व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का?

बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का?

बायबलचा दृष्टिकोन

बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का?

“सैतान आत शिरतो ते द्वार,” असे टर्टुलियन या तिसऱ्‍या शतकातल्या धर्मवेत्त्याने एकदा आपल्या लिखाणात स्त्रियांचे वर्णन केले. इतरांनी, स्त्रियांचा पुरुषांपेक्षा कमी दर्जा आहे हे दाखवण्यासाठी बायबलचा उपयोग केला आहे. त्यामुळे बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते असे पुष्कळ लोकांना वाटते.

“बायबल आणि चर्च हे स्त्रियांच्या मुक्‍तीच्या आड येणारे दोन सर्वात मोठे अडथळे आहेत,” असे एकोणीसाव्या शतकातील संयुक्‍त संस्थानामधील महिलांच्या हक्कासाठी झटणाऱ्‍या कार्यकर्त्या एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन यांना वाटले. बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांविषयी स्टॅन्टन एकदा असे म्हणाल्या: “मला अशी इतर कोणतीच पुस्तके माहीत नाहीत जी इतक्या कडकरीत्या स्त्रियांच्या अधिनतेविषयी किंवा त्यांच्या मानहानीविषयी शिकवतात.”

आज कदाचित फार कमी लोकांचा असा टोकाचा दृष्टिकोन असेल; तरीपण बायबलच्या काही भागात स्त्रियांबद्दल दुजाभाव व्यक्‍त केला आहे असे पुष्कळ लोकांना वाटते. हा निष्कर्ष रास्त आहे का?

इब्री शास्त्रवचनांत स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन

“तुझा ओढा नवऱ्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.” (उत्पत्ति ३:१६) टीकाकार या वचनाकडे बोट दाखवून, देवाने हव्वेचा न्याय केला आणि पुरुषाला स्त्रीवर स्वामित्व गाजवायला परवानगी दिली असे म्हणतात. परंतु, हे वचन देवाच्या उद्देशांतील केवळ एक वाक्य नसून ते पापाच्या व देवाच्या सार्वभौमत्त्वाला नाकारल्याचे दुःखदायक परिणामांचे अचूक वाक्य आहे. स्त्रियांशी केला जाणारा दुर्व्यवहार, देवाच्या इच्छेचा नव्हे तर मानवजातीच्या अपरिपूर्णतेचा थेट परिणाम आहे. होय, अनेक समाजांमध्ये स्त्रियांवर त्यांचे पती हक्क गाजवतात आणि तोही अतिशय कठोरतेने. पण हा देवाचा उद्देश नव्हता.

आदाम आणि हव्वा या दोघांनाही देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. शिवाय त्या दोघांनाही, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा ही देवाकडून सारखीच आज्ञा मिळाली होती. त्यांना संघ या नात्याने एकत्र काम करायचे होते. (उत्पत्ति १:२७, २८) त्यावेळेला कोणीही कोणावर कठोरतेने वर्चस्व गाजवत नव्हते. उत्पत्ति १:३१ म्हणते: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”

काही बाबतीत बायबल अहवाल आपल्याला, एखाद्या विशिष्ट विषयावर देवाचा काय दृष्टिकोन आहे ते सुचवत नाही. ते कदाचित फक्‍त ऐतिहासिक अहवाल असतील. लोट आपल्या मुली सदोमकरांना देऊ करतो हा अहवाल, हे नैतिकरीत्या बरोबर होते किंवा चूक किंवा देवाने याला अनुमती दिली किंवा नाही याविषयी काही सांगत नाही. *उत्पत्ति १९:६-८.

खरे पाहता, देवाला सर्वप्रकारच्या शोषणाची आणि गैरफायदा घेणाऱ्‍याची किळस वाटते. (निर्गम २२:२२; अनुवाद २७:१९; यशया १०:१, २) मोशेच्या नियमशास्त्राने बलात्कार आणि वेश्‍याव्यवसाय यांचे खंडन केले. (लेवीय १९:२९; अनुवाद २२:२३-२९) जारकर्मास मनाई होती आणि जारकर्म करणाऱ्‍या स्त्रीपुरूषाला मृत्यूची शिक्षा होती. (लेवीय २०:१०) स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवण्याऐवजी नियमशास्त्राने स्त्रियांना आदरभाव दाखवला आणि आसपासच्या राष्ट्रांत सर्रास चालत असलेल्या स्त्रियांच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण केले. एका सद्‌गुणी यहुदी पत्नीला, माननीय, प्रतिष्ठित व्यक्‍ती समजले जायचे. (नीतिसूत्रे ३१:१०, २८-३०) स्त्रियांना आदर दाखवण्याच्या बाबतीत असलेल्या देवाच्या नियमाचे इस्राएलांनी पालन केले नाही त्यात त्यांची चूक होती; देवाची नव्हे. (अनुवाद ३२:५) कालांतराने, देवाने इस्राएल राष्ट्राला त्याच्या घोर अवज्ञाकारक मनोवृत्तीमुळे न्यायदंड बजावून त्याला शिक्षा केली.

अधीनता दाखवण्यास सांगणे दुजाभाव आहे का?

कोणताही समाज, शिस्त असल्यास सुरळीत कार्य करू शकतो. यासाठी कोणाला तरी अधिकार गाजवावा लागतोच. अधिकार नसल्यास गोंधळ माजणे निश्‍चित. “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.”—१ करिंथकर १४:३३.

प्रेषित पौलाने कुटुंबात असलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेचे अशाप्रकारे वर्णन केले: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) देवाला सोडून बाकी प्रत्येक व्यक्‍ती एका उच्च अधिकाराच्या अधीन आहे. येशूला मस्तक आहे मग याचा अर्थ त्याच्याबद्दल दुजाभाव दाखवला जात आहे, असा होतो का? मुळीच नाही! शास्त्रवचनांनुसार पुरुषांना मंडळीत आणि कुटुंबात पुढाकार घेण्यास नेमण्यात आले आहे याचा अर्थ, स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवला जात आहे, असा मुळीच होत नाही. कुटुंबाची आणि मंडळीची भरभराट व्हायची असेल तर स्त्रीपुरुष या दोघांनी आपापली भूमिका प्रेम आणि आदराने पार पाडली पाहिजे.—इफिसकर ५:२१-२५, २८, २९, ३३.

येशूने नेहमी स्त्रियांना आदराने वागवले. दुजाभाव व्यक्‍त करणाऱ्‍या परंपरा आणि नियम जे परुशी शिकवत होते त्यांचे येशूने पालन करण्यास नकार दिला. तो गैरयहुदी स्त्रियांबरोबर बोलत असे. (मत्तय १५:२२-२८; योहान ४:७-९) त्याने स्त्रियांना शिकवले. (लूक १०:३८-४२) त्याने शिकवलेल्या तत्त्वांमुळे, स्त्रियांचा त्याग होण्यापासून त्या वाचल्या. (मार्क १०:११, १२) येशूने त्याच्या काळात सर्वात धाडसी पाऊल उचलले; त्याने, स्त्रियांचाही आपल्या निकट स्नेह्‍यांमध्ये समावेश केला. (लूक ८:१-३) देवाच्या सर्व गुणांचे हुबेहूब प्रतिबिंब करणाऱ्‍या येशूने दाखवून दिले की देवाच्या नजरेत स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत. खरे पाहता, आरंभीच्या ख्रिश्‍चनांमध्ये, पुरुषांना तसेच स्त्रियांनाही पवित्र आत्म्याचे दान मिळाले. (प्रेषितांची कृत्ये २:१-४, १७, १८) ख्रिस्ताबरोबर राजे व याजक म्हणून सेवा करण्याची आशा असलेले अभिषिक्‍त जण स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले जातात तेव्हा त्यांच्यात लिंगभेद नसतात. (गलतीकर ३:२८) बायबलचा लेखक अर्थात यहोवा देव स्त्रियांबद्दल दुजाभाव बाळगत नाही. (g०५ ११/८)

[तळटीप]

^ परि. 9 टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १, २००५, पृष्ठे २५-६ पाहा.

[१८ पानांवरील चित्र]

येशू त्याच्या काळातल्या बहुतेक लोकांपेक्षा वेगळा होता; त्याने स्त्रियांना आदराने वागवले