व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

“समस्या” बालक सुधरू शकतात

“प्राथमिक शालेय वयाची अनेक ‘समस्या’ मुले मोठी झाल्यावर सुधरतात,” असे द सीडनी मॉर्निंग हेराल्डने म्हटले. “ते समजदार किशोर बनतात.” ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅमिली स्टडीजने केलेल्या संशोधनात त्यांनी ११ ते १२ वयोगटातील १७८ मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवले तेव्हा त्यांना दिसून आले की या मुलांच्या वागणूकीत तीन किंवा त्याहूनही अधिक लक्षणे दिसून आली; जसे की “उच्च आक्रमकता, सहकार्य करण्याचा व आत्मसंयमाचा अभाव, एखाद्या कामावर लक्ष एकाग्र करता न येणे, उच्च अस्वस्थता आणि चंचल किंवा लहरी स्वभाव.” सहा वर्षांनंतर, यांपैकी १०० युवकांनी “शांतचित्त युवकांसारखे” वर्तन दाखवले. कोणत्या गोष्टीमुळे ही मुले सुधरली होती? “आनंदी किशोर बनलेल्या युवकांनी कदाचित तुसड्या युवकांबरोबर कमी संगती केली असावी आणि त्यांच्या पालकांचे त्यांच्याकडे अधिक लक्ष असावे,” असे बातमीपत्राने म्हटले. (g०५ ८/८)

तंबाखू संपूर्ण शरीरासाठी घातक

“धुम्रपान करणारे फक्‍त आपले फुफ्फुस आणि रोहिणीच नव्हे तर कोशिका देखील धोक्यात घालत आहेत,” असे न्यू सायन्टिस्टने वृत्त दिले. यु.एस. सर्जन जनरल रिचर्ड एच. करमोना यांनी प्रकाशित केलेल्या वृत्तात, तंबाखूच्या वापराशी जोडलेल्या डझनवारी आजारांची यादीच दिली ज्यात, नीमोनिया, रक्‍ताचा कॅन्सर, मोतीबिंदू, हिरड्यांचा आजार आणि मूत्रपिंड, ग्रीवा, जठर व स्वादूपिंड यांचा कर्करोग या सर्व आजारांचा समावेश होतो. करमोना म्हणतात: “धुम्रपान चांगले नाही, हे आम्हाला अनेक शतकांपासून माहीत होते, परंतु या अहवालावरून असे दिसून येते, की आम्हाला माहीतही नव्हते इतके ते घातक आहे.” “रक्‍त जिथे जिथे जाते तिथे तिथे सिगरेटीतला धूर जातो.” कमी टार व निकोटीन असलेल्या सिगारेटी ओढल्याने आपण धोका टाळू शकतो, असा जे विचार करतात त्यांना करमोना असे म्हणतात: “‘हलकी’, ‘अल्ट्रा-हलकी’ वगैरे सुरक्षित सिगारेट असे काही नसते.” ते पुढे असेही म्हणाले, की धुम्रपान करणारे, जे धुम्रपान करत नाहीत त्यांच्यापेक्षा १३ ते १४ वर्षे आधीच मरण पावतात. “धुम्रपानामुळे शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाला जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आजार होऊ शकतो,” असे करमोनाने म्हटल्याचे वृत्त द न्यू यॉर्क टाईम्समध्ये आले होते. (g०५ ९/२२)

विवाह फसवणूक

३,००० पेक्षा अधिक दक्षिण आफ्रिकन स्त्रियांची त्या “विवाहित” आहेत अशी फसवणूक करण्यात आल्याचे वृत्त जोहानसबर्गचे सोव्हेटन नावाचे बातमीपत्रक देते. एका फसवणूकीत, स्त्रियांनी, नोकरीचे कॉन्ट्रॅक्ट समजून एका दाखल्यावर सही केली पण खरे तर त्यांनी विवाहाच्या दाखल्यावर सही केली होती. या दाखल्यामुळे, विदेशी “वर” देशात कायम स्थायी होण्यास पात्र ठरतो. अशा जाळ्यात अडकलेली “वधू” जेव्हा आपल्या ओळखपत्राची कागदपत्रे पुन्हा करण्यासाठी अर्ज करते तेव्हा तिला कळते, की तिला वेगळे अडनाव देण्यात आले आहे; किंवा ती जेव्हा तिच्या खरोखरच्या विवाह दिवशी लग्नाचे रेजिस्ट्रेशन करायला जाते तेव्हा तिला कळते की ती आधीच विवाहित आहे! हा खोटा “विवाह” रद्द करण्यात खूप मगजमारी असते. तरीपण, सुमारे २,००० स्त्रियांनी यशस्वीपणे, आपल्या मनाविरुद्ध झालेला हा विवाह रद्द केला आहे. ही फसवणूक टाळण्याकरता, एक नवीन नियम काढण्यात आला आहे. यात, विदेशी विवाह सोबत्याला कायमचा स्थायी परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याआधी पाच वर्षे थांबावे लागते. (g०५ ५/२२)

मौजेखातर वाचन करणारे विद्यार्थी शाळेत यशस्वी

“तासन्‌तास अभ्यास, पालकांचे प्रशिक्षण, वर्गात घेतलेल्या नोंदी किंवा कंप्युटरचा वापर” यांच्यापेक्षा मौजेखातर वाचन केल्याने विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतात, असे मेक्सिको सिटीच्या मिलेन्यो वृत्तपत्रात म्हटले होते. लाखो उच्च शाळा प्रवेश परीक्षांच्या अभ्यासावरून असे दिसून आले, की जे विद्यार्थी आपल्या शाळेच्या अभ्यासासाठी आणि मौजेखातर वाचन करण्याकरता वेळ काढतात ते शाळेत यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे. त्यांनी फक्‍त शालेय विषयांचीच पुस्तके निवडावीत असे नाही, तर केवळ मौजेखातर म्हणून ते आत्मचरित्रे, कवितांची पुस्तके, विज्ञानाचे विषय असलेली पुस्तके वाचू शकतात. दुसरीकडे पाहता, या अहवालात असे म्हटले होते, की जे विद्यार्थी दिवसातून अनेक तास वाचन करण्याऐवजी टीव्ही पाहतात त्यांना शाळेत कमी मार्क मिळतात. (g०५ ८/८)

भूतानमध्ये तंबाखूच्या विक्रीवर बंदी

भारत व चीनच्या मधे असलेल्या हिमालयाच्या कुशीतील भूतान राज्याने तंबाखूच्या सर्व विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी विदेशी राजनीतीज्ञांना किंवा पर्यटकांना किंवा असरकारी संघटनांसाठी काम करणाऱ्‍यांना लागू होत नाही. असे म्हटले जाते, की भूतान हे जगातील पहिले राष्ट्र आहे ज्याने असे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानासही बंदी आहे. “भूतानला धुम्रपान-मुक्‍त राष्ट्र बनवण्याचे सरकारच्या उद्दिष्टांतील हे एक उद्दिष्ट आहे,” असे बीबीसीने सांगितले. (g०५ ८/२२)

पुरेशी झोप—समस्या सोडवण्यास तयार

“पुष्कळ लोकांच्या लक्षात आले आहे, की झोपायच्या वेळी जी समस्या सोडवायला कठीण वाटत होती, ती सकाळी उठल्यावर चुटकीसरशी सोडवता आली; जणू काय मेंदू रात्रभर, ती समस्या कशी सोडवायची याचाच विचार करत होते,” असे लंडनचे द टाईम्स म्हणते. हे खरे असल्याचा पुरावा जर्मनीतील वैज्ञानिकांना मिळाला आहे व तो त्यांनी सृष्टी (इंग्रजी) या आपल्या मासिकात प्रकाशित केला आहे. त्यांनी ६६ स्वयंसेवकांना एक गणित सोडवण्याकरता दोन नियम दिले परंतु, अचूक उत्तर देणारा तिसरा नियम सांगितला नाही. मग काही स्वयंसेवकांना झोपी जाण्यास सांगितले तर इतरांना संपूर्ण रात्र किंवा दिवस जागे ठेवले. “झोपेने कमाल केली,” असे याच अभ्यासावर भाष्य करताना लंडनच्या द डेली टेलिग्राफने सांगितले. जे स्वयंसेवक झोपून उठले ते, “ज्यांना जागे ठेवण्यात आले होते त्यांच्यापेक्षा दुप्पट पटीने तिसरा नियम शोधून काढू शकले.” आराम करून ताजेतवाने झालेल्या लोकांनी, झोप मिळाल्यामुळे चांगले परिणाम दाखवले होते, याची खात्री करण्याकरता वैज्ञानिकांनी दुसरा एक प्रयोग केला. दोन्ही गटाला, झोपून उठल्यावर किंवा दिवसभर जागे राहिल्यानंतर झोपी जाण्याआधी एक समस्या सोडवण्यासाठी दिली. यावेळी, दोन्ही गटातील लोकांच्या कार्यात फरक नव्हता; यावरून असे दिसून आले, की “हे उत्तम परिणाम, ताजेतवाने झालेल्या मेंदूमुळे नव्हे तर झोपेत पुनःसंघटन करणाऱ्‍या मेंदूचे कार्य आहे,” असे द टाईम्सने म्हटले. “तेव्हा, झोप हे सृजनशील शिकण्याचे कार्य म्हणून कार्य करते,” असा निष्कर्ष संशोधक डॉ. उलरीक वॅग्नर यांनी काढला. (g०५ ९/८)

शस्त्रास्रांची बनली खेळणी

लोकसंख्येकडील शस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी ब्राझीलने एक मोहीम काढली. परत आणून दिलेल्या प्रत्येक शस्त्राची वेगवेगळी किंमत, ३० पासून १०० डॉलर पर्यंतची (१,३५० ते ४,५०० रुपये) भरपाई देण्यात आली. फोल्या ऑनलाईनने सांगितल्याप्रमाणे, २,००,००० पेक्षा अधिक शस्त्रे २००४ सालच्या जुलै ते डिसेंबर महिन्यात संपूर्ण देशभर गोळा करण्यात आली. ही शस्त्रे मग साऊ पाऊलो येथे गोळा करून, त्यांचा चुरा करून, दाबून व वितळवण्यात आली आणि त्यांच्यापासून खेळाच्या मैदानात असलेली खेळणी बनवण्यात आली व ती शहरातील एका बागेत बसवण्यात आली. या बागेत आता एक सीसॉ, एक झोका आणि एक घसरगुंडी आहे. ही सर्व खेळणी, गोळा केलेल्या शस्त्रांपासून बनवण्यात आली आहेत. न्यायमंत्री मार्सियो टुमस बासटोस यांनी असे म्हटले: “निःशस्त्रीकरणाच्या मोहिमेचा एक प्रमुख हेतू म्हणजे, लोकांमध्ये शांती रुजवणे हा होय.” (g०५ ९/२२)