वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
फिलिपाईन्समधील सावध राहा! लेखकाकडून
इशारा: अनेक मोठ्या शहरांत साथ चालली आहे. ही साथ कुठल्याही संसर्गजन्य रोगाची किंवा फस्त करणाऱ्या हानीकारक कीटकांची धाड नाही. तरीपण, या साथीमुळे कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. मग नेमकी काय आहे ही साथ? ही, स्वयंचलित वाहनांच्या कोंडीची साथ आहे!
संशोधकांच्या मते, वाहनांच्या कोंडीत सतत अडकल्याने तुमच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होऊ शकतात. वाहतुकीच्या कोंडीत किमान एक तासभर जरी अडकलो तरी हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो, असे अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात सुचवण्यात आले. “कारच्या धुराड्यातून येणारा धूर, ध्वनी आणि तणाव ही, हृदयविकाराचा धोका वाढण्यामागची मुख्य कारणे असू शकतात,” असे द न्यू झीलंड हेराल्ड या बातमीपत्राने अहवाल दिला.
हवेतील विषारी वायू
बहुतेक मोटार गाड्यांतून, नायट्रोजन ऑक्साईड आणि कर्करोगास कारणीभूत असलेले पदार्थ बाहेर पडत असतात. पुष्कळ वाहने आणि खासकरून डिझेलवर धावणारी वाहने, मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म कण बाहेर सोडतात. यांमुळे लोकांच्या आरोग्याला धोका संभावतो. हवेतील प्रदुषणामुळे दर वर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू होतो, असा अंदाज लावला जातो. यांतील बहुतेक प्रदूषित हवा मोटार गाड्यांतून येते. एका अहवालात असे म्हटले आहे, की युरोपियन मुलांतील १० टक्के श्वसनाचे आजार, सूक्ष्म कणांच्या प्रदूषणामुळे होतात; आणि वाहनांची कोंडी असलेल्या शहरात तर आजारांचे प्रमाण आणखी आहे.
पृथ्वीच्या वातावरणावर होत असलेल्या दुष्परिणामांचा देखील विचार करा. वाहनांच्या धुराड्यातून निघणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडमुळे ॲसिडयुक्त पाऊस पडतो ज्यामुळे नद्या दूषित होतात, जलचरांवर हानीकारक परिणाम होतात आणि अनेक वनस्पतींची नासाडी होते. भरीत भर म्हणजे, वाहनांतून मोठ्या प्रमाणावर कार्बन डॉयऑक्साईडही बाहेर पडतो. हाच वायू प्रामुख्याने, ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे असे म्हटले जाते ज्यामुळे पृथ्वी ग्रहासाठी इतर धोकेही उत्पन्न होत आहेत.
एकावर एक अपघात
वाहतूक वाढल्याने मानव जीवाला धोका वाढतो. दर वर्षी दहा लाखापेक्षा अधिक लोक अपघातात आपला प्राण गमावतात; आणि या संख्येत घट होत असल्याचे काही चिन्ह दिसत नाही. काही क्षेत्रांत तर धोका विशेषकरून जास्त आहे. उदाहरणार्थ, युरोपियन कमिशनच्या संशोधकांना दिसून आले, की “ग्रीसमध्ये, दर दहा लाख रहिवाशांमागे ६९० लोकांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू होतो तर स्वीडनमध्ये १२० लोकांचा.”
अलिकडील वर्षांत अधिक चिंतेचा विषय बनला आहे तो वाहन चालकांचा क्रोध. एक वाहन चालक दुसऱ्या चालकावर क्रोधीत झाल्याच्या बातम्या सर्रास ऐकायला मिळतात. संयुक्त संस्थानांतील राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा मंडळाने घेतलेल्या एका सर्व्हेनुसार, चालकांच्या वाढत्या आक्रमक वृत्तीमागचे एक कारण, “वाढती वाहतूक किंवा कोंडी” हे होते.
आर्थिक पीडा
वाहतुकीच्या कोंडीमुळे पैशाचा देखील अपव्यय होतो. एका अभ्यासात असे दिसून आले, की लॉस
अँजिलिसमधील एकट्या कॅलिफोर्नियात एका वर्षात वाहतुकीच्या दिरंगाईमुळे ४०० कोटीपेक्षा अधिक लिटर इंधन वाया घालवले जाते. यात अप्रत्यक्ष हानी देखील आहे; जसे की, नोकरीची संधी गमावणे, प्रदुषणामुळे आरोग्यावर जादा खर्च आणि वाहतुकीच्या वाढत्या अपघातांमुळे होणारे दुष्परिणाम.वाहतुकीच्या कोंडीमुळे होणाऱ्या एकूण हानीचा फटका राष्ट्रीय आर्थिकतेला बसतो. दर वर्षी, वाहतुकीच्या कोंडीमुळे वेळ आणि इंधन वाया जाते व यामुळे अमेरिकन लोकांना सुमारे ४.६ लाख कोटी रुपयांचा फटका बसत आहे, असे एका अभ्यासावरून दिसून आले. आशियात फिलिपाईन स्टार नावाच्या बातमीपत्रात असे म्हटले होते: “टॅक्सी मीटरचा काटा जसा सतत वाढत जातो तसेच देशाला वाहनांच्या कोंडीमुळे दर वर्षी कोट्यवधी पेसोस मोजावे लागतात.” युरोपात सुमारे एक लाख कोटीच्या एक चतुर्थांश युरोस (सुमारे १० लाख कोटी) खर्च होतो, असा अंदाज लावला जातो.
वाहतुकीचे भविष्य काय आहे?
वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या नादात परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिकट झाली आहे. संयुक्त संस्थानातील ७५ ग्रामीण क्षेत्रफळाच्या टेक्सास वाहतूक इन्स्टिट्यूटने घेतलेल्या सर्व्हेत असे दिसून आले, की वाहतुकीत अडकलेल्या व्यक्तीचा वेळ १९८२ मध्ये दर वर्षी सरासरी १६ तासांपासून २००० पर्यंत ६२ तासांपर्यंत वाढला. दिवसातून ४.५ ते ७ तासांपर्यंत प्रवाशांना वाहतुकीच्या कोंडीत अडकून राहावे लागणार आहे. अहवाल म्हणतो: “अभ्यासल्या जाणाऱ्या सर्व ग्रामीण क्षेत्रफळात वाहतुकीच्या कोंडीची पातळी वाढली आहे. कोंडीचा वेळ लांबत चालला आहे आणि आता तर अनेक रस्त्यांवर याचा परिणाम होत आहे. शिवाय पूर्वीपेक्षा आता प्रवासामुळे अधिक वाहतूक वाढली आहे.”
दुसऱ्या देशांतूनही असेच अहवाल मिळत आहेत. “आपण आपल्या वाहतुकीच्या पद्धतीत आताच बदल केला नाही तर पुढच्या दशकात वाहतुकीच्या कोंडीत शहरेच्या शहरे गुदरमरून जातील,” असे युरोपियन कमिशनच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संशोधकांचे अभ्यासाअंती मत बनले आहे.
आशियाई राष्ट्रांतही परिस्थिती काही वेगळी नाही. टोकियो वाहतुकीच्या कोंडीसाठी कुविख्यात आहे आणि जपानमधील इतर शहरांत वाहतूक वाढत चालली आहे. फिलिपाईन्समध्ये, पुढे सांगितल्यासारख्या बातम्या सर्रास पाहायला मिळतात; जसे की मनीला बुलेटीन या बातमीपत्रात छापून आलेली ही बातमी वाचा: “रस्त्यांवर वाहने खचाखच भरली आहेत; कामाला जाणारे किंवा कामाहून येणारे हजारो प्रवासी वाढत्या गर्दीच्या वेळी लिफ्ट मिळते का म्हणून रस्त्यावर ताटकळत उभे आहेत.”
वास्तविक पाहता, असे म्हणावे लागते, की सध्या तरी वाहतुकीच्या समस्येवर पूर्ण तोडगा नाही असेच दिसते. ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे—गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी (इंग्रजी) पुस्तकाचे लेखक ॲन्थोनी डाऊन्झ या निष्कर्षास पोहंचले: “भवितव्यातील वाहतूक कोंडीवर कोणतेही सार्वजनिक धोरण स्वीकारण्यात आले तरीसुद्धा, जगाच्या सर्व भागात ही समस्या बळावतच जाणार आहे असे दिसते. त्यामुळे माझा शेवटचा सल्ला असा आहे: या गोष्टीची स्वतःला सवय करून घ्या.”
तुम्ही काय करू शकता?
हे सर्व पाहता, पारा चढवणाऱ्या या समस्येला तोंड देण्याकरता तुम्ही काय करू शकता? ट्रॅफिकमध्ये नेहमी अडकणाऱ्या कोट्यवधी लोकांपैकी तुम्ही एक असाल तर, तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.
▪तयार असा. पुष्कळ लोक ट्रॅफिक जॅममध्ये अडकायच्या आधीच तणावग्रस्त असतात. ते सकाळी उशिरा उठतात. त्यानंतर घाईगडबडीत, आंघोळ, आवरणे, नाश्ता खाणे होते. कामाला उशिरा पोहंचण्याचे टेन्शन. त्यात ही वाहतुकीची कोंडी त्यांच्या टेन्शनमध्ये आणखी भर टाकते. तुम्हाला जर माहीत आहे की अमूक वेळेला वाहतूक वाढते तर तुम्ही घरातूनच लवकर निघाले पाहिजे. लवकर निघाल्याने तुम्ही कदाचित वाहतुकीची वर्दळ वाढायच्या आधीच जाऊ शकता. दैनंदिन प्रवासाचा तणाव
—कारणे, परिणाम आणि उपाय, (इंग्रजी) नावाच्या पुस्तकानुसार, “कमी तणावपूर्ण प्रवास, दिवसाची किंवा रात्रीची सुरुवात आदल्या दिवशीच होते.” त्या पुस्तकात आणखी पुढे म्हटले आहे: “दुसऱ्या दिवसाचे कपडे, ब्रिफकेस, प्रवास करणाऱ्यांचा किंवा मुलांचा डबा आदल्या रात्रीच तयार केला जातो जेणेकरून सकाळी घाई होत नाही.” आणखी एक गोष्ट, रात्री चांगली झोप सर्वात महत्त्वाची आहे. सकाळी लवकर उठण्याकरता तुम्ही रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे.सकाळी लवकर उठण्याचे इतरही फायदे आहेत. उदाहरणार्थ, ट्रॅफिक जॅममध्ये पुष्कळ वेळ अडकून पडल्यामुळे तुमच्या स्नायूंवर ताण पडून त्यांची लवचिकता कमी होऊ शकते. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जमत असेल तर सकाळी तुम्ही व्यायाम करू शकता. नियमित व्यायाम केल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता, ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यामुळे येणारा थकवा तुम्ही घालवू शकता. लवकर उठल्याने तुम्हाला पोषक नाश्ता खायला वेळ मिळतो. बाहेरचे तळणीचे पदार्थ (जंक फूड) खाऊन किंवा अनुशापोटी ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने तुमच्या तणावाची पातळी आणखी वाढू शकते.
तुमचे वाहन उत्तम स्थितीत आहे की नाही याची खात्री केल्याने देखील तुम्ही जादा तणाव टाळू शकता. ट्रॅफिक जॅममध्ये तुमचे वाहन बंद पडणे हे अधिक चीड आणणारे आहे. आणि वादळी हवामानात जर असे झाले तर काही विचारूच नका. यास्तव, तुमच्या वाहनाचे ब्रेक, टायर, एअरकंडिशनर, हिटर, विंडशील्ड वायपर, डिफ्रॉस्टर आणि इतर महत्त्वपूर्ण भागांची चांगल्याप्रकारे तपासणी करा. खोळंबलेल्या ट्रॅफिकमध्ये लहानसा अपघात देखील मोठा तणाव निर्माण करू शकतो. आणखी एक गोष्ट, तुमच्या वाहनाच्या टाकीत पुरेसे इंधन आहे याची नेहमी खात्री करा.
▪माहिती काढा. घरातून निघण्याआधी तुम्ही काही खास गोष्टींची माहिती काढू शकता जसे की, दिवसभराचे हवामान कसे असेल, कोणत्या रस्त्याचे बांधकाम चालले आहे, कोणते रस्ते तात्पुरते बंद आहेत, कुठे अपघात झाले आहेत का, किंवा इतर वाहतुकीची परिस्थिती कशी आहे. ही माहिती तुम्हाला बातम्या ऐकल्यावर किंवा पेपर वाचल्यावर मिळू शकते. तसेच, तुमच्या भागाचा एक नकाशा देखील मिळवा. पर्यायी मार्ग शोधून काढल्यामुळे तुम्ही ट्रॅफिक जॅम असलेले मार्ग टाळू शकता.
▪आरामशीर बसा. वाहनात हवा खेळती ठेवण्यासाठी काही सोय असेल तर तुमच्या आवडीनुसार ती करा. तुमच्या आसनाची स्थिती अशी ठेवा जेणेकरून तुम्हाला शक्य तितका आराम वाटेल. गाडीत रेडिओ किंवा कॅसेट किंवा सिडी प्लेअर असेल तर तुमचे आवडते संगीत लावा. काही विशिष्ट प्रकारच्या संगीताने मन शांत राहते, तणाव कमी होऊ शकतो. या गोष्टी केल्याने कदाचित तुम्हाला वाहतुकीच्या कोंडीमुळे होणाऱ्या कर्कश आवाजापासून जरासा दिलासा मिळू शकेल. *
▪सृजनशील असा. ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यावर सर्वात उपयुक्त गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे सकारात्मक विचार. खोळंबून राहिलेल्या ट्रॅफिकवरच जास्त विचार करत बसण्यापेक्षा दिवसांतील कार्यांवर विचार करा. तुम्ही जर एकटेच असाल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टींवर विचार करण्याची अनोखी संधी मिळू शकते; शिवाय तुम्ही कसल्याही व्यत्ययाविना निर्णय घेऊ शकता.
तुम्ही जर प्रवासी असाल तर, तुमच्या समोर वाहनांची लांबलचक रांग पाहून तुमचा पारा चढू शकतो. तेव्हा, तुम्हाला थांबून राहाव्या लागणाऱ्या वेळेचा सदुपयोग करा. तुम्ही कदाचित तुमचे आवडते पुस्तक किंवा पेपर वाचायला नेऊ शकता. किंवा कदाचित तुम्हाला आदल्या दिवशी मिळालेली पत्रे तुम्ही वाचू शकता. काही लोक तर या वेळेत पत्र लिहित बसतात किंवा जर त्यांच्याकडे पोर्टेबल कंप्यूटर असेल तर त्यावर काम करत बसतात.
▪वास्तववादी असा. तुम्ही जर अशा ठिकाणी राहत असाल जेथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असेल तर, तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्याची अपेक्षा करू शकता आणि त्यानुसार मग बेत आखा. बहुतेक शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्या ही सतत राहील. ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे—गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले आहे: “येणाऱ्या भविष्यात, जिथं जिथं वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे त्या सर्व महानगरी क्षेत्रात ती अशीच राहील असे दिसते.” तेव्हा, या समस्येला स्वीकारून जगायला आणि हाती मिळत असलेल्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. (g०५ ११/२२)
[तळटीप]
^ परि. 25 सावध राहा! मासिकाच्या अनेक वाचकांना, या आणि याच्यासोबत येणाऱ्या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या कॅसेट्स ऐकायला आवडतात. काही भाषांत यांच्या कॅसेट्स, कंपॅक्ट डिस्क आणि एमपी ३ फॉरमॅट्स उपलब्ध आहेत.
[२६ पानांवरील चित्र]
आगाऊ योजना करून ट्रॅफिक टाळा
[२६ पानांवरील चित्र]
घरून निघण्याआधी एखादी उचित कॅसेट किंवा सिडी घ्या
[२६ पानांवरील चित्र]
तुम्ही प्रवासी असाल तर वेळेचा सदुपयोग कसा करता येईल त्याचे मार्ग शोधा
[२६ पानांवरील चित्र]
तुम्ही ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्याबद्दल डोक्याला ताप करून घेऊ नका