व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बुरशी अपकारक आणि उपकारक

बुरशी अपकारक आणि उपकारक

बुरशी अपकारक आणि उपकारक

स्वीडनमधील सावध राहा! लेखकाकडून

बुरशीचे काही प्रकार जीवनदायक आहेत तर काही जिवघेणे. काही जातींच्या बुरशी चीज व वाईन यांसारख्या खाद्यांची व पेयांची रूची वाढवतात तर काही जातींमुळे अन्‍न विषारी बनते. बुरशीच्या काही जाती लाकडाच्या ओंडक्यांवर वाढतात तर काही न्हाणीघरात व पुस्तकांवर वाढतात. खरे पाहिल्यास बुरशीचे बिजाणू सर्वत्र आढळतात—अगदी या क्षणी तुम्ही हे वाक्य वाचत असताना, बुरशीचे बिजाणू कदाचित तुमच्या नाकपुड्यांत जात असतील.

बुरशी सर्वत्र आढळते ही जर तुम्हाला अतिशयोक्‍ती वाटत असेल, तर हा लहानसा प्रयोग करून पाहा. पावाचा एक तुकडा असाच कुठेतरी ठेवा; फ्रिजमध्ये ठेवला तरी चालेल. एखाददोन दिवसांतच तुम्हाला त्यावर एक कापसासारखा थर आलेला दिसेल—हा थर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बुरशीच आहे!

बुरशी म्हणजे नेमके काय?

बुरशीच्या १,००,००० पेक्षा जास्त जाती (अळंब्या, वनस्पतींवर येणारे रोग, यीस्ट इत्यादी) कवक वर्गात मोडतात. कवकांपैकी केवळ १०० जातींमुळे मानवांमध्ये व प्राण्यांमध्ये रोग उत्पन्‍न होत असल्याचे ज्ञात आहे. बुरशीचे इतर प्रकार खरे तर अन्‍न साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. बुरशीमुळे कुजणाऱ्‍या खतातील जैव पदार्थांचे अपघटन होऊन वनस्पतींना उपयोगी ठरणारे घटक उत्पन्‍न होतात. बुरशीच्या इतर जाती वनस्पतींसोबत सहजीवन करतात व त्यांना जमिनीतून पोषक घटक शोषून घेण्यास मदत करतात. काही जाती परजीवी असतात.

बुरशीच्या जीवनसाखळीची सुरुवात हवेत उडणाऱ्‍या सूक्ष्म बिजाणूंच्या रूपात होते. हे बिजाणू, बुरशीच्या वाढीस पोषक अशा एखाद्या वस्तूच्या संपर्कात आल्यास व योग्य तापमान व दमटपणा मिळाल्यास वाढू लागतात व त्यांतून कवकतंतू उगवतात. असे बरेच कवकतंतू जाळ्याप्रमाणे वाढू लागल्यावर मखमलीसारखा थर तयार होतो ज्याला कवकजाल म्हणतात. हीच आपल्याला दिसणारी बुरशी असते. बुरशी कधीकधी, उदाहरणार्थ न्हाणीघरातल्या टाईल्सच्या मधल्या खाचांमध्ये साचलेल्या धुळीसारखी दिसते किंवा नुसतेच डाग पडल्यासारखी दिसते.

बुरशीचे प्रजोत्पादन अतिशय जलद गतीने होते. ऱ्‍हायझोपस स्टोलोनिफर ही पावावर वाढणारी बुरशी सर्वांच्या परिचयाची आहे. या बुरशीत दिसणारे लहानलहान काळे ठिपके म्हणजे बीजाणूधारक अवयव असतात. अशा केवळ एका ठिपक्यात ५०,००० पेक्षा जास्त बीजाणू असू शकतात आणि यांपैकी प्रत्येक बीजाणू काही दिवसांतच कोट्यवधी नवे बीजाणू उत्पन्‍न करू शकतो. अनुकूल परिस्थिती मिळाल्यास, पुस्तकांवर, बुटांत, वॉलपेपरवर किंवा जंगलातील एखाद्या ओंडक्यावरही बुरशी अगदी सहज वाढते.

बुरशी अन्‍न कशाप्रकारे ‘खाते’? प्राणी व मानव आधी अन्‍न खातात आणि मग पाचनक्रियेद्वारे त्यातील पोषक पदार्थ त्यांच्या शरीरात शोषले जातात. पण बुरशीचे अगदी उलट कार्य असते. सेंद्रिय पदार्थातील अणू खूप मोठे किंवा जटिल असल्यामुळे बुरशीला ते ‘खाता’ येत नाहीत; अशावेळी बुरशीतून पाझरणाऱ्‍या पाचक एन्झाइम्सच्या साहाय्याने या रेणूंचे जणू लहान तुकडे केले जातात व ते शोषून घेतले जातात. तसेच, बुरशी अन्‍न मिळवण्यासाठी कोठे जाऊ शकत नाही, त्यामुळे तिला आपल्या अन्‍न पदार्थांतच घर करून राहावे लागते.

बुरशीतून विषारी पदार्थ तयार होतात; यांना मायकोटॉक्सिन्स म्हणतात. यांच्या क्रियेमुळे मानवांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे रोग उत्पन्‍न होतात. हे विनाशक पदार्थ श्‍वासावाटे, तोंडावाटे किंवा त्वचेतून शरीरात प्रवेश करू शकतात. पण बुरशी मनुष्याकरता नेहमी अपायकारकच असते असे नाही. तर बुरशीची काही अतिशय उपयोगी वैशिष्ट्ये आहेत.

बुरशी उपकारक देखील

ॲलेक्सँडर फ्लेमिंग नावाच्या एका शास्त्रज्ञाला १९२८ साली अचानक, हिरव्या बुरशीमध्ये किटाणूनाशक गुणधर्म असल्याचे आढळले. या बुरशीला नंतर पेनिसिलियम नोटॅटम असे नाव पडले. ही बुरशी जिवाणूंकरता विनाशकारक होती पण मानवांकरता व प्राण्यांकरता ती अनपायकारक होती. हा शोध लागल्यामुळे पेनिसिलिन नावाचे औषध निर्माण झाले व या औषधाला “आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात मोठे जीवनरक्षक” म्हणण्यात आले. हा शोध लावल्याबद्दल फ्लेमिंग, तसेच हावर्ड फ्लोरी व अन्स्ट चेन या त्यांच्या संशोधक मित्रांना १९४५ साली वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. तेव्हापासून, बुरशीचा उपयोग करून इतर अनेक औषधी पदार्थ तयार करण्यात आले आहेत. यात रक्‍ताच्या गुठळ्या, अर्धशीशी व पार्किनसन्स या रोगांवरील औषधांचा समावेश आहे.

बुरशीचा उपयोग करून बरेच रुचकर खाद्यपदार्थही तयार केले जातात. चीजचे उदाहरण घ्या. ब्राय, कॅममबर्ट, डेनिश ब्लू, गॉर्गनझला, रोकफर्ट व स्टिलटन यांसारख्या चीजच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे श्रेय पेनिसिलियम बुरशीला जाते, हे तुम्हाला माहीत होते का? शिवाय सलामी, सोया सॉस आणि बियरच्याही उत्पादनात बुरशीचा उपयोग केला जातो.

वाईनच्या बाबतीतही तेच आहे. उत्कृष्ट प्रकारच्या गोड वाईन्स तयार करण्याकरता विशिष्ट प्रकारच्या द्राक्षांच्या प्रत्येक झुपक्यावर, ठराविक प्रमाणात बुरशी आलेली असताना, विशिष्ट वेळी त्यांची कापणी केली जाते. बॉट्रायटिस सिनेरिया नावाची बुरशी या द्राक्षांतील शर्करेवर क्रिया करते व त्यामुळे वाईनची लज्जत आणखीनच वाढते. वाईन साठवून ठेवतात त्या तळघरांमध्ये, ते मुरत असताना क्लॅडोस्पोरियम सेलेअर नावाची भुरशी त्याची चव आणखीन वाढवते. म्हणूनच, हंगेरियन वाईन उत्पादक म्हणतात की ‘चांगल्या वाईनचे गुपीत म्हणजे बुरशी.’

बुरशीमुळे होणारे अपाय

बुरशीच्या काही जातींमध्ये असणारे अपायकारक गुणधर्म फार जुन्या काळापासून मानवांना माहीत आहेत. सा.यु.पू. सहाव्या शतकात अश्‍शूरी लोकांनी आपल्या शत्रूंच्या विहिरींतले पाणी विषारी बनवण्याकरता क्लॅव्हिसेप्स परपुरिया नावाच्या बुरशीचा उपयोग केला होता. याला पुरातन काळातील जैविक युद्धप्रकार म्हणता येईल. ही बुरशी कधीकधी राय धान्यावरही उगवते व मध्य युगात याच बुरशीमुळे अनेक लोकांमध्ये पक्षाघात, वेदनादायक जळजळ, गँग्रीन, व भ्रांती यांसारखी लक्षणे दिसून आली. या रोगाला आता अर्गोटिसम म्हणतात, पण त्याकाळी या रोगाला सेंट ॲन्थनीज फायर म्हणत कारण अनेक रोग्यांची अशी धारणा होती की फ्रांसमधील सेंट ॲन्थनीच्या देवळात जाऊन प्रार्थना केल्यास हा रोग बरा होतो.

कर्करोगाला कारणीभूत ठरणारा सर्वात विषारी पदार्थ ॲफ्लाटॉक्सिन हा बुरशीतूनच तयार होतो. एका एशियन देशात दर वर्षी २०,००० मृत्यू ॲफ्लाटॉक्सिनमुळे होतात. या विषारी पदार्थाचा उपयोग आधुनिक काळातील जैविक शस्त्रसामग्रीत करण्यात आला आहे.

पण दररोजच्या जीवनात, बुरशीच्या सर्वसामान्य प्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे निर्माण होणारी लक्षणे आरोग्याला धोकेदायक नसली तरी त्रासदायक मात्र असू शकतात. युसी बर्कली वेलनेस लेटर यानुसार, “बुरशीचे बहुतेक प्रकार, तुम्हाला त्यांचा वास येत असला तरीसुद्धा ते अपायकारक नसतात.” सहसा ज्यांना फुफ्फुस्साचे विकार, उदाहरणार्थ दमा असतो त्यांना, तसेच ज्यांना अलर्जी आहे; जे रासायनिक पदार्थांना जास्त संवेदनशील आहेत किंवा ज्यांची रोग प्रतिकारक शक्‍ती कमकुवत आहे; तसेच शेतकरी, जे मोठ्या प्रमाणात बुरशीच्या संपर्कात येतात, त्यांना सहसा बुरशीमुळे त्रास होतो. अगदी लहान मुले व वृद्ध व्यक्‍तींमध्ये, बुरशीच्या संपर्कात आल्यावर त्रासदायक लक्षणे दिसून येण्याची जास्त शक्यता आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्व्हिस या संस्थेनुसार, बुरशीमुळे पुढील लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे: “घरघरणे, श्‍वास घेताना त्रास होणे व दम लागणे यांसारख्या श्‍वसन समस्या; नाक चोंदणे व सायनसचा त्रास; डोळ्यांचा त्रास (जळजळ, डोळ्यांतून पाणी येणे किंवा डोळे लाल होणे); कोरडा खोकला; नाकात किंवा घशात खाज; त्वचेवर पुरळ उठणे अथवा खाजणे.”

बुरशीचा इमारतींवर होणारा परिणाम

काही देशांत, इमारतींवर आलेली बुरशी काढून टाकण्याकरता व ती पुन्हा येऊ नये म्हणून प्रक्रिया करण्याकरता काही दिवस शाळा बंद असणे किंवा घर अथवा कार्यालयाची इमारत रिकामी करणे यांसारखे प्रकार सर्वसामान्य आहेत. २००२ सालच्या सुरुवातीला स्वीडनमधील स्टॉकहोम शहरातील नुकतेच सुरू झालेले म्युझियम ऑफ मॉडर्न आट्‌र्स हे संग्रहालय बुरशीमुळे बंद करावे लागले. या इमारतीवर बुरशीरोधक प्रकिया करण्यासाठी सुमारे २२.५ कोटी रुपये खर्च आला! अलीकडे ही समस्या का वाढली असावी?

याची दोन मुख्य कारणे असू शकतात: बांधकामाचे साहित्य व रचना. अलीकडील दशकांत बांधकामासाठी जे साहित्य वापरण्यात येत आहे त्यापैकी बरेचसे साहित्य ज्याला सहज बुरशी लागू शकेल अशाप्रकारचे आहे. उदाहरणार्थ ड्रायवॉल किंवा जिप्सम बोर्ड. ही कृत्रीम भिंत, एका जाडजूड प्लॅस्टरच्या बोर्डवर कागदाचे बरेच थर चिकटवून तयार केली जाते. मधल्या प्लॅस्टरच्या बोर्डमध्ये ओलावा शिरल्यास तो तसाच राहू शकतो. त्यामुळे अशाप्रकारचे बोर्ड जास्त काळापर्यंत ओले राहिल्यास बुरशीचे बिजाणू उत्पन्‍न होऊन त्यांची वाढ होऊ शकते आणि या कृत्रीम भिंतीतल्या कागदांच्या थरांत त्यांना आयते खाद्य मिळते.

इमारतींची संरचनाही अलीकडे बदलली आहे. १९७० च्या आधी अमेरिकेत व इतर अनेक देशांत, बहुतेक इमारती हवा खेळती राहील अशा रितीने बांधलेल्या होत्या. पण अलीकडे इमारतींमध्ये निरोधन वापरून त्या जवळजवळ हवाबंद केल्या जाऊ लागल्या आहेत. यामागचा उद्देश, ऊर्जेचा अपव्यय टाळणे हा आहे. त्यासाठी, थंड हवामानांच्या ठिकाणी उष्णता बाहेर पडू नये, आणि उष्ण हवामानाच्या ठिकाणी बाहेरची उष्णता आत येऊ नये अशारितीने इमारतींची रचना केली जाते. त्यामुळे ओलावा एकदाचा आत शिरला की तो सहजासहजी जात नाही आणि साहजिकच बुरशीची वाढ होते. या समस्येवर काही उपाय आहे का?

बुरशीची समस्या सोडवण्याचा किंवा निदान तो कमी करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे इमारतीच्या आतली जागा शक्य तितकी स्वच्छ व कोरडी ठेवणे आणि हवेतला ओलावा कमीतकमी ठेवणे. जर कोठे पाणी जमू लागले तर ती जागा लगेच कोरडी करून, पुन्हा पाणी जमू नये म्हणून लवकरात लवकर दुरुस्तीकाम करणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, छत व पाणी वाहून नेण्याचे पाईप स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावेत. तसेच इमारतीपासून जमीन उतरती असावी याची काळजी घ्या म्हणजे इमारतीच्या पायाजवळ पाणी जमणार नाही. जर वातानुकूलनाची सोय असेल तर ड्रिप पॅन्स स्वच्छ ठेवा व ड्रेन लाईन्स मोकळ्या आहेत याची खात्री करा.

एका तज्ज्ञानुसार, “बुरशीवर नियंत्रण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओलाव्यावर नियंत्रण करणे.” साधी काळजी घेतल्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला बुरशीचे अपाय सोसावे लागणार नाहीत. एका अर्थाने बुरशी आगीसारखी आहे. अपकारकही आणि उपकारकही. आपण तिचा कसा उपयोग करतो यावर बरेच काही अवलंबून आहे. अर्थात, बुरशी या विषयावर अजूनही बरेच संशोधन बाकी आहे. पण देवाच्या अद्‌भुत निर्मिती कृत्यांबद्दलचे ज्ञान नेहमी आपल्या फायद्याचेच ठरते. (g१/०६)

[१२, १३ पानांवरील चौकट/चित्र]

बायबलमध्ये बुरशीचा उल्लेख?

बायबलमध्ये एखाद्या इमारतीला किंवा ‘घराला महारोगाचा चट्टा’ पडण्याविषयी उल्लेख केला आहे. (लेवीय १४:३४-४८) याला “चरत जाणारे कुष्ठ” देखील म्हणण्यात आले आहे; ही कदाचित एकप्रकारची बुरशीच असावी असे म्हटले जाते, पण याविषयी अद्याप दुमत आहे. काहीही असो, पण देवाच्या नियमशास्त्रात घरमालकांना सांगण्यात आले होते, की त्यांनी रोग लागलेले दगड काढून टाकावेत, घरातल्या आतल्या भिंती सगळीकडून खरवडून काढाव्यात आणि हे दगड व खरवडून काढलेला चुना शहराबाहेर “एखाद्या अशुद्ध स्थळी” जाऊन फेकून द्यावा. जर चट्टा पुन्हा आला तर सबंध घरच अशुद्ध समजावे व ते पूर्णपणे पाडून त्याच्या बांधकामाचे सगळे साहित्य फेकून द्यावे असे त्यांना सांगण्यात आले होते. यहोवाने दिलेल्या या सविस्तर सूचनांवरून दिसून येते की त्याला आपल्या लोकांबद्दल किती प्रेम होते आणि त्यांच्या आरोग्याची किती काळजी होती!

[११ पानांवरील चित्र]

बुरशीपासून तयार करण्यात आलेली औषधे अनेकांकरता जीवनदायक ठरली आहेत

[१३ पानांवरील चित्र]

कृत्रीम भिंती व विनाईलमध्ये ओलावा तसाच राहतो आणि त्यामुळे बुरशी येते