सर्व विपत्तींचा लवकरच—अंत
सर्व विपत्तींचा लवकरच—अंत
“मुलांनो व मुलांच्या मुलांनो. ऐका! . . . आज ना उद्या हा पर्वत जळू लागेल. पण त्याआधी तो गुरगुरेल . . . गडगडेल. त्याभोवतीची जमीन हादरू लागेल. त्यातून धूर व ज्वाला बाहेर पडतील, आसमंत थरथरू लागेल, गडगडण्याचा आवाज ऐकू येईल. असे घडू लागताच, वेळ आहे तोपर्यंत आपला जीव घेऊन पळा . . . जर तुम्ही या पर्वताला तुच्छ लेखले, जर तुम्हाला आपल्या जिवापेक्षा आपल्या मालकीच्या वस्तू प्रिय वाटू लागल्या तर हा पर्वत तुम्हाला तुमच्या निष्काळजीपणाची व लोभीपणाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा, घरादाराची चिंता करत रेंगाळू नका, लवकरात लवकर पळ काढा.”
अँड्रू रॉबिन्सन यांच्या अर्थ शॉक या पुस्तकात त्यांनी धोक्याची सूचना देणारा वरील उतारा उद्धृत केला आहे. हा उतारा सा.यु. १६३१ साली इटलीतील माऊंट व्हेसुव्हियसचा उद्रेक झाल्यानंतर या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पोर्टीची या गावात एका स्मारक फलकावर कोरण्यात आला. माऊंट व्हेसुव्हियसच्या ज्वालामुखीने ४,००० लोकांचा बळी घेतला. रॉबिन्सन म्हणतात, “१६३१ साली झालेल्या या उद्रेकानंतर . . . अचानक व्हेसुव्हियस हे नाव घराघरात ओळखीचे झाले.” ते कसे? पोर्टीची शहराची पुनर्बांधणी करत असताना हर्क्युलेनियम व पोम्पेई या प्राचीन शहरांचा शोध लागला. ही दोन्ही शहरे सा.यु. ७९ साली व्हेसुव्हियसच्या उद्रेकानंतर पुरली गेली होती.
धाकटा प्लिनी नावाचा एक रोमन नागरिक या संकटातून बचावला
व नंतर तो एक सुभेदार बनला. या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याआधी हादरे बसल्याचे त्याने आपल्या लिखाणात लिहिले आहे. यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे अशी पूर्वसूचना मिळाली. त्याने व त्याच्या आईने, तसेच इतर अनेकांनी या पूर्वसूचनेकडे लक्ष दिले आणि त्यानुसार पावले उचलली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.आपल्या काळातील पूर्वसूचना देणारे चिन्ह
आज आपण या जगाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थेच्या अंताच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत. हे आपण कशावरून म्हणू शकतो? येशू ख्रिस्ताने, संपूर्ण जगभरात घडणाऱ्या घटनांच्या एका मालिकेविषयी सांगितले की ज्या देवाचा न्यायनिवाड्याचा दिवस जवळ आला आहे याचे चिन्ह असेल. धूर व निखारे बाहेर टाकणाऱ्या गडगडणाऱ्या ज्वालामुखीप्रमाणेच, येशूने सांगितलेल्या बहुव्यापक चिन्हात मोठी युद्धे, भूकंप, दुष्काळ व रोगराई या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व समस्यांनी १९१४ सालापासून जगात बराच विध्वंस घडवून आणला आहे.—मत्तय २४:३-८; लूक २१:१०, ११; प्रकटीकरण ६:१-८.
पण येशूच्या इशारेवजा चिन्हात आशेचा संदेश देखील आहे. त्याने म्हटले, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) येशूने राज्याच्या संदेशाला “सुवार्ता” म्हटले याकडे लक्ष द्या. खरोखरच ही एक सुवार्ता, किंवा चांगली बातमी आहे कारण देवाचे राज्य म्हणजेच ख्रिस्त येशूच्या हातातील एक स्वर्गीय सरकार मनुष्यांनी घडवून आणलेली सर्व हानी भरून काढेल. शिवाय, हे राज्य नैसर्गिक विपत्तींचा कायमचा अंत करेल.—लूक ४:४३; प्रकटीकरण २१:३, ४.
येशू या पृथ्वीवर मनुष्यरूपात होता तेव्हा त्याने एक मोठे भयानक वादळ शांत केले. यावरून त्याने दाखवले की त्याच्याजवळ नैसर्गिक शक्तींवरही नियंत्रण करण्याचे सामर्थ्य आहे. हे पाहून थक्क झालेल्या व घाबरलेल्या त्याच्या शिष्यांनी म्हटले: “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यास देखील हा आज्ञा करितो व ती त्याचे ऐकतात.” (लूक ८:२२-२५) आज येशू निव्वळ एक मनुष्य नसून एक शक्तिशाली आत्मिक व्यक्ती आहे. त्यामुळे आपल्या प्रजेला अपाय होऊ नये म्हणून नैसर्गिक तत्त्वांवर नियंत्रण करणे त्याला मुळीच कठीण जाणार नाही!—स्तोत्र २:६-९; प्रकटीकरण ११:१५.
काहींना कदाचित वाटेल की हे सर्व केवळ काल्पनिक आहे. पण एक गोष्ट आठवणीत असू द्या, बायबलमधील भविष्यवाद मानवी प्रतिज्ञा व भाकितांसारखे नाहीत. आजपर्यंत बायबलमधली एकही भविष्यवाणी पूर्ण झाल्याशिवाय राहिली नाही. यात १९१४ पासून आपण ज्या भविष्यावाण्या स्वतः पूर्ण होताना पाहिल्या आहेत त्यांचाही समावेश आहे. (यशया ४६:१०; ५५:१०, ११) होय, भविष्यात पृथ्वीवर शांती येईल हे निश्चित आहे. जर आपण देवाच्या वचनाकडे लक्ष दिले व लवकरच पृथ्वीला हादरवून सोडणाऱ्या ज्या घटना घडणार आहेत त्यांविषयी देवाच्या वचनात दिलेल्या प्रेमळ इशाऱ्याकडे लक्ष दिले तर आपलेही शांतीपूर्ण भविष्य निश्चित आहे.—मत्तय २४:४२, ४४; योहान १७:३. (g०५ ७/२२)
[११ पानांवरील चौकट/चित्र]
मृत्यू झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल काय?
आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा साहजिकच आपल्याला असहनीय दुःख होते. बायबलमध्ये सांगितले आहे की येशूचा प्रिय मित्र लाजर याचा मृत्यू झाला तेव्हा येशू रडला. पण काही मिनिटांनंतर येशूने एक अतिशय आश्चर्यकारक चमत्कार केला—त्याने लाजरला पुन्हा जिवंत केले! (योहान ११:३२-४४) असे करण्याद्वारे त्याने याआधी आपल्या सेवाकार्यादरम्यान दिलेल्या एका विस्मयकारक प्रतिज्ञेवर विश्वास ठेवण्याचा सर्व मानवाजातीला आधार दिला. त्याने अशी प्रतिज्ञा केली होती: “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) पुनरुत्थान होऊन नव्या पृथ्वीवरील सुखद परिस्थितीत जगण्याची अद्भुत आशा, आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलेल्या सर्वांचे सांत्वन करो.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
[१० पानांवरील चित्रे]
सध्याच्या जगाचे हे शेवटले दिवस असण्याविषयीच्या इशाऱ्याकडे तुम्ही लक्ष देत आहात का?
[१० पानांवरील चित्राचे श्रेय]
USGS, David A. Johnston, Cascades Volcano Observatory