गुलाबी रंगाचे तळे?
गुलाबी रंगाचे तळे?
सेनेगल येथील सावध राहा! लेखकाकडून
गुलाबी रंगाचे तळे खरेच असू शकते का? पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये असणाऱ्या रेट्बा तळ्याला गुलाबी तळे म्हणतात. हे तळे डाकार येथील आमच्या घरापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असल्यामुळे, आम्ही या तळ्याला प्रत्यक्ष भेट देऊन खरे खोटे काय याची खात्री करण्याचे ठरवले. तळ्याजवळ आम्ही पोचलो तेव्हा तळ्यातले पाणी उन्हात चमकताना आम्हाला दिसले. खरोखरच त्या पाण्याला एक सुरेख गुलाबी छटा होती. आमच्या गाईडने समजावून सांगितले की पाण्यातल्या सूक्ष्मजिवांवर सूर्यप्रकाशाची किरणे पडून त्यात रासायनिक बदल घडून आल्यामुळे ही सुरेख गुलाबी छटा पाण्याला येते. पण पाण्याचा गुलाबी रंग हे या तळ्याचे एकमेव वैशिष्ट्य नाही.
तळ्यातले पाणी फार खोल नाही. पाण्याच्या तळाशी मिठाचा थर आहे. पाणी इतके खारट आहे की तुम्ही त्यात अगदी विनासायास तरंगू शकता. काही पर्यटकांना हा मोह आवरत नाही.
गुलाबी रंगाचे हे तळे शेकडो लोकांना उपजिविका पुरवते (१). तळ्याच्या काठावर मजूर मिठाची पोती भरून ट्रक्समध्ये ठेवत होते. आम्ही काही वेळ थांबून, स्थानिक लोक तळ्यातून मीठ कसे काढतात ते पाहिले. काही माणसे छातीपर्यंत पाण्यात उभे राहून टिकावाने मीठ फोडत होते. मग फावड्याने ते टोपल्यांमध्ये काढून बोटींत टाकत होते. एका मजूराने आम्हाला सांगितले की तीन तासात ते एक टन मीठ काढतात. मिठाच्या भाराने शेवटी बोटी उलटू लागतात (२). बोटी किनाऱ्यावर आणल्यावर पुढचे काम स्त्रिया करतात. त्या बोटीतले मीठ बादल्यांमध्ये टाकून डोक्यावर वाहून नेतात (३). एखाद्या मोठ्या यंत्रासारख्या त्या सगळ्या मिळून काम करतात.
हा अनुभव अतिशय रोचक होता. आपला हा पृथ्वी ग्रह यहोवाने आपल्याला दिलेली अत्यंत मोलवान अशी देणगी आहे. गुलाबी तळे पाहून याची पुन्हा प्रचिती आली.—स्तोत्र ११५:१६. (g०५ ९/२२)
[१० पानांवरील चित्राचे श्रेय]
◀ Photo by Jacques CLEMENT, Clichy, FRANCE at http://community.webshots.com/user/pfjc