मुलांकडे आवश्यक लक्ष पुरवणे
बायबलचा दृष्टिकोन
मुलांकडे आवश्यक लक्ष पुरवणे
देवाच्या पुत्राजवळ लहान मुलांसाठी वेळ होता का? त्याच्या काही शिष्यांना असे वाटत नव्हते. एकदा लहान मुले येशूजवळ येऊ लागली तेव्हा त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येशूने म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” मग त्याने प्रेमळपणे त्या मुलांना आपल्याजवळ घेतले आणि तो त्यांच्याशी बोलू लागला. (मार्क १०:१३-१६) अशाप्रकारे येशूने दाखवले की तो मुलांकडे लक्ष देण्यास उत्सुक होता. आज आईवडील कशाप्रकारे त्याचे अनुकरण करू शकतात? आपल्या मुलांना योग्यप्रकारचे प्रशिक्षण देण्याद्वारे व त्यांना पुरेसा वेळ देण्याद्वारे ते असे करू शकतात.
अर्थात, आपल्या जबाबदारीची जाणीव असणारे आईवडील आपल्या मुलांची उत्तम प्रकारे काळजी घेण्यास झटतात आणि त्यांच्याशी कधीही अनुचित व्यवहार करत नाहीत. किंबहुना, पालकांना आपल्या मुलांबद्दल काळजी वाटणे व त्यांनी त्यांच्याशी विचारशीलपणे वागणे हे तर “स्वाभाविक” आहे. पण बायबलमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की आपल्या या काळात बऱ्याच जणांना “स्वाभाविक प्रेम” राहणार नाही. (२ तीमथ्य ३:१-३, NW) अर्थात, जे आपल्या मुलांची प्रेमाने काळजी घेतात ते देखील आईवडील या नात्याने आपली जबाबदारी अधिक चांगल्याप्रकारे कशी पार पाडता येईल याविषयी बरेच काही शिकू शकतात. त्यामुळे, पुढील बायबल तत्त्वे अशा आईवडिलांकरता अतिशय उपयुक्त ठरतील की जे आपल्या मुलांना सर्वात उत्तम तेच देऊ इच्छितात.
मुलांना चिरडीस न आणता शिकवणे
प्रख्यात शिक्षक व अनुसंधान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रॉबर्ट कोल्स यांनी एकदा असे म्हटले: “मुलांमध्ये लहानपणापासूनच चांगल्यावाईटाची जाणीव आकार घेत असते. मला तर असे वाटते की मुलांमध्ये ही जी नैतिक मार्गदर्शनाची उत्कंठा असते ती देवानेच दिलेली आहे.” नैतिक मार्गदर्शनाची ही भूक, ही तहान कोणी भागवावी?
इफिसकर ६:४, यात बायबल अशी आज्ञा देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” मुलांमध्ये देवाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या तत्त्वांविषयीची आवड निर्माण करण्याची जबाबदारी खासकरून वडिलांवर टाकण्यात आली आहे हे तुमच्या लक्षात आले का? इफिसकर अध्याय ६, यातील पहिल्या वचनात प्रेषित पौलाने मुलांना “आपल्या आईबापांच्या * आज्ञेत राहा,” असे सांगितले व या ठिकाणी त्याने आई व वडील या दोघांचा उल्लेख केला.
अर्थात, घरात वडील नसल्यास ही जबाबदारी आईने आपल्या हाती घेतली पाहिजे. कित्येक एकट्या मातांनी आपल्या मुलांना यशस्वीरित्या यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवले आहे. पण आईने लग्न केल्यास, ख्रिस्ती पतीने पुढाकार घेतला पाहिजे. आईने त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या मुलांच्या प्रशिक्षणात व त्यांना शिस्त लावण्यात सहभाग घेतला पाहिजे.
मुलांना ‘चिरडीस न आणता’ त्यांना प्रशिक्षण कसे देता येईल? यासाठी कोणतेही खास कानमंत्र नाहीत. कारण प्रत्येक मूल हे वेगळे असते. पण आपण आपल्या मुलांना कशाप्रकारे शिस्त लावतो याकडे आईवडिलांनी पुरेसे लक्ष दिले पाहिजे व नेहमी आपल्या मुलांशी प्रेमाने व आदराने व्यवहार केला पाहिजे. विशेष लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, मुलांना न चिडवण्याचा हा मुद्दा शास्त्रवचनांत कलस्सैकर ३:२१ यात पुन्हा सांगण्यात आला आहे. तेथे वडिलांना पुन्हा असे सांगण्यात आले आहे, “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.”
काही आईवडील आपल्या मुलांशी रागाने ओरडून बोलतात. निश्चितच यामुळे मुले चिरडीस येतील. बायबल इफिसकर ४:३१) बायबल असेही म्हणते, की “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे.—२ तीमथ्य २:२४.
आग्रहपूर्वक सांगते: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, . . . तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (त्यांच्यासाठी वेळ काढा
तुमच्या मुलांकडे आवश्यक लक्ष पुरवण्याकरता तुम्हाला आपल्या मुलांच्या हिताकरता आपल्या काही इच्छा व सोयींचा त्याग करण्याची तयारी दाखवावी लागेल. बायबल म्हणते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७.
आज, आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे फार कमी आईवडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मुलांसोबत राहू शकतात. तरीपण, अनुवादात सांगितल्यानुसार आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत घालवण्याकरता वेळ काढलाच पाहिजे. यासाठी उत्तम नियोजन, तसेच त्याग करावा लागू शकतो. पण मुलांकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
एका अभ्यासात, १३-१९ वयोगटातील १२,००० मुलामुलींचे निरीक्षण करण्यात आले. अभ्यासांती हे निष्पन्न झाले की “ज्या मुलांचे आपल्या आईवडिलांसोबत घनिष्ट, भावनिक नाते होते त्यांचे आरोग्य सर्वात उत्तम असल्याचे दिसून आले आणि अशी मुले वाममार्गाला लागण्याचे प्रमाणही फार कमी होते.” होय, आपल्या आईवडिलांनी आपल्याकडे लक्ष द्यावे म्हणून मुले अक्षरशः आसूसलेली असतात. एका आईने एकदा तिच्या मुलांना विचारले, “तुम्ही जे मागाल ते मिळेल असे सांगितल्यास तुम्ही काय मागाल?” तिच्या चारही मुलांनी उत्तर दिले, “आई व बाबांबरोबर जास्त वेळ.”
जबाबदार पालक होण्याकरता तुम्ही आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण होत आहे की नाही याची खात्री केली पाहिजे; यात आध्यात्मिक शिक्षणाची आणि आपल्या आईवडिलांशी घनिष्ट मैत्रीची त्यांची गरजही समाविष्ट आहे. सहमानवांशी विचारशीलपणे वागतील आणि आपल्या निर्माणकर्त्याच्या नावाला गौरव आणतील असे सक्षम, आदरणीय व प्रामाणिक प्रौढ होण्याकरता तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. (१ शमुवेल २:२६) होय, आपल्या मुलांना देवाच्या मार्गाने प्रशिक्षण देणारे व शिस्त लावणारे आईवडील आपली जबाबदारी योग्यप्रकारे पूर्ण करत आहेत. (g०५ २/८)
[तळटीप]
^ या ठिकाणी पौलाने गोनेफसिन हा ग्रीक शब्द वापरला, ज्याची व्युत्पत्ती “पालक” या अर्थाच्या गोनेफ्स या शब्दातून झाली आहे. पण ४ थ्या वचनात त्याने पातेरेस हा ग्रीक शब्द वापरला ज्याचा अर्थ, “वडील” असा होतो.
[१३ पानांवरील चित्र]
मुलांवर रागाने ओरडल्यामुळे ती खिन्न होतात
[१३ पानांवरील चित्र]
आपल्या मुलांना पुरेसा वेळ द्या