व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थडगी प्राचीन विश्‍वासांत डोकावून पाहण्याचे झरोके

थडगी प्राचीन विश्‍वासांत डोकावून पाहण्याचे झरोके

थडगी प्राचीन विश्‍वासांत डोकावून पाहण्याचे झरोके

तुम्ही हजारो वर्षांपूर्वी जगत आहात अशी कल्पना करा. तुम्ही, बॅबिलोनियातील सुमेर येथील एका समृद्ध राजसी शहरात अर्थात ऊरमध्ये आहात. सुमेरी लोकांची एक मिरवणूक शहराच्या बाहेर येऊन कब्रस्थानांत येते व अलिकडेच मरण पावलेल्या राजाच्या थडग्यात जाण्यासाठी लावलेल्या उतरत्या फळीवरून आत जात आहे. थडग्याच्या आतील भिंतींवर व जमिनीवर चटया लावल्या आहेत आणि खोली सुरेख सुमेरियन कलाकृतींनी सजवण्यात आली आहे. मिरवणुकीत असलेले सैनिक, पुरुष गडी आणि स्त्रिया यांच्याबरोबरच आलेले वाजंत्री देखील थडग्यात उतरतात. सर्वांनी उत्तमातले उत्तम पोषाख परिधान केले आहेत. अधिकारी, त्यांना मिळालेली पदके आपल्या खांद्यावर अभिमानाने मिरवत आहेत. या रंगीबेरंगी घोळक्यात, बैल किंवा गाढव ओढत असलेले रथ आहेत; बैलाच्या किंवा गाढवाच्या डोक्याशेजारी रथ हाकणारे उभे आहेत. सर्वजण आपापली जागा घेतात. मग संगीताबरोबर एक धार्मिक विधी होतो.

धार्मिक विधी समाप्त झाल्याबरोबर प्रत्येक व्यक्‍ती—वाजंत्र्यापासून नोकरापर्यंत—या प्रसंगासाठी येताना तिने सोबत आणलेला एक लहानसा मातीचा, दगडाचा किंवा धातूचा प्याला एका तांब्याच्या मडक्यात बुडवून खास तयार केलेले एक पेय घेऊन पिते. त्यानंतर सर्वजण एका ओळीने चटईवर आरामशीर व शांतपणे झोपतात आणि मरून जातात. कुणीतरी लगेच प्राण्यांची कत्तल करतो. कामकरी थडग्यात जाणारा मार्ग बुजवून टाकतात व थडगे मुहरबंद करतात. सुमेरी लोकांचा असा विश्‍वास आहे, की त्यांचा देव-राजा आता दुसऱ्‍या जगात त्याच्या पुरलेल्या रथावर वैभवीरूपाने स्वार आहे आणि त्याचे निष्ठावान सेवक आणि सैनिक रक्षक त्याच्याबरोबर दिमाखाने जात आहेत.

दक्षिण इराकमध्ये खोदकाम करत असताना सर लिओनार्ड वुली नावाच्या एका पुरात्त्ववेत्त्याला प्राचीन ऊरच्या कब्रस्थानात वर वर्णन केलेल्या थडग्यासारखी आणखी १६ राजसी थडगी आढळली. ही थडगी अतिशय भयानक होती तरीपण उल्लेखनीय होती. “मेसोपोटामियन पुरातनवस्तुशास्त्रात कशाचीच सर नसलेल्या या थडग्यांमध्ये आढळलेल्या संपत्तीत सर्वात लोकप्रिय असलेल्या सुमेरियन कलाकृतींचा समावेश आहे ज्या आता ब्रिटिश म्यूझियम आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनस्लिव्हानिया म्यूझियममध्ये आहेत,” असे पॉल बॅन थडगी, कब्रा आणि ममीज (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात.

परंतु, प्राचीन ऊरची थडगी, मानव आणि प्राण्यांच्या अर्पणाच्या अमानूष पद्धतीत अनोखी नव्हती. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये, अमीरउमरावांच्या, राजेमहाराजांच्या घरचे, मृत्यूच्या वेळच्या विधींसाठी आणि तदनंतरच्या जीवनाच्या तयारीसाठी पुष्कळ परिश्रम आणि अमाप पैसा खर्च करत असत. कधीकधी तर यातील रीतीरिवाज क्रूर पद्धतींचे देखील असायचे. उत्कृष्ट कलाकृतींनी व धनसंपत्तीने भरलेली त्यांची थडगी, जिवंतांच्या राजमहालांसारखीच वाटायची. परंतु आजकाल, ही आणि इतर अनेक थडगी गतकाळात डोकावून पाहण्याकरता जणू काय एका झरोक्याप्रमाणे आहेत. यांच्यामुळे आपण प्राचीन काळच्या व नामशेष झालेल्या संस्कृतींतील लोकांच्या विश्‍वासांबद्दलचे, त्यांच्या रीतीभातींचे, त्यांच्या कलाकौशल्यांचे व तांत्रिक कौशल्यांचे परीक्षण करू शकतो.

नोकर चाकरांबरोबर पुरण्यात आलेले थाटामाटात कुजत आहेत

एकोणीसशे चौऱ्‍हातर साली, चीनमधील शीएनच्या शहराजवळचे काही शेतकरी एक विहीर खोदत होते. पाणी लागण्याऐवजी त्यांच्या हाती बाहुलीवजा मातीचे पुतळे, ब्राँझचे क्रॉसबो (दस्त्यावर बसवलेले धनुष्य) आणि बाण हाती लागले. अजाणतेत त्यांना, २,१०० वर्षांपूर्वीचे मातीचे सैन्य आढळले होते. या सैन्यात, ७,००० जिवंत माणसाच्या उंचीपेक्षा किती तरी उंच असे मातीचे सैनिक व घोडे होते. या सर्व पुतळ्यांना सैनिकी आखणीत पुरण्यात आले होते. चीनमधील सर्वात मोठ्या बादशाही थडग्याचा भाग असलेल्या या चीन मातीच्या सैन्याला, चिन शिर व्हांग टी या सम्राटाचे नाव देण्यात आले. या सम्राटाने सा.यु.पू. २२१ मध्ये चीनच्या युद्ध करणाऱ्‍या प्रांतांमध्ये एकी आणली होती.

चिनची समाधी ही एकप्रकारे एक भूमिगत राजमहालच आहे. पण त्याला या मातीच्या सैन्याबरोबर का पुरण्यात आले होते? जान वन्ली आपल्या च्यीन मातीचे सैन्य (इंग्रजी) पुस्तकात म्हणतात, की चिनची “समाधी च्यीन सम्राज्याचे प्रतिनिधीत्व करते. च्यीन शी व्हांग डीचे [चिन शिअ व्हांग टी] जिवंतपणी जे वैभव व जो थाटमाट होता तोच मृत्यूनंतरही त्याला मिळावा म्हणून हे सर्व करण्यात आले होते.” हे थडगे आता एका प्रचंड संग्रहालयाचा भाग आहे; याच आवारात आणखी ४०० थडगी आणि कबरा आहेत.

हे थडगे बांधण्याकरता, “संपूर्ण साम्राज्यातून सुमारे ७,००,००० पुरुषांना सक्‍तीने आणण्यात आले होते” असे जान म्हणतात. सा.यु.पू. २१० मध्ये चिनचा मृत्यू झाला तरीसुद्धा थडग्याचे काम चालूच राहिले. हे थडगे बांधण्याकरता एकूण ३८ वर्षे लागली. परंतु, चिनबरोबर फक्‍त मातीचे पुतळेच पुरण्यात आले नाहीत. चिननंतर राजपदावर आलेल्या सम्राटाने असा हुकूम काढला, की चिनच्या निपुत्रिक उपपत्नींना देखील त्याच्याबरोबर पुरण्यात यावे. अशाप्रकारे, “खूप मोठ्या” संख्येच्या लोकांचा मृत्यू झाला, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्या काळी, अशाप्रकारच्या प्रथा नवीन नव्हत्या.

मेक्सिको सिटीच्या ईशान्येकडेस, प्राचीन तोतीहुकान शहराचे अवशेष आहेत. या शहरांत, मृतांचा मार्ग नावाचा एक रस्ता होता. “या रस्त्यावर जगातील सर्वात महान वास्तुशिल्प आहेत,” असे बॅन (ज्यांचा आधी उल्लेख करण्यात आला) लिहितात. यांमध्ये, सूर्याचा पिरॅमिड, चंद्राचा पिरॅमिड आणि क्वेतसलक्वा दैवताच्या मंदिराचे भग्नावशेष यांचा समावेश आहे. हे दोन पिरॅमिड सा.यु. पहिल्या शतकात बांधण्यात आले होते.

सूर्याच्या पिरॅमिडच्या आत प्रतिष्ठित व्यक्‍तींना कदाचित पुरोहितांना पुरण्यासाठी एक कबर होती असे दिसते. या पिरॅमिडच्या जवळच असलेल्या एका मोठ्या कबरेत सापडलेल्या मनुष्यांच्या सापळ्यांवरून असे दिसते, की पिरॅमिडच्या आत पुरलेल्यांचे संरक्षण करण्यासाठी योद्ध्‌यांचा बलि देण्यात आला असावा. कबरांचा हा आगळावेगळा नमुना पाहून पुरातन वस्तुशास्त्रज्ज्ञांना असे वाटू लागले आहे, की या ठिकाणी सुमारे २०० लोकांना व लहान मुलांना पुरण्यात आले असावे. वास्तुंच्या समर्पण विधीचा एक भाग म्हणून लहान मुलांचा देखील बलि देण्यात आला असावा.

मृत्यूनंतरच्या जीवनात बोटीने किंवा घोड्यावर बसून जाणे

सुमारे १,००० वर्षांपूर्वी युरोपची भीतीने गाळण उडवणाऱ्‍या स्कॅन्डीनेव्हियाचे समुद्री योद्धे अर्थात व्हायकींग यांचा देखील, मृत्यूनंतर त्यांना पार्थिव जीवनांतील काही उत्कृष्ट गोष्टींची गरज लागेल असा विश्‍वास होता. त्यांचा असा विश्‍वास होता, की मृत लोक दुसऱ्‍या जगात एकतर घोड्यावर बसून किंवा लांबसडक बोटीने जातात. त्यामुळे व्हायकींग लोकांच्या कब्रांमध्ये घोड्यांच्या सापळ्यांपासून लांबसडक बोटींची सडत असलेली लाकडे आढळू शकतात. व्हायकींग्जचा इतिहास (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात ग्वेन जोन्स असे लिहितात: “मृत पुरुषाचा किंवा स्त्रीचा मृत्यूनंतरचा प्रवास आरामशीर व आदरणीय व्हावा म्हणून त्याला किंवा तिला, त्यांना माहीत असलेले सर्व काही दिले जाई. . . . डेन्मार्क येथील लॅथबुई येथे पुरण्यात आलेल्या जहाजावर तर . . . नांगर वरच ठेवला होता. जेणेकरून जहाजाचा मालक आपला प्रवास संपल्यावर नांगर टाकू शकेल.”

युद्धप्रेमी जमात असलेल्या व्हायकींग लोकांचा असा विश्‍वास होता की युद्ध करताना त्यांना मृत्यू आला तर ते ॲसगार्ड म्हटल्या जाणाऱ्‍या ठिकाणी म्हणजे देवांच्या गृही जातील. “तेथे ते संपूर्ण दिवस युद्ध करू शकतील आणि रात्रीचे अन्‍नप्राशन करू शकतील,” असे वर्ल्ड बुक एनसायक्लोपिडिआ म्हणतो. व्हायकींग लोकांमध्ये नरबळीची देखील प्रथा होती. विकींग (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले आहे: “एखाद्या अधिपतीचा मृत्यू झाल्यावर, त्याच्या दासांना व चाकरांना ‘याच्याबरोबर कोण मरू इच्छितो’ असे विचारले जायचे.”

उत्तर युरोपातील प्राचीन सेल्ट लोकांचा असाही विश्‍वास होता, की एखादे कर्ज पुढच्या जगातही फेडले जाऊ शकत होते; कर्ज चुकवण्याचा हा एक चांगला बहाणा होता! मेसोपोटेमियात मुलांबरोबर त्यांच्या खेळण्या देखील पुरण्यात येत असे. प्राचीन ब्रिटनच्या काही भागांत सैनिकांच्या शवांबरोबर अन्‍न अर्थात मेंढीच्या मांड्या देखील पुरल्या जात जेणेकरून ते त्यांच्या पुढील जीवनात उपाशी राहणार नाहीत. उत्तर अमेरिकेत, माया संस्कृतीच्या राजेमहाराजांच्या कबरेत, जेड (मर्गझ) या मौल्यवान खड्यापासून बनवलेल्या वस्तू देखील पुरल्या जात; हा एक अतिमौल्यवान हिरव्या रंगाचा खडा आहे जो दाट ओलावा आणि श्‍वासाचे प्रतीक आहे, असा विश्‍वास केला जातो. मृत्यूनंतरही जीवन चालू राहावे हा यामागचा हेतू असावा.

सा.यु.पू. १,००० च्या काही काळानंतर, आज बल्गेरिया, उत्तर ग्रीस आणि तुर्कस्थानाचा भाग असलेल्या भागात थ्रासियन जमात राहायची. या जमातीने लोकांमध्ये दहशत पसरवली होती. पण ही जमात सोन्याच्या उत्तम कलाकृतींसाठी देखील सुप्रसिद्ध होती. थ्रासियन थडग्यांतून आपल्याला कळते, की त्यांच्या प्रमुखांना अतिशय वैभवात पुरले जायचे; म्हणजे, त्यांच्याबरोबर रथ, घोडे, उत्तमातले उत्तम पोशाख आणि होय, त्यांच्या पत्नींना देखील पुरले जायचे. खरे तर, थ्रासियन जमातीतील पत्नी, बली चढण्यास व आपल्या पतीबरोबर पुरले जाण्यास बहुमान समजायची!

यानंतर आणि फार दूरवर नव्हे—काळ्या समुद्राच्या उत्तरेकडे सायथियन जमात होती. या युद्धप्रेमी जमातीचे लोक, त्यांनी ठार मारलेल्या लोकांच्या कवट्यांचा उपयोग पेय पिण्यासाठी आणि त्यांच्या चामड्याचा उपयोग वस्त्र बनवण्यासाठी करत असत. एका सायथियन थडग्यात एका स्त्रीचा सापळा आढळला जिच्या शेजारी भांगाचा साठा होता. तिच्या कवटीवर तीन लहान छिद्रे होती. सूज कमी करण्यासाठी व दुखणं कमी करण्यासाठी ही छिद्रं पाडण्यात आली असावीत. तिच्या शेजारी हा भांग ठेवण्यात आला होता जेणेकरून दुसऱ्‍या जगात तिच्याजवळ तिच्या डोकेदुखीसाठी काहीतरी औषध असेल.

ईजिप्तच्या लोकांच्या मृत्यूनंतरचे जीवन

कैरो जवळच्या ईजिप्तचे पिरॅमिड आणि लक्सर जवळच्या राजांच्या खोऱ्‍यांतील कब्रा, सर्व प्राचीन थडग्यांतील सर्वात प्रसिद्ध थडगी आहेत. प्राचीन ईजिप्तचे लोक, “थडगे” आणि “घर” यासाठी एकच शब्द वापरत असत—पर. लेखिका ख्रिस्टीन अल माहडी प्राचीन ईजिप्तमधील ममीज, मिथ्यकथा आणि जादूटोणा (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हणतात: “जिवंतपणीही एक घर होते आणि मेल्यानंतरही एक घर होते.” त्या पुढे असेही म्हणतात: “[ईजिप्तचे] लोक असाही विश्‍वास करायचे, की त्यांच्या अस्तित्वाचे इतर पैलू, जसे की का, बा आणि अख हे जिवंत राहण्याकरता शरीराचे जिवंत राहणे अगत्याचे आहे.”

का म्हणजे शरीराची आत्मिक आवृत्ती ज्यांत इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांचा समावेश होतो. मृत्यूनंतर का शरीर सोडून जाते व थडग्यात राहू लागते. व्यक्‍ती जिवंत असताना तिला ज्या सर्व गोष्टी लागायच्या त्या आता काला लागत असल्यामुळे “थडग्यांत ठेवल्या जाणाऱ्‍या वस्तू ह्‍या प्रामुख्याने काच्या इच्छा तृप्त करण्यासाठीच होत्या,” असे अल माहडी लिहितात. बाची तुलना एखाद्या व्यक्‍तीच्या स्वभावाशी किंवा व्यक्‍तीमत्त्वाशी करता येते. मानवाचे डोके असलेला एक पक्षी असे बाला चित्रित केले जाते. बा, जन्माच्या वेळी शरीरात शिरतो आणि मृत्यूच्या वेळी शरीर सोडतो. तिसरे अस्तित्व म्हणजे अख. ममीवर जेव्हा जादूचा मंत्र म्हटला जातो तेव्हा अख ममीच्या आतून बाहेर येतो. * अख देवांच्या जगात राहतो.

मानव तीन गोष्टींचा बनला आहे असा विश्‍वास करून ईजिप्तशियन लोक प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांपेक्षा एक पाऊल पुढे गेले. ग्रीक तत्त्ववेत्त्यांचे म्हणणे होते, की मानव दोन गोष्टींचा बनला आहे—शरीर आणि अचेत “आत्मा.” ही शिकवण लोकप्रिय असली तरीसुद्धा, बायबलमध्ये या शिकवणीला कसलाच आधार नाही. बायबल असे म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.”—उपदेशक ९:५.

मृत्यूविषयी इतकी जिज्ञासा का?

पूर्वेतिहासिक धर्म (इंग्रजी) नावाच्या आपल्या पुस्तकात ई. ओ. जेम्स असे लिहितात: “मानवासमोर आलेल्या सर्व परिस्थितींत, मृत्यूची परिस्थिती सर्वात अस्वस्थजनक व उद्धवस्त करणारी आहे. . . . त्यामुळेच, मृतांच्या उपासनेला इतके महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे आणि मानव समाजात या विश्‍वासाची जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासूनच या विश्‍वासाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

खऱ्‍या बुद्धीचे सर्वात जुने पुस्तक अर्थात बायबलमध्ये मृत्यूला मानवांचा शत्रू म्हटले आहे. (१ करिंथकर १५:२६) खरोखरच किती उचित आहे हे! मृत्यू म्हणजे सर्वाचा शेवट, ही कल्पना प्रत्येक वंशाने व संस्कृतीने ठामपणे नाकारली आहे. पण दुसरीकडे पाहता, उत्पत्ति ३:१९ मध्ये बायबल अगदी अचूकरीत्या कब्रेत नेमके काय होते ते सांगते. ते म्हणते: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” परंतु अनेक मृतांच्या बाबतीत बायबल “स्मृती कबर” हा वाक्यांश देखील वापरते. का बरे? कारण, कबरेत असलेले अनेक जण, मग ते पूर्णपणे कुजून गेलेले असले तरीसुद्धा देवाच्या स्मृतीत आहेत. ते जणू काय त्या आनंदी काळाची वाट पाहत आहेत जेव्हा देव त्यांना पुन्हा उठवेल आणि पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवन अनुभवण्याची संधी देईल.—लूक २३:४३, NW; योहान ५:२८, २९, NW.

पण तो समय येईपर्यंत मृत बेशुद्धावस्थेत असतील. येशूने त्यांच्या अवस्थेची तुलना झोपेशी केली. (योहान ११:११-१४) अशा अवस्थेत एखाद्या व्यक्‍तीला तिच्याबरोबर पुरलेल्या वस्तूंची किंवा सेवकांची गरज भासणार नाही. आणि खरे पाहता, मृत व्यक्‍तीबरोबर पुरलेल्या वस्तूंचा फायदा मृतांना नव्हे तर जिवंतांनाच अर्थात थडगी लुटणाऱ्‍यांनाच होत आहे! मृतांच्या अवस्थेविषयीच्या शिकवणीच्या सुसंगतेत बायबल आणखी असे म्हणते: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही.” (१ तीमथ्य ६:७) प्राचीन—आणि कधीकधी तर आधुनिक—मृत्यूविषयीच्या सांप्रदायांच्या क्रूर प्रथांपासून सुटका करणाऱ्‍या सत्याबद्दल ख्रिश्‍चन कृतज्ञता बाळगतात जे त्यांना “बंधमुक्‍त” करते!—योहान ८:३२.

मृत्यूच्या सांप्रदायांच्या या प्रथा अर्थहीन असल्या तरी, प्राचीन लोकांची ही भव्य थडगी पूर्णपणे बिनमहत्त्वाची नाहीत. थडग्यांतील मृतांच्या सांगाड्यांबरोबर मिळालेल्या अनेक वस्तू नस्त्या तर गत काळाविषयीचे आणि गतकाळात नामशेष झालेल्या संस्कृतींबद्दलचे आपले ज्ञान पुसटसेच राहिले असते. (g०५ १२/८)

[तळटीप]

^ परि. 20 “ममी” हा शब्द ममीया या अरेबी शब्दातून येतो ज्याचा अर्थ “बिटुमन” किंवा “डांबर” असा होतो. पूर्वी हा शब्द राळेत बुडवून ठेवलेल्या कलेवरासाठी वापरला जायचा. कारण कलेवराचा रंग काळा झालेला असायचा. आता तो कोणत्याही जतन करून ठेवलेल्या शरीराला, मग ते मानवाचे शरीर असो अथवा प्राण्याचे शरीर असो, त्याला लागू होतो. शरीराचे असे जतन, मुद्दामहून करण्यात आले असेल अथवा अपघाताने झाले असेल.

[२४ पानांवरील चौकट/चित्रे]

प्राचीन काळातल्या लोकांचे आरोग्य कसे होते?

थडग्यांतील ममीकरण केलेल्या शवांचे तसेच पालापाचोळ्यात, अतिउष्ण वाळवंटातील वाळूत, बर्फ आणि हिम यांत नैसर्गिकरीत्या ममीकरण झालेल्या शवांचे परीक्षण केल्यावर शास्त्रज्ञांना आपल्या गत काळातील पूर्वजांच्या आरोग्याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. जनुकीय तंत्रांतील प्रगतीमुळे शास्त्रज्ञांना, फारो आणि त्यांच्या राण्यांच्या रक्‍ताच्या नात्यापासून इन्का कुमारीकेच्या रक्‍त गटापर्यंतची सर्व माहिती ठरवण्याकरता नवनवीन साधने प्राप्त झाली आहेत. या अभ्यासांतून असे दिसून आले आहे, की प्राचीन काळच्या लोकांनाही आपल्यासारख्याच आरोग्याच्या समस्या होत्या; जसे की, त्यांनाही संधीवाताचा त्रास होता, त्यांच्याही अंगावर चामखीळी होत्या.

खासकरून प्राचीन ईजिप्तच्या लोकांना कृमींचे जास्त आजार होते. ईजिप्तचे लोक नाईल नदीचे पाणी पीत असल्यामुळे व शेतीसाठी तेच पाणी वापरत असल्यामुळे या पाण्यातून त्यांना शीस्टोसोमा या परजीवीपासून नारू आणि पट्टकृमीपर्यंतच्या जंतांचा आजार जडला होता. यावरून इस्राएल राष्ट्राची ईजिप्तमधून सा.यु.पू. १५१३ मध्ये सुटका झाल्यानंतर देवाने या राष्ट्राला जे म्हटले होते त्याची आठवण होते: “मिसरांची जी वाईट दुखणी तुला ठाऊक आहेत, त्यातले कोणतेही तो [यहोवा] तुझ्यावर घालणार नाही.”—अनुवाद ७:१५, पं.र.भा.

[चित्राचे श्रेय]

© R Sheridan/ANCIENT ART & ARCHITECTURE COLLECTION LTD

[२० पानांवरील चित्र]

ऊर येथील एका राजसी थडग्यात पुरलेल्या एका महिला सेविकेचा सुमेरियन मुकूट आणि दागदागिने

[चित्राचे श्रेय]

© The British Museum

[२१ पानांवरील चित्रे]

च्यीन मातीचे सैन्य—प्रत्येक सैनिकाचा विशिष्ट हावभावात चेहरा कोरण्यात आला होता

[चित्राचे श्रेय]

आत: Erich Lessing/Art Resource, NY; © Joe Carini / Index Stock Imagery ▸

[२३ पानांवरील चित्र]

मेक्सिको येथील तोतीहुकान शहरातील सूर्याचा पिरॅमिड आणि मृतांचा मार्ग

[चित्राचे श्रेय]

वर: © Philip Baird www.anthroarcheart.org; रंगवलेले चित्र: Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[२३ पानांवरील चित्रे]

डावीकडे: तुतनखामुन या ईजिप्तच्या राजाचा त्याच्या मृत्यूच्या वेळी अस्सल सोन्याने बनवलेला मुखवटा; खाली: थडग्यांत रंगवलेले मानवाचे डोके असलेले बाचे चित्र