व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नैसर्गिक संकटे व मानवांचे योगदान

नैसर्गिक संकटे व मानवांचे योगदान

नैसर्गिक संकटे व मानवांचे योगदान

एखाद्याने आपल्याजवळील वाहनाची योग्य काळजी घेतल्यास त्याला सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याकरता त्या वाहनाचा उपयोग होतो. पण त्याच वाहनाचा योग्य प्रकारे उपयोग न केल्यास, व त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते धोकेदायकही ठरू शकते. या पृथ्वी ग्रहाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल.

बऱ्‍याच शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या वातावरणात व समुद्रांत मानवाने घडवून आणलेल्या बदलांमुळे, वारंवार व अधिक तीव्रतेची नैसर्गिक संकटे घडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली असून, हा पृथ्वी ग्रह मानव वस्तीकरता सुरक्षित राहिलेला नाही. भविष्यातील परिस्थितीसुद्धा अनिश्‍चित आहे. सायन्स नियतकालिकात वातावरणातील बदलांसंबंधी लिहिण्यात आलेल्या एका संपादकीय लेखात असे म्हटले होते, की “आपण जणू अशा एका मोठ्या प्रयोगात सामील आहोत, ज्याचा अंतिम परिणाम कोणालाही माहीत नाही; शिवाय प्रयोग करण्याकरता मानवांजवळ हा केवळ एकच ग्रह आहे.”

मानवी कार्यांचा नैसर्गिक विपत्तींच्या वारंवारितेवर व तीव्रतेवर कशाप्रकारे परिणाम होतो हे समजून घेण्याकरता त्यामागच्या नैसर्गिक प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, चक्रिवादळांसारखी तीव्र स्वरूपाची वादळे का निर्माण होतात?

पृथ्वीचे उष्णता विनिमयक

पृथ्वीची हवामान यंत्रणा, सूर्याची ऊर्जा रूपांतरीत करून तिचे वितरण करणाऱ्‍या यंत्रासारखी आहे. उष्णकटिबंधांना सूर्याची सर्वाधिक उष्णता मिळत असल्यामुळे पृथ्वीच्या विविध क्षेत्रांच्या तापमानात असंतुलन घडून वाऱ्‍याची हालचाल सुरू होते. * पृथ्वी दररोज स्वतःभोवती फिरत असल्यामुळे, या गतिमान आर्द्र वाऱ्‍यापासून प्रवाहावर्त तयार होतात आणि अशारितीने कमी दाबाचे प्रदेश निर्माण होतात. हे पुढे वादळांत रूपांतरीत होऊ शकतात.

उष्णकटिबंधीय वादळांच्या सर्वसामान्य मार्गाचे तुम्ही निरीक्षण केल्यास, तुम्हाला असे दिसून येईल की सहसा ही वादळे विषुववृत्तापासून दूर, एकतर उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे थंड प्रदेशांच्या दिशेने प्रवास करतात. असे करताना, ही वादळे जणू मोठ्या उष्णता विनिमयक यंत्रांचे काम करतात व हवामानाची तीव्रता संतुलित करण्यास हातभार लावतात. पण या हवामान यंत्राच्या “बॉयलर रूममधले,” म्हणजेच समुद्राच्या वरील पातळीचे तापमान २७ अंश सेल्सियस पेक्षा जास्त वाढते तेव्हा उष्णकटिबंधीय वादळांतील ऊर्जा अधिकच वाढून ते चक्रिवातांचे, वावटळीचे किंवा चक्रिवादळांचे रूप घेतात. वेगवेगळ्या प्रदेशांत नावे वेगळी असली तरी ही सर्व तीव्र स्वरूपाची वादळेच असतात.

मनुष्यहानीच्या संदर्भातून पाहिल्यास, संयुक्‍त संस्थानांच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी विपत्ती ८ सप्टेंबर, १९०० रोजी घडलेली विपत्ती होती. त्यादिवशी गॅल्वेस्टन, टेक्सस या बेटाला एका चक्रिवादळाचा फटका बसला. या वादळाच्या जोरदार वाऱ्‍यांनी ६,००० ते ८,००० शहरवासियांचा बळी घेतला तसेच जवळपासच्या क्षेत्रांतील ४,००० लोकही मृत्यूमुखी पडले; याशिवाय ३,६०० घरे जमीनदोस्त झाली. किंबहुना, गॅल्वेस्टन शहरात एकही अशी मानवनिर्मित वास्तू उरली नाही की जिला या वादळामुळे काही नुकसान झाले नाही.

याआधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे अलीकडील वर्षांत अनेक मोठी वादळे आली. याचा संबंध पृथ्वीचे तापमान वाढण्याशी आहे का व यामुळेच वादळी वाऱ्‍यांना अधिक ऊर्जा तर मिळत नसावी याविषयी सध्या शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. पण हवामानातील बदल हे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे केवळ एक लक्षण आहे. याहीपेक्षा जास्त हानीकारक ठरू शकेल असा दुष्परिणाम दिसू लागला आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ व जंगलतोड

सायन्स या नियतकालिकातील एका संपादकीय लेखानुसार, “गेल्या शतकात समुद्रांची पातळी १० ते २० सेंटीमीटर (चार ते आठ इंच) वाढली असून भविष्यात ती अधिकच वाढण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. पृथ्वीचे तापमान वाढण्याशी याचा कसा संबंध असू शकतो? संशोधनातून दोन मार्गांनी हे घडत असल्याची शक्यता समोर आली आहे. यांपैकी एक म्हणजे, ध्रुवांजवळील प्रदेशांतील व डोंगरांवरील बर्फ वितळल्यामुळे समुद्रातील पाण्याचे प्रमाण वाढले असावे. दुसरी शक्यता म्हणजे उष्णतेमुळे घडलेला विस्तार—समुद्रांचे तापमान वाढल्यामुळे त्यांचा विस्तारही वाढला आहे.

समुद्राची पातळी वाढण्याचे परिणाम प्रशांत महासागरातील तुवालु नावाच्या लहानशा बेटांवर दिसू लागले आहेत. स्मिथसोनियन नियतकालिकानुसार फुनाफुटी कंकणद्वीपावर गोळा केलेल्या माहितीनुसार तेथील समुद्राची पातळी “मागील दशकात दर वर्षी सरासरी ५.६ मिलीमीटर इतकी वाढल्याचे” दिसून येते.

जगाच्या बऱ्‍याच भागांत लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे शहरातील मनुष्यवस्ती प्रचंड वाढली आहे. यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढून वातावरण अधिकच निकृष्ट बनले आहे. या घडामोडींमुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढण्याचा संभव आहे. काही उदाहरणे पाहा.

हैटी या द्वीप राष्ट्राची लोकसंख्या बरीच जास्त असून गतकाळात तेथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. अलीकडील एका वृत्तावरून असे दिसून येते की हैटी देशात बऱ्‍याच आर्थिक, राजकीय व सामाजिक समस्या असल्या तरीही, या देशाच्या अस्तित्वाला सर्वात जास्त धोका आहे तो जंगलतोडीचा. हा धोका किती वास्तविक आहे हे २००४ साली प्रत्ययास आले, जेव्हा मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून हजारो लोकांचा जीव गेला.

टाईम एशिया यात असे म्हणण्यात आले की, “जागतिक तापमानात वाढ, जंगलतोड, व झाडे तोडून जाळणे व त्या ठिकाणी शेती करणे” यासारख्या कारणांमुळे दक्षिण आशियाला पीडित करणाऱ्‍या नैसर्गिक विपत्ती अधिकच तीव्र स्वरूपाच्या बनल्या. दुसऱ्‍या टोकाला पाहिल्यास, जंगलतोडीमुळे जमीन लवकर कोरडी होते व यामुळे अवर्षणाचे परिणाम अधिकच तीव्र स्वरूपात प्रकट होतात. अलीकडील वर्षांत, इंडोनेशिया व ब्राझील येथे अवर्षणामुळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वणवे पेटण्याच्या घटना घडल्या. सहसा येथील जंगले ओली असल्यामुळे वणवे पेटण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नसे. अर्थात, टोकाच्या हवामान परिस्थितीमुळेच नैसर्गिक विपत्ती येतात असे मुळीच म्हणता येत नाही. बऱ्‍याच देशांत येणाऱ्‍या विपत्तींचा उद्‌भव पृथ्वीच्या पोटातून होतो.

जेव्हा जमीन हादरू लागते

पृथ्वीचा पृष्ठभाग, म्हणजेच भूकवच निरनिराळ्या आकारांच्या भूपट्टांचे बनले आहे. व हे भूपट्ट सतत एकमेकांच्या स्थितीशी सापेक्ष हालचाल करत असतात. भूकवचात खरे तर इतकी हालचाल होत असते की दर वर्षी कितीतरी लाख भूकंप होत असावेत. अर्थात यांपैकी बहुतेक आपल्या नकळत घडतात.

असे म्हटले जाते, की एकूण भूकंपांपैकी जवळजवळ ९० टक्के भूकंप या भूपट्टांच्या सीमारेषांवर, भूपट्टांचे कडे एकमेकांत अडकतात त्या ठिकाणी घडतात. फार क्वचितवेळा, भूपट्टांच्या मधल्या भागातही भूकंप घडतात व हे अतिशय विनाशकारी असतात. अंदाजांप्रमाणे, लिखित इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप १५५६ साली चीनच्या तीन प्रांतात आला होता. यात कदाचित ८,३०,००० लोकांचा मृत्यू झाला असावा!

भूकंपांनंतरचे परिणाम देखील अतिशय भयानक असू शकतात. उदाहरणार्थ, नोव्हेंबर १, १७५५ रोजी आलेल्या एका भूकंपामुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर जवळजवळ भूईसपाट झाले. या शहराची लोकसंख्या २,७५,००० इतकी होती. पण या भूकंपाचे भयनाट्य इतक्यावर आटोपले नाही. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या व जवळच्या अट्‌लांटिक महासागरातून जवळजवळ ५० फूट उंचीच्या सुनामी लाटा देखील निर्माण झाल्या. एकूण या भूकंपामुळे ६०,००० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले.

या प्रकारच्या विपत्तीची तीव्रता देखील काही अंशी मानवाच्या कार्यांवर अवलंबून आहे. एक कारण म्हणजे भूकंप घडण्याची जास्त शक्यता असलेल्या क्षेत्रांतच दाट मनुष्यवस्ती असलेली शहरे वसलेली आहेत. लेखक ॲन्ड्रू रॉबिन्सन म्हणतात, “जगातली निम्मी महानगरे आता भूकंपाच्या दृष्टीने धोकेदायक अशा क्षेत्रांत वसलेली आहेत.” विनाशाला कारणीभूत ठरणारे आणखी एक कारण म्हणजे इमारती—त्यांनी वापरलेले बांधकाम साहित्य व इमारतींची रचना. असे म्हणतात, की “लोक भूकंपांमुळे नव्हे तर कोसळणाऱ्‍या इमारतींमुळे मरतात” आणि बरेचदा हे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. पण भूकंपरोधक साहित्याचा वापर करून बांधकाम करण्याची ऐपत नसलेल्यांजवळ आणखी कोणता पर्याय आहे?

ज्वालामुखी—संरचनात्मक व विघातक

संयुक्‍त संस्थानांतील स्मिथसोनियन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात असे म्हटले आहे, की “तुमचे हे वाक्य वाचून पूर्ण होईपर्यंत जगात कोठे न कोठे कमीतकमी २० ज्वालामुखींचा उद्रेक होत असावा.” सर्वसामान्यपणे, भूपट्ट-विवर्तनिकीच्या सिद्धान्तानुसार भूकंप व ज्वालामुखी एकाच प्रकारच्या प्रदेशात घडतात; जेव्हा जमिनीला किंवा समुद्रतळाला भेग पडून पृथ्वीच्या पोटात खोलवर असलेल्या द्रवीभूत खडकाच्या थरातून शिलारस बाहेर पडतो. हे सहसा अशा ठिकाणी घडते जेथे दोन भूपट्ट एकमेकांना भिडतात व एक भूपट्ट दुसऱ्‍या भूपट्टाच्या खाली सरकतो.

दोन भूपट्ट जुळण्याच्या ठिकाणी घडलेले ज्वालामुखी लोकांकरता सर्वात धोकेदायक ठरतात. एकतर या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकांचे निरीक्षण केले जाते आणि दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी हे उद्रेक घडून येतात. पॅसिफिक महासागराला वेढणाऱ्‍या किनारपट्टीच्या प्रदेशांत आणि बेटांच्या मालिकेत शेकडो असे ज्वालामुखी आहेत, त्यामुळे या प्रदेशाला ‘पॅसिफिकचे ज्वालावलय’ असे नाव पडले आहे. प्रमुख भूपट्टांखेरीज इतर ठिकाणीही तुरळक प्रमाणात ज्वालामुखी विखुरलेले आढळतात. हवाई बेटे, अझोर बेटे, गालॅपागस बेटे व सोसायटी बेटे ही सर्व ज्वालामुखी क्रियांमुळेच निर्माण झाली आहेत असे दिसते.

खरे पाहता, पृथ्वीच्या इतिहासात पुरातन काळापासून ज्वालामुखींचे रचनात्मक योगदानही आहे. एका विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, “भूखंडांचा व समुद्री तळाचा ९० टक्के भाग ज्वालामुखीच्या क्रियेमुळे अस्तित्वात आला आहे.” पण मग काही उद्रेक अतिशय विध्वंसक का ठरतात?

ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी पृथ्वीच्या पोटातील तप्त शिलारस वर ढकलला जाऊ लागतो. काही ज्वालामुखींत केवळ लाव्हारस हळूहळू बाहेर पडतो. अगदी अनपेक्षितपणे तो सहसा येत नाही. पण इतर ज्वालामुखींच्या उद्रेकात अणू बॉम्बपेक्षा जास्त ऊर्जा विमुक्‍त होते! यामागचे कारण म्हणजे ज्वालामुखीत साठलेल्या शिलारसाचा घट्टपणा, तसेच निरनिराळ्या वायूंचे प्रमाण व त्यात मिसळलेले अतितप्त पाणी. हा तप्त शिलारस वर येऊ लागतो तसतसे त्यात विरघळलेल्या पाण्याचा व वायूंचा विस्तार वाढू लागतो. शिलारसाचा दाब विशिष्ट प्रमाणात वाढल्यावर, सोडावॉटरच्या बाटलीचे बूच उडावे तसा वरचा टोपण खडक उडवून देऊन शिलारस उसळून जमिनीवर सांडतो.

पण सहसा ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी त्याची पूर्वसूचना मिळते. १९०२ साली मार्टिनीक या कॅरिबियन बेटावरील माऊंट पेले येथे असेच घडले. जवळच्याच सेंट पिएर या शहरात निवडणूक येऊ घातली होती. त्यावेळी ज्वालामुखीतून राख बाहेर पडत होती, लोकांना त्यामुळे मळमळ होत होती व शहरात भीतीचे वातावरण होते तरीसुद्धा राजकीय पुढारी त्यांना शहरातच राहण्याचे प्रोत्साहन देत होते. बरीच दुकाने अनेक दिवस बंद ठेवण्यात आली होती!

मे ८ रोजी, कॅथलिकांचा असेंशन डे हा सण होता आणि बऱ्‍याच कॅथलिकांनी कॅथेड्रलमध्ये जाऊन ज्वालामुखीपासून बचावाकरता प्रार्थना केली. त्याच दिवशी सकाळी ८ च्या सुमारास माऊंट पेलेचा उद्रेक झाला आणि अतितप्त अग्निदलिक पदार्थ—राख, अंगार, ज्वालाकाच, स्पंजाश्‍म व तप्त वायूंचे लोट बाहेर फेकले गेले. या बाहेर पडणाऱ्‍या पदार्थांचे तापमान २०० ते ५०० अंश सेल्सियस इतके होते. उतारांवरून वेगाने धाव घेत हे काळे लोंढे शहरात वाहत गेले व काही क्षणांतच सेंट पिएर शहरातील ३०,००० लोक मृत्यूमुखी पडले, चर्चची घंटा वितळली व बंदरावर उभ्या असलेल्या जहाजांना आग लागली. २० व्या शतकातील हा सर्वात विध्वंसक उद्रेक होता. पण लोकांनी पूर्वसूचनांकडे लक्ष दिले असते तर इतका विध्वंस घडलाच नसता.

नैसर्गिक विपत्ती वाढणार का?

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस व रेड क्रिसेंट सोसायटीज यांनी प्रसिद्ध केलेल्या जागतिक विपत्ती अहवाल २००४ यात असे म्हटले आहे की मागील दशकात, भौगोलिक व हवामानाशी संबंधित विपत्ती ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. “यावरून दीर्घकालीन भविष्याचे चित्र स्पष्ट दिसते,” असे या वृत्तात म्हटले होते. हा अहवाल २६ डिसेंबर रोजी हिंद महासागरात आलेल्या सुनामींच्या आधी प्रकाशित करण्यात आला होता, हे विशेष. साहजिकच, धोक्याच्या क्षेत्रांत लोकवस्ती वाढतच राहिली आणि जंगलतोड अशीच सुरू राहिली तर भविष्याबद्दल आशावादी राहणे व्यर्थ आहे.

याशिवाय, अनेक औद्योगिक देश वातावरणात हानीकारक वायू सोडून, पृथ्वीचे तापमान वाढवण्यात हातभार लावत आहेत. सायन्स नियतकालिकात एका संपादकीय लेखानुसार, हे विषारी वायू वातावरणात सोडण्यावर आळा घालण्यास उशीर करणे हे “शरीरात पसरत चाललेल्या संसर्गावर औषध घेण्यास नकार देण्यासारखे आहे: आज ना उद्या त्याची भारी किंमत मोजावी लागेल हे निश्‍चित.” विपत्ती परिहाराविषयीच्या एका कनेडियन वृत्ताने या संदर्भात म्हटले: “हवामानातील बदल हा आंतरराष्ट्रीय मानवसमाजाने आजवर तोंड दिलेला सर्वात व्यापक व दीर्घकालीन परिणाम करू शकणारा पर्यावरणाचा प्रश्‍न आहे.”

सध्या परिस्थिती अशी आहे की, खरोखरच मानवी कार्यहालचालींमुळे पृथ्वीचे तापमान वाढण्यास हातभार लागतो का यावर आंतरराष्ट्रीय मानव समाजाचे एकमतसुद्धा नाही, मग यावर उपाययोजना करण्याची गोष्ट तर दूरची आहे. या परिस्थितीकडे पाहिल्यावर बायबलमध्ये व्यक्‍त केलेल्या या वस्तूस्थितीची आठवण होते, “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) तरीपण, पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत त्याप्रमाणे, परिस्थिती पूर्णपणे आशाहीन नाही. किंबहुना, मानवी समाज ज्या वादळी परिस्थितीत सापडला आहे त्यावरून उलट हेच सिद्ध होते की यातून मुक्‍तता मिळण्याचा काळ आता जवळ आला आहे. (g०५ ७/२२)

[तळटीप]

^ परि. 6 सूर्याच्या उष्णतेच्या कमी जास्त वाटपामुळे समुद्रातही आवर्त निर्माण होतात आणि अशारितीने उष्ण हवा थंड प्रदेशांकडे सरकते.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

मक्याच्या शेतात पर्वत उगवला!

मेक्सिकोत १९४३ साली, एका शेतकऱ्‍याला आपल्या मक्याच्या शेतात मका नव्हे, तर दुसरेच काहीतरी उगवत असल्याचे दिसले. शेतात काम करताना त्याला जमिनीत भेगा पडल्याचे दिसले. दुसऱ्‍या दिवशी त्यांचा आकार वाढून तेथे एक लहानसा ज्वालामुखी तयार झाला होता. पुढच्या आठवड्यात हा शंकू ५०० फूट इतका वाढला आणि एका वर्षानंतर १,२०० फूट! शेवटी, समुद्रसपाटीपासून ९,१०० फुटापर्यंत वाढलेला हा शंकू १,४०० फूट वाढला. पॅरिक्युटिन असे नाव पडलेला हा ज्वालामुखी १९५२ साली अचानक शांत झाला आणि तेव्हापासून तो शांतच आहे.

[चित्राचे श्रेय]

◀ U. S. Geological Survey/Photo by R. E. Wilcox

[८ पानांवरील चौकट/चित्र]

देवाने जेव्हा राष्ट्रांना विपत्तीपासून वाचवले

दुष्काळ ही एक प्रकारची नैसर्गिक विपत्तीच आहे. इतिहासात नोंदलेल्या अगदी पहिल्या दुष्काळांपैकी एक, याकोब किंवा इस्राएल याचा पुत्र योसेफ याच्या काळादरम्यान प्राचीन ईजिप्तमध्ये आला होता. हा दुष्काळ सात वर्षे राहिला आणि ईजिप्त, कनान व इतर देशांच्या लोकांना याचा फटका बसला. पण यामुळे मोठ्या संख्येने लोकांची उपासमार झाली नाही कारण यहोवाने सात वर्षांआधीच या दुष्काळाविषयी भाकीत केले होते. तसेच या मधल्या सात वर्षांत ईजिप्तमध्ये भरपूर पीक उगवेल असेही त्याने भाकीत केले होते. देवाला भिणारा योसेफ, देवाच्याच मार्गदर्शनाने ईजिप्तचा प्रधानमंत्री व अन्‍नधान्याचा मुख्याधिकारी बनला होता व याच्या नेतृत्त्वाखाली ईजिप्तच्या लोकांनी इतके धान्य साठवून ठेवले की शेवटी त्यांनी ते “मोजावयाचे सोडिले.” अशारितीने ईजिप्त हे राष्ट्र स्वतःच्याच प्रजेला नव्हे तर ‘देशोदेशीच्या लोकांना’ अन्‍न पुरवू शकले. यात योसेफच्या घराण्याचाही समावेश होता.—उत्पत्ति ४१:४९, ५७; ४७:११, १२.

[७ पानांवरील चित्रे]

हैटी२००४ मुले पुराच्या पाण्यातून मार्ग काढत लोकांना पिण्याचे पाणी पुरवत आहेत. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्यामुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या

[चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी: Sophia Pris/EPA/Sipa Press; आतील चित्र: Carl Juste/Miami Herald/Sipa Press

[९ पानांवरील चित्र]

अनेक देश आजही वातावरणात हानीकारक वायू सोडत आहेत

[चित्राचे श्रेय]

© Mark Henley/Panos Pictures