शाळेत मी सेक्सपासून दूर कसा राहू शकतो?
तरुण लोक विचारतात . . .
शाळेत मी सेक्सपासून दूर कसा राहू शकतो?
“दररोज मुलं सेक्सबद्दल बोलत असतात. मुलीसुद्धा पुढाकार घेतात आणि अगदी शाळेत मुलं-मुली सेक्ससंबंध ठेवतात.”—आयलीन, १६.
“माझ्या शाळेत, समलिंगी तर इतर मुलांच्या देखत अनैतिक चाळे करतात. आपण काही चूक करतोय असं त्यांना जरा देखील वाटत नाही.”—मायकल, १५. *
तुमच्या वर्गातील मुले नेहमी सेक्सविषयी बोलत असतात का? काहीजण तर बोलण्याच्याही पलीकडे जातात का? असे असेल तर, तुम्हालाही या किशोरवयीन मुलीप्रमाणे वाटेल जिला शाळेतलं वातावरण “फक्त प्रौढांकरता असलेल्या एखाद्या कामुक चित्रपटाच्या सेटवर काम करण्यासारखं आहे,” असे वाटते. शाळेत अनेक तरुणांना सेक्सविषयी चर्चा करण्याबद्दल किंवा सेक्स कृत्ये करण्याबद्दल सतत भडिमार केला जातो, ही वस्तुस्थिती आहे.
तुम्ही कदाचित तुमच्या वर्गमित्रांना, “हुकींग अप” याबद्दल बोलताना ऐकले असेल. हुकींग अप म्हणजे, कोणतीही भावनिक वचनबद्धता न करता सेक्ससंबंध ठेवणे. काही मुले फक्त तोंडओळख असलेल्या लोकांबरोबर सेक्ससंबंध ठेवतात. इतर बाबतीत ते, इंटरनेटवर ज्यांच्याशी भेट झाली अशा एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवतात. वर उल्लेखण्यात आलेल्या दोन्ही बाबतीत, संबंध ठेवताना प्रेम नावाची कोणतीही गोष्ट मध्ये आणायची नाही, हा त्यांचा उद्देश असतो. “अशाप्रकारच्या संबंधात, शारीरिक वासना तृप्त करण्यापलिकडे या दोन व्यक्तींचा दुसरा कोणताही हेतू नसतो,” असे १९ वर्षीय डॅन्येला म्हणते.
हुकींग अप हा आजकालच्या शाळांमधील गरमागरम विषय झाला आहे, यात काही आश्चर्य नाही. “शनिवार-रविवार येऊन गेला, की शाळेतील दालनात आता कोणाची जोडी जमली आहे याबद्दलची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये चाललेली असते. मित्रांमध्ये, त्या जोडीबद्दलच्या बारीकसारीक गोष्टींची चर्चा अगदी चवीनं केली जाते,” असे एका १७ वर्षीय मुलीने आपल्या शाळेच्या बातमीपत्रात लिहिले.
तुम्ही जर बायबल दर्जांनुसार जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक असाल तर, सतत सेक्सविषयीच बोलत राहणाऱ्या मुलामुलींच्या गोतावळ्यात तुम्हाला नक्कीच एकटे एकटे वाटत असेल. आणि जर तुम्ही अशा लोकांच्या बोलण्यात सामील झाला नाहीत तर तुम्ही थट्टेचा विषय बनता. हे काही अंशी तुम्ही अपेक्षिलेच पाहिजे; कारण बायबल म्हणते, की इतरांना जेव्हा तुम्ही अशाप्रकारे का वागत आहात हे कळत नाही तेव्हा ते “तुमची निंदा” करून आपली प्रतिक्रिया दाखवतात. (१ पेत्र ४:३, ४) पण, आपण थट्टेचा विषय बनावे असे कोणालाच वाटत नाही. मग, शाळेत जेव्हा सेक्सविषयी चर्चा होत असते किंवा तुमच्यावर सेक्ससंबंध ठेवण्याचा दबाव येतो तेव्हा या सर्वापासून तुम्ही दूर राहून अभिमानाने तुमचा पावित्रा कायम कसा ठेवू शकाल? सर्वात आधी आपण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, की लैंगिक संबंध ठेवण्याचा मोह इतका तीव्र का असतो?
स्वतःला जाणून घ्या
कौमार्यात शारीरिक व मानसिक असे दोन्ही प्रकारचे बदल तुमच्या शरीरात झपाट्याने होत असतात. या काळात तुम्ही तीव्र लैंगिक इच्छा अनुभवता. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, याची खात्री बाळगा. त्यामुळे शाळेत जेव्हा तुम्ही विरुद्धलिंगी व्यक्तिकडे खूप आकर्षित होता तेव्हा असा समज करून घेऊ नका, की तुमचे वळण चांगले नाही किंवा तुम्हाला नैतिकरीत्या शुद्ध राहता येत नाही. तुम्ही जर ठरवले तर तुम्ही जरूर नैतिकरीत्या शुद्ध राहू शकता!
कौमार्यात तुमच्या मनात चाललेली भावनिक घालमेल हिच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी एका गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे. अपरिपूर्ण असल्यामुळे, सर्व मानवांचा वाईट गोष्टी करण्याकडे कल असतो. प्रेषित पौलाने देखील असे कबूल केले: “माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” पौल म्हणतो, की त्याच्या अपरिपूर्णतांमुळे त्याला स्वतःला तो ‘किती कष्टी माणूस’ आहे असे वाटत होते. (रोमकर ७:२३, २४) पण तो या लढाईत जिंकला आणि तुम्ही देखील जिंकू शकता!
आपल्या वर्गमित्रांना समजून घ्या
आधी उल्लेख केल्याप्रमाणे तुमचे वर्गसोबती सतत सेक्सविषयी बोलत असतील किंवा सेक्ससंबंध ठेवून आपण कसे धाडस केले याबाबतची बढाई मारतील. तुम्ही अशा मुलांच्या अहितकारक प्रभावापासून दूर राहिले पाहिजे. (१ करिंथकर १५:३३) पण त्यांना आपले शत्रू समजण्याची गरज नाही. का नाही?
कारण तुमच्याप्रमाणे तुमच्या वर्गमित्रांना देखील इच्छा आहेत. त्यांचाही वाईट गोष्टी करण्याकडे कल जातो. पण ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत; ते कदाचित ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ असतील. किंवा ते ज्या घरातून येतात त्या घरातील सदस्य “ममताहीन” असतील. (२ तीमथ्य ३:१-४) तुमच्या काही वर्गमित्रांना प्रेमळ पालक देतात ती प्रेमळ शिस्त व नैतिक शिक्षण मिळालेले नसेल.—इफिसकर ६:४.
तुमच्याप्रमाणे त्यांच्याजवळ सर्वोच्च बुद्धीचा स्रोत अर्थात बायबल नसल्यामुळे, तुमच्या वर्गमित्रांना वासनांच्या आहारी जाण्यामुळे किती हानीकारक परिणाम होतात हे माहीत नसेल. (रोमकर १:२६, २७) त्यांच्या आईवडिलांनी जणू काय खूप रहदारी असलेल्या महामार्गावर त्यांच्या हातात एका कारच्या चाव्या देऊन, कार कशी चालवायची हे त्यांना न शिकवताच जाऊ दिले आहे. कारची सफर क्षणापुरती थरारक वाटेल, पण त्यांचा अपघात होणे अटळ आहे. तेव्हा, तुमचे वर्गमित्र तुमच्या देखत सेक्सविषयी चर्चा करू लागले किंवा त्यांच्या अनैतिक कार्यात ते तुम्हालाही सामील करू पाहत असतील तर तुम्ही काय करू शकता?
अनैतिक विषयांबद्दल घृणा व्यक्त करा
तुमचे वर्गमित्र अनैतिक संबंधांविषयी बोलू लागल्यास तुम्हाला त्यांच्या गोष्टी ऐकण्याचा किंवा त्यांच्या गप्पांत भाग घेण्याचा मोह होऊ शकतो—‘हा जरा वेगळाच आहे’ असा विचार त्यांनी करू नये असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण यामुळे ते काय समजतील, याचा विचार करा. त्यांच्या बोलण्यात तुम्ही रस घेता तेव्हा त्यांना तुम्ही खरोखर कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात किंवा बनू इच्छिता हे समजू शकेल का?
यास्तव, तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बोलत आहात आणि बोलता बोलता तुमचे विषय अनैतिक लैंगिकसंबंधांबद्दल सुरू होतात तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? तुम्ही तेथून उठून गेले पाहिजे का? निश्चितच! (इफिसकर ५:३, ४) बायबल म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) तुम्ही तेथून उठून जाता याचा अर्थ तुम्ही उद्धट नव्हे तर सुज्ञ आहात, असा होतो.
अनैतिक विषय बोलणाऱ्यांच्या मधून उठून जाणे बरोबर नाही, असे वाटण्याची गरज नाही. असे किती तरी इतर विषय असतात ज्यांच्यावर चर्चा चाललेली असते तेव्हा तुम्ही तेथून कसलीही लाज न बाळगता उठून जाता; खासकरून असे विषय ज्यात तुम्हाला कसलाही रस नसतो किंवा ज्या संभाषणांत तुम्ही भाग घेऊ इच्छित नाही. उदाहरणार्थ, समजा तुमच्या वर्गातील काही मुले सशस्त्र चोरी
करण्याचा कट रचत आहेत. अशावेळी तुम्ही त्यांच्यामध्ये बसून त्यांचा बेत किंवा कट ऐकाल का? तुम्ही जर असे केले तर तुम्ही देखील त्यांना मिळालेले आहात, असे समजले जाईल. त्यामुळे तुम्ही तेथून सुज्ञपणे निघून जाल. अनैतिक लैंगिकसंबंधांकडे जेव्हा चर्चा वळू लागते तेव्हा असेच करा. बहुतेकवेळा तुम्ही, फारच धार्मिक असल्याचा आव न आणता किंवा थट्टेचा विषय न बनता घोळक्यातून निघून जाऊ शकाल.हे कबूल आहे, की नेहमीच तुम्हाला निघणे सोपे असणार नाही. जसे की, वर्गात तुमच्या शेजारी ज्याला बसवले आहे तो विद्यार्थी तुम्हाला लैंगिक विषयांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करील. अशावेळी तुम्ही त्याला सरळ शब्दांत परंतु आदराने सांगू शकता, की त्याने तुमचे लक्ष विचलित करू नये. हा उपाय चालला नाही तर, तुम्ही ब्रेन्डाने जे केले ते करू शकता. “मी माझ्या वर्ग शिक्षकांना, माझी जागा बदलवण्यास सांगितलं,” असे ती म्हणाली.
विचारशीलता दाखवा
वर्गमित्रांमध्ये चाललेल्या घाणेरड्या गोष्टींमध्ये तुम्ही का सामील होत नाही, हे आज नाही तर उद्या तुमचे इतर वर्गमित्र तुम्हाला जरूर विचारतील. त्यांनी तुम्हाला तुमच्या नैतिक स्तरांविषयी विचारले तर विचारपूर्वक उत्तर द्या. तुमचा दृष्टिकोन समजून घेण्यापेक्षा तुमची टर उडवण्याच्या उद्देशाने काही जण तुम्हाला असे विचारतील. पण, तुम्हाला प्रश्न विचारणारा प्रामाणिकपणे तुमच्या नैतिक स्तरांविषयी जाणून घेऊ इच्छित असेल तर आपल्या विश्वासांविषयी अभिमानाने बोला. अनेक तरुणांनी, तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकाचा उपयोग करून आपल्या वर्गमित्रांना बायबल तत्त्वांनुसार जीवन जगल्याने कोणते फायदे मिळतात ते समजण्यास मदत केली आहे. *
कडक राहा
तुमच्या वर्गातला एखादा मुलगा अथवा मुलगी इतकी धीट आहे की ती किंवा तो तुमच्या अंगाला वाईट हेतूने हात लावत असेल किंवा तुम्हाला चुंबन द्यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? तुम्ही जर त्याला किंवा तिला अडवण्याचा प्रयत्न केला नाहीत तर तुम्ही जणू काय ही चूक करत राहण्याचे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. बायबलमध्ये एका तरुणाचे वर्णन करण्यात आले आहे ज्याने एका अनैतिक स्त्रीस, त्याला धरून त्याचे चुंबन घेऊ दिले. त्याने तिला कामुक गोष्टी बोलू दिल्या. याचा परिणाम काय झाला? “तो तत्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो.”—नीतिसूत्रे ७:१३-२३.
याच्या अगदी उलट योसेफाचे उदाहरण आहे. त्याने अशीच एक परिस्थिती वेगळ्याप्रकारे हाताळली. त्याच्या धन्याची पत्नी त्याला मोहात पाडायचा रात्रंदिवस प्रयत्न करत राहिली पण त्याने तिच्या प्रस्तावांना धुडकावून लावले. एकदा तर तिने जेव्हा त्याला धरले तेव्हा त्याने निर्णायक पाऊल उचलले आणि तो तेथून पळून गेला.—उत्पत्ति ३९:७-१२.
तुमच्या वर्गातला मुलगा अथवा मुलगी किंवा इतर कोणी ओळखीची व्यक्ती अयोग्य प्रकारे तुम्हाला स्पर्श करायचा प्रयत्न करत असेल तर योसेफाप्रमाणे तुम्हाला देखील कडक पावले उचलावी लागतील. आयलीन म्हणते: “एखाद्या मुलाने कधी मला हात लावायचा प्रयत्न केला तर मी त्याला ताकीद देते. जर त्याने ऐकले नाही तर मी त्याच्यावर अक्षरशः खेकसून त्याला दूर व्हायला सांगते.” आपल्या शाळेतील मुलांविषयी आयलीन म्हणते: “जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा आदर करायला लावत नाही तोपर्यंत ते तुमचा आदर करणार नाहीत.”
तुम्हीसुद्धा अनैतिक गोष्टी ऐकण्यास नकार दिल्यास, तुमच्या वर्गातील इतर विद्यार्थी तुमचा आदर करू लागतील. नैतिकतेविषयी तुमची काय भूमिका आहे हे तुम्ही समजावून सांगा आणि अगदी कडकपणे अनैतिक प्रस्तावांना नकार दर्शवा. याचा आणखी एक लाभ म्हणजे, तुम्हाला स्वतःविषयी समाधान वाटेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाचा अनुग्रह तुम्ही मिळवाल!—नीतिसूत्रे २७:११. (g ३/०६)
विचार करण्याजोग्या काही गोष्टी
▪अनैतिक गोष्टींची चर्चा होत असताना तेथून उठून जाताना तुम्ही काय म्हणू शकता?
▪तुमच्या वर्गातला एखादा मुलगा अथवा मुलगी अनैतिक प्रस्ताव करत असेल तर तुम्ही काय म्हणाल व कराल?
[तळटीपा]
^ परि. 4 काही नावे बदलण्यात आली आहेत.
^ परि. 22 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
[१७ पानांवरील चित्र]
मित्रांमधील गप्पा अनैतिक विषयांकडे वळतात तेव्हा तेथून उठून जा
[१८ पानांवरील चित्र]
अनैतिक प्रस्तावांना सडेतोडपणे नकार दर्शवा