व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैसर्गिक विपत्ती वाढत चालल्या आहेत का?

नैसर्गिक विपत्ती वाढत चालल्या आहेत का?

नैसर्गिक विपत्ती वाढत चालल्या आहेत का?

“हवामानातील बदलांमुळे घडून येणारी संकटे भविष्यात अतिशय रौद्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अर्थ, आपण हवामानाशी संबंधित नवनवीन प्रकारची संकटे येण्याची आणि यांमुळे अधिक प्रमाणावर हानी होण्याची अपेक्षा करू शकतो. . . . या लक्षणीय बदलांकरता आपण आतापासूनच पूर्वतयारी व आवश्‍यक तजवीज करणे शहाणपणाचे ठरेल.” —“टॉपिक्स-जिओ—वार्षिक आढावा: नैसर्गिक अरिष्टे २००३.”

युरोपातील काही प्रदेशांत २००३ सालच्या उन्हाळ्यात अतिशय उच्च तापमान नोंदण्यात आले. बेल्जियम, ब्रिटन, फ्रांस, इटली, नेदरलँड्‌स, पोर्तुगाल व स्पेन या देशांत जवळजवळ ३०,००० लोकांच्या मृत्यूकरता हे उच्च तापमान जबाबदार होते. बांग्लादेश, भारत, व पाकिस्तान या देशांत मान्सूनपूर्व आलेली उष्णतेची लाट १,५०० लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली; तर, ऑस्ट्रेलियात कोरड पडल्यामुळे व कधी नव्हे इतके उच्च तापमान नोंदण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी वणवे पेटून ७० लाखापेक्षा जास्त एकर जमीन नष्ट झाली.

जागतिक हवामान संघटनेनुसार, “अटलांटिक प्रदेशातील नेहमीच्या वादळी मोसमात, २००३ साली १६ अशी वादळे आली की ज्यांना नाव देण्यात आले. १९४४-१९९६ या काळादरम्यान या प्रदेशांत दरवर्षी सरासरी ९.८ अशी वादळे येत होती, त्यापेक्षा २००३ सालच्या वादळांची संख्या खूपच होती. पण १९९० च्या दशकाच्या मध्यापासून, उष्णकटिबंधीय हवामान बदलांच्या वार्षिक संख्येत झालेल्या वाढीशी ही वाढ सुसंगत होती.” २००४ सालीही ही वाढ तशीच कायम राहिली. कॅरिबियन व गल्फ ऑफ मेक्सिकोत आलेल्या विनाशकारी झंझावाती वादळांनी २,००० लोकांचा बळी घेतला आणि प्रचंड प्रमाणात हानी झाली.

श्रीलंकेत २००३ साली आलेल्या मोठ्या चक्रवाती पुरामुळे २५० लोकांचा बळी गेला. २००४ साली पश्‍चिम पॅसिफिक समुद्राच्या प्रदेशात कमीतकमी २३ चक्रीवादळांची विक्रमी संख्या नोंदण्यात आली. यांपैकी दहा वादळांचा जपानला फटका बसला. यांत बरेच नुकसान झाले व १७० पेक्षा अधिक लोक दगावले. जोरदार मॉन्सून पावसाचा दक्षिण आशियातील जवळजवळ तीन कोटी लोकांवर परिणाम झाला; विशेषतः बांग्लादेशाला या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला. लाखो लोक बेघर झाले, जवळजवळ ३० लाख लोकांना आपले घर सोडून पळावे लागले आणि १,३०० लोकांना आपला जीव गमवावा लागला.

२००३ साली अनेक मोठे भूकंप देखील झाले. २१ मे रोजी ॲल्जियर्स, अल्जेरिया येथे झालेल्या भूकंपात १०,००० लोक जखमी झाले आणि २,००,००० लोक बेघर झाले. २६ डिसेंबर रोजी पहाटे ५:२६ वाजता इराणच्या बाम शहरापासून दक्षिणेकडे आठ किलोमीटर अंतरावर पृथ्वीने आपला प्रकोप दाखवला. ६.५ महत्तेच्या या भूकंपाने शहराचा ७० टक्के भाग नष्ट केला, ४०,००० लोकांचा, म्हणजे एकूण जनसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांचा बळी घेतला आणि १,००,००० पेक्षा अधिक जणांना बेघर केले. या वर्षीचे हे सर्वात विनाशकारी नैसर्गिक अरिष्ट होते. पर्यटकांकरता एक मुख्य आकर्षण आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा बाम शहरातील २,००० वर्षांपूर्वीचा किल्ला, आर्ग-ए-बाम देखील या भूकंपात जवळजवळ जमीनदोस्तच झाला.

याच्या बरोबर एका वर्षानंतर, उत्तर सुमात्रा, इंडोनेशियाच्या पश्‍चिमी किनाऱ्‍यापासून काही अंतरावर ९.० महत्तेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे आलेल्या सुनामी लहरी इतिहासातल्या सर्वात विनाशकारी ठरल्या. या प्रलयकारी लहरींनी २,००,००० पेक्षा अधिक जणांना गिळंकृत केले आणि याहूनही मोठ्या संख्येच्या लोकांना जखमी व बेघर केले. भूकंप ज्या ठिकाणी घडला त्यापासून तब्बल ४,५०० किलोमीटर दूरवर असलेल्या आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही या सुनामींनी आपल्या प्राणघातक विळख्यात ओढले.

क्षितिजावर आणखी संकटांची चिन्हे?

या घटना भविष्यातील घटनांची नांदी तर देत नाहीत ना? हवामानाशी संबंधित संकटांच्या संबंधात अनेक शास्त्रज्ञांचे असे मत आहे की मानवाने वातावरणात घडवून आणलेल्या बदलांमुळे जगाच्या एकंदर हवामानात परिवर्तन घडून येत आहे आणि हेच काही अंशी टोकाच्या हवामान परिस्थितींना कारणीभूत आहे. हे जर खरे असेल, तर भविष्याचे चित्र फार आशादायी म्हणता येणार नाही. त्यातल्या त्यात, आता अधिकाधिक लोक स्वेच्छेने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा, संकटांचा अधिक धोका असलेल्या क्षेत्रात राहात आहेत.

आकडेवारीनुसार असे दिसून येते की नैसर्गिक विपत्तींना बळी पडणाऱ्‍या लोकांपैकी ९५ टक्के लोक विकसनशील देशांचे असतात. दुसरीकडे पाहता श्रीमंत देशांत मृत्यूंचे प्रमाण कमी असले तरी विपत्तींमुळे होणाऱ्‍या आर्थिक हानीपैकी ७५ टक्के हानी मात्र त्यांना झेलावी लागते. अशा विपत्तींमध्ये होणाऱ्‍या प्रचंड आर्थिक नुकसानीकडे पाहून काही विमा कंपन्यांना तर भिती वाटू लागली आहे की त्यांचा उद्योग टिकून राहू शकेल का?

पुढील लेखात, ज्यांमुळे संकटे घडून येतात अशा काही नैसर्गिक प्रक्रियांचे आणि कधीकधी मानव स्वतःच कशाप्रकारे त्यांची तीव्रता वाढवण्यास हातभार लावतात याचे आपण परीक्षण करू. तसेच ही पृथ्वी भावी पिढ्यांकरता सुरक्षित राहावी म्हणून जे बदल करण्याची गरज आहे ते घडवून आणण्याचे सामर्थ्य व इच्छा मानव कुटुंबाजवळ आहे का, हे ही आपण विचारात घेऊ. (g०५ ७/२२)

[३ पानांवरील चित्र]

फ्रांस२००३ उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेच्या लाटेने ३०,००० लोकांचा बळी घेतला; स्पेनमध्ये ४४.८°सें. तापमान नोंदण्यात येते.

[चित्राचे श्रेय]

◀ Alfred/EPA/Sipa Press

[४, ५ पानांवरील चित्रे]

इराण२००३ बाम शहरातील भूकंपात ४०,००० ठार; स्त्रिया व नातेवाईक एका सामूहिक क बरेजवळ शोक करत आहेत

[चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी आणि स्त्रिया: © Tim Dirven/Panos Pictures