व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यांनी आव्हान पेलले

यांनी आव्हान पेलले

यांनी आव्हान पेलले

आज अनेक आयांना तोंड द्यावे लागणारे मुख्य आव्हान म्हणजे आपल्या कुटंबाला आर्थिक हातभार लावण्याकरता नोकरी करावी लागणे. शिवाय, या ना त्या कारणामुळे काही जणींना पतीच्या आधाराविना मुलांचे संगोपन करणे भाग पडते.

मार्गारीटा ही मेक्सिको येथे राहणारी एकटी माता असून आपल्या दोन मुलांचे ती एकटीच संगोपन करत आहे. ती म्हणते: “मुलांवर नैतिक आणि आध्यात्मिक संस्कार करणं मला फार जड गेलं. मागे एकदा माझा १३-१४ वर्षांचा मुलगा एका पार्टीनंतर दारूच्या नशेत घरी परत आला. मी त्याला बजावून सांगितलं की पुन्हा असं घडलं तर मी तुला घरात घेणार नाही. दुसऱ्‍यांदा तो पिऊन घरी आला तेव्हा, मला वाईट वाटत होतं तरीही, मी त्याला घरात घेतलंच नाही. त्यानं पुन्हा कधी ती चूक केली नाही.”

यानंतर काही काळाने मार्गारीटाने बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यामुळे तिला आपल्या मुलांच्या मनावर नैतिक मूल्ये बिंबवण्यास साहाय्य मिळाले. आज तिची दोन्ही मुले यहोवाच्या साक्षीदारांतील पूर्ण वेळेचे सेवक आहेत.

नवरा परदेशी असतो तेव्हा

अल्प विकसित देशांतील बरेच पुरुष श्रीमंत देशांत नोकरीच्या शोधात जातात. यामुळे मुलांना वाढवण्याची जबाबदारी बायकोच्या खांद्यावर येते. नेपाळमध्ये राहणारी लक्ष्मी नावाची एक आई सांगते: “माझे पती सात वर्षांपासून बाहेरगावी राहतात. मुलं वडिलांनी सांगितलेलं ऐकतात पण माझा त्यांना तितका धाक नाही. ते घरात असते तर मला सोपं गेलं असतं.”

या अडचणी असूनही लक्ष्मी तिच्यासमोर असलेले आव्हान पेलतेय. तिचे खास शिक्षण झालेले नसल्यामुळे तिने आपल्या मोठ्या मुलांना शाळेच्या अभ्यासात मदत करण्यासाठी शिकवणी लावल्या आहेत. पण मुलांच्या आध्यात्मिक प्रशिक्षणात मात्र ती स्वतः लक्ष घालते. दर आठवड्यात एकदा ती त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करते. शिवाय, दररोज बायबलच्या एका वचनाची चर्चा त्यांच्यासोबत करते आणि नियमितपणे त्यांना ख्रिस्ती सभांना नेते.

आईचे फारसे शिक्षण झालेले नसते तेव्हा

काही देशांत, स्त्रियांना आणखी एका आव्हानाला तोंड द्यावे लागते. याचे कारण आहे स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली निरक्षरता. अशिक्षित असल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याविषयी सहा मुलांची आई असलेली मेक्सिकोची ऑरिलिया असे सांगते: “माझी आई नेहमी म्हणायची की शिक्षण मुलींसाठी नसतं. त्यामुळे मी कधी वाचायला शिकलेच नाही. आपल्या मुलांना आपण अभ्यासात मदत करू शकत नाही, याचं मला फार वाईट वाटायचं. पण माझ्यासारखं त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं.”

फारसे शिक्षण झालेले नसूनही आई आपल्या मुलांचे भविष्य बदलू शकते. ‘स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे नवे शिक्षक तयार करणे’ असे म्हणतात, आणि हे अगदी खरे आहे. नेपाळची बिश्‍नू ही तीन मुलांची आई असून, एकेकाळी ती अशिक्षित होती. पण बायबलमधील सत्य शिकून आपल्या मुलांना ते शिकवण्याच्या उत्कट इच्छेने प्रेरित होऊन ती बऱ्‍याच प्रयत्नांती लिहावाचायला शिकली. आपली मुले शाळेचा गृहपाठ करतात की नाही याची ती खात्री करायची आणि वेळोवेळी त्यांच्या शाळेत जाऊन शिक्षकांकडे त्यांच्या प्रगतीविषयी विचारपूस करायची.

त्यांच्या आध्यात्मिक व नैतिक शिक्षणाच्या संदर्भात बिश्‍नूचा मुलगा सीलाश सांगतो: “आईची एक गोष्ट मला खूप आवडायची. आमच्याकडून कधी चूक झाली तर ती बायबलमधली उदाहरणं देऊन आम्हाला समजावायची. ही तिची शिकवण्याची पद्धत अतिशय परिणामकारक होती आणि यामुळे मला तिचा सल्ला स्वीकारायला सोपं जायचं.” बिश्‍नू आपल्या मुलांना शिक्षण देण्यात यशस्वी ठरली आहे. आज तिची तिन्ही मुले देवभीरू वृत्तीचे तरुण आहेत.

आन्तोन्या ही मेक्सिको येथे राहते आणि तिला दोन मुले आहेत. ती म्हणते: “मी फक्‍त सहावीपर्यंतच शिकले. आमचे गाव अगदी आडवळणाला होते. एक माध्यमिक शाळा होती, पण ती फार दूर होती. आपल्या मुलांनी मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकावे असे मला वाटायचे, त्यामुळे मी त्यांच्याकडे खूप लक्ष दिले. मी त्यांना अक्षरं आणि आकडे ओळखायला शिकवले. माझी मुलगी तर शाळेला जाऊ लागण्याआधीच आपल्या नावाचे स्पेलिंग सांगायची आणि सगळी अक्षरं लिहायची. माझा मुलगा बालवाडीत जाऊ लागला तेव्हा तो अगदी स्पष्टपणे वाचू शकत होता.”

आध्यात्मिक व नैतिक संस्कार करण्यासाठी तुम्ही काय केले असे आन्तोन्याला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले: “मी त्यांना बायबलमधून गोष्टी सांगायचे. माझ्या मुलीने बोलायला सुरुवात करण्याआधीच ती हातवारे करून बायबलच्या गोष्टी सांगायची. माझ्या मुलाने पहिल्यांदा ख्रिस्ती सभांमध्ये जाहीर बायबल वाचन केले तेव्हा तो अवघ्या चार वर्षांचा होता.” कमी शिक्षण असूनही कित्येक माता आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलताहेत.

घातक प्रथांचा मुकाबला करणे

मेक्सिकोच्या त्सोत्सील भाषिकांमध्ये, मुली १२-१३ वर्षांच्या झाल्यावर त्यांचे लग्न करून त्यांना विकून टाकण्याची प्रथा आहे. बरेचदा मुलींना त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्‍याच मोठ्या, आणि पूर्वी एक दोन वेळा लग्न झालेल्या माणसाला विकले जाते. जर त्या माणसाला मुलगी आवडली नाही तर तो तिला परत करून आपले पैसे परत घेऊ शकतो. पेट्रोना लहान होती तेव्हा तिलाही आज न उद्या या प्रथेला बळी पडावे लागणार होते. तिच्या आईलाही विकण्यात आले होते आणि एक मूल झाल्यावर तिला घटस्फोटही देण्यात आला—हे सगळे ती १३ वर्षांची होण्याआधीच घडले! ते पहिले मूल मरण पावले, तेव्हा पेट्रोनाच्या आईला आणखी दोन वेळा विकण्यात आले. एकंदर तिला आठ मुले झाली.

आपल्याबाबतीत असे घडू नये म्हणून पेट्रोनाने काय केले याविषयी ती सांगते: “प्राथमिक शाळा संपल्यानंतर मी आईला सांगितले की मला लग्न करायचे नाही कारण मला आणखी शिकायचेय. आई म्हणाली की माझ्या हातात काही नाही, तू तुझ्या वडिलांशी बोल.”

वडील म्हणाले, “मी तुझे लग्न करून देणार आहे. तुला स्पॅनिश बोलता येतं, वाचायला येतं. आणखी काय पाहिजे तुला? आणखी शिकायचं असेल तर खुशाल शिक, पण त्याचा खर्च तुला स्वतःला उचलावा लागेल.”

पेट्रोना सांगते, “मग मी असंच केलं. मी भरतकाम करून माझ्या शाळेचा खर्च भागवायचे.” तर अशारितीने पेट्रोनाला विकण्यात आले नाही. पेट्रोना मोठी झाल्यावर तिची आई बायबलचा अभ्यास करू लागली आणि यामुळे तिला पेट्रोनाच्या लहान बहिणींना बायबलमधील तत्त्वांच्या आधारावर शिक्षण देण्याचे धैर्य मिळाले. मुलींचे लग्न करून त्यांना विकून टाकण्याच्या या प्रथेच्या दुःखद परिणामांविषयी ती स्वतःच्या अनुभवावरून आपल्या मुलींना शिकवू शकली.

बऱ्‍याच समाजांत असलेल्या प्रथांपैकी आणखी एक प्रथा आहे. या प्रथेनुसार, कुटुंबात मुले असल्यास, त्यांना शिस्त लावण्याचा हक्क केवळ वडिलांना असतो. पेट्रोना सांगते: “त्सोत्सील स्त्रियांना शिकवले जाते, की पुरुषांपेक्षा त्यांचा दर्जा कमी आहे. आमच्या समाजात पुरुष अधिकार गाजवतात. लहान लहान मुलं पण आपल्या वडिलांची नक्कल करतात आणि आईला सरळ म्हणतात: ‘तू मला काही सांगू शकत नाहीस. माझे वडील जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मी करणार नाही.’ त्यामुळे आया पण आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत. आता माझ्या आईने बायबलचा अभ्यास केला आहे त्यामुळे तिला माझ्या भावांवर संस्कार करणे शक्य झाले. त्यांनी इफिसकर ६:१, २ तोंडपाठ केले आहे: ‘मुलांनो तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा. आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख.’”

नायजेरिया येथे राहणारी मेरी म्हणते: “मी जिथे लहानाची मोठी झाले, तिथल्या संस्कृतीनुसार आई आपल्या मुलग्यांना शिकवू शकत नाही किंवा त्यांना शिक्षा करू शकत नाही. पण बायबलमधील, तीमथ्याची आजी व आई, लोईस व युनीके यांच्या उदाहरणाचे अनुकरण करून मी निर्धार केला की लोकांच्या रितीरिवाजांमुळे मी माझ्या मुलांना शिकवण्याचे सोडणार नाही.”—२ तीमथ्य १:५.

काही देशांमध्ये प्रचलित असणारी आणखी एक प्रथा जिला अनेकजण “मुलींची सुंता” म्हणतात ती आहे. आता या प्रक्रियेला सर्वसामान्यपणे ‘स्त्रीच्या जननेंद्रियाची काटछाट’ (फिमेल जेनिटल म्युटिलेशन, एफजीएम) म्हणतात. या शस्त्रक्रियात मुलींच्या बाह्‍य जननेंद्रियाचे काही भाग अथवा संपूर्ण काढून टाकले जाते. सुप्रसिद्ध फॅशन मॉडेल आणि युनायटेड पॉप्युलेशन फंड या संस्थेची खास राजदूत वारीस डीरी हिने ही प्रथा उजेडात आणली. सोमालियातील स्थानिक प्रथेनुसार, लहानपणीच तिच्या आईने तिच्यावर ही शस्त्रक्रिया करवून घेतली होती. एका वृत्तानुसार मध्यपूर्व व आफ्रिकेतील जवळजवळ ८० लाख ते १ कोटी स्त्रिया व मुली या शस्त्रक्रियेला बळी पडण्याची शक्यता आहे. संयुक्‍त संस्थानातदेखील अंदाजे १०,००० मुलींना हा धोका आहे.

कोणते काही अंधविश्‍वास या प्रथेला जबाबदार आहेत? काही जणांचे असे मत आहे की स्त्रियांचे जननेंद्रिय अश्‍लील असल्यामुळे, ही शस्त्रक्रिया न झालेली मुलगी अशुद्ध असते; अशा मुलीशी कोणीही लग्न करू इच्छित नाही. शिवाय, जननेंद्रिये काढून टाकल्यामुळे किंवा कापून टाकल्यामुळे मुलगी वयात येताना तिचे कौमार्य टिकून राहील आणि ती लग्नानंतर आपल्या नवऱ्‍याला विश्‍वासू राहील, असे समजले जाते. एखाद्या आईने या प्रथेनुसार आपल्या मुलींच्या जननेंद्रियांची शस्त्रक्रिया न करवून घेतल्यास ती स्वतःवर आपल्या नवऱ्‍याचाच नव्हे तर सबंध समाजाचा रोष ओढवते.

पण बऱ्‍याच मातांना हे समजले आहे की या वेदनादायक प्रथेला खतपाणी देण्याकरता धार्मिक, वैद्यकीय अथवा आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही कोणताही ठोस आधार नाही. हिडीस प्रथांचा निषेध (इंग्रजी) नावाच्या नायजेरियन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे कित्येक मातांनी आपल्या मुलींना या शस्त्रक्रियेला बळी पडू दिलेले नाही.

तर अशाप्रकारे, अनेक आव्हाने पेलून जगभरातील माता यशस्वीरित्या आपल्या मुलांचे संरक्षण करत आहेत व त्यांना शिक्षण देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांची खरोखरच कदर केली जाते का? (g०५ २/२२)

[५ पानांवरील चौकट/चित्र]

“कित्येक अभ्यासांतून निष्पन्‍न झाल्याप्रमाणे, असा कोणताही परिणामकारक विकास कार्यक्रम नाही की ज्यात स्त्रियांची मध्यवर्ती भूमिका नाही. स्त्रिया पूर्णपणे याला योगदान देतात तेव्हा या कार्यक्रमांचे फायदेकारक परिणाम लगेच दिसून येतात: कुटुंबांचे आरोग्य व पोषण सुधारते; त्यांचे उत्पन्‍न, बचत आणि नव्या गुंतवणुकींत वाढ होते. आणि जे कुटुंबांच्या बाबतीत म्हणता येते तेच समाजांच्या आणि दीर्घ पल्ल्याचा विचार केल्यास सबंध देशांच्या बाबतीतही म्हणता येते.”—संयुक्‍त राष्ट्रांचे मुख्य सचीव कोफी ॲनन, मार्च ८, २००३.

[चित्राचे श्रेय]

UN/DPI photo by Milton Grant

[८ पानांवरील चौकट/चित्रे]

तिनं आमच्यासाठी बरेच त्याग केले

झुल्यानु नावाचा ब्राझीलचा तरुण म्हणतो: “मी पाच वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईला उत्तम नोकरी होती. पण माझ्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा तिने आमची काळजी घेण्याकरता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या कार्यस्थळी असलेल्या सल्लागारांनी तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. ते तिला म्हणाले की, मुलांची लग्नं झाली, ती आपापल्या मार्गाला लागली की मग त्यांच्याकरता केलेले सगळे कष्ट व्यर्थ ठरतील—ही अशी गुंतवणूक आहे की ज्यातून प्राप्ती काहीच नाही. पण त्या सर्वांचे म्हणणे चुकीचे होते, असे मी खात्रीने म्हणू शकतो; तिने आमच्याकरता जे केलं ते मी कधीही विसरू शकत नाही.”

[चित्रे]

झुल्यानुची आई आपल्या मुलांसोबत. डावीकडे: झुल्यानु पाच वर्षांचा असताना

[६ पानांवरील चित्रे]

बिश्‍नू लिहावाचायला शिकली आणि मग तिने आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळवण्यास मदत केली

[७ पानांवरील चित्रे]

आन्तोन्याचा चिमुकला ख्रिस्ती सभांमध्ये बायबल वाचन करतो

[७ पानांवरील चित्रे]

पेट्रोना ही यहोवाच्या साक्षीदारांच्या मेक्सिको शाखा दफ्तरात स्वयंसेविका आहे. तिची आई, जी कालांतराने साक्षीदार बनली ती पेट्रोनाच्या लहान भाऊबहिणींना शिकवतेय

[८ पानांवरील चित्र]

वारीस डीरी ही स्त्रीच्या जननेंद्रियाच्या काटछाट या प्रथेचा निषेध करणारी सुप्रसिद्ध प्रतिनिधी आहे

[चित्राचे श्रेय]

Photo by Sean Gallup/Getty Images