्या मांसाची आणि त्यांच्या अंड्यांची चटक लागली होती. यांच्या गंधग्रंथीना कस्तुरीसारखा वास असल्यामुळे त्यातून सुवासिक अत्तर बनवले जायचे. शिवाय, धरणे, दूषित पाणी यांमुळेही मगरींची संख्या कमी झाली. पण, त्यांच्या कातडीसाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या त्यांच्या कत्तलींमुळे मगरी जवळजवळ नामशेष झाल्या होत्या. मगरींच्या कातडीपासून बनवलेले शू, हॅण्डबॅग्स, मोठ्या लगेज बॅग्ज, बेल्ट आणि इतर वस्तू अतिशय सुबक, टिकाऊ आणि आकर्षक असतात. तसा मगरींच्या जीवाला अद्यापही धोका आहेच. पण अलिकडील मगरींचे संवर्धन करण्यासाठी उचलेली पावले यशस्वी ठरली आहेत.—खालील चौकोन पाहा.
मगरीशी दोस्ती!
मगर कुटुंबातील काही जातींशी तुमचा परिचय झाला आहे, तेव्हा आता तुम्हाला हे प्राणी कसे वाटतात? पूर्वी तुम्हाला ते नकोसे वाटत असतील, पण आता कदाचित तुम्हाला त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले असेल. संपूर्ण जगभरात प्राण्यांचे वेड असलेले लोक त्या काळाची वाट पाहत आहेत जेव्हा त्यांना भल्या मोठ्या खाऱ्याची कसली भीती राहणार नाही. सरीसृपांचा निर्माणकर्ता पृथ्वीचे नविनीकरण करेल तेव्हा आपण मगरींशी मैत्री करू शकू.—यशया ११:८, ९. (g०५ ३/८)
[१३ पानांवरील चौकट/चित्र]
मद्रास मगर बँक
आशियातील काही भागात जंगली अवस्थेत फार कमी मगरी राहिल्या आहेत, असे जेव्हा एका सर्व्हेवरून समजले तेव्हा १९७२ साली मद्रास सर्पोद्यानात मगरींच्या संवर्धनास सुरुवात झाली. भारतातील ३० पेक्षा अधिक सरीसृप केंद्रांपैकी मद्रास मगर बँक हे सर्वात जुने व सर्वात मोठे केंद्र आहे. १९७६ साली, सरीसृपांचा अभ्यास करणारे रोम्यूलस व्हिटेकर यांनी या केंद्राची स्थापना केली. कोरोमॅन्डल कोस्टवर साडेआठ एकरांच्या या केंद्राच्या आवारात, १५० जातींची झाडे आहेत ज्यामुळे सुंदर सुंदर पक्षी आणि किडे आकर्षित होतात.
बंदिस्त असलेल्या मगरींची व घडियालांची पैदास करून पाणथळींत व नद्यांमध्ये त्यांना सोडले जाते किंवा पैदास करणाऱ्या व संशोधन करणाऱ्या केंद्रांना पाठवले जाते. या बँकेत एक नर्सरी आहे ज्यांत एका वेळेला २,५०० पिल्ले तळ्यात ठेवली जातात. या पिल्लांना दररोज स्थानीय मच्छीमारांकडून घेतलेल्या माशांचे तुकडे चारले जातात. या तळ्यांवर जाळी टाकण्यात आली आहे ज्यांमुळे माश्यांचे तुकडे किंवा मगरीची अशक्त पिल्ले पळवणाऱ्या पक्ष्यांपासून संरक्षण होते. ही पिल्ले जसजशी मोठी होत जातात तसतसे त्यांना मोठ्या तळ्यांमध्ये हलवले जाते. या तळ्यांत त्यांना, ते तीन वर्षांचे व १.२५ ते १.५ मीटर लांबीचे होईपर्यंत अख्खे मासे चारले जातात. यानंतर एका मोठ्या खाटीकखान्यातून येणाऱ्या बीफचे वाया गेलेले तुकडे चारले जातात. या बँकेत सुरुवातीला, भारतात आढळणाऱ्या फक्त ३ जातींच्या मगरींची पैदास केली जायची. पण आता येथे आणखी ७ जातींच्या मगरी आहेत आणि कालांतराने संपूर्ण जगात ज्ञात असलेल्या सर्व जातींची पैदास करण्याची त्यांची योजना आहे, असे म्हटले जाते. सरपटणाऱ्या या प्राण्यांची, त्यांच्या कातडीसाठी व मांसासाठी व्यापारी दृष्टीने पैदास करावी की नाही याविषयावर एकमत नाही. मगरींचे मांस अतिशय चविष्ट आणि कमी कोलोस्ट्रोल असलेले आहे, असे व्हिटेकरने सावध राहाला! सांगितले. संवर्धन मोहिमांनी या प्राण्यांना नामशेष होण्यापासून फक्त वाचवले नाही तर त्यांच्या संख्येत कमालीची वाढ आणली. मगरींविषयीच्या गैरसमजुती कायमच्या दूर करून लोकांमध्ये त्यांची प्रतिमा सुधारण्याचे, लोकप्रिय पर्यटन आकर्षण असलेल्या मद्रास मगर बँकचे लक्ष्य आहे.
[चित्राचे श्रेय]
Romulus Whitaker, Madras Crocodile Bank
[२३ पानांवरील चित्र]
मोठाला “खाऱ्या”
[२४ पानांवरील चित्र]
खाऱ्या पाण्यात राहणारी मादी मगर आपल्या पिल्लांना अशी जबड्यात उचलते
[चित्राचे श्रेय]
© Adam Britton, http://crocodilian.com
[२४ पानांवरील चित्र]
मगर
[चित्राचे श्रेय]
© E. Hanumantha Rao/Photo Researchers, Inc.
[२४ पानांवरील चित्र]
लांब मुस्कटाचा घडियाल