व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘मरण्याआधी मी देवाची सेवा करू इच्छिते’

‘मरण्याआधी मी देवाची सेवा करू इच्छिते’

‘मरण्याआधी मी देवाची सेवा करू इच्छिते’

मामी फ्रीची कहाणी

लायबेरीयात १९९० साली नागरी युद्धास तोंड फुटले. युद्ध बळावत चालले होते तेव्हा मामी नावाची एक १२ वर्षीय क्रान मुलगी आणि तिचे कुटुंब, राजधानी मोनरोव्हिया येथील आपल्या घरात अडकून पडले होते. मामी म्हणते: “आमच्या शेजारच्या घरात आम्ही एक स्फोट ऐकला. एक क्षेपणास्त्र दारावर आदळले होते व घराला आग लागली होती. आगीच्या ज्वाला आमच्या घराकडे येऊन आमच्याही घराला आग लागली.” त्यामुळे बाहेर इतके जोरदार युद्ध चालले होते तरी मामी, तिची आई आणि तिचा धाकटा मामा बाहेर पळाले.

“अचानक, मला काही तरी लागलं,” मामी सांगते.

“काय झालं?” माझ्या आईने मला विचारले.

“मला काहीतरी लागलं! मला वाटतं, बंदुकीची गोळी असेल,” मी म्हणाले.

मामी वेदनेने कळवळून खाली पडली आणि तिने प्रार्थना केली: “देवा, कृपाकरून माझी विनंती ऐक. मला वाटतं, मी आता जगणार नाही. पण मरण्याआधी मी तुझी सेवा करू इच्छिते.” असे बोलून ती बेशुद्ध पडली.

मामी मेली असे समजून शेजाऱ्‍यांचा तिला जवळच्या एका समुद्रकिनाऱ्‍यावर पुरण्याचा विचार होता. तिच्या आईने मात्र, तिला स्थानिय दवाखान्यात न्या, असा तगादा लावला. पण हा दवाखाना आधीच जखमी स्त्रीपुरुषांनी व मुलांनी खचाखच भरला होता. मामीचा धाकटा मामा जो जखमी झाला होता तो त्या रात्री मरण पावला; पण मामी वाचली. तिच्या शरीराचा कमरेखालचा संपूर्ण भाग लुळा पडला.

तिच्या शरीराच्या आत रक्‍तस्राव होतच राहिला आणि तिला खूप वेदना होत होत्या. चार महिन्यांनंतर सरतेशेवटी डॉक्टरांनी गोळी शोधून काढण्यासाठी एक्सरे घेतले. ती गोळी तिचे हृदय आणि तिची फुफ्फुसे यांच्यामध्ये होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करणे जिक्रीचे होते त्यामुळे मामीच्या आईने तिला जडीबुटी देणाऱ्‍याकडे नेले. मामी आठवून सांगते: “या मनुष्याने मला एका रेझर ब्लेडनं कापलं. आणि त्याच्या तोंडानं गोळी बाहेर शोषून घ्यायचा प्रयत्न केला. ‘ही घ्या गोळी’ असं म्हणून त्याने आपल्या तोंडून गोळी काढली. आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.”

पण त्या मनुष्याने आम्हाला फसवलं होतं. आणखी एक्सरे घेतल्यावर समजले, की गोळी तर अजूनही तिथेच होती. त्यामुळे मामी आणि तिची आई पुन्हा त्या जडीबुटीवाल्याकडे गेल्या. पण त्याने त्यांची अशी समजूत घातली, की त्याने तर गोळी काढली होती पण नऊ महिन्यांनंतरच त्यांना एक्सरेत ते दिसून येईल. त्या दोघी पुन्हा आपल्या घरी आल्या आणि नऊ महिन्यांपर्यंत थांबून राहिल्या. त्याच दरम्यान मामी वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे घेत राहिली. नऊ महिन्यांनंतर आणखी एक्सरे घेण्यात आले. गोळी तर अजूनही तिथेच होती. जडीबुटीवाल्याकडे गेल्यावर समजले की तो तेथून पळून गेला होता.

बंदुकीची गोळी मामीच्या शरीरात अठरा महिन्यांपासून होती. तिच्या एका नातेवाईकाने तिला एका चेटकिणीकडे नेले. या चेटकिणीने तिला मदत करायच्या ऐवजी तिला म्हटले, की एकतर मामी किंवा तिची आई अमूक तारखेला मरण पावेल. मामी आता १३ वर्षांची होती. मामी म्हणते: “मी तर नुसती रडत होते. पण चेटकिणीनं सांगितलेला दिवस आला तेव्हा आमच्यापैकी कोणीही मेलं नाही.”

यानंतर, मामीच्या एका मामाने तिला एका चर्च पाळकाकडे नेले. मामीचा अर्धांवायू तिला गोळी लागल्यामुळे नव्हे तर कोणीतरी तिच्यावर जादू केल्यामुळे झाला होता, असे स्वप्नात पाहिल्याचे या पाळकाने म्हटले. मामीने जर त्याने सांगितलेले रीतीरीवाज पाळले तर ती एक आठवड्यात पुन्हा चालू लागेल, असे तो खात्रीने म्हणाला. “मी कितींदा तरी समुद्राच्या पाण्यानं पवित्र आंघोळी केल्या, उपास-तपास केले, रोज मध्यरात्री कित्येक तासतरी जमिनीवर लोळत होते. माझे हे सर्व प्रयत्न पाण्यात गेले. माझी परिस्थिती जशी का तशीच राहिली.”

हळूहळू, पुष्कळ दवाखाने पुन्हा सुरू झाले व मामीला आपल्या शरीरातून बंदुकीची गोळी काढता आली. तिने दोनपेक्षा अधिक वर्षांसाठी असह्‍य वेदना सहन केल्या होत्या. ती म्हणते: “शस्त्रक्रियेनंतर दुखणं बऱ्‍यापैकी कमी झालं आणि मला श्‍वासही घ्यायला त्रास होत नव्हता. माझ्या कमरेखालचा भाग लुळा पडला होता तरीपण वॉकरच्या साहाय्यानं मी उभी राहू शकत होते.”

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर मामीची भेट

शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनंतर, मामीच्या आईला दोन यहोवाचे साक्षीदार भेटले. आपल्या मुलीला बायबल वाचायला किती आवडते हे माहीत असल्यामुळे, तिने साक्षीदारांना तिच्या घरी बोलावले. मामीने लगेच बायबल अभ्यास स्वीकारला. पण काही महिन्यांनंतर, तिला पुन्हा दवाखान्यात जावं लागल्यामुळे साक्षीदारांबरोबरचा तिचा संपर्क तुटला.

पण मामीची बायबलचे ज्ञान मिळवण्याबद्दलची भूक मात्र तशीच राहिली. त्यामुळे दुसऱ्‍या एका चर्चमधून एका पाळकानं तिला मदत करण्याची तयारी दाखवली तेव्हा तिने ती स्वीकारली. संडेस्कूलमधील एका विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारले: “येशू खरोखरच देवाच्या बरोबरीचा आहे का?”

“होय, ते दोघे समान आहेत. पण येशू अगदी पूर्णपणे देवासमान नाही,” असे शिक्षकाने म्हटले.

मामीने विचार केला: ‘समान आहे पण पूर्णपणे समान नाही म्हणजे काय? काहीतरी गडबड दिसतेय. शिक्षकांना नेमकं काय सांगायच असेल.’ आपण बायबल सत्य शिकत आहोत असे जराही समाधान तिला न मिळाल्यामुळे तिने त्या चर्चला जायचेच सोडून दिले.

एकोणीसशे शहाण्णव साली मोनरोव्हियात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. मामीच्या घरचे आणखी दोन सदस्य यांत मरण पावले आणि दुसऱ्‍यांदा तिच्या घराला आग लावण्यात आली. काही महिन्यांनंतर, दोन यहोवाचे साक्षीदार घरोघरचे कार्य करत असताना मामीला भेटले. मामीने त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा आपला अभ्यास सुरू केला. ती पहिल्यांदा सभेला उपस्थित राहिली तेव्हा तिला सर्वांना म्हणजे मंडळीतील वडिलांना देखील राज्य सभागृहाची स्वच्छता करताना पाहून खूप आश्‍चर्य वाटले. त्याच वर्षी नंतर ती “ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिली तेव्हा तर तिच्या आनंदाला सीमाच नव्हती. ती यहोवाच्या साक्षीदारांच्या अशा मोठ्या मेळाव्यासाठी पहिल्यांदाच आली होती.

ती म्हणते: “मी खूपच प्रभावीत झाले. साक्षीदारांना एकमेकांबद्दल किती प्रेम आहे. ते वेगवेगळ्या जातीचे असले तरी त्यांच्यात खरे प्रेम आहे. आणि सर्व काही कसं सुरळीत चाललं आहे.”

देवाची सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होते

एकोणीसशे अठ्याण्णव साली पुन्हा एकदा मोनरोव्हियात युद्ध सुरू झाल्यामुळे मामी आणि तिच्या आईला जवळच्या कोट डीव्हॉर येथे राहायला जावे लागले. तेथे सुमारे ६,००० इतर लायबेरियन लोकांबरोबर त्या पीस टाऊन निर्वासित छावणीत जाऊन राहू लागल्या. मामीने साक्षीदारांबरोबर आपला अभ्यास चालू ठेवला आणि भराभर प्रगती केली. तिला आता आपल्या विश्‍वासाविषयी इतरांना सांगण्याची घाई वाटू लागली. तिला क्षेत्र सेवेत भाग घेता यावे म्हणून तिचे आध्यात्मिक बंधूभगिनी तिला तिच्या व्हीलचेअरवरून नेऊ लागले. अशाप्रकारे, मामी इतर अनेक निर्वासितांना उत्तम साक्ष देऊ शकली.

ती जिथे राहते तेथून सहा किलोमीटरवर राज्य सभागृह आहे. तिच्या अंपगत्वामुळे तिला राज्य सभागृहात येणे सोपे नव्हते तरी देखील ती सर्व सभांना हजर राहायची. मे १४, २००० साली ती १९० किलोमीटरचा प्रवास करून एका खास संमेलनाला उपस्थित राहिली आणि तिथे देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. (मत्तय २८:१९, २०) बाप्तिस्म्यासाठी मामीला जेव्हा उचलून खाडीत नेले जात होते तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती पाण्यातून वर आली तेव्हा तिच्या चेहऱ्‍यावर स्मितहास्य होते.

आता ती घानातील एका निर्वासित छावणीत राहते. सामान्य पायनियर किंवा पूर्ण वेळेची सुवार्तिक बनण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या आईने देखील यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तीसुद्धा शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगू लागली आहे. दोघी मायलेकी त्या काळाची वाट पाहत आहेत ज्याच्याविषयी देवाच्या वचनात वचन दिले आहे, की “लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५-७. (३/०६)

[२० पानांवरील चित्र]

मामीच्या शरीरातून काढण्यात आलेली गोळी

[२१ पानांवरील चित्र]

बाप्तिस्म्यासाठी मामीला उचलून खाडीत नेत असताना

[२१ पानांवरील चित्र]

तिची आई एमा हिच्याबरोबर बायबलचा अभ्यास करताना