जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
जगातील आवडता प्राणी
“कुत्रा मानवाचा सच्चा दोस्त असेल पण जगाचा आवडता प्राणी आहे, वाघ,” अशी लंडनच्या द इंडिपेंडटने बातमी दिली. दहा वेगवेगळ्या प्राण्यांवर दहा लघूपट दाखवल्यानंतर, ७३ राष्ट्रांतील ५२,००० पेक्षा अधिक लोकांच्या सर्वेक्षणात, लोकांनी कुत्र्यापेक्षा वाघाला केवळ १७ मते अधिक दिली. तिसऱ्या क्रमांकावर होता, डॉल्फिन आणि त्यानंतर मग घोडा, सिंह, साप, हत्ती, चिंपाझी, ऑरँग्यूटन आणि व्हेल. प्राणी शास्त्रज्ञ डॉ. कॅन्डी ड्सा यांनी असे स्पष्टीकरण दिले, की ‘वाघ बाहेरून हिंसक आणि करारी दिसतो परंतु आतून सन्माननीय व समजंस आहे, हे मानव समजू शकतात; याच्या उलट, कुत्रा एकनिष्ठ आणि आदरणीय प्राणी आहे व तो मानवी स्वभावाची मैत्रीपूर्ण, अधिक संवादशील बाजू प्रदर्शित करण्यास प्रवृत्त करतो.’ वाघाला जास्त मते मिळालेली पाहून पर्यावरणवाद्यांना आनंद झाला. पर्यावरणासाठी जगव्याप्त निधीचे कॅलम रॅन्कन म्हणाले: “लोक जर वाघ त्यांचा आवडता प्राणी म्हणून मत देत असतील तर त्याचा अर्थ त्यांना वाघाचे महत्त्व समजते आणि त्यांना वाचवण्याची किती गरज आहे हे ते ओळखतात.” असा अंदाज लावला जातो, की जंगलात केवळ ५,००० वाघ उरले आहेत. (g०५ १२/२२)
तोंडातील सूक्ष्म रोगजंतूंचा तुमच्या आरोग्यावर परिणाम
“तोंड हे एक जटील परिस्थितीकी आहे,” असे सायन्स मासिक म्हणते. “गेल्या ४० वर्षांपासून, तोंडातील जंतूंचे शास्त्रज्ञ, दात, हिरड्या, जीभ यांच्यावर आणि यांच्या आसपास झपाट्याने वाढत असलेल्या जंतूंवर अभ्यास करत आहेत.” काही काळपर्यंत या शास्त्रज्ञांना माहीत होते, की सहसा तोंडात सापडणारे जिवाणू शरीरात इतरत्र जाऊ शकतात व त्यांच्यामुळे इतर अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतात. तोंडातील जिवाणूंमुळे हृदयरोग होऊ शकतात हे तर केव्हाच सिद्ध झाले आहे आणि अभ्यासांत असेही दिसून आले आहे, की इतर जिवाणूंमुळे प्रीमॅच्योर डिलिव्हरी (वेळेच्या अगोदर बाळाचा जन्म) होऊ शकते. घातक जिवाणू थेट हल्ला करतात. हे घातक जिवाणू एकत्र आले आणि त्यांची संख्या तोंडातील चांगल्या जिवाणूंपेक्षा अधिक वाढली तर दात किडणे, हिरड्यांतून रक्तस्रावणे, तोंडाची दुर्गंधी यासारखे वाईट परिणाम होतात. अहवाल म्हणतो: “६५ वय ओलांडलेल्या १० पैकी ३ लोकांचे सर्वच दात पडले आहेत. संयुक्त संस्थानांत, सर्व प्रौढांतील निम्म्या अधिक प्रौढांना हिरड्यांचा आजार किंवा किडक्या दातांची समस्या आहे.” या जिवाणूंचा अभ्यास करून संशोधक, “तोंडांतील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही जिवाणूंचा नाश करण्यापेक्षा फक्त वाईट जिवाणूंचा नाश करणारे माऊथवॉश” कसे बनवता येतील हे शिकण्याची आशा करत आहेत. (g०५ १२/२२)
झोपण्याच्या सवयी
‘बहुतेक अमेरिकन आणि युरोपियन लोकांपेक्षा आशियातील लोक उशिरा झोपून सकाळी लवकर उठतात, असे झोपण्याच्या सवयीवर संपूर्ण विश्वात घेतलेल्या एका सर्व्हेत दिसून आले,’ अशी बातमी अल्जाजिरा या वृत्त वाहिनीवर देण्यात आली. २८ राष्ट्रांतील १४,००० पेक्षा अधिक लोकांना, ते सहसा किती वाजता झोपून सकाळी किती वाजता उठतात हे विचारण्यात आले. पोर्तुगालमध्ये, ४ लोकांपैकी ३ लोक मध्यरात्रीनंतर झोपतात. आशियातील लोक सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी आहेत; यांत इंडोनिशियाचा प्रथम क्रमांक लागतो; तेथे ९१% टक्के लोकांनी म्हटले की “ते सकाळी ७ वाजताच उठतात.” जपानी लोकांची झोप कमी आहे. ४० पेक्षा अधिक टक्के लोक दररोज रात्री सहा किंवा त्याहूनही कमी तास झोपतात. सर्वात अधिक झोप घेणारे आहेत ऑस्ट्रेलियन लोक. त्यांच्यामध्ये फक्त, रात्री १० च्या आधी झोपी जाणाऱ्यांची संख्याच जास्त नाही तर सर्व्हेतील एक तृतीयांश ऑस्ट्रेलियन लोक म्हणाले, की त्यांना दररोज रात्री सरासरी नऊ पेक्षा अधिक तास झोप मिळते. (g०५ १२/२२)
बाळांसाठी “कांगारू केअर”
“कांगारू केअर मिळणारी बाळं जास्त वेळ झोपतात, त्यांचा श्वास सुधारतो आणि त्यांचे वजन लवकर वाढते,” असे जपानच्या डेली योमिऊरी या वृत्तपत्राने म्हटले. “कांगारू केअर” म्हणजे काय? कांगारू केअरमध्ये बाळाच्या आईने किंवा बाबांनी दररोज एक किंवा दोन तासांसाठी आपल्या बाळाला आपल्या उघड्या छातीवर घेऊन झोपावे. टोकियो मेट्रोपॉलिटन बोकुटो इस्पितळाचे प्रमुख टोयोको वटानाबे म्हणाले: “उष्णता नियंत्रक पेटींच्या अभावामुळे, कोलंबियात कांगारू केअर तातडीचा उपाय म्हणून सुरू करण्यात आला होता. यामुळे, वेळेच्या अगोदर जन्मलेल्या बाळांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आणि बाळांना इस्पितळात ठेवण्याचा कालावधी देखील कमी झाला, हे युनिसेफला दिसून आले.” वृत्तपत्र पुढे म्हणते: ‘आता विकसनशील राष्ट्रांत वेळेच्या अगोदर आणि पूर्ण दिवसांच्या जन्मणाऱ्या बाळांसाठी कांगारू केअर पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली आहे.’ अंगाला अंग लागल्यामुळे अनेक फायदे होतात शिवाय पालकांचे आपल्या शिशूबरोबर निकटचे बंधन तयार होते. शिवाय, यासाठी कसलाही खर्च लागत नाही किंवा खास साधन लागत नाही. (g०५ १२/२२)
तरुण आणि मोबाईल
“ब्रिटनमधल्या तरुणांना मोबाईल फोनविना जगणे मुश्किल झाले आहे,” असा अहवाल लंडनच्या डेली टेलिग्राफने दिला. संशोधकांनी १५ ते २४ वयोगटातील युवकांना दोन आठवड्यांसाठी त्यांचा मोबाईल फोन दिला नाही. अहवाल म्हणतो: “हा अतिशय विचित्र अनुभव होता. तरुणांना वेगळ्याच प्रकारचे नवीन अनुभव घ्यायला लावण्यात आले: जसे की, आपल्या आईवडिलांशी बोलणे, आपल्या मित्रांच्या घराचे दार वाजवणे, मित्रांच्या आईवडिलांना भेटणे.” इंग्लंडमधील लॅन्कॅस्टर विद्यापिठातील प्राध्यापक मायकल ह्यूम तरुणांचे सेलफोनवरील संभाषण, “स्वतःला सांत्वन देण्याचा व स्वतःची अस्मिता स्थापित करण्याचा मार्ग” आहे असे म्हणतात. वृत्तपत्रात म्हटले होते, एक किशोरवयीन मुलगी सेलफोन नसल्यामुळे “चिडखोर बनली होती व तणाव” अनुभवत होती, आणि दुसऱ्या एका तरुणाला एकटे वाटू लागले होते. “त्याला हवे तेव्हा तो आपल्या मित्रांशी” आता बोलू शकत नसल्यामुळे त्याला “ठरलेल्या वेळी लोकांना भेटण्याची आगाऊ योजना करावी” लागत होती. (g०५ ११/८)
“सर्वात उत्तम गृहशोभा”?
“चीनमध्ये वाघांची कातडी बेकायदेशीररीत्या विकत घेणारे पाश्चिमात्य पर्यटक आणि व्यापारी, जगात नामशेष होत चाललेल्या प्राण्याच्या कत्तलीसाठी जबाबदार आहेत,” असे लंडनच्या द संडे टेलिग्राफने म्हटले. जंगलांतील वाघांची संख्या एक शतकाआधी जवळजवळ १,००,००० इतकी होती आणि आज ती घटून ५,००० पेक्षाही कमी झाली आहे. बहुतेक वाघ भारतात आढळतात; काही दक्षिण आशिया तसेच पूर्व आणि ईशान्य आशियातही आढळतात. द एनव्हायरनमेंटल इन्वेस्टिगेशन एजन्सी ही लंडनमध्ये धर्मादाय कार्यात असलेली संस्था असे वृत्त देते, की गिऱ्हाईकांना वाघाचे कातडे “सर्वात उत्तम गृहशोभा वाटते परंतु ते वाघाला नामशेष करत आहेत. . . . हे प्राणी खरोखरच इतक्या धोक्यात आहेत, की उरलेला प्रत्येक वाघ त्याची जात वाचवण्याकरता महत्त्वाचा आहे.” १९९४ व २००३ सालांदरम्यान, वाघांच्या ६८४ कातड्या जप्त करण्यात आल्या; परंतु हा आकडा, चोरट्या मार्गाने नेण्यात आलेल्या कातड्यांच्या तुलनेत अल्पांश आहे, असे समजले जाते. (g०५ ११/८)
हसण्याची शक्ती
“शास्त्रज्ञांचे असे मत आहे, की फक्त अर्ध्या मिनिटांचे खळखळून हसणे हे ४५ मिनिटे पूर्ण आराम करण्यासारखे आहे,” असे शियाचुका या पोलीश साप्ताहिकात म्हटले होते. “उत्स्फूर्त हशा तीन मिनिटांच्या एरोबिक व्यायामाइतका आहे तर, दहा वेळा केलेले प्रेमळ हास्य दहा मिनिटांच्या तीव्र रोईंग व्यायामासारखे आहे.” हसण्याच्या इतर फायद्यांमध्ये इतरही गोष्टींचा समावेश होतो जसे की, फुफ्फुसांमध्ये शोषल्या जाणाऱ्या हवेची तीनपट वाढ, तसेच रक्ताभिसरण, पाचनक्रिया, चयापचय, मेंदूचे कार्य आणि अपायकारक घटक शरीरातून बाहेर फेकले जाणे यांत सुधारणा. मासिकात असे सुचवण्यात आले होते, की आनंदी मूडमध्ये राहण्याकरता सकाळी उठल्याबरोबर आधी तुम्ही स्वतःवर, आपल्या सोबत्याकडे, आपल्या मुलांकडे पाहून हसले पाहिजे. मासिकात पुढे म्हटले होते: “स्वतःवर हसायला शिका. कठीण परिस्थितीतही, सकारात्मक बाजू पाहायचा प्रयत्न करा.” (g०५ १०/२२)