व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निवास समस्या का अस्तित्वात आली?

निवास समस्या का अस्तित्वात आली?

निवास समस्या का अस्तित्वात आली?

एका मोठ्या आफ्रिकन शहराच्या सीमेजवळ ३६ वर्षांची जोझफीन, ६-११ वयोगटांतील आपल्या तीन मुलांसोबत राहते. पोट भरण्यासाठी ती प्लास्टिकचे रिकामे डबे गोळा करते व जवळच्याच एका कारखान्यात नेऊन विकते. दिवसभर वाकून वाकून तिची कंबर मोडते पण इतके करूनही तिला दिवसाला ९० रुपये देखील मिळत नाहीत. त्या शहरात इतक्या पैशांत तिला न धड आपल्या मुलांना खाऊ घालता येत, न त्यांच्या शाळेचा खर्च भागवता येत.

संध्याकाळी ती आपल्या घरी परत येते. घर कसले? या घराला तिला नाईलाजाने घर म्हणावे लागते. त्याच्या भिंती मातीच्या विटा व बारीक फांद्यांना चिखल लावून बांधलेल्या आहेत. छत काय तर गंजलेले लोखंडाचे पत्रे, तसेच प्लास्टिक व टिनाचे लहान मोठे तुकडे एकमेकांवर ठेवलेले आहेत. आणि ते वाऱ्‍याने उडून जाऊ नयेत म्हणून त्यावर दगड, लाकडे व जुने पत्रे ठेवलेले आहेत. घराचे “दार” व “खिडकी” फाटलेल्या पोत्याची आहे. त्यामुळे थंडी व वाऱ्‍यापासूनही रक्षण होत नाही, मग चोरांची तर गोष्टच दूर.

आणि हे मोडके घरही जोझफीनचे स्वतःचे नाही. जोझफीन व तिच्या मुलांना सतत भीती वाटते की कोणत्याही क्षणी त्यांना येथून बाहेर काढले जाईल. कारण ज्या जागेवर त्यांची झोपडी आहे ती जागा जवळच्याच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वापरली जाणार आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे अशीच परिस्थिती जगातल्या कित्येक देशांत पाहायला मिळते.

आरोग्याला बाधक असलेले घर

एका आंतरराष्ट्रीय निवास साहाय्य योजनेचे वरिष्ठ अधिकारी रॉबिन शेल म्हणतात की “झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्‍या मुलांना आपल्या घराची लाज वाटते, . . . कुटुंबातले सदस्य वरचेवर आजारी पडतात आणि . . . कोणत्याही क्षणी एखादा सरकारी अधिकारी किंवा जमिनीचा मालक येऊन त्यांचे झोपडे तोडून टाकेल अशी त्यांना सतत भीती असते.”

अशा परिस्थितीत राहणाऱ्‍या आईवडिलांना सतत आपल्या मुलांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी असते. आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा बहुतेक वेळ व शक्‍ती, मुलांना अन्‍न, विसावा, व निवारायांसारख्या मूलभूत गोष्टी पुरवण्याकरता संघर्ष करण्यातच जातो.

आपण या गरिबांची परिस्थिती दुरून पाहतो आणि सहज असा निष्कर्ष काढतो की त्यांनी थोडा प्रयत्न केल्यास ते नक्कीच आपली परिस्थिती सुधारू शकतील. पण ‘प्रयत्न करा म्हणजे तुम्ही आपोआप वर याल’ असे लोकांना सांगणे हा या समस्येवरील उपाय नाही. घरांच्या समस्येला अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत ज्या बदलणे कोणत्याही एका व्यक्‍तीच्या हातात नाही. या विषयावर संशोधन करणारे सांगतात की या समस्येला जबाबदार असलेली प्रमुख कारणे, लोकसंख्येत झालेली वाढ, झपाट्याने घडणारे शहरीकरण, नैसर्गिक विपत्ती, राजकीय उलथापालथ व दारिद्र्‌याचा न सुटणारा प्रश्‍न ही आहेत. बंद मुठीच्या पाच बोटांसारखे या समस्यांनी जगातील गरीब लोकांना जखडून ठेवले आहे व त्यांचे जगणे मुश्‍कील करून टाकले आहे.

लोकसंख्येशी संबंधित समस्या

सर्वसामान्यपणे असा अंदाज लावला जातो की दर वर्षी सबंध जगात ६.८ ते ८ कोटी लोकांना आश्रय पुरवावा लागतो. संयुक्‍त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जगाच्या लोकसंख्येने २००१ साली ६१० कोटीची संख्या पार केली आणि २,०५० सालापर्यंत ही संख्या ७९० ते १,०९० कोटी इतकी होण्याची अपेक्षा केली जाते. विशेष म्हणजे, पुढील दोन दशकांत होणाऱ्‍या या वाढीपैकी ९८ टक्के वाढ विकसनशील देशांत होईल असे सांगितले जाते. हे अंदाज पाहिल्यावर, येणाऱ्‍या काळात निवासाची सोय करणे हे किती मोठे आव्हान असणार आहे याची कल्पना येते. भरीस भर म्हणजे बहुतेक देशांत, लोकसंख्येत सर्वात झपाट्याने वाढ होणारी क्षेत्रे म्हणजे आधीच गजबजलेली शहरे आहेत.

अव्याहत शहरीकरण

न्यूयॉर्क, लंडन व टोकियो यांसारख्या प्रमुख शहरांना सहसा देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्रस्थान मानले जाते. परिणामस्वरूप, हजारो ग्रामीण लोक दर वर्षी या ‘तुलनात्मकरित्या समृद्ध’ क्षेत्रांत शिक्षण व रोजगार मिळवण्याच्या आशेने येतात.

उदाहरणार्थ चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तार पावत आहे. यामुळे, एका वृत्तानुसार पुढील काही दशकांत, मोठ्या शहरांतच २० कोटी पेक्षा जास्त नव्या घरांची गरज पडणार आहे. ही संख्या सध्याच्या घटकेला सबंध संयुक्‍त संस्थानांत असलेल्या एकूण घरांपेक्षा दुप्पट आहे. अशा प्रचंड मागणीला कोणती निवास योजना प्रतिसाद देऊ शकते?

वर्ल्ड बँकेने दिलेल्या माहितीनुसार “दर वर्षी विकसनशील जगातील शहरांत १.२ ते १.५ कोटी नव्या कुटुंबांची भर पडते आणि साहजिकच त्यांच्यासाठी इतक्याच नव्या घरांची गरज उद्‌भवते.” परवडण्यासारखी घरे उपलब्ध नसल्यामुळे शहरात राहणारे हे गरीब लोक मिळेल त्या ठिकाणी, सहसा दुसरे कोणीही जेथे राहू इच्छित नाहीत अशा ठिकाणी आपले बिऱ्‍हाड करतात.

नैसर्गिक व राजकीय विपत्ती

गरिबीमुळे अनेकांना पूर, दरड कोसळणे व भूकंप यांसारखे प्रकार वरचेवर घडणाऱ्‍या क्षेत्रांत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. उदाहरणार्थ, व्हेनेझुएलातील काराकास शहरात पाच लाख पेक्षा जास्त लोक “डोंगरकड्यांवर असलेल्या अनाधिकृत वसाहतींत राहतात, जेथे सहसा दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात.” १९८४ साली भारतातील भोपाळ शहरात घडलेली औद्योगिक दुर्घटना तुम्हाला आठवत असेल. या दुर्घटनेत हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर याहीपेक्षा जास्त लोक जखमी झाले. इतक्या लोकांचा बळी का गेला? कारण जवळचीच एक झोपडपट्टी वाढत वाढत कारखान्याच्या हद्दीपासून फक्‍त पाच मीटर अंतरावर आली होती.

अंतर्गत युद्धांसारख्या राजकीय विपत्ती देखील निवास समस्यांना जबाबदार आहेत. एका मानवी हक्क संस्थेने २००२ साली प्रकाशित केलेल्या एक वृत्तानुसार, १९८४ व १९९९ दरम्यान आग्नेय तुर्कस्थानात झालेल्या अंतर्गत युद्धात जवळजवळ १५ लाख लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना आपले घर सोडून इतरत्र जावे लागले होते. या लोकांपैकी बऱ्‍याच जणांना मिळेल त्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. काहींना नातेवाईक व शेजाऱ्‍यांच्या आधीच गजबजलेल्या घरात राहावे लागले, काहींना शेतांतल्या इमारतींत तर काहींना बांधकाम प्रकल्पांवर जाऊन राहावे लागले. काही कुटुंबांचा एक समूह तर तबेल्यांत राहात होता. तेसुद्धा एका खोलीत १३ किंवा त्याहीपेक्षा जास्त जणांना राहावे लागत होते. एकच न्हाणीघर आणि अंगणात असलेला एकच नळ वापरावा लागत होता. एका निर्वासिताने म्हटले, “आम्हाला अशा जगण्याचा कंटाळा आलाय. गुराढोरांसाठी बनवलेल्या जागेत आम्हाला राहावं लागतंय.”

आर्थिक मरगळ

शेवटी, निवासाची समस्या आणि गरिबांच्या आर्थिक स्थितीचाही निश्‍चित संबंध आहे. याआधी ज्याचा उल्लेख करण्यात आला होता, त्या वर्ल्ड बँकेच्या वृत्तानुसार, १९८८ या एकाच वर्षात विकसनशील देशांतील ३३ कोटी शहरवासी गरीब म्हणता येईल अशा स्थितीत राहात होते व त्यांची ही परिस्थिती पुढच्या काही वर्षांत फारशी बदलणार नव्हती. लोकांना अन्‍न व वस्त्र यांसारख्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसताना ते एक चांगले घर भाड्याने घेतील किंवा बांधतील अशी अपेक्षा कशी करता येईल?

वधारलेले व्याजाचे दर आणि महागाई यांमुळे बऱ्‍याच कुटुंबांना बँकांचे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे आणि सार्वजनिक सेवांचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्यांना आपल्या परिस्थितीत सुधारणा करणे अतिशय कठीण जाते. काही देशांत बेकारीचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असल्यामुळे काहींना उदरनिर्वाह चालवणे जवळजवळ अशक्य असते.

या व अशा इतर कारणांमुळे जगाच्या पाठीवरील कोट्यवधी लोकांना सर्वसामान्यापेक्षा निकृष्ट दर्जाच्या घरांत राहणे भाग आहे. काही लोक जुन्या टाकून दिलेल्या बसेसमध्ये, मालवाहू गाड्यांच्या डब्यांमध्ये, तर काही कार्डबोर्डच्या खोक्यांमध्ये राहतात. काहीजण पायऱ्‍यांखाली, प्लास्टिकच्या चादरींखाली तर काहीजण वापरलेल्या जुन्या सामानासुमानाखाली संसार मांडतात. उजाड पडलेल्या कारखान्यांत काहीजण जाऊन वसले आहेत.

समस्येवर कोणते उपाय केले जात आहेत?

बऱ्‍याच दर्दी व्यक्‍ती, संस्था व सरकारे यांनी या समस्येला तोंड देण्याकरता विधायक पावले उचलली आहेत. जपानमध्ये, परवडण्यासारखी घरे बांधण्यास मदत करण्यासाठी कित्येक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत १९९४ साली सुरू करण्यात आलेल्या एका निवास कार्यक्रमांतर्गत चार खोल्यांची दहा लाखांपेक्षा अधिक घरे बांधून पूर्ण झाली आहेत. केनियात दर वर्षी शहरी क्षेत्रांत १,५०,००० आणि ग्रामीण भागांत यापेक्षा दुप्पट घरे बांधण्याचे उद्दिष्ट बाळगणारी एक महत्त्वाकांशी योजना आहे. मादागास्कर यांसारख्या इतर कित्येक देशांनीही स्वस्त दरांत घर उभे करण्याकरता नवनवीन बांधकाम पद्धतींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

“प्रचंड शहरी विस्तारामुळे निर्माण होणाऱ्‍या समस्या टाळण्याकरता व त्यांचे निवारण करण्याकरता” जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत हे दाखवण्याकरता युएन-हॅबिटॅट यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. बऱ्‍याच स्वयंसेवी संस्था व एनजीओ देखील मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने निरनिराळ्या देशांतल्या १,५०,००० पेक्षा जास्त कुटुंबांना चांगले घर मिळवण्यास मदत केली आहे. या संस्थेचा अंदाज आहे की २००५ पर्यंत त्यांनी दहा लाख लोकांना साधे पण चांगले व परवडण्यासारखे घर मिळवण्यास मदत केलेली असेल.

या संस्थांपैकी बऱ्‍याच संस्थांनी, निकृष्ट दर्जाच्या घरांत राहणाऱ्‍या लोकांना आपल्या सध्याच्याच परिस्थितीला तोंड देण्याकरता किंवा त्यात सुधारणा करण्याकरता उपयोगी पडू शकेल अशी व्यावहारिक माहिती गोळा केली आहे. जर तुम्हाला अशा मदतीची गरज असेल तर तुम्ही अशा संस्थांनी केलेल्या सवलतींचा फायदा जरूर घ्यावा. तुम्ही स्वतःहूनही बरीच साधी पावले उचलू शकता.—“तुमचे घर व तुमचे आरोग्य” हे शीर्षक असलेला पृष्ठ ७ वरील चौकोन पाहा.

तुमची वैयक्‍तिक परिस्थिती सुधारणे तुम्हाला शक्य असो वा नसो, पण एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे, कोणतीही एक व्यक्‍ती किंवा मानवी संस्था या समस्येत लोकांना जखडणाऱ्‍या जागतिक परिस्थितीची बंद मूठ उघडण्यास समर्थ नाही. आर्थिक विकास व मानव साहाय्याची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि ही मागणी पूर्ण करणे आंतरराष्ट्रीय मानव समाजाला दिवसेंदिवस जास्त कठीण होत चालले आहे. दर वर्षी दारिद्र्‌याच्या या गर्तेत लाखो मुलांचा जन्म होतो. यावर काही कायमचा उपाय असू शकतो का? (g०५ ९/२२)

[७ पानांवरील चौकट]

तुमचे घर व तुमचे आरोग्य

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सर्वसामान्यपणे चांगल्या आरोग्याला पोषक ठरण्याकरता घरात निदान खाली उल्लेख केलेल्या सोयी असल्याच पाहिजेत:

◼ पावसाचे पाणी झिरपू नये म्हणून पक्के छत

◼ ऊन, वारा, पाऊस यांपासून व प्राण्यांपासून संरक्षण देण्याकरता पक्क्या भिंती व दारे

◼ किडे, विशेषतः डास आत येऊ नयेत म्हणून खिडक्यांना व दारांना जाळ्या

◼ उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्याकरता भिंतीपासून थोडे पुढे आलेले छप्पर

[८ पानांवरील चौकट/चित्रे]

ग्रामीण आफ्रिकेतील पारंपरिक घरे

आफ्रिकेत बरीच वर्षे पारंपरिक घरे पाहायला मिळत. ही घरे काही लहान तर काही मोठी व वेगवेगळ्या आकारांची असत. केनियाच्या काही जमाती, उदाहरणार्थ किकूयू व लुओ जमातीचे लोक गोलाकार भिंती व गवताचे शंक्वाकार छत असलेले घर बांधत. तर इतर जमाती उदाहरणार्थ केनिया व टान्झानियाचे मसाई काहीसे लांबुळके चौकोनी घर बांधत. पूर्व आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्‍याजवळील प्रदेशांत घरांचे गवती छत अगदी जमिनीपर्यंत असे व ही घरे मधमाशांच्या पोळांसारखी दिसत.

या घरांसाठी लागणारे बांधकामाचे साहित्य सहज उपलब्ध असल्यामुळे लोकांना घरांची समस्या नव्हती. मातीत पाणी घालून भिंतींना लावण्याकरता गिलावा तयार करता येत होता. जवळपास अनेक जंगले असल्यामुळे लाकूड, गवत, वेत, व बांबूची पाने अगदी सहज मिळवता येत होती. त्यामुळे, एखादे कुटुंब गरीब असो वा श्रीमंत, त्यांना स्वतःचे घर बांधणे तसे सोयीचे होते.

अर्थात, ही घरे सर्वच दृष्टीने सोयीस्कर नव्हती. छत सहसा सहज जळू शकणाऱ्‍या साहित्याचे असल्यामुळे घराला आग लागण्याची भीती होती. तसेच, चोर किंवा दरोडेखोर या घरांच्या मातीच्या भिंतीत छिद्र करून सहज घरात प्रवेश करू शकत होते. म्हणूनच आज आफ्रिकेत बऱ्‍याच क्षेत्रांत पारंपरिक धाटणीच्या घरांऐवजी जास्त पक्क्या स्वरूपाचे बांधकाम केले जाताना दिसते.

[चित्राचे श्रेय]

संदर्भ: आफ्रिकन पारंपरिक वास्तूशास्त्र

झोपड्या: Courtesy Bomas of Kenya Ltd - सांस्कृतिक, चर्चा व मनोरंजन केंद्र

[५ पानांवरील चित्र]

युरोप

[चित्राचे श्रेय]

© Tim Dirven/Panos Pictures

[६ पानांवरील चित्र]

आफ्रिका

[६ पानांवरील चित्र]

दक्षिण अमेरिका

[७ पानांवरील चित्र]

दक्षिण अमेरिका

[७ पानांवरील चित्र]

आशिया

[६ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Teun Voeten/Panos Pictures; J.R. Ripper/BrazilPhotos

[७ पानांवरील चित्राचे श्रेय]

JORGE UZON/AFP/Getty Images; © Frits Meyst/Panos Pictures