व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बागकाम एक उत्तम छंद

बागकाम एक उत्तम छंद

बागकाम एक उत्तम छंद

तुम्हाला बागेत काम करायला आवडते का? तुमच्या या छंदामुळे तुम्हाला किती फायदे होतात याची कदाचित तुम्हाला कल्पनाही नसेल. लंडनच्या इंडिपेंडट या वृत्तपत्रानुसार, संशोधकांना असे दिसून आले आहे की “बागकाम हा अतिशय आरोग्यदायी छंद आहे, यामुळे तणाव दूर होतो, रक्‍तदाब कमी होतो आणि माणसाचे आयुष्य वाढते.”

लेखक गे सर्च म्हणतात, “दिवसभर धावपळीत व तणावात घालवल्यानंतर घरी येऊन काही वेळ बागेत छोटीमोठी कामे केल्यास तुम्हाला अगदी हलके हलके वाटू लागेल.” बागकाम केल्याने केवळ समाधान व विरंगुळाच मिळतो असे नाही, तर हा जिममध्ये जाऊन केलेल्या व्यायामापेक्षाही चांगला व्यायाम असू शकतो. तो कसा? सर्च यांच्या मते, “खड्डा खणणे, किंवा दांताळ्याने बागेतली पाने गोळा करणे यामुळे सर्व स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो आणि सायकल चालवताना जितक्या कॅलरीज तुम्ही जाळता त्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्ही बागेतली निरनिराळी कामे करताना जाळू शकता.”

विशेषतः वयस्क व्यक्‍तींसाठी बागकाम अतिशय उपयुक्‍त आहे. नवी पालवी फुटण्याची किंवा कळी उमलण्याची वाट पाहताना त्यांना आशादायी वृत्ती बाळगण्यास मदत मिळते. शिवाय, रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीचे डॉ. ब्रिजिड बोर्डमन म्हणतात की “बागकाम म्हणजे म्हातारपणाचे दुःख आणि निराशा यांवर अगदी उत्तम उपाय आहे. वयस्क लोकांना सहसा दुसऱ्‍यांवर अवलंबून राहावे लागते म्हणून निराश वाटते. पण डॉ. बोर्डमन सांगतात, की “निरनिराळी रोपे लावताना, बागेची विशिष्टप्रकारे आखणी करताना आणि तिची निगा घेताना स्वतःच्या जीवनावर नियंत्रण असण्याची त्यांची स्वाभाविक गरज पूर्ण होते. दुसऱ्‍या कोणाची काळजी घेण्याची गरज भागवली जाते.”

मनोविकारांपासून पीडित व्यक्‍तींनाही सुंदर, शांत वातावरणात काम केल्यास खूप तणावमुक्‍त वाटते. शिवाय, इतरांकरता फुले अथवा फळे, भाज्या इत्यादी उगवल्यामुळे अशा व्यक्‍तींना आपला हरवलेला आत्मविश्‍वास व आत्मसन्मान परत मिळवण्यास मदत मिळते.

पण बागेचा फायदा केवळ बागकाम करणाऱ्‍यांपुरताच मर्यादित राहात नाही. टेक्सस विद्यापिठाचे प्राध्यापक रॉजर उलरिक यांनी काही लोकांवर एक प्रयोग केला. या समूहातील व्यक्‍तींना मुद्दामहून तणावग्रस्त करण्यात आले. यांपैकी ज्यांना बरीच झाडेझुडुपे असलेल्या हिरव्यागार परिसरात नेण्यात आले ते, ज्यांना अशा नैसर्गिक ठिकाणी नेण्यात आले नाही त्यांच्या तुलनेत लवकरच तणावमुक्‍त झाले. हे त्यांच्या हृदयाच्या गतीवरून व रक्‍तदाबावरून निदर्शनास आले. अशाचप्रकारच्या आणखी एका प्रयोगात असे आढळले की शस्त्रक्रियेनंतर इस्पितळात राहणाऱ्‍या रुग्णांना, जेथून बाहेरची झाडे, हिरवळ दिसते अशा खोल्यांमध्ये ठेवण्यात आले तेव्हा त्यांचे आरोग्य सुधारले. इतर रुग्णांच्या तुलनेत, ते “लवकर बरे झाले, त्यांना लवकर घरी जाता आले, वेदना कमी करण्यासाठी त्यांच्यावर तुलनेने कमी उपचार करावे लागले आणि ते तक्रारही कमी करत होते.” (g०५ ४/२२)