व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जंतरमंतर—बिनदुर्बिणींची वेधशाळा

जंतरमंतर—बिनदुर्बिणींची वेधशाळा

जंतरमंतर—बिनदुर्बिणींची वेधशाळा

भारतातील सावध राहा! लेखकाकडून

भारतातील नवी दिल्ली येथे जंतरमंतर पाहायला आलेले लोक, तेथील विविध आकृत्या पाहून आश्‍चर्यचकित होऊन विचार करू लागतील: ‘ही खरोखरच वेधशाळा असू शकते?’ आधुनिक इमारतींमधल्या नानाविध उच्च-तंत्राची खगोलीय उपकरणे पाहण्याची सवय झालेल्यांना, एका मोठ्या बागेत विचित्र आकृतींचे दगडी बांधकाम पाहून, ही खरोखरच वेधशाळा आहे, असा विचार करून डोके खाजवावे लागते. पण, हेच ते जंतरमंतर आहे जे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आले होते. दुर्बिणी व युरोपात तयार होत असलेल्या इतर उपकरणांविना देखील या वेधशाळेने, आकाशातील ताऱ्‍यांची किंवा ग्रहांची सविस्तर आणि पुरेशी अचूक माहिती दिली.

जंतरमंतर हे, रजपूत राजा महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने बांधलेल्या पाच वेधशाळांपैकी तीन वेधशाळांचे एकच नाव आहे. “जंतर” आणि “मंतर” हे संस्कृत शब्द आहेत ज्यांचा अर्थ “यंत्र” आणि “सूत्र” असा होतो. जोर देण्याकरता वापरण्यात आलेल्या शब्दाशी मिळता-जुळता असा शब्द वापरण्याच्या सवयीमुळे जंतरमंतर हा शब्द तयार झाला आहे.

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील एका उपकरणावर १९१० साली लावलेल्या फलकावर, या वेधशाळेचे बांधकाम १७१० साली करण्यात आल्याचे लिहिले होते. परंतु, नंतरच्या संशोधनात असे आढळून आले, की या वेधशाळेचे बांधकाम १७२४ साली पूर्ण झाले. जयसिंग दुसरा याच्या जीवनाविषयीची माहिती याला पुष्टी कशी देते हे आपण पाहू या. पण त्याआधी आपण, जगातील सर्वात प्राचीन समजल्या जाणाऱ्‍या या वेधशाळेतील उपकरणांबद्दलची थोडी माहिती घेऊ या.

दगडविटांची वेधयंत्रे

या वेधशाळेत विटा आणि दगडांची चार वेगवेगळी यंत्रे आहेत. यांतील सर्वात उल्लेखनीय यंत्र आहे सम्राट यंत्र अर्थात भव्य यंत्र. ते “खरे तर एक सम-तास छाया घड्याळ आहे.” ही जयसिंगची सर्वात महत्त्वपूर्ण सृष्टी होती. हे त्रिकोणी आकाराचे घड्याळ विटांचे बनलेले आहे व याची उंची २१.३ मीटर, तळ ३४.६ मीटर आणि रुंदी ३.२ मीटर आहे. त्रिकोणाची ३९ मी. लांब कर्णरेषा, पृथ्वीच्या आसाच्या पातळीला समांतर आहे आणि ती उत्तर ध्रुवाच्या दिशेने आहे. छायाशंकूच्या दुसऱ्‍या बाजूला, चतुर्थांश वर्तुळाकृती आहे जिच्यावर तास, मिनिटे आणि सेकंद सूचित करणाऱ्‍या खुणा आहेत. कित्येक शतकांपासून साधी छाया घड्याळे अस्तित्वात होती तरीसुद्धा जयसिंगने, सूर्याची क्रांती काढण्यासाठी व अवकाशातील ग्रहांच्या इतर संबंधित कार्यांच्या हालचालींचे मापन करण्यासाठी या मूलभूत यंत्राला, अचूक उपकरण बनवले.

वेधशाळेतील इतर तीन यंत्रे, राम, जयप्रकाश आणि मिश्र यंत्र होत. सूर्याची व ताऱ्‍यांची क्रांती, उन्‍नतांश आणि दिगंश मापण्यासाठी अगदी बारकाईने तयार करण्यात आले होते. मिश्रयंत्र तर जगातील विविध शहरांत मध्यान्ह केव्हा होतो हेही दर्शवते.

मिश्र यंत्र सोडून वर उल्लेखलेली सर्व यंत्रे जयसिंगने बांधली होती. ही यंत्रे, त्या काळात भारतात असलेल्या कोणत्याही यंत्रांपेक्षा अतिशय गुंतागुंतीची व उपयुक्‍त होती आणि यांच्यामुळेच अचूक पंचांग व खगोलशास्त्रीय घरे तयार करण्यात आली. या यंत्रांची रचना डोळ्यात भरतील अशी सुरेख होती. दुर्बिणींचा व इतर गोष्टींचा शोध लागेपर्यंत ही यंत्रे महत्त्वपूर्ण माहिती पुरवत होती. नंतर ही यंत्रे जुनी झाली. पण हुशार व विद्याप्रेमी जयसिंगने आपल्या ज्योतिषीय संशोधनात, युरोपात उपलब्ध असलेल्या काही उपकरणांचा आणि प्रकाशीय दुर्बिणीचा समावेश का केला नाही? या महाराजाच्या पार्श्‍वभूमीत आणि त्याच्या काळाच्या इतिहासात या प्रश्‍नाचे उत्तर दडलेले आहे.

“गणितीय विज्ञानाच्या अभ्यासाला समर्पित”

जयसिंगचा जन्म १६८८ साली भारतातील राजस्थान प्रांतात झाला होता. त्याचे वडील, कच्छवाहा रजपूतांच्या वंशाची राजधानी असलेल्या अंबेरचे महाराजा होते व ते दिल्लीतील मोगलांच्या सत्तेच्या अधीन होते. राजपुत्र जयसिंगचे हिंदी, संस्कृत, फार्सी आणि अरबी भाषांत शिक्षण झाले होते. गणित, ज्योतिषशास्त्र आणि वीरश्रीपूर्ण खेळांचेही प्रशिक्षण त्याला मिळाले होते. पण एक विषय मात्र त्याच्या खास आवडीचा होता. त्याच्या काळातील एक लेख असे म्हणतो: “आपल्या तर्कशक्‍तीचा उपयोग करायला सुरुवात केल्यापासून आणि प्रौढ झाल्यापासूनच सवाई जयसिंग गणितीय विज्ञानाच्या (ज्योतिषशास्त्र) अभ्यासाला समर्पित होता.”

वयाच्या ११ व्या वर्षी म्हणजे १७०० साली जयसिंग आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर अंबेरच्या सिंहासनावर विराजमान झाला. त्यानंतर लवकरच, दक्षिण भारतातील मोगल सम्राटाने तरुण जयसिंगला बोलवले. तेथे जयसिंग गणित आणि ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्या एका मनुष्याला अर्थात जगन्‍नाथला भेटला. हा मनुष्य नंतर त्याचा प्रमुख साहाय्यक बनला. १७१९ साली मुहम्मदशाहाची राजवट सुरु झाली तेव्हापर्यंत तरुण जयसिंग महाराजाच्या राजकीय स्थितीत सतत चढउतार होत होते. जयसिंगला तेव्हा नवीन मोगल शासकाबरोबर एका बैठकीसाठी राजधानी दिल्लीला बोलावण्यात आले. १७२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या बैठकीत जयसिंगने, वेधशाळा बांधण्याचा प्रस्ताव मांडला. १७२४ साली त्याचा हा प्रस्ताव वास्तवात उतरला.

पण महाराजा जयसिंगने वेधशाळा का बांधली? जयसिंगला जाणवले, की भारतातील पंचांग आणि ज्योतिषीय घरे बिलकुल अचूक नव्हती आणि त्याच्या काळात ज्योतिषशास्त्राबद्दल फार कमी माहिती उपलब्ध होती. त्यामुळे त्याने, प्रत्यक्षात दृश्‍य ग्रहांना जुळतील अशी नवीन घरे तयार करण्याचे ठरवले. तसेच, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला स्वतःला समर्पित करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीसाठी खस्थ ज्योतींचा वेध घेण्याकरता वेध साधने तयार करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे जयसिंगने फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल आणि जर्मनीहून पुस्तकांचा एक मोठा संग्रहच मिळवला. त्याच्या दरबारात, ज्योतिषशास्त्राच्या शाळांतील हिंदू, इस्लामी व युरोपियन पंडितांचे स्वागत केले जायचे. ज्योतिषशास्त्रावर माहिती गोळा करून वस्तुस्थिती शोधून काढण्याकरता त्याने पौर्वात्याहून एका कंपूला युरोपलाही पाठवले. त्याने त्यांना परत येताना ज्योतिषशास्त्रावर आधारित पुस्तके आणि साधने आणण्याची आज्ञा दिली.

पूर्व आणि पश्‍चिम कधी भेटू शकले नाहीत

युरोपमध्ये दुर्बिण, सूक्ष्ममापक आणि लघुभागमापकाचा उपयोग होत होता तरीसुद्धा जयसिंगने दगडविटांची वेधशाळा का बांधली? आणि त्याला कोपरनिकस व गॅलिलियोच्या सूर्यकेंद्रिय शोधांची माहिती कशी काय नव्हती बरे?

पूर्व व पश्‍चिमेमधील अपुरे दळणवळण, हे काही प्रमाणात यास जबाबदार असावे. पण केवळ हीच एक समस्या नव्हती. त्या काळचे धार्मिक वातावरणही जबाबदार होते. ब्राम्हण पंडितांनी युरोपला जाण्यास नकार दिला. आपण जर महासागर ओलांडून गेलो तर आपण आपली जात गमावू अशी त्यांची धारणा होती. जयसिंगला माहिती मिळवण्यास मदत करणाऱ्‍या युरोपीयन साहाय्यकांपैकी बहुतेक जण जेसुईट पंडित होते. जयसिंगचे आत्मचरित्र लिहिणाऱ्‍या वी. एन. शर्मा यांच्या मते, जेसुईटांना आणि कॅथलिक लोकांना, पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते हा गॅलिलियो व इतर वैज्ञानिकांनी मांडलेला दृष्टिकोन स्वीकारण्याची धर्मसभेने धमकी दिली होती. चर्चच्या मते हा पाखंड आणि नास्तिकवाद होता. त्यामुळे, जयसिंगने युरोपला पाठवलेल्या प्रतिनिधींनी, युरोपहून त्यांना ज्या ज्या गोष्टी आणायच्या होत्या त्या वस्तूंच्या यादीत, कोपरनिकस आणि गॅलिलियोच्या ग्रंथांचा किंवा सूर्यकेंद्रिय तत्त्वाचे समर्थन करण्याकरता वापरल्या जाणाऱ्‍या नवीन साधनांचा समावेश केला नाही.

अखंड ध्यास

धार्मिक असहिष्णुता व कट्टरपणाचे गालबोट लागलेल्या युगात जयसिंग जगत होता. आकाशस्थ ज्योतींबद्दलचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी जयसिंगने बुद्धिमान व अधिकारपूर्ण कार्य केले तरीपण अनेक दशकांपर्यंत भारतात या क्षेत्रात विशेष प्रगती झाली नाही. तरीपण, जंतरमंतर वेधशाळा, विद्येची तहान असलेल्या एका मनुष्याच्या प्रयत्नांची साक्ष देते.

जयसिंगने आकाशातील ज्योतींच्या हालचालीत रस घ्यायच्या अनेक शतकांआधी इतर विचारवंत, आकाशाकडे पाहत होते आणि विश्‍वातील अद्‌भुत गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत होते. देवाच्या हस्तकृतीबद्दलचे आपले ज्ञान वाढवण्याचा ध्यास घेतलेली मानवजात ‘आपले डोळे वर करून पाहणे’ थांबवणार नाही, यात शंकाच नाही.—यशया ४०:२६; स्तोत्र १९:१. (g०५ ७/८)

[१८ पानांवरील रेखाचित्र/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सम्राटयंत्र एक अचूक छाया घड्याळ होते. या मोठ्या त्रिकोनाची छाया या वर्तुळाकृतींवर (गोल करण्यात आलेले चित्र पाहा) पडायची ज्यावर तास-मिनिटांच्या खुणा होत्या

[१८ पानांवरील रेखाचित्र/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

जयप्रकाशयंत्रात कढईसारख्या अर्धगोलाकृती आहेत. या अर्धगोलाकृतींच्या भिंतींवर खुणा आहेत. याच्या कडेवर आडव्या-उभ्या तारा ताणलेल्या आहेत

रामयंत्राच्या आत उभे राहून विविध सावल्यांवरून किंवा भिंतीतील खिडक्यांमधून ताऱ्‍यांचे निरीक्षण करता येते

[१८ पानांवरील रेखाचित्र/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मिश्रयंत्राच्या साहाय्याने विविध शहरात मध्यान्ह केव्हा आहे हे सांगता येते

[१९ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

दृष्टीरेखा वेधशाळा, सवाई जयसिंगने अतिशय सूक्ष्मपणे ज्योतिविषयक वेध घेण्यासाठी वेधशाळा निर्मिली

तारा पाहण्यासाठी तुम्हाला आधी त्याचा उन्‍नतांश (आकाशात तो किती उंचीवर आहे) आणि त्याचा दिगंश (तो तारा उत्तरेपासून किती लांब आहे) माहीत असावयास हवा

दोन लोक सम्राटयंत्राच्या साहाय्याने तारा पाहून त्याची स्थिती सांगू शकत होते

[चित्राचे श्रेय]

खाली: Reproduced from the book SAWAI JAI SINGH AND HIS ASTRONOMY, published by Motilal Banarsidass Publishers (P) Ltd., Jawahar Nagar Delhi, India

[१९ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

भारत

नवी दिल्ली

मथुरा

जयपूर

वाराणसी

उज्जैन

जयसिंगने भारतात पाच वेधशाळा बांधल्या; यात नवी दिल्लीतील वेधशाळेचाही समावेश आहे

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

चित्र: Courtesy Roop Kishore Goyal