व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पिलग्रीम्स आणि प्युरिटन्स हे कोण होते?

पिलग्रीम्स आणि प्युरिटन्स हे कोण होते?

पिलग्रीम्स आणि प्युरिटन्स हे कोण होते?

मॅसच्यूसिट्‌स, प्लिमथ येथील उत्तर अमेरिकन समुद्रकिनाऱ्‍यावर एक मोठा दगड आहे ज्यावर १६२० ही संख्या कोरलेली आहे. या दगडाला प्लिमथ रॉक म्हटले जाते. हा दगड, सुमारे ४०० वर्षांपूर्वी युरोपियन लोकांचा एक गट किनाऱ्‍यावर जिथे आला होता तेथून जवळच आहे, असे समजले जाते. या लोकांना तुम्ही पिलग्रीम्स किंवा पिलग्रीम फादर्स म्हणू ओळखत असाल.

आपल्या नेटीव अमेरिकन दोस्तांना मेजवानीचा आनंद लुटण्यास बोलवणाऱ्‍या आदरातिथ्यशील पिलग्रीम लोकांच्या कथा पुष्कळांना ऐकिवात आहेत. पण पिलग्रीम्स कोण होते आणि ते उत्तर अमेरिकेत का आले? या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला इंग्लिश राजा हेन्री आठवा, याच्या काळात जावे लागेल.

इंग्लंडमध्ये धार्मिक खळबळ

पिलग्रीम लोक अमेरिकेत जाण्याच्या १०० पेक्षा कमी वर्षांआधी, इंग्लंड हा एक रोमन कॅथलिक देश होता आणि राजा हेन्री आठवा याला, विश्‍वासाचा समर्थक ही पोपची पदवी होती. हेन्रीला सहा बायका होत्या. त्यापैकी पहिली होती, ॲरगनची कॅथरिन. हेन्री हिच्याबरोबरचा आपला विवाह रद्द करू इच्छित होता. पण पोप क्लेमेंट सातवा याने जेव्हा यास नकार दिला तेव्हा त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले.

एकीकडे हेन्री आपल्या कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये गुंतला होता तर दुसरीकडे संपूर्ण युरोपभर प्रॉटेस्टंट धर्मसुधारणा रोमन कॅथलिक चर्चमध्ये धुमाकूळ माजवत होती. चर्चने आपल्याला दिलेली प्रतिष्ठा गमावू इच्छित नसलेल्या हेन्रीने पहिल्यांदा या धर्मसुधारकांना इंग्लंडमध्ये प्रवेश करू दिला नाही. पण नंतर त्याने आपले मन बदलले. कॅथलिक चर्च त्याचा विवाह रद्द करत नव्हते त्यामुळे हेन्रीने चर्चच रद्द करायचे ठरवले. १५३४ साली त्याने इंग्लिश कॅथलिकांवर पोपला असलेला कब्जा काढून घेतला आणि स्वतःला चर्च ऑफ इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ मुख्य म्हणून घोषित केले. त्याने सर्व मठ बंद करून टाकले आणि या मठांची असलेली मालमत्ता विकून टाकली. १५४७ साली हेन्रीचा मृत्यू झाला तेव्हा इंग्लंड प्रॉटेस्टंट देश बनण्याच्या मार्गावर होता.

हेन्रीचा मुलगा एडवर्ड सहावा याने देखील रोमन कॅथलिक चर्चशी समेट केला नाही. १५५३ मध्ये एडवर्डचा मृत्यू झाल्यानंतर, ॲरगनच्या कॅथरिनकडून हेन्रीला झालेली रोमन कॅथलिक मुलगी मेरी ही राणी बनली आणि तिने त्यानंतर पोपचा अधिकार मान्य करण्यास देशाला भाग पाडायचा प्रयत्न केला. तिने अनेक प्रॉटेस्टंटांना जबरदस्तीने हद्दपार केले आणि ३०० पेक्षा अधिक लोकांच्या मशाली बनवून त्यांना जाळले. अशाप्रकारे तिने ब्लडी मेरी असे नाव कमवले. पण ती चळवळ थांबवू शकली नाही. १५५८ मध्ये मेरी मरण पावली आणि तिच्या जागी राणी झालेली तिची सावत्र बहीण एलिझाबेथ पहिली हिने, इंग्लिश लोकांच्या धार्मिक जीवनावर पोपचा कसलाही प्रभाव पडू दिला नाही.

परंतु, फक्‍त चर्च ऑफ रोममधून वेगळे होणे पुरेसे नाही, तर रोमन कॅथलिक धर्माच्या प्रत्येक गोष्टीपासून आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे, असे काही प्रॉटेस्टंटांना वाटत होते. त्यांना चर्चची उपासना शुद्ध करायची होती त्यामुळे त्यांना प्युरिटन असे नाव पडले. आपल्याला बिशपांची गरज नाही, प्रत्येक मंडळीने, राष्ट्रीय चर्चपासून वेगळे राहून स्वतःचा कारभार स्वतःच पाहिला पाहिजे, असे काही प्युरिटन लोकांना वाटले. या लोकांना सेपरेटिस्ट्‌स असे नाव पडले.

वादग्रस्त प्युरिटन लोक एलिझाबेथच्या कारकीर्दीत प्रसिद्ध होऊ लागले. काही पाद्र्‌यांचा अनौपचारिक पेहराव राणीस आवडत नसे आणि १५६४ साली तिने पाद्र्‌यांसाठी एक विशिष्ट पेहराव असला पाहिजे अशी आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरीला आज्ञा दिली. हा असा पेहराव कॅथलिक पाळकांसारखाच दिसेल, असे प्युरिटन लोकांना वाटल्यामुळे त्यांनी ही आज्ञा पाळण्यास नकार दिला. बिशपांच्या व आर्चबिशपांच्या जुन्या श्रेणीरचनेच्या संबंधाने आणखी वाद माजला. एलिझाबेथने बिशपांना राहू दिले आणि त्यांनी तिला चर्चचे मुख्य म्हणून स्वीकारावे अशी मागणी केली.

सेपरेटिस्ट्‌सचे झाले पिलग्रीम्स

सन १६०३ मध्ये एलिझाबेथनंतर जेम्स पहिला राजा बनला आणि त्याने सेपरेटिस्ट्‌सवर आपल्या अधिकाराच्या अधीन होण्याचा खूप दबाव टाकला. १६०८ मध्ये स्क्रूबी शहरातील एक सेपरेटिस्ट लोकांची मंडळी, हॉलंडमध्ये स्वातंत्र्य आहे हे पाहून तिथे पळून गेली. परंतु, डच लोकांची इतर धर्मांच्या बाबतीत असलेली सोशिकता आणि त्यांची स्वच्छंदी जीवनशैली पाहून या सेपरेटिस्ट्‌सना, आपण आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे, त्यांनी युरोप सोडून उत्तर अमेरिकेत जाऊन राहण्याचे ठरवले. आपल्या विश्‍वासांसाठी घरापासून दूर जाऊन राहण्यास तयार असलेल्या या सेपरेटिस्ट लोकांना कालांतराने पिलग्रीम्स असे नाव पडले.

अनेक सेपरेटिस्ट्‌स यांचा समावेश असलेल्या पिलग्रीम्सनी व्हर्जिनियातील ब्रिटिश वसाहतीत बस्तान मांडण्यासाठी परवानगी मिळवली आणि १६२० सालच्या सप्टेंबर महिन्यात ते मेफ्लावर नावाच्या एका जहाजावरून उत्तर अमेरिकेच्या दिशेने निघाले. या जहाजावरील सुमारे १०० प्रौढांना व मुलांना, केप कॉड येथे पोहंचण्यासाठी दोन महिने लागले; उत्तर अटलांटिक महासागरावरील या दोन महिन्यात त्यांना अनेक समुद्री वादळांचा सामना करावा लागला. व्हर्जिनियाच्या उत्तरेपासूनचा हा प्रवास बऱ्‍याच लांबच्या पल्ल्याचा अर्थात सुमारे ८०० किलोमीटरचा होता. तेथे त्यांनी मेफ्लावर कंपॅक्ट अर्थात एक करार लिहून काढला. यांत त्यांनी, एक समाज स्थापून त्या समाजाच्या नियमांच्या अधीन होण्याची आपली इच्छा आहे, असे व्यक्‍त केले. १६२० सालच्या डिसेंबर २१ रोजी ते जवळच्या प्लिमथ येथे स्थाईक झाले.

नव्या जगातील जीवन

उत्तर अमेरिकेत आश्रय घेतलेले हे लोक हिवाळ्यासाठी बिन तयारीचे आले होते. काही महिन्यातच गटातील अर्धे लोक मरण पावले. पण वसंतुऋतू आला तेव्हा त्यांना बरे वाटले. जिवंत उरलेल्यांनी बऱ्‍यापैकी घरे बांधली आणि नेटीव अमेरिकन लोकांकडून, स्थानीय पीक कसे पिकवायचे ते शिकून घेतले. १६२१ सालच्या शरद ऋतूपर्यंत, हे पिलग्रीम्स इतके श्रीमंत झाले होते की, त्यांनी देवाने त्यांच्यावर आशीर्वाद पाठवल्याबद्दल त्याचे आभार मानण्याकरता एक वेळ ठरवून दिली. तेव्हापासून आज अमेरिकेत आणि इतर ठिकाणी साजरा केला जाणारा थँक्सगिव्हींगचा सण (आभारप्रदर्शन) मानायला सुरुवात झाली. यानंतर आणखी लोक येऊन राहिले त्यामुळे १५ पेक्षा कमी वर्षांत प्लिमथ येथील लोकसंख्या दोन हजारच्या वर गेली.

या काळांत, सेपरेटिस्ट लोकांप्रमाणे इंग्लंडमधीलही काही प्युरिटन लोकांनी, अटलांटिकच्या पलिकडे असलेला आपला “वचनयुक्‍त देश” शोधून काढायचे ठरवले. १६३० मध्ये त्यांच्यातील एक गट प्लिमथच्या उत्तरेकडील एके ठिकाणी आला आणि त्यांनी मॅसच्यूसिट्‌स बे कॉलनी स्थापन केली. १६४० पर्यंत सुमारे २०,००० इंग्लिश स्थालांतरीत, न्यू इंग्लंडमध्ये राहत होते. १६९१ मध्ये मॅसच्यूसिट्‌स बे कॉलनीने प्लिमथवर कब्जा मिळवला तेव्हा सेपरेटिस्ट पिलग्रीम्स सेपरेट म्हणजे वेगळे राहिले नाही. बॉस्टन हे त्या भागातील प्रमुख धार्मिक केंद्र बनले. येथे प्युरिटन लोकांनी आता न्यू इंग्लंडच्या धार्मिक जीवनावर आपला पगडा बसवला. त्यांची उपासना पद्धत कशी होती?

प्युरिटन लोकांची उपासना

नवीन जगातील प्युरिटन लोकांनी सर्वात आधी लाकडी सभागृहे बांधली जेथे ते रविवारी सकाळी उपासनेसाठी एकत्र येत. हवामान चांगले असेल तर आतील वातारवणही चांगले असायचे. पण कडाक्याच्या थंडीत जेव्हा सभा भरायच्या तेव्हा प्युरिटन लोकांमधील सर्वात सशक्‍त असलेल्यांची देखील काही खैरीयत नसायची. या सभागृहांमध्ये वातावरण गरम ठेवण्याची सोय नव्हती; त्यामुळे नियमाने सभेला येणारे लोक गारठ्याने थरथर कापायचे. खोलीतल्या गारठ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून प्रचारक सहसा हातमोजे घालायचे.

प्रॉटेस्टंट फ्रेंच धर्मसुधारक, जॉन कॅल्विन याच्या शिकवणुकींच्या आधारावर प्युरिटन लोकांनी आपले विश्‍वास बनवले. त्यांचा पूर्वनियोजनाच्या सिद्धांतावर विश्‍वास होता आणि कोणत्या व्यक्‍तीचे तारण होईल व कोणत्या व्यक्‍तीला अनंतकाळ नरकाग्नीत टाकले जाईल हे देवाने आधीच ठरवले आहे, असेही ते मानायचे. आपण कसेही वागलो तरी, देवापुढे मात्र आपण आपली भूमिका बदलू शकत नाही, असे ते मानायचे. मृत्यूनंतर आपण स्वर्गातील सुख अनुभवू की सदासर्वकाळासाठी वातीसारखे जळत राहू, हे कोणाला माहीत नसते, असाही त्यांचा विश्‍वास होता.

हळूहळू, प्युरिटन सेवक पश्‍चात्ताप करण्यास लोकांना सांगू लागले. देव दयाशील असला तरी, जे लोक त्याच्या आज्ञा पाळत नाहीत ते सरळ नरकात टाकले जातील, अशी त्यांनी लोकांना ताकीद दिली. हे प्रचारक, नरकाग्नीच्या शिकवणीचा धाक दाखवून लोकांना नियमांचे पालन करायला लावायचे. जॉनथन एडवड्‌र्स नावाच्या अठराव्या शतकातील एका प्रचारकाने म्हणे, “क्रोधीत परमेश्‍वराच्या तावडीत सापडलेले पापी जन” या विषयावर एक भाषण दिले. नरकाविषयी त्याने केलेले वर्णन इतके भीतीदायक होते, की इतर पाळकांना, हे भाषण ऐकून गर्भगळीत झालेल्या लोकांना मानसिकरीत्या धीर द्यावा लागला होता.

मॅसच्यूसिट्‌सच्या बाहेरून आलेले जे सुवार्तिक तेथे प्रचार करत होते त्यांच्यासाठी धोका होता. अधिकाऱ्‍यांनी, मेरी डायर नावाच्या एका महिला क्वेकर प्रचारकला तीन वेळा तडीपार केले; तरीपण ती पुन्हा येतच राहिली आणि आपले मत मांडत राहिली. शेवटी, जून १, १६६० रोजी त्यांनी तिला बॉस्टनमध्ये फाशी दिली. प्युरिटन नेत्यांनी विरोधकांचा किती कडाडून विरोध केला हे कदाचित फिलिप रॅटक्लिफ विसरून गेला होता. सरकारच्या आणि सालेम येथील चर्चच्या विरोधात त्याने केलेल्या भाषणांमुळे त्याला चाबकाने मारण्यात आले व त्याला दंड भरावा लागला. त्याने याद राखावी म्हणून त्याला पाठवण्याआधी त्यांनी त्याचे कान कापले. प्युरिटन लोकांच्या अहिष्णुतेमुळे लोक मॅसच्यूसिट्‌स सोडून जाऊ लागले व यामुळे इतर वसाहती वाढू लागल्या.

गर्वामुळे हिंसाचार पेटतो

आपण देवाचे “निवडलेले” खास लोक आहोत व स्थानीय लोकांना हक्क नसतानाही त्यांनी जमिनी बळकावल्या आहेत, असा प्युरिटन लोकांचा समज होता. यामुळे लोकांमध्ये नाराजी उत्पन्‍न झाली आणि काही स्थानीय लोकांनी तर प्युरिटन लोकांवर हल्लेही करायला कमी केले नाही. त्यामुळे प्युरिटन धार्मिक नेत्यांनी शब्बाथाविषयीच्या नियमांत फेरफार केले जेणेकरून उपासनेसाठी जाताना लोक स्वसंरक्षणासाठी हातात बंदूक घेऊन जाऊ शकतील. १६७५ साली तर परिस्थिती आणखी विकोपाला गेली.

आपले लोक त्यांचा प्रदेश गमावत आहेत हे पाहून वांपानोआग अमेरिकन इंडियन असलेला मेटाकॉमेट, ज्याला राजा फिलिप असेही म्हटले जाते त्याने प्युरिटन लोकांच्या वस्तींवर धाड टाकून त्यांची घरे जाळायला आणि तेथे राहणाऱ्‍यांची कत्तल करायला सुरुवात केली. प्युरिटन लोकांनी याला प्रतिरोध केला आणि अशाप्रकारे या दोन गटातील झगडा कित्येक महिने चालला. १७६७ सालच्या ऑगस्ट महिन्यात प्युरिटन लोकांनी ऱ्‍होड द्वीपावर फिलिपला पकडले. त्यांनी त्याचा शिरच्छेद करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. अशाप्रकारे, राजा फिलिपचे युद्ध आणि न्यू इंग्लंडच्या स्थानीय लोकांचे स्वतंत्र जीवन संपुष्टात आले.

अठराव्या शतकादरम्यान, प्युरिटन लोकांनी एका नव्या मार्गाने आपला आवेश व्यक्‍त केला. मॅसच्यूसिट्‌समधील काही प्युरिटन पाळकांनी इंग्लिश सत्तेचा कडाडून विरोध केला आणि स्वातंत्र्याची इच्छा जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुधारणेवरील त्यांच्या चर्चेत राजनीती आणि धर्म यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला.

प्युरिटन कष्टाळू, धैर्यशील व धर्माच्या बाबतीत प्रामाणिक होते. आजही लोक ‘प्युरिटन स्वभावाविषयी’ व ‘प्युरिटन प्रामाणिकतेविषयी’ बोलतात. पण, केवळ प्रामाणिकता एखाद्याला चुकीच्या शिकवणुकींपासून शुद्ध करत नाही. राजनीती आणि धर्म यांचा मिलाफ ही अशी एक गोष्ट आहे जी स्वतः येशू ख्रिस्ताने टाळली. (योहान ६:१५; १८:३६) आणि क्रूरता ही या महत्त्वपूर्ण सत्याच्या अगदी विरोधात आहे, की “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.

तुमचा धर्म, नरकाग्नी, पूर्वनियोजनाचा सिद्धांत किंवा इतर गैरबायबल सिद्धांत शिकवतो का? तुमच्या धर्माचे पुढारी राजकीय मोहिमांमध्ये भाग घेतात का? देवाचे वचन बायबल याचा प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे तुम्हाला “शुद्ध व निर्मळ” अर्थात देवाला स्वीकारयोग्य असलेली व खरोखरीच शुद्ध असलेली उपासनापद्धत शोधायला मदत होईल.—याकोब १:२७. (२/०६)

[२९ पानांवरील चौकट/चित्र]

प्युरिटन लोक आणि नरकाग्नीची शिकवण

नरकाग्नीची शिकवण देऊन प्युरिटन लोक देवाच्या वचनाच्या अगदी उलट शिकवण देत होते. मृत बेशुद्धावस्थेत आहेत, त्यांना वेदना किंवा सुख जाणवत नाही, असे बायबल शिकवते. (उपदेशक ९:५, १०) शिवाय, धगधगत्या अग्नीत पीडा देण्याची कल्पना खऱ्‍या देवाच्या ‘मनातही केव्हा आली नाही.’ (यिर्मया १९:५; १ योहान ४:८) उलट, तो लोकांना आपली कार्ये बदलण्याची विनंती करतो आणि पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या अपराध्यांबरोबरही दयाळुपणे वागतो. (यहेज्केल ३३:११) पण प्युरिटन प्रचारकांनी शास्त्रवचनांतील या सत्यांच्या अगदी उलट देवाचे चित्र रेखाटले आहे; देव क्रूर व खुनशी आहे, असे त्यांनी देवाचे चित्र रेखाटले आहे. जीवनाबद्दलच्या एका निर्दयी दृष्टिकोनास त्यांनी बढावा दिला आहे; विरोध करणाऱ्‍यांची तोंडे बंद करण्यासाठी शक्‍तीचा उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी दर्शवले.

[२६ पानांवरील चित्र]

१६२० साली उत्तर अमेरिकेत पोहंचलेले पिलग्रीम्स

[चित्राचे श्रेय]

◀ Harper’s Encyclopædia of United States History

[२८ पानांवरील चित्र]

१६२१ साली पहिला थँक्सगिव्हिंग सण साजरा करताना

[२८ पानांवरील चित्र]

मॅसच्यूसिट्‌स येथील प्युरिटन लोकांचे सभागृह

[२८ पानांवरील चित्र]

जॉन कॅल्विन

[२८ पानांवरील चित्र]

जॉनथन एडवड्‌र्स

[२९ पानांवरील चित्र]

चर्चला जाताना हातात शस्त्रे घेऊन जाणारे पिलग्रीम जोडपे

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

◀ Library of Congress, Prints & Photographs Division

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

वर डावीकडे: Snark/Art Resource, NY; वर उजवीकडे: Harper’s Encyclopædia of United States History; जॉन कॅल्विन: Portrait in Paul Henry’s Life of Calvin, from the book The History of Protestantism (Vol. II); जॉनथन एडवड्‌र्स: Dictionary of American Portraits/Dover

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो: North Wind Picture Archives