सर्वांनाच घराची गरज आहे
सर्वांनाच घराची गरज आहे
“प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वतःच्या व तिच्या कुटुंबाच्या आरोग्याला व कल्याणाला पोषक ठरेल असे राहणीमान असण्याचा हक्क आहे . . . यात घराचाही समावेश आहे.”—मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहिरनामा, कलम २५.
शेती व्यवसाय करणारी एक भटकी जमात एका परिसरात वसली आहे. यालाच आता ते आपले घर म्हणतात. गावाबाहेर एक मोठा कॅम्प आहे जेथे ते अगदी नाममात्र भाडे देऊन आपापल्या ट्रेलर गाड्यांमध्ये राहू शकतात. याच कॅम्पमध्ये या जमातीची शेकडो कुटुंबे येऊन वसली आहेत. या कॅम्प्सना पारकेआडोरेस म्हणतात. येथे सांडपाणी वाहून नेण्याची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय अगदीच सुमार दर्जाची आहे, किंबहुना या सोयी नाहीच म्हटले तरी चालेल. एका पत्रकाराने या वस्तीचे वर्णन करताना म्हटले की “हे ठिकाण इतके दरिद्री आहे की या [भटक्या शेतकऱ्यांना] ते परवडण्यासारखे आहे.”
तीन वर्षांपूर्वी जेव्हा अधिकाऱ्यांनी अशा काही वसत्या बंद करण्यास सुरुवात केली तेव्हा यांपैकी काही कुटुंबे आपल्या ट्रेलर गाड्या विकून शहरातल्या आधीच गजबजलेल्या वस्त्यांमध्ये, इमारतींमध्ये व गॅरेज इत्यांदींमध्ये जाऊन राहू लागली. इतर कुटुंबे आपले सामानसुमान बांधून पुन्हा नव्या ठिकाणाच्या शोधात निघाली जेथे कापणी झाल्यानंतर त्यांना जाऊन राहता येईल; असे ठिकाण ज्याला ते आपले घर म्हणू शकतील.
हे मध्य किंवा दक्षिण अमेरिकेतील एखाद्या ठिकाणाचे वर्णन असावे अशी तुम्ही कल्पना करत आहात का? पण खरे पाहता, हे वर्णन आहे संयुक्त संस्थानांतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या मेक्का नावाच्या गावाजवळील ट्रेलर कॅम्पचे. पाम स्प्रिंग्स या अतिशय समृद्ध शहरापासून पूर्व दिशेला तासाभराच्या अंतरावर हा कॅम्प आहे. सध्याच्या घटकेला संयुक्त संस्थानांत स्वतःची घरे असलेल्या लोकांची संख्या अभूतपूर्व प्रमाणात वाढली असून, २००२ साली प्रत्येक कुटुंबाची सरासरी मिळकत ४२,००० डॉलर (१८,९०,००० रुपये) इतकी होती. तरीसुद्धा ५० लाख पेक्षा अधिक अमेरिकन कुटुंबे अजूनही निकृष्ट दर्जाच्या घरांत राहात आहेत.
विकसनशील देशात तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे. बऱ्याच राजकीय, सामाजिक व धार्मिक संस्थांनी प्रयत्न करूनसुद्धा जागतिक निवास समस्या सातत्याने वाढत चालली आहे.
जागतिक समस्या
सबंध जगात, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या शंभर कोटीपेक्षा जास्त असून जागतिक शहरी लोकसंख्येपैकी हे ३२ टक्के लोक आहेत. ब्राझीलमध्ये शहरीकरणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना अशी भीती वाटते की या देशात सतत वाढत चाललेल्या फावेला म्हणजेच झोपडपट्ट्या “ज्या शहरांत त्या प्रथम स्थापन झाल्या होत्या त्यांपेक्षा विस्तारित व गजबजलेल्या बनतील.” काही नायजेरियन शहरांत एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये व अनधिकृत वसाहतींमध्ये राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव कोफी अन्नान यांनी २००३ साली असे म्हटले की “जर गांभीर्याने विचार करून पावले उचलण्यात आली नाहीत तर पुढच्या ३० वर्षांत जगभरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या २०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते.”
पण केवळ या संख्यांवरून जगातल्या गरीब लोकांना ज्या दारिद्र्यात राहावे लागते व त्यामुळे ज्या भयानक परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागते त्याचा मुळीच अंदाज येत नाही. संयुक्त राष्ट्रसंघानुसार विकसनशील देशांतील निम्म्यापेक्षा अधिक लोकांना अगदी मूलभूत आरोग्यरक्षणाची (सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट) सोय उपलब्ध नाही; एक तृत्यांश लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, एक चतुर्थांश लोकांजवळ पर्याप्त सोयी असलेले घर नाही तर एक पंचमांश लोकांना आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. सुविकसित देशांतील बहुतेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांनाही अशा परिस्थितीत राहू देणार नाहीत.
सार्वत्रिक हक्क
सोयीस्कर आश्रय असणे ही मानवाची एक मूलभूत गरज आहे हे सर्वज्ञात आहे. १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेल्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहिरनाम्यात असे घोषित करण्यात आले होते की प्रत्येक व्यक्तीला पर्याप्त राहणीमान असण्याचा हक्क आहे व यात चांगल्या घराचाही समावेश आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ एक चांगले घर असणे खरोखरच आवश्यक आहे.
अलीकडच्या काळात, १९९६ साली बऱ्याच देशांनी मिळून संयुक्त राष्ट्रसंघाच्या हॅबिटॅट अजेंडा नावाच्या दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या. या दस्तऐवजात सर्व लोकांकरता पर्याप्त सोयी असलेले आश्रय पुरवण्याकरता सुविशिष्ट ठराव उल्लेखण्यात आले. मग जानेवारी १, २००२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने या कार्यक्रमास राष्ट्रसंघाचा उपक्रम घोषित करून या ठरावांस पुष्टी दिली.
गंमत म्हणजे, एकीकडे जगातील सर्वात श्रीमंत देश चंद्रावर वसाहती स्थापन करण्याची व मंगळावर शोधकार्य सुरू करण्याची विनंती करत आहेत तर दुसरीकडे याच देशांतील सर्वात गरीब नागरिकांना या पृथ्वीवर राहण्याजोगे ठिकाण नाही. निवास समस्येचा तुमच्यावर काही परिणाम होतो का? एके दिवशी सर्वांजवळ एक आरामदायी घर असेल अशी आशा आपण बाळगू शकतो का? (g०५ ९/२२)
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
काही देश चंद्रावर वसाहती स्थापन करण्याचे स्वप्न पाहतात पण त्यांच्या देशातील कित्येक नागरिकांजवळ इथे पृथ्वीवर राहण्याजोगे ठिकाण नाही
[२, ३ पानांवरील चित्र]
एक आशियाई निर्वासित कुटुंब.
एका शहरात ३,५०० कुटुंबे तात्पुरत्या तंबूंत राहतात आणि त्यांना पाण्याची व आरोग्यरक्षण सोयींची नितान्त आवश्यकता आहे
[४ पानांवरील चित्र]
उत्तर अमेरिका