व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

२००० साली, संपूर्ण जगभरात क्षयरोगाचे अंदाजे ८३ लाख नवीन रुग्ण होते व जवळजवळ वीस लाख रुग्ण मरण पावले. यांतील बहुतेक रुग्ण निम्न मिळकतीच्या देशांतील होते.—मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया. (१/०६)

“वयाच्या तिसाव्या वर्षी धुम्रपान करणाऱ्‍या पुरुषाचे सरासरी आयुष्य साडेपाच वर्षांनी तर स्त्रीचे आयुष्य साडेसहा पेक्षा अधिक वर्षांनी घटते,” असे इन्स्टिट्यूट ऑफ ॲकच्योरीजने तयार केलेल्या तक्‍त्‌यात दिसून आले. पण, वयाच्या तिसाव्या वर्षी धुम्रपान सोडून दिल्यास तंबाखू संबंधित आजारापासून मरण पावण्याचा धोका पुष्कळ कमी होऊ शकतो.—द टाईम्स, इंग्लंड.

२००४ सालादरम्यान, जागतिक तेल सेवन, दररोज ३४ लाखांपासून ८२४ लाख बॅरल, इतके वाढले. संयुक्‍त राष्ट्रे आणि चीन हे देश, या वाढीतील अर्ध्या वाढीस कारणीभूत आहेत व आता ते दिवसाला २०५ व ६६ लाख बॅरेल वापरतात.—वायटल साईन्स २००५, वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूट. (२/०६)

“आपल्या आईची कदर करा”

शाळेला जाणाऱ्‍या दोन मुलांची आई असलेल्या एका कॅनडियन गृहिणीला जर ती करत असलेले काम आणि तिला करावे लागलेले ओव्हरटाईम यांच्यासाठी पगार देण्यात आला तर तिचा वार्षिक पगार, $१६३,८५३ (कॅनडियन) (सुमारे ५८ लाख रुपये) इतका होईल, असा कामगार विश्‍लेषकांनी अंदाज लावला. ही संख्या चालू मार्केट पगाराच्या आधारावर तसेच “१०० तासांचा कामाचा आठवडा ज्यांत सहा १५-तासांचे दिवस आणि एक १०-तासांचा दिवस आहे, यावर आधारीत आहे,” असे वँकूव्हर सन बातमीपत्रकाने सांगितले. एका गृहिणीला कराव्या लागणाऱ्‍या कामांमध्ये, डे-केअरचे कामगार, शिक्षक, वाहन-चालक, हाऊसकिपर, स्वयंपाकी, परिचारिका आणि सामान्य मेंटन्स कामगार, यांचा समावेश होतो. बातमीपत्र पुढे असा सल्ला देते: “आपल्या आईची कदर करा: ती बिन पगाराची काम करते.” (२/०६)

अंधश्रद्धा वाढत चालली आहे

“आजच्या या युगात तंत्रज्ञानाने व विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे तरीपण अंधश्रद्धेने अजूनही लोकांवरील आपली पकड ढिली केलेली नाही,” असे जर्मन लोकमत सर्वेक्षण संस्था ॲलेन्श्बॅकने अहवाल दिला. दीर्घकाळच्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की “आज लोक, शुभाशुभ शकुनांवर तर्कहीन विश्‍वास ठेवत असल्याचे दिसून येते; किंबहुना २५ वर्षांपूर्वीपेक्षा आज अधिक लोकांच्या अंधश्रद्धा आहेत.” उदाहरणार्थ, १९७० सालच्या दशकात, आकाशातून तुटलेला तारा पडताना पाहिल्याने आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो, असे २२ टक्के लोक मानायचे. आता ४० टक्के लोक असे मानू लागले आहेत. आज ३ पैकी केवळ एक प्रौढ सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा नाकारतो. १,००० जर्मन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्‍या एका अभ्यासात स्पष्ट झाले, की एक तृतीयांश विद्यार्थी, शुभाशुभ गोष्टींवर विश्‍वास ठेवतात व आपल्या कारमध्ये किंवा चाव्यांच्या रींगमध्ये ताईत लावतात. (१/०६)

आधुनिक गुलामगिरी

“संपूर्ण जगभरात कमीतकमी १२३ लाख लोकांकडून सक्‍तीने मजूरी करून घेतली जात आहे,” असे एका संयुक्‍त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या (आयएलओ) अभ्यासाने सांगितले. यांपैकी २४ लाख लोकांना बेकायदेशीररीत्या विकण्यात आले असावे, असा अंदाज लावला जातो. सक्‍तीने करवून घेतलेल्या मजुरीत मजुरांना मनाविरुद्ध काम करावे लागते किंवा धमकी देऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले जाते. वेश्‍याव्यवसाय, लष्करी सेवा आणि बाँण्डेड लेबर हे सक्‍तीच्या मजूरीचे प्रकार आहेत. बाँण्डेड लेबर मध्ये, कामगार फार कमी किंवा काहीच कमवत नाहीत; कारण त्यांचा पगार कर्ज फेडण्यासाठी ठेवून घेतला जातो. आयएलओचे व्यवस्थापक जनरल हुआन सोमाविया यांच्या मते, अशाप्रकारची मजूरी “लोकांकडून त्यांचे मूलभूत हक्क आणि प्रतिष्ठा हिरावून घेते.”

पार्क केलेल्या मोटार गाड्यांतील तापमान

२००४ सालादरम्यान, अमेरिकेत, पार्क केलेल्या गाड्यांमध्ये सोडलेली ३५ मुले उष्माघातामुळे मरण पावली, असे पेडिआट्रिक्स मासिक म्हणते. बाहेरचे तापमान जेव्हा ३० डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक वाढते तेव्हा मोटारगाड्यांतील तापमान लगेच ५७ ते ६८ डिग्री वाढू शकते, असे अभ्यासात दिसून आले आहे. बाहेरचे तापमान २२ डिग्री असले तरी, कार पार्क केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटांत कारच्या आतील तापमान सुमारे २२ डिग्री आणखी वाढू शकते. कारच्या खिडक्या दीड इंच खुल्या ठेवल्यास आणि कार बंद करायच्या थोडा वेळ आधी एअर-कंडिशन सुरू केल्याने फारसा फरक पडत नाही. मासिकातील लेख लिहिणाऱ्‍यांचे असे मत आहे, की लोकांना या धोक्याबद्दल जागृत केल्यास जीव वाचू शकतात. (३/०६)