व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटी—सर्वांकरता एक चांगले घर!

शेवटी—सर्वांकरता एक चांगले घर!

शेवटी—सर्वांकरता एक चांगले घर!

केनियाच्या नायरोबी शहराच्या सीमेवर १४० एकर क्षेत्रात युनायटेड नेशन्स गीगीरीचे कंपाऊंड असून यातच युएन-हॅबिटॅट या संस्थेचे मुख्यालय आहे. ही संस्था म्हणजे जागतिक निवास समस्येचे निवारण करण्याकरता आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या क्षेत्रातील गीगीरी नेचर ट्रेल म्हटलेल्या वाटेने फेरफटका मारल्यास, एकजूट प्रयत्न व पुरेसा निधी यांच्या साहाय्याने काय साध्य करता येऊ शकते याचा प्रत्यय येतो. पूर्वी पडीक जमीन असलेल्या ठिकाणी आज एक अतिशय रमणीय व सवलतींनी युक्‍त असे मनोरंजन क्षेत्र कर्मचारी व पर्यटकांसाठी खुले आहे.

पण केवळ दोन चार किलोमीटर अंतरावर, तुलनेत नवी पण सातत्याने वाढत चाललेली झोपडपट्टी दिसते. सध्याच्या जगात निवास समस्या किती गुंतागुंतीची आहे याची ही झोपडपट्टी आठवण करून देते. झोपडपट्टीतली घरे माती, काटक्या व टिनाची बनलेली असून येथील झोपड्या चार चार मीटरच्या आहेत. मधल्या जागेतून वाहणाऱ्‍या सांडपाण्याचा दुर्गंध सर्वत्र पसरलेला आहे. पाणी मिळवण्याकरता या झोपडपट्टीच्या रहिवाशांना, संयुक्‍त संस्थानातील सर्वसामान्य नागरिकाच्या तुलनेत पाचपट जास्त किंमत मोजावी लागते. येथे राहणारे जवळजवळ ४०,००० लोक साधारण २० ते ४० या वयोगटातले आहेत. ते आळशी किंवा कामचुकार नाहीत. उलट जवळच्याच नायरोबी शहरात रोजगार मिळवण्याकरताच ते येथे आले आहेत.

एकीकडे जागतिक ख्यातीचे पुढारी स्वच्छ, सवलतींनी युक्‍त व प्रशस्त अशा वास्तूत एकत्र येतात व गरीब स्त्रीपुरुषांच्या भविष्याविषयी विचारविनिमय करतात; तर दुसरीकडे, या कुंपणाच्या बाहेर तेच गरीब स्त्री, पुरुष व लहान मुले राहात आहेत. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सचिवांच्या मते सर्वात वैफल्यग्रस्त करणारी वस्तूस्थिती म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्‍या लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याकरता आवश्‍यक असलेली “साधने, व्यावहारिक ज्ञान व सामर्थ्य जगाजवळ आहे.” मग काय करण्याची गरज आहे? श्री. अन्‍नान यांच्याच शब्दांत, “या कार्यात राजकीय पुढाऱ्‍यांची उदासीनता व दृढसंकल्पाचा अभाव यामुळे आजवर प्रगती होऊ शकली नाही. या उदासीनतेवर सर्व संबंधित व्यक्‍ती मात करतील अशी मी आशा करतो.”

पण ही आशा कितपत वास्तववादी आहे? सर्व आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानीय पुढारी आपापले स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांना ज्यामुळे फायदा होईल असा उपाय शोधण्याकरता खरोखरच सहकार्य करतील का? पण एकजण आहे, ज्याच्याकडे या सध्याच्या समस्येचे कायमचे निवारण करण्याकरता आवश्‍यक असलेली साधने, ज्ञान व सामर्थ्य आहे. आणि याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच या दिशेने पावले उचलण्याइतकी कणव व दृढसंकल्प त्याच्याठायी आहे. किंबहुना त्याच्या सरकारने आधीच अशा एका सविस्तर योजनेचे वर्णन केले आहे ज्यामुळे जागतिक निवासाची समस्या कायमची सुटेल.

एक नवी निवास योजना

बायबलमध्ये आपला निर्माणकर्ता यहोवा देव आपल्या संकल्पाचे वर्णन करतो. तो आश्‍वासन देतो: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो.” (यशया ६५:१७) यामुळे एक विधायक बदल घडून येईल. नवे “आकाश” अर्थात एक नवे सरकार, सध्याच्या मानवी सरकारांना जे साध्य करता येत नाही ते साध्य करेल. देवाचे राज्य, अथवा सरकार नव्या पृथ्वीवरील मानवी समाजात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीला आरोग्य, सुरक्षा, व आत्मसन्मान मिळवून देईल. पूर्वी यशयाला सांगण्यात आले होते, की या पृथ्वीवरील नव्या समाजाला “शेवटल्या दिवसात” एकत्रित केले जाईल. (यशया २:१-४) याचा अर्थ हे बदल लवकरच घडून येणार आहेत.—मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५.

विशेष म्हणजे, यशयाच्या ६५ व्या अध्यायातील इतर वचनांनुसार देवाने स्पष्टपणे असे आश्‍वासन दिले आहे की तो सर्वांना एक कायमचे निवासस्थान देईल. तो म्हणतो, ‘ते घरे बांधून त्यात राहतील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील असे व्हावयाचे नाही.’ (यशया ६५:२१, २२) कल्पना करा एका रमणीय परादिसात स्वच्छ व सुरक्षित वातावरणात शेवटी तुम्हाला राहायला एक उत्तम घर मिळालेले असेल! अशा परिस्थितीची कोणाला उत्कंठा वाटणार नाही? पण देवाने हे जे आश्‍वासन दिले आहे यावर तुम्ही कशाच्या आधारावर विश्‍वास ठेऊ शकता?

भरवशालायक प्रतिज्ञा

देवाने प्रथम आदाम व हव्वेला निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना एका पडीक क्षेत्रात सोडून दिले नाही. तर त्याने त्यांना एदेन बागेत, स्वच्छ हवा व खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू असलेल्या एका सुंदर बगिच्यात ठेवले. (उत्पत्ति २:८-१५) देवाने आदामाला “पृथ्वी व्यापून टाका” असे सांगितले होते; गर्दी होईल इतकी ती भरून टाकण्यास त्याला सांगितले नव्हते. (उत्पत्ति १:२८) सुरुवातीपासूनच देवाचा असाच उद्देश होता की तेथे सर्वांनी सुव्यवस्था, एकोपा व विपूल प्रमाणात चांगल्या गोष्टी उपभोगाव्यात.

पण नंतर, नोहाच्या काळात मानवी समाजात अत्याचार व अनैतिकता फोफावली आणि त्यामुळे, “देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली.” (उत्पत्ति ६:११, १२) देवाने या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले का? नाही. त्याने लगेच पाऊल उचलले. त्याने आपल्या नावासाठी आणि नीतिमान नोहा व त्याच्या संततीसाठी एक जागतिक जलप्रलय आणून पृथ्वीवरून वाईट लोकांचा नाश केला. नोहाने तारवातून बाहेर आपल्या नव्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याला पुन्हा एकदा “बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका,” असे सांगण्यात आले.—उत्पत्ति ९:१.

आणखी काही काळानंतर देवाने इस्राएल लोकांचा पूर्वज अब्राहाम याला दिलेल्या वचनानुसार त्यांना एक वतन दिले. या प्रतिज्ञात भूमीचे वर्णन, ‘चांगला व मोठा देश, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत असा देश’ असे करण्यात आले. (निर्गम ३:८) इस्राएल लोकांच्या आज्ञाभंग करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना चाळीस वर्षांपर्यंत कायमचे घर मिळाले नाही व अरण्यात भटकावे लागले. पण देव आपली प्रतिज्ञा विसरला नाही व त्याने कालांतराने त्यांना वसण्याकरता एक देश दिला. प्रेरित अहवालानुसार: “परमेश्‍वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. . . . परमेश्‍वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहोशवा २१:४३-४५.

शेवटी सर्वांकरता एक घर!

तेव्हा हे अगदी स्पष्ट आहे की यशया अध्याय ६५ यात यहोवाने जे म्हटले आहे ती पोकळ आश्‍वासने नाहीत. सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता या नात्याने ही पृथ्वी स्वच्छ करून तिच्याबद्दल आपला मूळ उद्देश पूर्ण करण्याकरता लागणारे सामर्थ्य नक्कीच त्याच्याजवळ आहे. (यशया ४०:२६, २८; ५५:१०, ११) शिवाय बायबल आपल्याला आश्‍वासन देते की तो असे करू इच्छितो. (स्तोत्र ७२:१२, १३) गतकाळात त्याने नीतिमान मानवांना चांगले निवासस्थान पुरवले व तो पुन्हा एकदा तसेच करेल.

त्याचा पुत्र येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला तेव्हा त्याने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले की, ‘जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि देवाच्या इच्छे प्रमाणे होवो.’ (मत्तय ६:१०) अशारितीने त्याने दाखवले की या पृथ्वीवर परादीस येईल. हे घडल्यावर पृथ्वीची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करा. झोपडपट्ट्या, अनधिकृत वसाहती, फुटपाथवर झोपलेले लोक कोठेही दिसणार नाहीत व लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचे प्रकार पुन्हा कधीही घडणार नाहीत. खरच, किती आनंदाचा काळ असेल तो! देवाच्या राज्याच्या शासनात शेवटी सर्वांना एक कायमचे घर मिळेल! (g०५ ९/२२)

[१० पानांवरील चौकट/चित्र]

प्राचीन इस्राएलातली घरे

उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते की आपल्या आधीच्या कनानी लोकांप्रमाणेच इस्राएल लोकांमध्येही दगडांची घरे बांधण्याची प्रथा होती. कारण या इमारती दुसऱ्‍या प्रकारच्या बांधकामापेक्षा जास्त मजबूत व सुरक्षित होत्या. (यशया ९:१०; आमोस ५:११) पण सखल प्रदेशांत, उन्हात किंवा भट्टीत भाजलेल्या मातीच्या विटांची घरे बांधली जात. सहसा घराचे छत सपाट असे आणि कधीकधी वरच्या माळ्यावरही खोली बांधली जात. अंगणात सहसा भट्टी आणि कधीकधी विहीर किंवा हौद असे.—२ शमुवेल १७:१८.

मोशेच्या नियमशास्त्रात घरासंबंधी बरेच नियम होते. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची होती. दुर्घटना टाळण्याकरता घराच्या गच्चीभोवती भिंत बांधण्याची आज्ञा देण्यात आली होती. दहाव्या आज्ञेनुसार, इस्राएलांना आपल्या शेजाऱ्‍याच्या घराचा लोभ धरू नका असे सांगण्यात आले होते. तसेच ज्या कोणावर आपले घर विकण्याची वेळ येई, त्याला निदान काही काळापर्यंत ते सोडवण्याचा हक्क असे.—निर्गम २०:१७; लेवीय २५:२९-३३; अनुवाद २२:८.

इस्राएलात घर हे आध्यात्मिक शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण असे. वडिलांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते की त्यांनी घरात बसलेले असताना आपल्या मुलाबाळांना देवाच्या आज्ञा शिकवाव्यात. तसेच घरात कोणत्याही प्रकारच्या मूर्ती न ठेवण्याचीही त्यांनी ताकीद देण्यात आली होती.—अनुवाद ६:६, ७; ७:२६.

[चित्र]

प्राचीन इस्राएलात घरांचा उपयोग आध्यात्मिक कार्यांसाठी केला जात असे, उदाहरणार्थ मांडवांचा सण

[१२ पानांवरील चौकट/चित्र]

सर्वात पुरातन घरे

पहिला मानव आदाम कशाप्रकारच्या घरात राहात होता याविषयी बायबलमध्ये काही सांगितलेले नाही. पण उत्पत्ति ४:१७ म्हणते की काईनाने “एक नगर बांधिले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरुन हनोख असे ठेविले.” हे शहर आजच्या तुलनेत, फक्‍त मजबूत घरे असलेले खेडे असावे. घरे कशाप्रकारची होती हे या अहवालात सांगितलेले नाही. कदाचित सबंध खेड्यात फक्‍त काईनाच्या कुटुंबाचे सदस्यच राहात असावेत.

पुरातन काळात निवाऱ्‍याकरता तंबूचा सर्रास वापर केला जाई. काईनाचाच आणखी एक वंशज याबाल याला “पाल देऊन [“तंबूत,” NW] राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मुळपुरुष” म्हटले आहे. (उत्पत्ति ४:२०) तंबू बांधायला सोपे आणि उचलून दुसरीकडे नेण्यास सोयीचे होते.

कालांतराने अनेक संस्कृतींत शहरे बांधली गेली आणि त्यांत प्रशस्त घरे बांधण्यात आली. उदाहरणार्थ, एकेकाळी कुलपिता अब्राहाम जेथे राहात होता, त्या ऊर शहराच्या अवशेषांवरून असे दिसून येते की त्या शहरातील काही रहिवाशांची घरे गिलावा दिलेली व चुना लावलेली १३ किंवा १४ खोल्यांची आरामदायी घरे होती. त्या काळात, इतरांना हेवा वाटेल अशी ही घरे असावीत.

[९ पानांवरील चित्र]

देव नीतीमानांना सुरक्षित घर देण्याचे वचन देतो