व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का?

मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का?

तरुण लोक विचारतात . . .

मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का?

“माझी जिच्याबरोबर मागणी झाली आहे ती मुलगी म्हणजे सिंडी मला म्हणाली, की आपण पळून जाऊ या आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराला व नातेवाईकांना न सांगता लग्नाचा लहानसा कार्यक्रम आटपून टाकू या. यावर आणखी चर्चा केल्यावर आम्हा दोघांनाही वाटलं, की यामुळे वेळेची बचत होईल, दगदगही वाचेल.”—ॲलन. *

तुम्ही लग्नाच्या वयाचे झाला आहात आणि तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडला आहात तर, गपचूप पळून जाऊन लग्न करण्याचा मार्ग तुम्हाला सोईस्कर वाटेल. काही परिस्थितीत तर, एखादी जोडी आपल्या आईवडिलांना काहीही न सांगता पळून जाऊन लग्न करेलही. पण कोणती तत्त्वे तुम्हाला, तुम्ही काय करावे व काय करू नये हे ठरवण्यास मदत करू शकतील?

रूढीप्रमाणे विवाह होणे अधिक महत्त्वाचे आहे का?

बहुतेक समाजांत विवाह ही सर्वसामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येक समाजांतील विवाहसोहळ्यांत फरक असतो. ख्रिश्‍चनांकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांचा विवाह स्थानीय रूढीतील प्रत्येक आचारपद्धतींनुसार होत आहे, ही नाही. (रोमकर १२:२) तर त्यांची प्रमुख इच्छा, लग्नाआधीच्या त्यांच्या गाठीभेटी आणि विवाह यांद्वारे यहोवा देवाचा गौरव होतो की नाही हे पाहणे आहे.—१ करिंथकर १०:३१.

विवाह ही एक आदरणीय व्यवस्था असल्यामुळे बहुतेक जोडपी ती गुप्त ठेवू इच्छित नाहीत. अनेक पाश्‍चिमात्य देशांत, यहोवाच्या साक्षीदारांतील जोडपी सहसा आपल्या विवाहसोहळ्याची व्यवस्था स्थानीय राज्य सभागृहात करतात. * त्यानंतर कदाचित ते रिसेप्शन पार्टी ठेवून आपल्या कुटुंबाबरोबर व मित्रपरिवाराबरोबर भोजनाची व काही मनोरंजनाची व्यवस्था करतील. असे प्रसंग भपकेदार असण्याची आवश्‍यकता नाही. मान्य आहे, की विवाहसोहळ्याची व रिसेप्शन पार्टीची योजना करणे दगदगीचे व खर्चिक असू शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेत रिसेप्शन पार्ट्यांचा हजारो डॉलरमध्ये खर्च होऊ शकतो.

काही जोडप्यांनी दगदग आणि खर्च वाचवण्यासाठी एक सोपा उपाय शोधून काढला आहे. सिंडी म्हणते: “आम्ही रूढीप्रमाणे लग्नसोहळा ठेवणार नाही, कारण आमचा विवाहसोहळा साधा आणि कमी खर्चाचा असला पाहिजे, असं आम्ही दोघांनी आमच्या आईवडिलांना सांगितलं. माझ्या आईबाबांनी आम्हाला खात्री दिली, की त्यांना आमची परिस्थिती आणि आम्हाला असलेली काळजी समजली. त्यांनी आम्हाला साथ दिली.” पण सिंडीची मागणी ज्याच्याबरोबर झाली होती त्या ॲलनने जेव्हा, त्याने व सिंडीने आपल्या विवाहाच्या योजनांविषयी आपल्या आईवडिलांना सांगितले तेव्हा त्यांना, या दोघांनी असा निर्णय का घेतला होता हे समजले नाही. “त्यांना वाटलं, की आमच्याच एखाद्या चुकीमुळे कदाचित त्यांनी असा निर्णय घेतला असावा. पण तसं काहीही नव्हतं,” असे ॲलन म्हणाला.

तुम्हीसुद्धा तुमचा विवाहसोहळा साधा ठेवण्याचा निर्णय घेतला तर कदाचित तुमचे आईवडील नाराज होतील; त्यांना वाटेल, की लग्नासारख्या गोष्टी सारख्या सारख्या होत नसल्यामुळे शक्य तितक्या लोकांना आपल्या आनंदात आपण सहभागी केले पाहिजे. आणि तुमच्या लग्नाला तुमच्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे तुम्ही त्यांना न सांगता लग्न करू इच्छित असाल तर काय?

आपल्या कुटुंबाच्या भावनांचा विचार करा

तुमचे आईवडील तुमच्या लग्नाला विरोध करतात ते कदाचित त्यांना असे वाटत असल्यामुळे, की तुम्ही इतका मोठा निर्णय घेण्यासाठी अद्याप लहान आहात. त्यांना अशी भीती वाटते, की तुम्ही प्रौढ झाल्यावर तुमच्या आवडीनिवडी बदलतील आणि तेव्हा तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विवाहसोबत्याच्या बाबतीत पस्तावा होईल. किंवा कदाचित ते तुम्हाला, तुम्ही लग्नासाठी तयार आहात असे समजतील परंतु तुमचे ज्या व्यक्‍तीवर प्रेम आहे त्या व्यक्‍तीत त्यांच्या मते काही अवगुण असतील. किंवा, तुम्ही निवडलेला सोबती तुमच्यासारखे धार्मिक विश्‍वास बाळगत नसल्यामुळे ते तुम्हाला त्याच्याशी/तिच्याशी विवाह करण्यास मनाई करतील.

तुमचे आईवडील खरे ख्रिस्ती असल्यास, त्यांच्याकडे चिंता करण्याचे बायबल-आधारित रास्त कारण आहे. त्यांच्या मनात असलेल्या शंकाकुशंका व्यक्‍त करणे अगदी योग्य आहे. आणि त्यांनी जर असे केले नाही तर यहोवा त्यांना बेजबाबदार व त्यांचे तुमच्यावर प्रेम नाही, असे समजेल. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन समजून घेणे यात तुमचाच फायदा आहे.—नीतिसूत्रे १३:१, २४.

समजा: तुम्ही कपडे विकत घेता तेव्हा तुम्हाला ते कपडे चांगले दिसतात की नाही हे कोणीतरी तुम्हाला सांगावे असे वाटते. तुम्हाला नेहमीच त्यांचे मत पटणार नाही तरीपण तुमच्या जवळच्या मित्राने अगर मैत्रिणीने तुम्हाला ते कपडे किंवा ती स्टाईल सूट होते किंवा नाही हे सांगितलेले आवडेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची तुम्हाला किंमत असते कारण ते तुम्हाला पैसा वाया घालवण्यापासून वाचवू शकतात. मग, विवाह सोबत्याच्या तुमच्या निवडीविषयी तुमच्या घरच्यांच्या मताची कदर करणे अगत्याचे नाही का? तुम्ही कपडे बदलून आणू शकता किंवा टाकून देऊ शकता परंतु तुमच्या विवाह सोबत्याशी तुम्ही आमरण जडून राहिले पाहिजे, अशी यहोवा तुमच्याकडून अपेक्षा करतो. (मत्तय १९:५, ६) अंगाला घट्ट चिकटणारे कपडे घातले तर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता परंतु त्याही पेक्षा मानसिक अस्वस्थता तेव्हा येऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाशी व आध्यात्मिकतेशी न जुळणारा विवाह सोबती निवडता. (उत्पत्ति २:१८; नीतिसूत्रे २१:९) एवढेच नव्हे तर, तुम्ही खरा आनंद मिळवण्याची संधी देखील गमावलेली असेल.—नीतिसूत्रे ५:१८; १८:२२.

हे खरे आहे, की काही पालक स्वार्थी कारणांपोटी आपल्या मुलांच्या विवाहाला विरोध करतील; कदाचित ते आपल्या मुलांवर पूर्णपणे ताबा ठेवू इच्छितात. पण, आपले पालक स्वार्थी कारणांसाठी चिंता करतात असा विचार करून पळून जाऊन लग्न करण्याआधी ते आक्षेप का घेतात हे पडताळून पाहणे उत्तम ठरेल, नाही का?

सावधगिरी बाळगण्यामागची कारणे

तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतशा तुमच्या आवडीनिवडी बदलत राहतील, ही एक वस्तुस्थिती आहे. प्रेषित पौल लिहितो: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.” (१ करिंथकर १३:११) तसेच, तुम्ही किशोर असताना दुसऱ्‍या व्यक्‍तीचे गुण तुम्हाला आवडतील, पण तुम्ही मोठे झाल्यावर कदाचित तुमच्या आवडीनिवडी फारच वेगळ्या असतील. म्हणूनच बायबल तुम्हाला “तारुण्याचा बहर ओसरेपर्यंत” म्हणजेच तुमच्या लैंगिक इच्छा जेव्हा अतिशय तीव्र असतात ती वर्षे सरेपर्यंत विवाह सोबती निवडण्याची घाई करू नये असे सुचवते.—१ करिंथकर ७:३६, NW.

पण तुमचे आईवडील तुम्ही निवडलेल्या सोबत्यात काही अवगुण पाहतात तेव्हा काय? तुमच्या पालकांना जीवनात जास्त अनुभव असल्यामुळे त्यांच्या ज्ञानेंद्रियांना बरोबर काय व चूक काय यांतील फरक समजण्याचा सराव झालेला असतो. (इब्री लोकांस ५:१४) त्यामुळे तुम्ही निवडलेल्या सोबत्याच्या व्यक्‍तिमत्त्वात त्यांना असे अवगुण दिसतील जे कदाचित तुम्हाला दिसणार नाहीत. सुज्ञ मनुष्य शलमोन याने जे तत्त्व सांगितले त्यावर अंमळ विचार करा: “जो आपला दावा प्रथम मांडितो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावितो.” (नीतिसूत्रे १८:१७) तसेच, तुम्ही ज्या व्यक्‍तीवर प्रेम करता त्या व्यक्‍तीने तुमची खात्री पटवलेली असते की ती किंवा तो तुमच्यासाठी योग्य साथीदार आहे. परंतु, तुमच्या पालकांनी तुमच्या साथीदाराला ‘कसास लावल्यानंतर’ ते काही गोष्टी तुमच्या निर्दशनास आणून देतील ज्यावर विचार करणे सुज्ञपणाचे ठरेल.

उदाहरणार्थ, ते तुम्हाला “केवळ प्रभूमध्ये” लग्न करा या बायबलमधील खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी असलेली आज्ञा बजावून सांगतील. (१ करिंथकर ७:३९) पण तुम्ही यावर आक्षेप घेऊन म्हणाल, की अमूक एकाने ख्रिस्ती विश्‍वास नसलेल्या व्यक्‍तीबरोबर लग्न केले तरीपण ते आता यहोवाची आनंदाने सेवा करत आहेत. असे घडू शकते, हे कबूल आहे. परंतु असे फार तुरळक वेळा घडते. तुमच्यासारखा धार्मिक विश्‍वास नसलेल्या व्यक्‍तिबरोबर तुम्ही लग्न केले तर तुम्ही यहोवाच्या स्तरांचा अनादर करताच शिवाय स्वतःला तीव्र आध्यात्मिक धोक्यात घालता.—२ करिंथकर ६:१४. *

लग्न करण्यासाठी मूर्ख कारण

काही तरुण पळून जाऊन लग्न करतात कारण ते अनैतिक वर्तनात गुरफटले आहेत आणि त्यांना वाटते, की ज्या व्यक्‍तीबरोबर त्यांचे अनैतिक संबंध आहेत तिच्याशी लग्न करून ते आपला विवेक शुद्ध करू शकतात. किंवा आपल्या पापाचे परिणाम झाकण्यासाठी जसे की अनियोजित गर्भधारणा लपवण्यासाठी ते पटकन लग्न करतात.

तुम्ही जर एक पाप झाकण्यासाठी लग्न करत असाल तर तुम्ही दुसरी चूक करून परिस्थिती आणखी बिघडवाल. शलमोनाने असा इशारा दिला: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीतिसूत्रे २८:१३) शलमोनाचे आईवडील, बथशेबा आणि दावीद यांना, आपले अनैतिक कृत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात किती मूर्खपणा आहे हे समजले होते. (२ शमुवेल ११:२–१२:२५) आपले पाप लपवून ठेवण्याऐवजी आपल्या पालकांशी आणि मंडळीतील वडिलांशी याविषयी बोला. असे करण्यासाठी तुम्हाला धैर्य एकवटावे लागेल परंतु तुम्ही जर मनापासून पश्‍चात्तापी असाल तर यहोवा निश्‍चित तुम्हाला क्षमा करेल हा भरवसा तुम्ही बाळगू शकता. (यशया १:१८) आणि मग तुमचा विवेक शुद्ध झाल्यावर तुम्ही विवाहाबद्दल संतुलित निर्णय घेण्यास तयार व्हाल.

पस्तावा होण्याची पाळी टाळा

आपल्या विवाहाविषयी सांगताना ॲलन म्हणतो: “साधा विवाहसोहळा ठेवल्यामुळे आमची बरीच दगदग वाचली. पण मला एका गोष्टीची खंत वाटते, ती ही की मी माझ्या कुटुंबाला, आम्ही असा निर्णय का घेतला होता हे समजावून सांगू शकलो नाही.”

होय, एका प्रौढ दांपत्याने रूढीप्रमाणे विवाह करावा की नाही ही पूर्णपणे व्यक्‍तिगत बाब आहे. पण, विवाहाविषयी कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका, आपल्या कुटुंबाबरोबर याविषयी चर्चा करा आणि “नीट पाहून पाऊल” टाका. तुमच्यावर, पस्तावा होण्याची पाळी येण्याचे तुम्ही टाळू शकाल.—नीतिसूत्रे १४:१५. (g०५ ११/२२)

[तळटीपा]

^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 7 ही उपासनास्थळे यहोवाच्या साक्षीदारांच्या विवाहांसाठी उत्तम ठिकाणे आहेत. येथे होणारा सोहळा साधाच असतो. तेथे बायबल तत्त्वांवर संक्षिप्त चर्चा केली जाते. ही बायबल तत्त्वे उत्तम विवाहासाठी पाया ठरतात. अर्थात राज्य सभागृहाचे भाडे घेतले जात नाही.

^ परि. 18 या विषयावर अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर टेहळणी बुरूज जुलै १, २००४, पृष्ठे ३०-१ आणि जून १, १९९०, पृष्ठे १२-१६ पाहा.

[२५ पानांवरील चित्र]

लग्न करण्याविषयी कोणतेही निर्णय घेताना, आपल्या कुटुंबाबरोबर याची चर्चा करा