व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मातांसमोर असणारी आव्हाने

मातांसमोर असणारी आव्हाने

मातांसमोर असणारी आव्हाने

“घरात केली जाणारी सर्वसाधारणे कामे ही मुळात मानवहिताची सर्वात मूलभूत कामे आहेत. . . . आईने आपली जबाबदारी पूर्ण न केल्यास पुढची पिढी तयार होणार नाही किंवा अशी पिढी तयार होईल की जी अस्तित्वात न येणेच हिताचे ठरले असते.”थियडोर रूजवेल्ट, संयुक्‍त संस्थानांचे २६ वे राष्ट्राध्यक्ष.

मानवी जीवन हे आईच्या शिवाय अस्तित्वात येणे शक्य नाही, हे तर अगदी स्पष्ट आहे. पण आईची भूमिका ही केवळ मुलांना जन्म देण्यापुरतीच नाही. आजच्या जगातल्या बहुतेक भागांत, आईच्या भूमिकेविषयी एका लेखकाने असे म्हटले: “प्रत्येक मुलाचे आरोग्य, शिक्षण, बौद्धिक व व्यक्‍तिमत्त्व विकास, चारित्र्य आणि भावनिक स्थैर्य यांचे रक्षण करणे हे आईच्याच हातात असते.”

आईच्या अनेक जबाबदाऱ्‍यांपैकी एक म्हणजे आपल्या मुलांना शिक्षण देणे. मुलांनी उच्चारलेले पहिलेवहिले शब्द सहसा आईकडूनच शिकलेले असतात. म्हणूनच की काय, एका व्यक्‍तीच्या मूळ भाषेला मातृभाषा म्हटले जाते. पित्यापेक्षा मुलांसोबत आईच जास्त वेळ घालवत असल्यामुळे तीच त्यांची मूळ शिक्षिका असते आणि त्यांना शिस्त लावण्यात तिचाच मोठा वाटा असतो. म्हणूनच की काय, आईच्या महत्त्वाच्या भूमिकेचे गौरव करणारी एक म्हण मेक्सिकोत सर्वज्ञात आहे, की “शिक्षण हे मुलांना आईच्या दुधातून मिळते.”

आपला निर्माणकर्ता यहोवा देव देखील आईचे गौरव करतो. खुद्द देवाने “आपल्या बोटाने” दगडी पाट्यांवर लिहिलेल्या दहा आज्ञांपैकी एका आज्ञेत मुलांना असे सांगण्यात आले आहे: “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख.” (निर्गम २०:१२; ३१:१८; अनुवाद ९:१०) शिवाय, बायबलमधील एका नीतिसूत्रात “आईची शिस्त,” अथवा कायदा याविषयी सांगितले आहे. (नीतिसूत्रे १:८) जीवनाच्या पहिल्या तीन वर्षांत, मुलांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे हे आता सर्वमान्य झाले आहे; आणि या काळात बहुतेक मुले सहसा पूर्णपणे आईच्याच देखरेखीखाली असतात.

काही आव्हाने कोणती आहेत?

बऱ्‍याच मातांना मुलांच्या सुरुवातीच्या संस्कारक्षम वर्षांत ज्या आव्हानाला तोंड द्यावे लागते ते म्हणजे कुटुंबाला आर्थिक योगदान देण्याकरता नोकरी करण्याचा दबाव. संयुक्‍त राष्ट्रांद्वारे संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बऱ्‍याच विकसित देशांत तीन वर्षांखालील मुले असलेल्या ५० टक्के माता नोकरी करतात.

शिवाय, पती दुसऱ्‍या शहरात अथवा परदेशात नोकरी करत असल्यास, मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी पूर्णपणे आईवरच येते. उदाहरणार्थ, काही वृत्तांनुसार आर्मेनियाच्या विशिष्ट भागांत जवळजवळ एक तृतीयांश पुरुष कामाच्या शोधात बाहेरगावी गेले आहेत. इतर स्त्रियांना त्यांच्या पतींनी सोडून दिलेले असल्यामुळे किंवा त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर एकट्यानेच मुलांचा संभाळ करण्याची वेळ आली आहे.

काही देशांत बऱ्‍याच माता सुशिक्षित नाहीत. हे त्यांच्याकरता एक आव्हान बनते. संयुक्‍त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक व्यवहार विभागाच्या अंदाजानुसार जगातील एकूण ८७.६ कोटी अशिक्षित व्यक्‍तींपैकी दोन तृतीयांश स्त्रिया आहेत. किंबहुना, युनेस्कोने दिलेल्या वृत्तानुसार आफ्रिका, अरब देश, पूर्व व दक्षिण आशिया येथे ६० टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया अशिक्षित आहेत. शिवाय, बऱ्‍याच पुरुषांचे असे मत आहे की स्त्रियांना शिकू देणे अनावश्‍यक आहे कारण त्यांचे शिक्षण, मुलांना जन्म देण्याची त्यांची भूमिका निभावण्याच्या मार्गात बाधा बनू शकते.

आउटलुक या नियतकालिकात असे सांगण्यात आले की भारतात, केरळ राज्यातील एका जिल्ह्यात मुली १५ वर्षांच्या होईपर्यंत सहसा त्यांना मूल झालेले असते; येथे सुशिक्षित मुलीशी कोणीही लग्न करू इच्छित नाही. शेजारच्या पाकिस्तानातही, मुलींपेक्षा मुलांना सर्व बाबतीत पहिला मान दिला जातो. त्यांनी मोठे होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आईवडिलांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घ्यावी याकरता त्यांची लहानपणापासूनच मानसिक तयारी केली जाते. त्याउलट, विकसनशील देशांत स्त्री शिक्षण या पुस्तकानुसार “मुली कोणत्याही प्रकारे कुटुंबात आर्थिक हातभार लावण्यास समर्थ नसल्यामुळे आईवडील त्यांच्यावर फारसा पैसा खर्च करू इच्छित नाहीत.”

याशिवाय, निरनिराळ्या ठिकाणच्या रितीरिवाजांमुळेही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, काही देशांत अल्पवयीन मुलींचे लग्न करून त्यांना विकून टाकणे तसेच लहान मुलींच्या गुप्तांगांची शस्त्रक्रिया करणे यांसारख्या प्रथांना सहकार्य करण्याची अनेक मातांकडून अपेक्षा केली जाते. आयांनी आपल्या मुलग्यांना शिकवणे व त्यांना शिक्षा करणे काही समाजात वाईट समजले जाते. मग मातांनी अशा प्रथांपुढे हात टेकून, आपल्या मुलग्यांना शिकवण्याची जबाबदारी इतरांवर टाकावी का?

या व अशा अनेक आव्हानांना काही माता कशा तोंड देताहेत याविषयी पुढील लेखांत आपण पाहुया. तसेच माता व मातृत्त्व यांविषयीची आपली कदर वाढवण्याचा आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्याच्या आईच्या भूमिकेबद्दल संतुलित दृष्टिकोन मिळवण्याचा आपण प्रयत्न करू या. (g०५ २/२२)

[४ पानांवरील चौकट/चित्र]

“मुलांच्या बुद्धिला व जिज्ञासेला चालना देण्यात तसेच त्याची/तिची सर्जनशीलता विकसित करण्यात आईची महत्त्वाची भूमिका असते.”—मुलांचे हक्क यांवरील प्रादेशिक परिषद, बुर्किना फासो, १९९७.

[३ पानांवरील चित्रे]

प्रत्येक मुलाचे आरोग्य, शिक्षण, व्यक्‍तिमत्त्व विकास, आणि भावनिक स्थैर्य हे बऱ्‍याच अंशी आईच्याच हातात असते