व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला कुसंगती कशी टाळता येईल?

मला कुसंगती कशी टाळता येईल?

तरुण लोक विचारतात . . . 

मला कुसंगती कशी टाळता येईल?

“शाळेत माझी एका मुलीशी गट्टी जमली . . . तिला ड्रग्सची, किंवा पार्ट्यांना जाण्याची सवय नव्हती आणि ती चांगल्या वळणाची होती. तिला शिव्या देण्याचीही सवय नव्हती. शिवाय तिला नेहमी चांगले गुण मिळायचे. पण तरीसुद्धा तिची मैत्री निश्‍चितच कुसंगती होती.”—बेव्हर्ली. *

बेव्हर्ली या निष्कर्षावर का आली? तिला आता जाणवते की या मुलीने तिला अयोग्य प्रकारच्या गोष्टींच्या संपर्कात आणले. बेव्हर्ली सांगते, “आमचं एकमेकींसोबत उठणंबसणं वाढलं, तसतशी मी हळूहळू भूतविद्येशी संबंधित पुस्तके वाचू लागले. अशाच विषयावर मी स्वतः एक गोष्टही लिहिली.”

मेलानी नावाची एक मुलगी देखील अशाचप्रकारे कुसंगतीमुळे गैरवर्तनात अडकली—पण तिने कोणा बाहेरच्या नव्हे, तर स्वतःला सहख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या मंडळीतल्याच व्यक्‍तीशी मैत्री केली होती! तर मग कोणते मित्र चांगले मित्र ठरतील हे तुम्ही कसे ठरवू शकता? विश्‍वासात नसलेल्यांशी मैत्री करणे नेहमीच धोकेदायक ठरते का? सह ख्रिस्ती बांधवांमध्ये केलेली मैत्री नेहमीच सुरक्षित असते का?

खासकरून, विरुद्धलिंगी व्यक्‍तीशी मैत्री करताना काय लक्षात ठेवायला हवे? जर तुम्ही लग्नाच्या दृष्टीने एखाद्या व्यक्‍तीकडे आकर्षित झाला असाल, तर या व्यक्‍तीसोबत नातेसंबंध जोडणे तुमच्याकरता आध्यात्मिक रितीने हितकारक ठरेल हे तुम्ही कसे ठरवू शकता? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यास साहाय्य करतील अशी बायबलमधील काही तत्त्वे आपण आता विचारात घेऊया.

कोणत्या प्रकारच्या मित्रांना चांगले म्हणता येईल?

बेव्हर्लीची शाळासोबती खऱ्‍या देवाची उपासक नव्हती; केवळ या कारणामुळे बेव्हर्लीने तिच्याशी मैत्री करताना पुन्हा एकदा विचार करायला हवा होता का? एखादी व्यक्‍ती सहख्रिस्ती नाही म्हणजे निश्‍चितच ती असभ्य किंवा अनैतिक असावी असा निष्कर्ष खरे ख्रिस्ती काढत नाहीत, हे कबूल आहे. पण अशा व्यक्‍तीशी जवळीक करण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा निश्‍चितच विचारपूर्वक पाऊल उचलण्याची गरज आहे. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातल्या करिंथ शहरातील मंडळीला असा इशारा दिला: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) त्याला नेमके काय म्हणायचे होते?

करिंथच्या त्या ख्रिश्‍चनांपैकी काहीजण त्याकाळच्या एपिक्यूरियन लोकांसोबत मैत्री करत होते अशी दाट शक्यता आहे. एपिक्यूरियन हे एपिक्यूरस या ग्रीक तत्त्ववेत्त्याचे अनुयायी होते. विशेष म्हणजे एपिक्यूरसने आपल्या अनुयायांना सुबुद्धीने वागण्याची, धैर्य, आत्मसंयम व नीती या गुणांचा अवलंब करण्याची शिकवण दिली होती. किंबहुना, लपून वाईट गोष्टी करण्याचेही टाळावे असे त्याने त्यांना शिकवले होते. मग पौल या एपिक्यूरियन लोकांची, आणि ख्रिस्ती मंडळीत त्यांच्यासारखा विचार करणाऱ्‍या लोकांचीही मैत्री “कुसंगती” होती असे का म्हणू शकत होता?

एपिक्यूरियन लोक खऱ्‍या देवाचे उपासक नव्हते. त्यांचा मृतांच्या पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता; त्याअर्थी, सध्याच्या जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणे हेच त्यांच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट होते. (प्रेषितांची कृत्ये १७:१८, १९, ३२) साहजिकच, अशा लोकांची संगत धरल्यामुळेच करिंथ मंडळीतल्या काहीजणांचा पुनरुत्थानावरील विश्‍वास कमकुवत होऊ लागला होता. म्हणूनच १ करिंथकर अध्याय १५—ज्यात पौल कुसंगतीबद्दल इशारा देतो—त्यात आपल्याला त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा पुनरुत्थानावरील विश्‍वास पुन्हा बळकट करण्यासाठी पुरवलेले असंख्य युक्‍तिवाद आढळतात.

यातून आपण काय शिकतो? की अधार्मिक लोकही चांगले गुण दाखवू शकतात. पण जर तुम्ही अशा व्यक्‍तींना आपले जवळचे मित्र होण्याकरता निवडले तर तुमच्या विचारसरणीवर, विश्‍वासावर व वर्तनावर त्यांचा नक्कीच परिणाम होईल. म्हणूनच, पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात म्हटले: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.”—२ करिंथकर ६:१४-१८.

सोळा वर्षांच्या फ्रेडला पौलाच्या या शब्दांतील सुज्ञतेची प्रचिती आली. शाळेतल्या अभ्यासक्रमात नसलेल्या एका विशेष उपक्रमात सहभाग घेण्याचे त्याने सुरुवातीला ठरवले होते. या उपक्रमात काही मुले मिळून एका विकसनशील देशात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याकरता मदत करणार होती. पण फ्रेड आपल्या वर्गसोबत्यांबरोबर या उपक्रमाची तयारी करू लागला तेव्हा हळूहळू त्याचे मन बदलले. तो म्हणतो: “मला जाणवलं की या मुलांच्या सहवासात मी जो इतका वेळ खर्च करतोय, त्यामुळे मला आध्यात्मिक दृष्टीने कोणताही फायदा होणार नाहीय.” या कारणामुळे फ्रेडने या उपक्रमातून माघार घेण्याचे ठरवले आणि त्याने गरीब मुलांना इतर मार्गांनी मदत करण्याचे निवडले.

सहख्रिस्ती बांधवांशी मैत्री

पण ख्रिस्ती मंडळीतल्या व्यक्‍तींशी मैत्री करण्यासंबंधी काय म्हणता येईल? तरुण तीमथ्याला पत्र लिहिताना पौलाने त्याला बजावून सांगितले: “मोठ्या घरात केवळ सोन्याची व रूप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीहि असतात; त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.” (२ तीमथ्य २:२०, २१) तर, ख्रिश्‍चनांमध्येही आदरणीय पद्धतीने न वागणाऱ्‍या व्यक्‍ती असू शकतात या वस्तूस्थितीबद्दल पौलाने तीमथ्याला अंधारात ठेवले नाही. आणि अशा व्यक्‍तींची संगत टाळण्याचेही पौलाने तीमथ्याला अगदी स्पष्टपणे सांगितले.

याचा अर्थ आपण आपल्या सह ख्रिस्ती बांधवांकडे शंकेखोर दृष्टीने पाहावे असा होतो का? नाही. आणि आपल्या सोबत्यांकडून कोणत्याच चुका घडणार नाहीत अशी अपेक्षाही आपण करू नये. (उपदेशक ७:१६-१८) पण यावरून हे समजते की केवळ एखादी तरुण व्यक्‍ती ख्रिस्ती सभांना येते किंवा तिचे आईवडील मंडळीत आवेशी आहेत याचा अर्थ त्या व्यक्‍तीशी जवळची मैत्री करणे श्रेयस्कर ठरेल असे नाही.

नीतिसूत्रे २०:११ म्हणते: “वृत्ति शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करिते.” तेव्हा तुम्ही सुज्ञपणे हा विचार करावा: ही व्यक्‍ती यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला जीवनात सर्वात जास्त महत्त्व देते का? की तिच्या विचारसरणीतून, वृत्तींतून “जगाचा आत्मा” डोकावतो? (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२) या व्यक्‍तीच्या सहवासात, यहोवाची उपासना करण्याची तुमची इच्छा अधिक प्रबळ होते का?

जर तुम्ही यहोवावर व आध्यात्मिक गोष्टींवर मनापासून प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍तींसोबत मैत्री केली तर तुम्हाला केवळ समस्याच टाळता येणार नाहीत, तर देवाची सेवा करण्याचे अधिक मनोबलही लाभेल. पौलाने तीमथ्याला म्हटले: “शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्‍यांबरोबर नीतिमत्व, विश्‍वास, प्रीति, शांति ह्‍यांच्या पाठीस लाग.”—२ तीमथ्य २:२२.

विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत मैत्री

जर तुमचे लग्नाचे वय आहे आणि तुम्हाला लग्न करण्याची इच्छा आहे, तर जोडीदार शोधताना याच तत्त्वांचा तुम्हाला कसा उपयोग करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे का? एखाद्या व्यक्‍तीकडे बऱ्‍याच कारणांमुळे तुम्ही आकर्षित होऊ शकता पण त्या व्यक्‍तीच्या आधात्मिक स्थितीपेक्षा जास्त महत्त्वाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही.

म्हणूनच बायबल वारंवार “प्रभूमध्ये” नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्यासंबंधी ताकीद देते. (१ करिंथकर ७:३९; अनुवाद ७:३, ४; नहेम्या १३:२५) विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीही जबाबदार वृत्तीच्या, सुशील व प्रेमळ असू शकतात हे खरे आहे. पण या गुणांमध्ये विकास करून विवाह टिकवून ठेवण्याकरता आवश्‍यक असलेली जी प्रेरणा तुमच्याजवळ आहे ती त्यांच्याजवळ नसते.

दुसरीकडे पाहता, जी व्यक्‍ती यहोवाला समर्पित असते आणि एकनिष्ठ असते ती ख्रिस्ती गुण विकसित करून ते कोणत्याही परिस्थितीत कायम राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. अशी व्यक्‍ती हे ओळखते की बायबलनुसार आपल्या विवाह जोडीदारावर प्रेम करण्याचा संबंध यहोवासोबतच्या नातेसंबंधाशी आहे. (इफिसकर ५:२८, ३३; २ पेत्र ३:७) त्यामुळे, जेव्हा दोघेही जोडीदार यहोवावर प्रेम करतात तेव्हा त्यांना एकमेकांना एकनिष्ठ राहण्याची सर्वात जोरदार प्रेरणा मिळते.

पण याचा अर्थ सह विश्‍वासू व्यक्‍तींचे विवाह नेहमीच यशस्वी होतात असा आहे का? नाही. उदाहरणार्थ, ज्या व्यक्‍तीला आध्यात्मिक गोष्टींची फक्‍त नावापुरती आवड आहे अशा व्यक्‍तीशी तुमचे लग्न झाल्यास काय घडू शकते? या व्यवस्थीकरणाच्या दबावांना तोंड देण्याकरता आवश्‍यक सामर्थ्य नसल्यामुळे, आध्यात्मिकरित्या दुर्बळ असणारी व्यक्‍ती ख्रिस्ती मंडळीपासून भरकटत जाण्याची जास्त शक्यता आहे. (फिलिप्पैकर ३:१८; १ योहान २:१९) तुमचा जोडीदार ‘जगाच्या घाणीत’ गुंतल्यास तुम्हाला किती दुःख होईल व किती वैवाहिक तणाव सहन करावा लागेल याची कल्पना करा.—२ पेत्र २:२०.

ज्याची परिणती विवाहात होऊ शकते असा नातेसंबंध जोडण्याआधी विचार करा: ही व्यक्‍ती एक आध्यात्मिक वृत्तीची व्यक्‍ती आहे हे स्पष्टपणे दिसून येते का? तो किंवा ती ख्रिस्ती जीवनात उत्तम आदर्श मांडते का? ही व्यक्‍ती बायबल सत्यात पूर्णपणे स्थिरावलेली आहे का की तिला आध्यात्मिक विकास करण्यासाठी अजून काही काळ लागेल? यहोवाबद्दलच्या प्रेमानेच प्रवृत्त होऊन तो किंवा ती जीवनातले लहानमोठे निर्णय घेते याची तुम्हाला खात्री पटली आहे का? एखाद्या व्यक्‍तीचे चांगले नाव आहे हे माहीत असणे निश्‍चितच आवश्‍यक आहे. पण शेवटी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला आकर्षक वाटणारी ही व्यक्‍ती यहोवाला पूर्णपणे समर्पित आहे आणि ती एक चांगला जोडीदार ठरेल याची व्यक्‍तीशः तुम्हाला खात्री असली पाहिजे.

जे “अयोग्य व्यक्‍तींकडे” आकर्षित होतात, ते सहसा प्रथम अयोग्य गोष्टींकडे आकर्षित होतात—उदाहरणार्थ अयोग्य प्रकारच्या मनोरंजनाकडे किंवा एखाद्या अनुचित कार्याकडे. ख्रिस्ती मंडळीतले अनुकरणीय वृत्तीचे तरुण अशा गोष्टींमध्ये तुम्हाला साथ देणार नाहीत. तेव्हा आपल्या हृदयाचे परीक्षण करा.

जर तुम्हाला आढळले की तुमच्या आध्यात्मिक हृदयात काही सुधारणा करण्याची गरज आहे तर निराश होऊ नका. अशी सुधारणा करणे शक्य आहे. (नीतिसूत्रे २३:१२) मुख्य मुद्दा हा आहे की मुळात तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला चांगल्या गोष्टींची आवड आहे का आणि जे चांगल्या गोष्टी करतात अशा व्यक्‍तींकडे आकर्षित होण्याची तुमची इच्छा आहे का? यहोवाच्या मदतीने तुम्ही अशाप्रकारचे हृदय उत्पन्‍न करू शकता. (स्तोत्र ९७:१०) आणि योग्य व अयोग्य यातला फरक ओळखण्याकरता आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देण्याद्वारे तुम्हाला चांगल्या, उन्‍नतीकारक मित्रांशी संगती करणे सोपे जाईल.—इब्री लोकांस ५:१४. (g०५ ८/२२)

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.

[१४ पानांवरील चित्र]

चांगले सोबती तुमच्यावर उन्‍नतीकारक आध्यात्मिक प्रभाव पाडतात