व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे जग कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे?

हे जग कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे?

हे जग कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे?

पुढची १०, २० किंवा ३० वर्षे कशी असतील? दहशतवादाच्या या युगात भविष्याचा जरा भीत भीतच विचार करावा लागतो. दुसरीकडे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. जागतिकीकरणामुळे बरीच राष्ट्रे एकमेकांवर अवलंबू लागली आहेत. येणाऱ्‍या काळात, आंतरराष्ट्रीय पुढारी आपापले मतभेद विसरून उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतील का? काही जण म्हणतात, होय असेच घडेल. सन २०१५ पर्यंत जागतिक नेत्यांनी दारिद्र्‌य व उपासमारीचे उच्चाटन केलेले असेल, एड्‌सचा फैलाव रोखलेला असेल आणि ज्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी व आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत अशा लोकांची संख्या निम्म्यावर आणलेली असेल, असे ते म्हणतात.—“आशावाद विरुद्ध वास्तव” या शीर्षकाचा चौकोन पाहावा.

पण भविष्याबद्दल मनुष्याच्या मनोकल्पना सहसा भ्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ, कित्येक दशकांपूर्वी एक तज्ज्ञाने असे म्हटले होते की १९८४ सालापर्यंत शेतकरी, समुद्राखाली चालणारे ट्रॅक्टर्स वापरून समुद्राचा तळ नांगरतील; दुसऱ्‍या एकाने म्हटले होते, की १९९५ साल उगवेपर्यंत मोटारींमध्ये एक विशेष प्रकारची संगणकीय यंत्रणा बसवली जाईल जिच्यामुळे मोटार अपघात होणारच नाहीत; आणि आणखी एकाने असे भाकीत केले होते की सन २००० पर्यंत जवळजवळ ५०,००० लोक अवकाशात राहात व काम करत असतील. अर्थात, अशी भाकिते करणाऱ्‍यांना आता, आपण असे बोललो नसतो तर बरे झाले असते असे वाटते. एका पत्रकाराने लिहिले: “काळाचा प्रवाह, जगातल्या मोठमोठ्या बुद्धिवंतांना मूर्ख ठरवतो.”

आपले मार्गदर्शन करू शकेल असा “नकाशा”

लोक सतत भविष्याबद्दल काही न काही अंदाज बांधत असतात. पण कधीकधी भविष्याकडे त्यांचे पाहणे वास्तवावर नव्हे तर आदर्शवादावर आधारित असते. भविष्याविषयी विश्‍वसनीय माहिती आपल्याला कोठे सापडू शकते?

एक उदाहरण लक्षात घ्या. असे समजा की तुम्ही एका अनोळखी देशात बसने प्रवास करत आहात. हा परिसर तुमच्याकरता नवीन असल्यामुळे तुम्हाला काहीशी चिंता वाटू लागते. तुम्ही विचार करता, ‘आपण नेमकं कुठं आहोत?’ ‘ही बस योग्य दिशेने जात आहे ना? इच्छित स्थानापासून आपण अजून किती दूर आहोत?’ अचूक नकाशा पाहून व खिडकीबाहेर रस्त्यावरील चिन्ह पाहून तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरे मिळवू शकता.

भविष्याबद्दल ज्यांना चिंता वाटते असे बरेच जण काहीशा अशाच परिस्थितीत आहेत. ते विचार करतात, ‘आपण कोणत्या दिशेने जात आहोत? ही वाट खरोखरच आपल्याला जागतिक शांतीकडे नेत आहे का? आणि असल्यास, आपण ते ध्येय केव्हा गाठू?’ बायबल एखाद्या नकाशासारखे आहे व ते आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यास साहाय्य करू शकते. हा नकाशा लक्षपूर्वक वाचल्यास व “खिडकीबाहेर” म्हणजेच जगात जे काही घडत आहे त्याकडे लक्ष दिल्यास, आपण सध्या नेमके कोठे आहोत आणि कोणत्या दिशेने जात आहोत याविषयी आपण बरेच काही जाणून घेऊ शकतो. पण प्रथम, मनुष्याच्या सर्व समस्यांची सुरुवात कशी झाली हे आपण पाहिले पाहिजे.

प्रवासाची दुःखदायक सुरुवात

बायबल आपल्याला सांगते की देवाने पहिल्या पुरुषाला व स्त्रीला निर्माण केले होते, तेव्हा ते परिपूर्ण होते, व देवाने त्यांना एका रम्य बागेत ठेवले होते. आदाम व हव्वा यांना केवळ ७० किंवा ८० वर्षे नव्हे, तर सर्वकाळ जिवंत राहण्याकरता निर्माण करण्यात आले होते. देवाने त्यांना म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” आदाम, हव्वा व त्यांच्या वंशजांकरता देवाचा असा उद्देश होता की त्यांनी त्या रम्य बागेच्या सीमा वाढवाव्यात व पृथ्वीगोलाच्या सर्व भागांना त्या बागेसारखेच बनवावे.—उत्पत्ति १:२८; २:८, १५, २२.

आदाम व हव्वा यांनी देवाच्या विरोधात जाण्याचे ठरवले. त्यामुळे त्या रम्य बागेतले घर ते गमावून बसले. इतकेच नव्हे, तर तेव्हापासून ते हळूहळू शारीरिक व मानसिक दृष्ट्या दुबळे होऊ लागले. एकेक दिवस, आदाम व हव्वा यांना त्यांच्या मृत्यूच्या जवळ नेऊ लागला. का? कारण आपल्या निर्माणकर्त्याकडे पाठ फिरवून त्यांनी पाप केले होते आणि “पापाचे वेतन मरण आहे.”—रोमकर ६:२३.

आदाम व हव्वा शेवटी मरण पावले. पण त्याआधी त्यांनी अनेक मुलामुलींना जन्म दिला होता. ही मुले देवाचा तो मूळ उद्देश पूर्ण करण्यास समर्थ होती का? नाही, कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून उपजतच अपरिपूर्णता मिळाली होती. किंबहुना, एका पिढीपासून दुसऱ्‍या पिढीला असे करत, आदामाच्या सर्व वंशजांना पाप व मृत्यूचा वारसा मिळाला आहे. यांत आपणही आलो. बायबल म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ३:२३; ५:१२.

आपण सध्या नेमके कोठे आहोत?

आदाम व हव्वा यांच्या विद्रोहामुळे मानवजातीच्या एका दीर्घ व दुःखदायक प्रवासाला सुरुवात झाली व हा प्रवास आपल्या या काळातही सुरूच आहे. बायबलच्या एका लेखकाने म्हटल्याप्रमाणे, मानवजात, “व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली.” (रोमकर ८:२०) मानवाच्या संघर्षाचे यापेक्षा अचूक वर्णन काय असू शकेल! अर्थात, आदामाच्या वंशजांतून काही अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील धुरंधर, व तंत्रज्ञान क्षेत्रातील पंडित उत्पन्‍न झाले. पण त्यांपैकी कोणीही, मानवाकरता देवाच्या उद्देशानुसार जागतिक शांती व परिपूर्ण आरोग्य देऊ शकला नाही.

आदाम व हव्वा यांच्या विद्रोहाचा दुष्परिणाम आपल्यापैकी प्रत्येकाला भोगावा लागतो. उदाहरणार्थ अन्यायाची सल, गुन्हेगारीची भीती, जुनाट रोगाच्या वेदना किंवा प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे होणारे अकथनीय व असहनीय दुःख आपल्यापैकी कोणी अनुभवले नाही? थोडे दिवस सुखात जातात न जातात तोच काहीतरी दुर्घटना घडते. घडीभर सुख मिळाले तरी आपले अस्तित्व पुरातन काळातील कुलपिता ईयोब याने वर्णन केल्याप्रमाणेच आहे: “मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.”—ईयोब १४:१.

एकेकाळी परिपूर्ण असलेल्या मनुष्याची आज झालेली दयनीय अवस्था पाहिल्यावर एखादा विचार करेल, की भविष्याबद्दल काहीही आशा नाही. पण बायबल आपल्याला आश्‍वासन देते की देव ही परिस्थिती सर्वकाळ राहू देणार नाही. मानवाकरता त्याने केलेला मूळ उद्देश अवश्‍य सफल होईल. (यशया ५५:१०, ११) हे लवकरच घडेल याची आपण खात्री का बाळगू शकतो?

बायबलनुसार, आज आपण एका कठीण काळातून जात आहोत, ज्याला ‘शेवटला काळ’ म्हटले आहे. (२ तीमथ्य ३:१) पण याचा अर्थ पृथ्वी ग्रहाचा व त्यावरील सर्व सजीव सृष्टीचा अंत होईल असे या संज्ञेवरून सूचित होत नाही. तर सध्याच्या व्यवस्थेचा, म्हणजेच आपल्याला दुःखी करणाऱ्‍या परिस्थितीचा शेवट होईल असे यावरून सूचित होते. (मत्तय २४:३) या शेवटल्या काळात कशाप्रकारच्या घटना घडतील आणि लोकांची प्रवृत्ती कशी असेल याविषयी वर्णन केले आहे. त्यांपैकी पृष्ठ ८ वरील चौकोनात उल्लेख केलेल्या काही गोष्टींकडे लक्ष द्या, आणि मग “खिडकीबाहेर” अर्थात या जगात जे घडत आहे त्याकडे पाहा. बायबल, अर्थात आपला नकाशा आपल्याला अगदी स्पष्ट दाखवत आहे की आज आपण या व्यवस्थेच्या अंताच्या अगदी जवळ पोचलो आहोत. पण, त्यानंतर काय?

पुढची वाट

आदाम व हव्वा यांनी विद्रोह केल्यावर लगेच, देवाने ‘ज्याचा कधी भंग होणार नाही’ असे एक राज्य स्थापन करण्याचा आपला उद्देश प्रकट करण्यास सुरुवात केली. (दानीएल २:४४) जिला सहसा ‘प्रभुची प्रार्थना’ म्हटली जाते, त्या प्रार्थनेत या राज्याकरता प्रार्थना करण्यास अनेक जणांना शिकवण्यात आले आहे; व हेच राज्य मानवजातीवर अगणित आशीर्वादांचा वर्षाव करील.—मत्तय ६:९, १०.

देवाचे राज्य म्हणजे एखाद्या व्यक्‍तीच्या मनात असलेली अमूर्त कल्पना नव्हे. तर ते खरोखरचे एक सरकार आहे. हे सरकार पृथ्वीवर आमूलाग्र बदल घडवून आणेल. देव आपल्या राज्याकरवी मानवजातीकरता काय काय करण्याचे आश्‍वासन देतो पाहा. बायबल सांगते की सर्वप्रथम देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील. (प्रकटीकरण ११:१८) जे देवाच्या आज्ञांचे पालन करतात त्यांच्याकरता तो काय करील? त्याचे लिखित वचन सांगते की “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) कोणताही मानव या गोष्टी साध्य करू शकतो का? फक्‍त देवच त्याच्या मूळ उद्देशानुसार मानवजातीला परिपूर्ण स्थितीत आणू शकतो.

देवाच्या राज्याच्या आशीर्वादांचा लाभ तुम्ही कसा मिळवू शकाल? योहान १७:३ म्हणते: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे,” अर्थात ज्ञान घ्यावे. हे ज्ञान घेण्यास लोकांना मदत करण्याकरता यहोवाचे साक्षीदार एक जागतिक शैक्षणिक कार्यक्रम चालवत आहेत. त्यांचे हे सेवाकार्य जवळजवळ २३० राष्ट्रांमध्ये चालले आहे व त्यांचे साहित्य ४०० पेक्षा जास्त भाषांतून प्रकाशित केले जाते. तुम्हाला याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधावा किंवा पृष्ठ ५ वरील योग्य पत्त्यावर लिहावे. (१/०६)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“जे तुम्ही म्हणता, ‘आज किंवा उद्या आम्ही अमूक गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू व फायदेशीर उद्योग सुरू करू’ ते तुम्ही ऐका. तुम्ही असे म्हणता, पण उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही.”—याकोब ४:१३, १४, सुबोध भाषांतर

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबल अगदी पहिल्या पुरुष व स्त्रीपासूनचा इतिहास सांगते. म्हणजेच आपण कोठून आलो आहोत हे ते आपल्याला सांगते. तसेच आपण कोठे जात आहोत हेही ते आपल्याला सांगते. पण बायबल आपल्याला जे सांगते ते समजून घेण्याकरता आपण एखाद्या नकाशाप्रमाणे त्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“पाप” याचा अर्थ एखादे वाईट कृत्य किंवा वाईट गोष्टींची ओढ असणे. आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपल्यात ही पापी प्रवृत्ती असते आणि तिचा आपल्या कृत्यांवर प्रभाव पडतो. “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.”—उपदेशक ७:२०

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

काळा डाग असलेल्या एका कागदाच्या तुम्ही फोटोकॉपीज काढल्यात, तर साहजिकच तो डाग तुम्ही काढलेल्या सर्व कॉपीजवरही असेल. आपण सर्व आदामाचे वंशज—किंवा कॉपीज असल्यामुळे आपल्यावरही पापाचा डाग आहे. मूळ कागदावर म्हणजेच आदामावर आलेला हाच तो डाग आहे

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

▪बायबल म्हणते: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) जागतिक शांती आणण्याचे मनुष्याचे प्रयत्न आजपर्यंत अयशस्वी का ठरले आहेत हे यावरून समजते. मनुष्याला देवापासून स्वतंत्र होऊन ‘पावले टाकण्याकरता’ निर्माण करण्यात आले नव्हते

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

▪बायबलमध्ये स्तोत्रकर्ता देवाला म्हणतो: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (स्तोत्र ११९:१०५) बायबल दिव्यासारखे आहे कारण आपल्याला जीवनात लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा ते आपल्याला योग्य पाऊल उचलण्यास साहाय्य करते. आणि ते ‘मार्गावरील प्रकाशासारखेही’ आहे कारण ते आपल्यापुढे असलेल्या मार्गास प्रज्वलित करते जेणेकरून आपल्याला मानवांचे भविष्य कसे असेल हे समजते

[७ पानांवरील चौकट]

आशावाद विरुद्ध वास्तव

सप्टेंबर २००० मध्ये संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांनी एकमताने काही ध्येये निश्‍चित केली व सन २०१५ पर्यंत ही ध्येये वास्तवात उतरवली जातील असे घोषित केले. या ध्येयांपैकी काही खालीलप्रमाणे होती:

जे लोक दिवसाला एक डॉलरपेक्षा कमी मिळकतीत गुजराण करतात व ज्यांची उपासमार होत आहे अशाची संख्या निम्म्यावर आणणे.

सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण प्राप्त करून देणे.

शिक्षणक्षेत्राच्या सर्व स्तरांतून लिंगभेद नष्ट करणे.

पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर ६६% कमी करणे.

बाळंतिणीचा मृत्यूदर ७५% कमी करणे.

एचआयव्ही/एड्‌सचा फैलाव रोखणे व त्यात घट होण्याकरता पावले उचलणे तसेच मलेरियासारख्या इतर प्रमुख रोगांना आळा घालणे.

पिण्याचे स्वच्छ पाणी ज्यांना उपलब्ध नाही अशा लोकांचे प्रमाण ५०% कमी करणे.

ही ध्येये गाठता येण्याजोगी आहेत का? २००४ साली याबाबतीत पुनर्विचार केल्यावर जगभरातील आरोग्य अधिकाऱ्‍यांचा एक समूह या निष्कर्षास पोचला की फक्‍त आशावादी असण्यात अर्थ नाही. इच्छित ध्येयांसोबतच वास्तविक परिस्थितीची जाणीव असणेही महत्त्वाचे आहे. स्टेट ऑफ द वर्ल्ड २००५ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्यानुसार: “दारिद्र्‌य आजही अनेक क्षेत्रात प्रगतीला खीळ घालत आहे. एचआयव्ही/एड्‌स यासारख्या रोगांचे प्रमाण वाढतच आहे; सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत बरेच देश जणू कोणत्याही क्षणी स्फोट होईल अशा टाईम बॉम्बवर बसलेले आहेत. मागच्या ५ वर्षांत दूषित पाण्यामुळे होणाऱ्‍या, टाळता येण्याजोग्या रोगांमुळे जवळजवळ २ कोटी मुले दगावली; आणि पिण्याचे स्वच्छ पाणी व आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे कोट्यवधी लोक अजूनही दररोज हाल सोसत आहेत.”

[८, ९ पानांवरील चौकट/चित्रे]

‘शेवटल्या काळाची’ काही ओळखचिन्हे

अभूतपूर्व प्रमाणात युद्धे.मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:४.

दुष्काळ.मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:५, ६, ८.

रोगराई.लूक २१:११; प्रकटीकरण ६:८.

वाढती अराजकता.मत्तय २४:१२.

पृथ्वीची नासाडी.प्रकटीकरण ११:१८.

मोठे भूकंप.लूक २१:११.

कठीण दिवस.२ तीमथ्य ३:१.

पैशाची हाव.२ तीमथ्य ३:२.

आईबापांची अवज्ञा.२ तीमथ्य ३:२.

माणूसकीचा अभाव.२ तीमथ्य ३:३.

देवापेक्षा चैनीची जास्त आवड.२ तीमथ्य ३:४.

असंयम.२ तीमथ्य ३:३.

चांगुलपणाचा द्वेष.२ तीमथ्य ३:३.

येऊ घातलेल्या संकटाची जराही पर्वा नसणे.मत्तय २४:३९.

शेवटल्या काळाची चिन्हे मान्य करण्यास तयार नसणारे थट्टेखोर.२ पेत्र ३:३, ४.

देवाच्या राज्याचा जगभरात प्रचार.मत्तय २४:१४.

[चित्राचे श्रेय]

© G.M.B. Akash/Panos Pictures

© Paul Lowe/Panos Pictures

[९ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याबद्दल सुप्रसिद्ध आहेत