व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

केवळ एकच खरा देव आहे का?

केवळ एकच खरा देव आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

केवळ एकच खरा देव आहे का?

मोलख, अष्टारोथ, बआल, दागोन, मरोदख, झ्यूस, हर्मीस व अर्तमी हे बायबलमध्ये नावाने उल्लेख केलेले काही देवीदेवता आहेत. (लेवीय १८:२१; शास्ते २:१३; १६:२३; यिर्मया ५०:२; प्रेषितांची कृत्ये १४:१२, पं.र.भा. समास; १९:२४) पण शास्त्रवचनांत केवळ यहोवालाच सर्वसमर्थ देव म्हटले आहे. मोशेने एका विजयोत्सवाच्या गीतात आपल्या लोकांसोबत असे गायिले: “हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?”—निर्गम १५:११, पं.र.भा.

यावरून स्पष्टच आहे की बायबल यहोवाला इतर सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ स्थान देते. पण मग या कनिष्ठ देवांची भूमिका काय आहे? ते व शतकानुशतके मानवजातीने ज्या अनेक देवांची उपासना केली आहे ते सर्वसमर्थ यहोवा देवाच्या वर्चस्वाखाली असलेले खरोखरचे देवीदेवता आहेत का?

काल्पनिक

बायबल सांगते की यहोवा हा एकच खरा देव आहे. (स्तोत्र ८३:१८; योहान १७:३) संदेष्टा यशया याने, खुद्द देवाने उद्‌गारलेले शब्द लिहिले: “माझ्यापूर्वी कोणी देव निर्माण झाला नाही, आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. मी, मीच यहोवा आहे आणि माझ्यावाचून कोणी तारणारा नाही.”—यशया ४३:१०, ११, पं.र.भा.

इतर सर्व देव यहोवापेक्षा निम्न दर्जाचे तर आहेतच, पण यांपैकी बहुतेक देवीदेवता अस्तित्वातच नाहीत, तर केवळ काल्पनिक आहेत. या देवांबद्दल बायबल म्हणते की हे “मनुष्यांच्या हातांनी घडलेले [आहेत] . . . जे पाहत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत, व हुंगीत नाहीत.” (अनुवाद ४:२८) बायबलची शिकवणूक अगदी स्पष्ट आहे, यहोवा हा एकच खरा देव आहे.

हे लक्षात घेतल्यास, यहोवाशिवाय इतर कोणत्याही देवीदेवतेची उपासना करण्याविरुद्ध बायबलमध्ये स्पष्ट ताकीद का दिली आहे हे आपण समजू शकतो. उदाहरणार्थ मोशेला देण्यात आलेल्या दहा आज्ञांपैकी पहिल्या आज्ञेत इस्राएलच्या प्राचीन राष्ट्राला सांगण्यात आले होते, की त्यांनी इतर कोणत्याही देवाची उपासना करता कामा नये. (निर्गम २०:३) का?

पहिले कारण म्हणजे, जो देव अस्तित्वातच नाही त्याची उपासना करणे, हे सृष्टीकर्त्याचा घोर अपमान करण्यासारखे आहे. बायबलनुसार, या खोट्या देवतांच्या उपासकांनी “देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्‍ति व सेवा केली.” (रोमकर १:२५) सहसा या काल्पनिक देवांना धातू किंवा लाकूड यांसारख्या नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तींचे रूप दिले जाते. अनेक देवीदेवतांचा संबंध नैसर्गिक तत्त्वाशी, उदाहरणार्थ विजांचा गडगडाट, समुद्र व वायू यांच्याशी लावला जातो. साहजिकच, अशा कृत्रिम देवांची उपासना केल्यामुळे सर्वसमर्थ देवाचा घोर अपमान होतो.

निर्माणकर्त्याच्या दृष्टीने खोटे देवता व त्यांच्या मूर्ती घृणास्पद आहेत. पण देवाने आपला असंतोष मुख्यतः ज्यांनी या खोट्या देवतांना निर्माण केले आहे त्या लोकांविरुद्ध व्यक्‍त केला आहे. त्याच्या भावना पुढील शब्दांतून अतिशय स्पष्टपणे व्यक्‍त होतात: “राष्ट्रांच्या मूर्ति केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृति आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्‍वास नाही. त्या बनविणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.”—स्तोत्र १३५:१५-१८.

यहोवा देवाशिवाय इतर कोणाचीही अथवा कशाचीही उपासना करण्याविरुद्ध बायबलमध्ये जी कडक ताकीद देण्यात आली आहे त्यामागे आणखी एक कारण आहे. अशाप्रकारची उपासना म्हणजे वेळेचा व शक्‍तीचा मोठा अपव्यय आहे. संदेष्टा यशया याने अगदी योग्यपणे म्हटले: “हा देव कोणी घडिला? ही मूर्ति कोणी व्यर्थ ओतिली?” (यशया ४४:१०) बायबल असेही म्हणते, की “राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत.” (१ इतिहास १६:२६) खोटे देव काल्पनिक आहेत आणि अशा देवांची उपासना करणे व्यर्थ आहे.

येशू, देवदूत व दियाबल

शास्त्रवचनांत काही ठिकाणी खरोखरच्या व्यक्‍तींना देव म्हटले आहे. पण बारकाईने परीक्षण केल्यावर स्पष्टपणे दिसून येते की या ठिकाणी “देव” या शब्दाचा वापर या व्यक्‍तींना देव समजून त्यांची उपासना केली जावी असे सुचवण्यासाठी करण्यात आलेला नाही. उलट बायबल ज्या मूळ भाषांमधून लिहिण्यात आले होते, त्यांत “देव” हा शब्द सर्वसमर्थ देवाव्यतिरिक्‍त अशा व्यक्‍तींचे वर्णन करण्यासाठीही वापरला जात असे, की जी शक्‍तिमान आहे, किंवा जी देवासारखी आहे किंवा सर्वसमर्थ देवाशी जिचा जवळचा संबंध आहे.

उदाहरणार्थ, बायबलमधील काही वचनांत येशू ख्रिस्ताला देव म्हटले आहे. (यशया ९:६, ७; योहान १:१, १८) याचा अर्थ येशूची उपासना करणे योग्य आहे का? येशूने स्वतः म्हटले: “यहोवा तुझा देव याला नमन कर, व केवळ त्याचीच सेवा कर असे लिहिले आहे.” (लूक ४:८, पं.र.भा., समास) त्याअर्थी, येशू जरी सामर्थ्यशाली व स्वभावतः देवासारखा असला तरीसुद्धा त्याची उपासना केली जावी असे बायबल शिकवत नाही.

देवदूतांनाही ‘दिव्य’ अर्थात देवासारखे म्हणण्यात आले आहे. (स्तोत्र २९:१) पण शास्त्रवचनांत एकदाही मानवांना देवदूतांची उपासना करण्याचे प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. उलट, एकदा वयोवृद्ध प्रेषित योहान एका देवदूताला पाहून इतका विस्मित झाला की त्याने वाकून त्याला नमन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या देवदूताने त्याला म्हटले: “पाहा! तू असे करू नको . . . देवाला नमन कर.”—प्रकटीकरण १९:१०, पं.र.भा.

प्रेषित पौलाने सैतानाला “या जगाचा देव” म्हटले. (२ करिंथकर ४:४, पं.र.भा.) “जगाचा अधिकारी” या नात्याने दियाबलाने असंख्य खोट्या देवांना उभे केले आहे. (योहान १२:३१) त्यामुळे मानवाने निर्माण केलेल्या देवांची कोणत्याही प्रकारे उपासना करणे म्हणजे मुळात सैतानाची उपासना करण्यासारखे आहे. पण सैतान आपली उपासना मिळवण्यास पात्र नाही. तो स्वघोषित अधिकारी आहे, व तो देवाचे स्थान बळकावू पाहतो. शेवटी तो व त्याच्यासोबत सर्व प्रकारची खोटी उपासना नष्ट केली जाईल. त्यानंतर सर्व मानवजात—होय सर्व सृष्टी—यहोवा हा एकच खरा व जिवंत देव आहे हे सर्वकाळ कबूल करील.—यिर्मया १०:१०. (२/०६)

तुम्ही याचा कधी विचार केला आहे का?

▪मूर्तिपूजेविषयी बायबल काय शिकवते?—स्तोत्र १३५:१५-१८.

▪येशू व देवदूतांना देव मानून त्यांची उपासना करणे योग्य आहे का?—लूक ४:८.

▪एकच खरा देव कोण आहे?—योहान १७:३.

[१४, १५ पानांवरील चित्रे]

प्रतिमा, डावीकडून उजवीकडे: मरीया, इटली; माया मक्याची देवता, मेक्सिको व मध्य अमेरिका; अष्टारोथ, कनान; अंधविश्‍वासी धर्माची मूर्ती, सिएरा लिओन; बुद्ध, जपान; चीकोमेकोआतल, ॲझटेक, मेक्सिको; होरस ससाणा, ईजिप्त; झ्यूस, ग्रीस

[चित्राचे श्रेय]

मक्याची देवता, होरस ससाणा, व झ्यूस: Photograph taken by courtesy of the British Museum