व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हवेहवेसे वाटणारे सोने

हवेहवेसे वाटणारे सोने

हवेहवेसे वाटणारे सोने

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! लेखकाकडून

सोन्याचा शोध करणारा एक मनुष्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात, पाणी आटून गेलेल्या एका लहानशा कोरड्या नदीच्या पात्रातून हळूहळू चालला आहे. तो पार थकून गेला आहे. त्याच्या पाठीवर मध्यान्हाच्या ऊन्हाचे चटके बसत आहेत. त्याच्या मळकट शर्टाच्या आतून घामाच्या धारा वाहत आहेत. तरीही तो हातात एक लांब धातूची काठी घेऊन चालला आहे जिच्या टोकाला ताटाच्या आकारचे एक यंत्र आहे. हे अतिशय सुधारित धातूचे यंत्र तो जमिनीवर मागे-पुढे फिरवत चालला आहे. ताटाच्या आकारच्या यंत्राचे चुंबकीय क्षेत्र दगडी मातीच्या एक मीटर आत शिरू शकते. त्याच्या कानाला लावलेल्या हेडफोनवरून त्याला, धातूचा शोधक देत असलेले संकेत ऐकू येतात. हे संकेत म्हणजे, सतत व मोठ्या आवाजात वाजणारी शिट्टी.

अचानक, मोठ्याने वाजणाऱ्‍या शिट्टाचा आवाज कमी होतो आणि टिकटिक असा बारीक आवाज येऊ लागतो तेव्हा आनंदामुळे त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. टिकटिक असा आवाज येऊ लागतो याचा अर्थ त्याचे उपकरण, नक्कीच मातीत कोठेतरी धातू आहे, असा संकेत देत आहे. तो लगेच गुडघ्यावर बसून माती खणू लागतो. आपल्या लहानशा कुदळीने तो कडक माती उकरू लागतो. मातीतील धातू कदाचित एक गंजलेला खिळा असेल. किंवा कदाचित ते एक जुने नाणे असू शकते. पण जसजसे तो माती खणू लागतो तसतसे त्याचे डोळे, पिवळा धातू दिसतो काय म्हणून शोध घेऊ लागतात.

सोनं मिळणाऱ्‍या ठिकाणी उडणारी झुंबड

सोनं शोधण्याच्या पद्धतीत कदाचित बदल झाला असेल परंतु संपूर्ण इतिहासात मानवाने मात्र हा चकाकणारा पिवळा धातू मिळवायचा बराच प्रयत्न केला. खरे पाहता, वर्ल्ड गोल्ड काऊंसिलनुसार, गेल्या ६,००० वर्षांपासून १,२५,००० पेक्षा अधिक टन सोने खाणीतून काढण्यात आले आहे. * इजिप्त, ओफीर आणि दक्षिण अमेरिकामधील प्राचीन संस्कृती, सोन्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध असल्या तरीसुद्धा, आतापर्यंत खाणींतून काढलेल्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक सोने, हे गेल्या १५० वर्षांत काढण्यात आले आहे.—१ राजे ९:२८.

१८४८ साली, यु.एस.ए., कॅलिफोर्नियातील अमेरिकन नदीवरील सटर्स मिलमध्ये जेव्हा सोने सापडले तेव्हापासून सोन्याच्या खाणकामाला तेजी आली. या शोधामुळे, अचानक सोने मिळण्याची आशा मनी बाळगणाऱ्‍या लोकांच्या झुंडीच्या झुंडी एका ठिकाणी येऊ लागल्या. येणाऱ्‍या प्रत्येकाच्या मनात, कॅलिफोर्नियाच्या मातीत आपले भाग्य दडलेले आहे, असे स्वप्न होते. पुष्कळ लोकांची निराशा झाली, पण काहींना विलक्षण यश मिळाले. रोमन साम्राज्याच्या अख्ख्या कालावधीत अंदाजे दहा टन सोने संपूर्ण जगभरात खाणीतून काढण्यात आले, यावरून या प्रचंड संपत्तीच्या खाणीची परिमिती ठरवता येते. केवळ १८५१ साली, ७७ टन सोने फक्‍त कॅलिफोर्नियाच्या सोन्याच्या खाणीतून काढण्यात आले.

त्याचसुमारास, जगाच्या दुसऱ्‍या बाजूला सोन्याचा शोध लागला. ऑस्ट्रेलियाच्या नवीन वसाहतीत. कॅलिफोर्नियाच्या सोन्याच्या खाणीत अमूल्य अनुभव मिळवलेले एडवर्ड हारग्रेव्झ ऑस्ट्रेलियात आले आणि त्यांना, न्यू साऊथ वेल्स येथील बॅथर्स्टच्या लहानशा गावात वाहणाऱ्‍या एका ओढ्यात सोने सापडले. १८५१ दरम्यान, व्हिक्टोरिया प्रांतातील बॅलरॅट आणि बेन्डिगो येथेही मोठ्या प्रमाणावर सोने सापडले. ही बातमी जेव्हा सर्वदूर पसरली तेव्हापासून लोकांच्या झुंडी येऊ लागल्या. आलेल्या लोकांपैकी काही जण खाण उद्योजक होते. परंतु बाकीचे पुष्कळ जण, शेतकाम करणारे किंवा कार्यालयात काम करणारे होते ज्यांनी आयुष्यात कधी खाण कामगारांचा टिकाव हातात घेतला नव्हता. सोन्यासाठी झुंबड उडालेल्या एका दृश्‍याचे वर्णन करताना त्या दिवसाच्या बातमीपत्रात असे म्हटले होते: “बॅथर्स्टला पुन्हा खूळ लागले आहे. सोन्याचे फॅड वाढत्या तेजीने पुन्हा एकदा आले आहे. लोक एकमेकांना भेटत आहेत, एकमेकांकडे बावळटासारखे पाहत आहेत, फालतू गोष्टी बरळत आहेत आणि पुढे काय होईल याचा विचार करत बसले आहेत.”

पुढे काय झाले? लोकसंख्येत कमालीची वाढ! १८५१ नंतरच्या दशकात ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या दुप्पट झाली, कारण जगातील विविध भागांतून सोनं मिळण्याच्या आशेने पुष्कळ लोक तिथे आले. ऑस्ट्रेलिया खंडात विविध मात्रेत सोने सापडू लागले. एकीकडे झुंबड कमी झाली, की दुसरीकडे सुरू व्हायची. एकट्या १८५६ साली, सोने शोधायला आलेल्या लोकांनी ऑस्ट्रेलियात ९५ टन सोने खोदून काढले. मग, १८९३ साली पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील कलगुर्ली-बोल्डर जवळ खाणकामगारांनी खाणकाम सुरू केले. तेव्हापासून, १,३०० पेक्षा अधिक टन सोने, ‘जगातील सर्वात अधिक सोने सापडणाऱ्‍या २.५ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातून’ काढण्यात आले आहे. या क्षेत्रात आजही सोने मिळते व तेथे जगातील सर्वात खोल ओपनकट सोन्याची खाण आहे. ही मानवनिर्मित दरी जवळजवळ दोन किलोमीटर रूंद, तीन किलोमीटर लांब आणि ४०० मीटर खोल आहे.

आज, जगात ऑस्ट्रेलियाचा सोने उत्पादनात तिसरा क्रम लागतो. येथील कारखान्यांत ६०,००० कामगार आहेत आणि दरवर्षी सुमारे ३०० टन किंवा ५०० कोटी डॉलर (ऑस्ट्रेलियन) (१७,००० कोटी रुपये) किंमतीचे सोने मिळवले जाते. संयुक्‍त राष्ट्राचा जगात, सोने उत्पादनात दुसरा क्रम लागतो. पण गेल्या शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून दक्षिण आफ्रिका जगात, सोने-उत्पादनात अग्रगामी आहे. आतापर्यंत काढण्यात आलेले जवळजवळ ४० टक्के सोने याच देशातून आले आहे. संपूर्ण जगभरात दर वर्षी २,००० टन सोने मिळवले जाते. मग या मिळवलेल्या मौल्यवान धातूचे पुढे काय होते?

संपत्ती आणि सौंदर्याचा मिलाफ

आजही काही ठिकाणी सोन्याच्या मोहरा बनवल्या जातात. पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील द पर्थ मिंट हे, अशाप्रकारची नाणी बनवणारे जगातील मुख्य उत्पादक आहे. ही नाणी चलनात नाहीत पण संग्रह करणारे ती साठवून ठेवतात. शिवाय, आतापर्यंत निखनन केलेल्या सर्व सोन्यापैकी २५ टक्के सोन्याच्या विटा बनवून त्या बँकांच्या लॉकरमध्ये ठेवल्या जातात. संयुक्‍त राष्ट्रात, जगातील बहुतेक सोन्याच्या विटा बँकांच्या लॉकरमध्ये आहेत.

सध्या, दरवर्षी खाणीतून काढलेल्या जवळजवळ ८० टक्के सोन्याचा म्हणजे सुमारे १,६०० टन सोन्याचा दागिन्यांसाठी उपयोग केला जातो. संयुक्‍त राष्ट्राच्या बँकांमध्ये बहुतेक सोने असेल परंतु दागिन्यांना त्यात मोजले जाते तेव्हा भारताकडे सर्वात जास्त सोने आहे. हा पिवळा धातू मौल्यवान आणि सुंदर तर आहेच तसेच या मऊ धातूचे असे गुणधर्म आहेत ज्यामुळे त्याचा कठीण कामासाठी देखील उपयोग केला जातो.

प्राचीन धातूचे आधुनिक उपयोग

सोने रासायनिक प्रक्रियेने नष्ट होत नाही हे प्राचीन इजिप्तच्या फारोंनी ओळखल्यामुळे त्यांनी त्यापासून मृत व्यक्‍तीसाठी मुखवटे बनवले. सोन्याच्या टिकाऊपणाचा एक पुरावा म्हणजे, पुरातत्त्ववेत्यांनी तूतांखामेन या फारोचे थडगे हजारो वर्षांनंतर उघडले तेव्हा त्यांना या तरुण राजाचा सोन्याचा मुखवटा सापडला ज्यावर कसलेही चरे पडलेले नव्हते आणि या पिवळ्या धम्मक धातूची झळाळी कमी झालेली नव्हती.

सोन्याचे तेज कायम राहते कारण त्यावर पाण्याचा किंवा हवेचा परिणाम होत नाही. इतर धातूंच्या बाबतीत असे होत नाही. जसे की लोह जेव्हा पाण्याच्या व हवेच्या संपर्कात येते तेव्हा त्याचा नाश होतो. पण सोन्यात हा टिकाऊपणा असतो शिवाय ते वीज प्रक्षेपक असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक घटक बनवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. दरवर्षी, सुमारे २०० टन सोन्याचा उपयोग, टीव्ही, व्हिसीआर, सेलफोन आणि सुमारे पाच कोटी संगणक बनवण्यासाठी केला जातो. तसेच, उच्च प्रतीच्या कंपॅक्ट डिक्सवर टिकाऊ सोन्याचा पातळ मुलामा असतो ज्यामुळे डिस्कचे आयुष्य वाढते.

सोन्याच्या पातळ पत्र्यात विचित्र गुणलक्षणे दिसून येतात. या धातूचा प्रकाशाशी संपर्क येतो तेव्हा काय होते यावर विचार करा. सोन्याचा अगदी पातळ पत्रा पारदर्शक होतो. अशावेळी या पत्र्यातून हिरवा प्रकाश तरंग पार होऊ शकतो पण हा पत्रा अवरक्‍त प्रकाश परावर्तित करतो. सोन्याचा मुलामा लावलेल्या खिडक्यांतून प्रकाश आत येतो परंतु उष्णता परावर्तित करते. त्यामुळे, अनेक नवीन कार्यालयांच्या खिडक्यांप्रमाणे आधुनिक विमानांच्या चालकपीठेच्या (कॉकपीट) खिडक्यांवर सोन्याचा मुलामा लावला जातो. तसेच, पारदर्शक नसलेल्या सोन्याच्या फॉईलने, अवकाशात जाणाऱ्‍या यानांचे नाश होऊ शकणारे भाग गुंडाळले जातात ज्यामुळे तीव्र किरणोत्सर्गांपासून व उष्णतेपासून त्यांचे संरक्षण होऊ शकेल.

सोने जिवाण्णूंचा देखील रोध करणारे आहे. त्यामुळे, खराब झालेले अथवा किडलेले दात दुरुस्त करण्यासाठी किंवा दुसरे दात बसवण्यासाठी दंतवैद्य सोन्याचा उपयोग करतात. अलिकडील वर्षांत, शस्त्रक्रिया रोपणांत सोने हे अगदी उत्तम शाबीत झाले आहे. जसे की, सोन्याचा ताव असलेले स्टेंट्‌स, म्हणजे सोन्याचा थर असलेल्या अगदी बारीक नळ्यांच्या तारा, खराब झालेल्या वाहिन्यांना किंवा धमनींना बळकट करण्यासाठी शरीरात ठेवल्या जातात.

या बहुपयोगी धातूच्या मूल्याचा आणि सौंदर्याचा विचार केल्यावर, सोन्याचा शोध घेणारे निश्‍चितच हा हवाहवासा वाटणारा धातू, जमिनीतून उकरून काढायचे थांबवणार नाहीत. (g०५ ९/२२)

[तळटीप]

^ सोने इतके जाड असते की, सर्व बाजूने फक्‍त ३७ सेंटीमीटर जाड सोन्याच्या घनाचे वजन एक टन असू शकते.

[२५ पानांवरील चौकट]

सोने कोठे सापडते?

खडक: सर्व अग्निज खडकांत लहान मात्रेत सोने असते. भूकवचाच्या काही क्षेत्रातील खडकांत मोठ्या प्रमाणावर एकत्रित स्वरुपात सोने आढळते तेव्हा खाणउद्योजक, तो खडक फोडतात, त्याचा चुरा करतात आणि मग रासायनिक प्रक्रियेने कच्च्या धातूतून धातुक वेगळे करतात. एक टन खडकातील उच्च प्रतीच्या कच्चा धातूत फक्‍त ३० ग्रॅम सोने असते.

खनिज शिरा: फार क्वचित, स्फटिकासारख्या खडकाच्या थरांतील शिरांत सोने सापडते. याला सोन्याचा पदर म्हटले जाते.

नद्या: हळूहळू, सोने असलेल्या खडकांवर ऊन, पाऊस आणि हवा यांचा परिणाम होतो तेव्हा खडकांत अडकलेले सोने सुटे होते आणि ओढ्यांत किंवा नदीत लहान लहान कण किंवा चकत्यांच्या रूपात साठते. या स्वरुपात मिळणाऱ्‍या सोन्याला गाळाचे सोने म्हटले जाते.

भूकवचाच्या पृष्ठभागावर: कधीकधी, वेड्यावाकड्या आकाराच्या सोन्याच्या तुकड्यांचे गुच्छ, भूकवचाच्या पृष्ठभागावर असेच तयार होतात तेव्हा त्यांना सोन्याची लगड म्हटले जाते. हे गुच्छ कधीकधी खूप मोठ्या आकाराचे होऊ शकतात. ऑस्ट्रेलियात आढळलेल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या गुच्छाला द वेल्कम स्ट्रेन्जर असे नाव देण्यात आले. हा गुच्छ ७० पेक्षा अधिक किलोग्रॅमचा होता. तो १८६९ साली ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतांत आढळला होता. ऑस्ट्रेलिया हे एक असे ठिकाण आहे जेथे सर्वात मोठमोठे सोन्याचे गुच्छ आढळले आहेत. उत्पन्‍न झालेल्या सर्वात मोठमोठ्या २५ गुच्छांपैकी २३ गुच्छ तेथेच आढळले. आज सोन्याचे गुच्छ, आगकाडीच्या डोक्याच्या आकाराइतके लहान असू शकतात आणि ते रत्न असलेल्या हिऱ्‍यापेक्षाही दुर्मिळ आहेत.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

धातू शोधक कसे कार्य करते?

धातूशोधकात प्रामुख्याने तारांच्या दोन गुंड्या असतात. एका गुंडीतून विद्युतशक्‍ती पार होते तेव्हा चुंबकीय प्रवर्तन तयार होते. धातूशोधक जेव्हा एखाद्या धातूवरून जसे की सोन्याच्या एका गुच्छावरून फिरवला जातो तेव्हा हे शोधक त्या धातूत कमी चुंबकीय क्षेत्र तयार करते. धातूशोधकातील दुसरी गुंडी हे कमी चुंबकीय क्षेत्र ओळखते आणि धातूशोधक वापरणाऱ्‍याला, धातूशोधकावर लहानसा प्रकाश असेल तर प्रकाशाच्या माध्यमाने किंवा काटा असेल तर त्या काट्याच्या माध्यमाने किंवा आवाजाच्या माध्यमाने संकेत देते.

[२५ पानांवरील चित्रे]

१८०० च्या दशकात सोन्याला आलेली तेजी:

१. सटर्स मिल, कॅलिफोर्निया, यु.एस.ए;

२. बेन्डिगो क्रीक, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया

३. गोल्डन पॉईंट, बॅलरॅट, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया

[चित्राचे श्रेय]

१: लायब्ररी ऑफ काँग्रेस; २: सोन्याचे संग्रहालय, बॅलरॅट; ३: ला ट्रोब, चित्र संग्रह, स्टेट लायब्ररी ऑफ व्हिक्टोरिया

[२६ पानांवरील चित्रे]

सोन्याचा आधुनिक उपयोग

उच्च प्रतीच्या कंपॅक्ट डिस्कवर सोन्याचा पातळ मुलामा असतो

सोन्याच्या फॉईलचा अवकाशयानांसाठी उपयोग केला जातो

मायक्रोचिप्सवर सोन्याचा मुलामा असतो

सोन्याचा ताव असलेल्या तारांमध्ये अतिशय उत्तम विद्युतवहन क्षमता असते

[चित्राचे श्रेय]

NASA photo

Carita Stubbe

Courtesy Tanaka Denshi Kogyo

[२६ पानांवरील चित्र]

पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील बोल्डर येथील कलगुर्लीमधील जगातील सर्वात खोल ओपनकट सोन्याची खाण

[चित्राचे श्रेय]

Courtesy Newmont Mining Corporation

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Brasil Gemas, Ouro Preto, MG