व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा आहे का?

उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा आहे का?

उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा आहे का?

“उत्क्रांतीचा सिद्धान्त तितकाच खरा आहे जितकी सूर्याची उष्णता,” असे प्राध्यापक रिचर्ड डॉकन्झ या नामवंत उत्क्रांतीवादी वैज्ञानिकाने प्रतिपादन केले. अर्थात, सूर्यात उष्णता आहे हे प्रयोगांवरून व थेट निरीक्षणावरूनही सिद्ध होते. पण उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा असल्याचे प्रयोगांवरून व थेट निरीक्षणांवरून सिद्ध होते का?

या प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी एक गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे. बऱ्‍याच वैज्ञानिकांना दिसून आले आहे की सजीव प्राण्यांचे व वनस्पतींचे वंशज काहीसे बदलू शकतात. चार्ल्स डार्विन याने या प्रक्रियेला “परिवर्तनांसहित अवतरण” म्हटले. हे बदल थेट निरीक्षणांवरून, प्रयोगांवरून सिद्ध झाले आहेत आणि पशू व वनस्पतींची पैदास करणाऱ्‍यांनी यांचा उपयोगही करून घेतला आहे. * हे बदल खरे आहेत असे आपण स्वीकारू शकतो. पण या लहान बदलांना काही वैज्ञानिक “सूक्ष्म उत्क्रांती” म्हणतात. असे म्हणण्याद्वारे वैज्ञानिक असा दावा करू पाहतात की हे बारीक सारीक बदल महाउत्क्रांती घडल्याचा पुरावा आहेत. पण ज्याला ते महाउत्क्रांती म्हणतात ती एक अतिशय वेगळी प्रक्रिया असून आजपर्यंत कोणीही ती घडल्याचे निरीक्षणाद्वारे अथवा प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले नाही.

पण डार्विन अशा निरीक्षण करता येण्याजोग्या परिवर्तनांच्या फार पलीकडे गेला. दी ओरिजिन ऑफ स्पीशीज या त्याच्या सुप्रसिद्ध पुस्तकात त्याने लिहिले: “सर्व प्राणी विशिष्ट निर्मिती नसून काही मोजक्या मुख्य जातींपासून उत्पन्‍न झालेले वंशज आहेत.” डार्विनने सुचवले की कोट्यवधी वर्षांच्या काळादरम्यान या मूळ ‘मोजक्या सजीवांची’ अर्थात अगदी साध्या रचनेच्या जिवांची, “अतिशय सूक्ष्म परिवर्तनांकरवी” हळूहळू उत्क्रांती होऊन पृथ्वीवर दिसणारे कोट्यवधी सजीव प्राणी व वनस्पती उत्पन्‍न झाल्या. उत्क्रांतीवादाचे समर्थन करणारे असे म्हणतात की हे लहान लहान बदल एकत्र मिळून कालांतराने मोठे बदल घडून येऊ लागले व त्यामुळे माशांपासून बेडके व कपींपासून मानव उत्पन्‍न होण्याइतपत परिवर्तन घडून आले. या गृहित धरलेल्या मोठ्या परिवर्तनांना महाउत्क्रांती म्हणतात. बऱ्‍याच लोकांना ही दुसरी कल्पना पटण्याजोगी वाटते. त्यांचे म्हणणे आहे की, ‘जर एकाच जातीत सूक्ष्म बदल घडू शकतात तर मग कोट्यवधी वर्षांच्या काळात मोठे बदल घडून उत्क्रांती का घडू शकत नाही?’ *

महाउत्क्रांतीचा सिद्धान्त तीन प्रमुख गृहितांवर आधारित आहे:

१. उत्परिवर्तनांमुळे नव्या जाती उत्पन्‍न करण्याकरता आवश्‍यक असलेला कच्चा माल उपलब्ध होतो. *

२. नैसर्गिक निवड या प्रक्रियेद्वारे नव्या जाती उत्पन्‍न होतात.

३. उत्खननातून सापडलेल्या जिवाश्‍मांच्या पाहणीतून वनस्पती व प्राण्यांमध्ये झालेले मोठे बदल दिसून येतात.

महाउत्क्रांतीकरता मिळालेला पुरावा खरोखरच इतका ठोस आहे का?

उत्परिवर्तनांतून नव्या जातींची उत्पत्ती शक्य आहे का?

वनस्पती अगर प्राण्यांविषयीची सविस्तर माहिती त्यांच्या जननिक सांकेतिक वर्णात नमूद असते. प्रत्येक पेशीच्या केंद्रकात ही माहिती बंदिस्त असते. * संशोधकांना दिसून आले आहे की जननिक सांकेतिक वर्णात उत्परिवर्तन किंवा अनपेक्षित बदल घडून आल्यास वनस्पती व प्राण्यांच्या वंशजात रूपांतर घडून येते. १९४६ साली, उत्परिवर्तन आनुवंशिकीच्या शास्त्राचे संस्थापक व नोबेल पारितोषिक विजेते हर्मन जे. मलर यांनी असे प्रतिपादन केले: “या क्वचित घडून येणाऱ्‍या, सूक्ष्म बदलांच्या संचयाकरवीच मनुष्याला वनस्पती व प्राण्यांच्या सुधारित जाती कृत्रिमरित्या उत्पन्‍न करणे शक्य झाले आहे. पण जास्त महत्त्वाचे म्हणजे, याचप्रकारे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे नैसर्गिक उत्क्रांती घडून आली आहे.”

मुळात, महाउत्क्रांतीचा सिद्धान्त याच दाव्यावर आधारित आहे की उत्परिवर्तनांकरवी केवळ नव्या जातीच नव्हे तर पूर्णपणे नव्या कुळाच्या वनस्पती व प्राणी उत्पन्‍न होतात. या धाडसी प्रतिपादनाची सत्यता तपासून पाहण्याचा काही मार्ग आहे का? आनुवंशिकी शास्त्राच्या क्षेत्रातील १०० वर्षांच्या संशोधनातून उजेडात आलेली माहिती काय दाखवते ते पाहूया.

१९३० च्या दशकाच्या शेवटास, शास्त्रज्ञांनी मोठ्या उत्साहीपणे ही कल्पना स्वीकारली की जर नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून अधून मधून होणाऱ्‍या उत्परिवर्तनांकरवी वनस्पतींच्या नव्या जाती उत्पन्‍न होऊ शकतात तर मग कृत्रिमरित्या, मानवाने जर विशिष्ट उत्परिवर्तने घडवून आणली तर मग ती आणखी फायदेकारक ठरू शकतील. या कल्पनेमुळे “जीववैज्ञानिक व आनुवंशिकीशास्त्राचे तज्ज्ञ तसेच वनस्पती व प्राण्यांची पैदास करणाऱ्‍यांना अत्यानंद झाला,” असे जर्मनीच्या मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूट फॉर प्लान्ट ब्रीडींग रीसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञ वोल्फ एकहार्ट लॉएनिग यांनी सावध राहाने! त्यांची मुलाखत घेतली तेव्हा सांगितले. त्यांना का म्हणून अत्यानंद झाला? वनस्पतींमध्ये आनुवंशिकी उत्परिवर्तनांचा जवळजवळ २८ वर्षे अभ्यास करणाऱ्‍या लॉएनिग यांनी म्हटले: “या संशोधकांना वाटले की वनस्पती व प्राण्यांची पैदास करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये क्रांतीकारी बदल करण्याची वेळ आली आहे. त्यांना वाटले की चांगल्या प्रकारची निवडक उत्परिवर्तने घडवून आणण्याद्वारे ते नव्या व अधिक चांगल्या प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांची उत्पत्ती करू शकतील.” *

संयुक्‍त संस्थाने, आशिया व युरोपातील वैज्ञानिकांनी कमी काळात उत्क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न दाखवणाऱ्‍या पद्धतींचा अवलंब करण्याकरता महागड्या योजना व संशोधन मोहिमा राबवल्या. पण ४० वर्षांच्या व्यापक संशोधनानंतर कोणते परिणाम निष्पन्‍न झाले आहेत? संशोधक पेटर फॉन सेंन्जबुश म्हणतात, “भरमसाट पैसा खर्च करूनही, प्रारणाकरवी अधिक उत्पादनशील जाती उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे.” लॉएनिग म्हणतात: “१९८० च्या दशकापर्यंत सबंध जगातील अपयशी प्रयोगांमुळे वैज्ञानिकांचा आशावाद व उत्साह मावळला होता. उत्परिवर्तनांकरवी पैदास करण्याची जी संशोधनाची वेगळी शाखा सुरू करण्यात आली होती ती पाश्‍चात्त्य देशांत बंद करण्यात आली. जवळजवळ सगळ्याच उत्परिवर्तित जाती “निकृष्ट दर्जाच्या” निघाल्या; म्हणजे एकतर त्या जिवंतच राहिल्या नाहीत किंवा मग मूळ नैसर्गिक जातींपेक्षा अशक्‍त निघाल्या.” *

सर्वसामान्यपणे उत्परिवर्तनावरील संशोधनाला आता सुमारे १०० वर्षे झाली आहेत, शिवाय उत्परिवर्तनाच्या साहाय्याने पैदास करण्याच्या प्रयोगांना ७० वर्षे झाली आहेत. तेव्हा या काळादरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर वैज्ञानिक आता उत्परिवर्तनाच्या साहाय्याने नव्या जाती उत्पन्‍न करण्यासंबंधी निष्कर्ष काढण्याच्या स्थितीत आहेत. पुराव्याचे परीक्षण केल्यानंतर लॉएनिग असा निर्वाळा देतात: “उत्परिवर्तनांकरवी [एखाद्या वनस्पतीच्या अथवा प्राण्याच्या] मूळ जातीपासून पूर्णपणे नवी अशी जाती उत्पन्‍न करणे शक्य नाही. हा निष्कर्ष २० व्या शतकात उत्परिवर्तनावर करण्यात आलेल्या सबंध संशोधनातून निष्पन्‍न झालेल्या परिणामांशी व अनुभवाशी तसेच संभाव्यतेच्या नियमांशीही सुसंगत आहे. अशारितीने, वारंवार दिसून येणाऱ्‍या फरकाच्या नियमावरून असे दिसून येते की दोन जातींमध्ये काही आनुवांशिकी सीमारेषा असतात ज्या एकतर काढून टाकता येत नाहीत व ज्यांचे आकस्मिक उत्परिवर्तनांनी उल्लंघनही करता येत नाही.”

वरील वास्तव काय सुचवतात याचा विचार करा. जर उच्च प्रशिक्षित वैज्ञानिक कृत्रिमरित्या निवडक उत्परिवर्तने घडवून आणण्याद्वारे वनस्पती व प्राण्यांच्या नव्या जाती उत्पन्‍न करू शकत नाहीत, तर मग एका बुद्धिहीन प्रक्रियेकरवी ही किमया घडणे खरंच शक्य आहे का? उत्परिवर्तनांकरवी मूळ जातीच्या वनस्पती किंवा प्राण्यापासून पूर्णपणे नवी जात उत्पन्‍न करणे शक्य नाही असे जर संशोधनावरून दिसून येते तर मग महाउत्क्रांती घडलीच कशी?

नैसर्गिक निवडीमुळे नव्या जातींची निर्मिती होते का?

डार्विनने ज्याला नैसर्गिक निवड म्हटले आहे त्या कल्पनेनुसार, जे सजीव पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त योग्य असतात तेच टिकून राहतात आणि जे तितके योग्य नसतात ते एक एक करून नाहीसे होतात. आधुनिक काळातील उत्क्रांतीवादी असे शिकवतात की सजीवांच्या जाती जसजशा पसरल्या व एकमेकांपासून दूर गेल्या तसतसे त्यांच्यापैकी जे सजीव जनुकात झालेल्या उत्परिवर्तनामुळे नव्या वातावरणात टिकून राहण्यास सर्वात योग्य होते, त्यांची नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून निवड झाली. परिणामस्वरूप, उत्क्रांतीचे समर्थन करणारे असे प्रतिपादन करतात की हे दूर गेलेले जातीसमूह पूर्णपणे नव्या जातींमध्ये रूपांतरीत झाले.

याआधी सांगितल्याप्रमाणे, संशोधनातून निष्पन्‍न झालेला पुरावा स्पष्टपणे दाखवतो, की उत्परिवर्तनातून पूर्णपणे नव्या प्रकारच्या वनस्पती अथवा प्राणी उत्पन्‍न होणे शक्य नाही. तर मग, फायदेशीर ठरणाऱ्‍या उत्परिवर्तित जातींचा नैसर्गिक निवडीत टिकाव लागून त्यांपासून नव्या जाती उत्पन्‍न होतात हा दावा सिद्ध करण्याकरता उत्क्रांतीवादी कोणता पुरावा सादर करतात? संयुक्‍त संस्थानांतील नॅशनल अकॅडमी ऑफ साइन्सेस (एनएएस) या संस्थेने १९९९ साली प्रकाशित केलेल्या एका माहितीपत्रकात असे म्हणण्यात आले होते: “नव्या जाती उत्पन्‍न होणे शक्य आहे हे दाखवणारा सर्वात शक्‍तिशाली पुरावा हा डार्विन याने गॅलॅपेगॉस द्विपसमुहांवर अभ्यास केलेल्या १३ जातींच्या फिंच पक्ष्यांचा आहे, ज्यांना आता डार्विनचे फिंच पक्षी म्हटले जाते.”

१९७० च्या दशकात पीटर व रोझमरी ग्रांट यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधकांच्या एका गटाने या फिंच पक्ष्यांवर अभ्यास सुरू केला. त्यांना असे आढळले की वर्षभराच्या दुष्काळानंतर ज्या फिंच पक्ष्यांच्या चोचींचा आकार किंचित मोठा होता ते टिकून राहिले आणि लहान चोचीचे फिंच पक्षी मरून गेले. या फिंच पक्ष्यांच्या १३ जातींच्या चोचींचा आकारच त्यांना ओळखण्याचा सर्वात मुख्य मार्ग असल्यामुळे हा शोध अतिशय लक्षवेधक ठरला. सदर माहितीपत्रकाने पुढे म्हटले, “पीटर व रोझमरी ग्रांट यांच्या अंदाजानुसार, जर दर १० वर्षांत या द्वीपांवर दुष्काळ येत असेल तर मग जवळजवळ २०० वर्षांच्या काळानंतरच एक नव्या जातीचा फिंच पक्षी उत्पन्‍न होऊ शकतो.”

पण एनएएस माहितीपत्रकाने काही महत्त्वाच्या पण गोंधळविणाऱ्‍या गोष्टींचा उल्लेख टाळला आहे. उदाहरणार्थ, दुष्काळानंतरच्या वर्षांत लहान चोचींच्या फिंच पक्ष्यांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आढळली. म्हणूनच नेचर या विज्ञान मासिकात पीटर ग्रांट व पदवीधर विद्यार्थी लायल गिब्स यांनी १९८७ साली लिहिले की त्यांना “उलट दिशेने [नैसर्गिक] निवड झाल्याचे आढळले.” १९९१ साली ग्रांटने लिहिले की प्रत्येकवेळी हवामानात बदल होतो तेव्हा “नैसर्गिक निवड झालेल्या पक्ष्यांची संख्या कधी कमी तर कधी जास्त असल्याचे दिसून येते.” या संशोधकांना असेही दिसून आले की या तथाकथित वेगवेगळ्या “जातींचे” फिंच पक्षी आपसांत प्रजनन करून मूळ जातीच्या पक्ष्यांपेक्षा जी टिकून राहण्यास योग्य होती अशी संतती उत्पन्‍न करत होते. यावरून पीटर व रोझमरी ग्रांट यांनी असा निष्कर्ष काढला की जर या जातींमधील आपसातले प्रजनन सुरू राहिले तर २०० वर्षांच्या आतच या दोन “जातींपासून” एकच जाती उत्पन्‍न होईल.

१९६६ साली उत्क्रांतीवादी जीववैज्ञानिक जॉर्ज क्रिस्टोफर विल्यम्स यांनी असे लिहिले: “नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त हा सुरुवातीला उत्क्रांतीचे स्पष्टीकरण देण्याकरता विकसित करण्यात आला याचा मला खेद वाटतो. खरे पाहता हा सिद्धान्त, प्राणी किंवा वनस्पती कशाप्रकारे आपल्या वातावरणाशी समरस होण्याकरता बदलत जातात याचे स्पष्टीकरण देण्याकरता जास्त उपयुक्‍त आहे.” उत्क्रांतीवादी विद्वान जेफ्री श्‍वॉट्‌र्झ यांनी १९९९ साली असे लिहिले की जर विल्यम्सचे निष्कर्ष खरे असतील तर नैसर्गिक निवड निरनिराळ्या जातींच्या वनस्पती व प्राण्यांना अस्तित्वाकरता आवश्‍यक बदल करण्यास मदत करत असावी पण ती “नवीन असे काहीही निर्माण करत नाही.”

तेव्हा वास्तविक पाहिल्यास, डार्विनचे फिंच पक्षी होते तसेच आहेत; त्यांपासून “काहीही नवीन” उत्पन्‍न होताना दिसत नाही. ते अजूनही फिंच पक्षीच आहेत. आणि ज्याअर्थी ते आपसांत प्रजनन करत आहेत त्याअर्थी उत्क्रांतीवादी एखाद्या प्राण्याच्या जातीची कशाप्रकारे व्याख्या करतात त्याबद्दलही शंका उपस्थित होते. शिवाय, प्रतिष्ठित वैज्ञानिक संशोधन संस्था देखील कधीकधी पूर्वग्रहांच्या आधारावर एकतर्फी वृत्ते प्रसिद्ध करतात हे ही यावरून दिसून येते.

जिवाश्‍मांच्या इतिहासावरून महाउत्क्रांती झाल्याचे सिद्ध होते का?

याआधी ज्याचा उल्लेख करण्यात आला होता ते एनएएस माहितीपत्रक वाचकांना असे भासवते जणू वैज्ञानिकांना सापडलेल्या जिवाश्‍मांवरून महाउत्क्रांतीचा सिद्धान्त अगदी पूर्णपणे सिद्ध करता येतो. यात असे म्हटले आहे: “मत्स्य व उभयचर, उभयचर व सरीसृप, सरीसृप व सस्तन, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या कपींची उत्क्रांती होताना मधल्या स्थितीतील प्राण्यांचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणात सापडले आहेत की एका जातीच्या प्राण्यांची दुसऱ्‍या जातीत उत्क्रांती नेमकी कधी झाली हे निश्‍चितपणे सांगणे कधीकधी अवघड जाते.”

हे निश्‍चयपूर्वक विधान वाचून आश्‍चर्य वाटते. का? २००४ साली नॅशनल जिओग्राफिक या मासिकाने म्हटले की उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचा पुरावा समजला जाणारा जिवाश्‍मांचा इतिहास, “एका अशा चित्रपटासारखा आहे ज्यातील प्रत्येक १,००० चित्रांपैकी ९९९ चित्रे, फिल्म कापत असताना गहाळ झाली.” मग ही हजार-पैकी-एक उरलेली चित्रे खरोखरच महाउत्क्रांतीची प्रक्रिया घडल्याचा पुरावा देतात का? उपलब्ध जिवाश्‍मांवरून वास्तवात काय दिसून येते? नाईल्स एल्ड्रेज स्वतः एक कट्टर उत्क्रांतीवादी असूनही ते कबूल करतात की बऱ्‍याच कालावधींपर्यंत “बहुतेक जातींत कोणत्याही प्रकारची उत्क्रांती दिसून येत नाही,” असे उपलब्ध जिवाश्‍मांचा इतिहास दाखवतो.

आजपर्यंत, सबंध जगातील वैज्ञानिकांनी जवळजवळ २० कोटी मोठी जिवाश्‍मे व अब्जावधी लहान जिवाश्‍मे गोळा केली आहेत. बरेच संशोधक हे कबूल करतात की या उपलब्ध जिवाश्‍मांच्या व्यापक व सविस्तर माहितीवरून हेच दिसून येते की प्राणीजगतातील सर्व मुख्य समूह अचानकच पडद्यावर आले आणि काळाच्या ओघात त्यांच्यात जवळजवळ कोणताच बदल झालेला दिसत नाही. काही जाती जशा अचानक पडद्यावर आल्या तशाच अचानक नाहिशाही झाल्या. जिवाश्‍मांच्या इतिहासावरून मिळणाऱ्‍या पुराव्याचे परीक्षण करताना जीववैज्ञानिक जॉनथन वेल्स लिहितात: “[प्राणी व वनस्पतींची] सृष्टी, संघ, व वर्ग या थरांवर विचार केल्यास, काही मोजक्या पूर्वजांपासून सर्व जिवांची उत्क्रांती झाली आहे हे सिद्ध करणारा वैज्ञानिक पुरावा आढळत नाही. जिवाश्‍मांतून मिळणाऱ्‍या माहितीच्या व गुंतागुंतीच्या रेणवीय यंत्रणांच्या आधारावर ठरवल्यास, उत्क्रांतीचा सिद्धान्त सिद्ध करणे तर दूर पण त्याला पुष्टी देखील मिळत नाही.”

उत्क्रांती—सिद्ध झालेली वस्तुस्थिती की केवळ एक कल्पना?

महाउत्क्रांती ही एक वस्तूस्थिती आहे असा बहुतेक नामवंत उत्क्रांतीवादी अट्टहास का करतात? एक प्रतिष्ठित उत्क्रांतीवादी वैज्ञानिक रिचर्ड लवॉन्टन यांनी रिचर्ड डॉकन्झ यांच्या तर्कवादाची टीका करून असे लिहिले की बरेच वैज्ञानिक सामान्य बुद्धीला न पटणारे वैज्ञानिक दावे स्वीकारायला तयार असण्याचे कारण असे की “आपण सर्वांनी आधीपासूनच जडवादी भूमिका स्वीकारलेली आहे.” * या विश्‍वाची निर्मिती करणारा एक बुद्धिमान सृष्टिकर्ता असू शकतो या शक्यतेवर विचार करायला बरेच वैज्ञानिक नकार देतात कारण लवॉन्टन यांनी लिहिल्याप्रमाणे, वैज्ञानिक या नात्याने “आपण देवाच्या कल्पनेला मुळीच थारा देऊ शकत नाही.”

या संदर्भात, रॉड्‌नी स्टार्क यांचे एक विधान सायंटिफिक अमेरिकन या नियतकालिकात उद्धृत करण्यात आले होते: “जवळजवळ २०० वर्षांपासून हा नियम आपल्या गळी उतरवण्यात आला आहे की जर तुम्ही स्वतःला वैज्ञानिक म्हणवत असाल तर धार्मिक कल्पनांचा तुमच्यावर पगडा असता कामा नये.” पुढे ते म्हणतात की संशोधन विद्यापीठांत “धार्मिक भूमिका घेणारे गप्प बसतात” आणि “धर्म न मानणारे त्यांना तुच्छ लेखतात.” स्टार्क यांच्या मते, “वरच्या दर्जाच्या [वैज्ञानिक वर्तुळांत] धर्म मुळीच न मानणाऱ्‍या व्यक्‍तीला पुरस्कृत केले जाते.”

महाउत्क्रांतीचा सिद्धान्त जर तुम्हाला मानायचा असेल तर तुम्हाला हे ही मानावे लागेल, की अज्ञेयवादी किंवा नास्तिकवादी वैज्ञानिक आपल्या संशोधनावर किंवा त्यातून जे निष्कर्ष ते काढतात त्यांवर आपल्या वैयक्‍तिक मतांचा प्रभाव पडू देणार नाहीत. अब्जावधी उत्परिवर्तनांचा जवळजवळ शंभर वर्षे अभ्यास केल्यानंतर, उत्परिवर्तनांतून प्राण्यांची किंवा वनस्पतींची एकही विशिष्ट जाती पूर्णपणे नवीन जातीत रूपांतरीत झाल्याचे आढळलेले नसूनही तुम्हाला हे मानावे लागेल की गुंतागुंतीच्या रचना व कार्ये असलेले सर्व सजीव उत्परिवर्तनांमुळे व नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेमुळेच अस्तित्वात आले आहेत. प्राण्यांचे व वनस्पतींचे बहुतेक प्रकार अचानकच अस्तित्वात आले व अगणित काळांपासून ते दुसऱ्‍या कोणत्या प्रकारच्या प्राण्यांत अथवा वनस्पतींत बदललेले नाहीत असे जिवाश्‍मांचा इतिहास स्पष्टपणे दाखवत असूनही तुम्हाला मानावे लागेल की सर्व जिवांची एकाच पूर्वजापासून हळूहळू उत्क्रांती झाली. तुमच्या मते, या गोष्टी मानणे वस्तूस्थितीला धरून आहे? की निव्वळ एका कल्पनेला? (९/०६)

[तळटीपा]

^ परि. 3 कुत्र्यांची पैदास करणारे, मूळ जातीच्या कुत्र्यापेक्षा आखूड पाय असलेले वंशज उत्पन्‍न करण्यासाठी दोन वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांची एकमेकात निपज करू शकतात. पण अशाप्रकारचे परिवर्तन सहसा विशिष्ट जनुकांच्या कार्यात अडथळा आणल्यामुळे घडते. उदाहरणार्थ, डॅक्संड या जातीच्या कुत्र्यांत उपास्थींचा सर्वसामान्य विकास न झाल्यामुळे ती बुटकी होतात.

^ परि. 4 या लेखात “जाती” हा शब्द बरेचदा वापरलेला आहे. जीवशास्त्रात हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने तो या लेखात वापरला आहे. पण बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात हा शब्द या अर्थाने वापरलेला नाही. बायबलमध्ये सांगितलेला “जाती” हा शब्द बहुसमावेशक असून जीवशास्त्रीय वर्गीकरण पद्धतीशी संबंधित नाही. सहसा वैज्ञानिक ज्याला उत्क्रांती म्हणतात ते बायबलमधील उत्पत्तिच्या पुस्तकात सांगितलेल्या एका ‘जातीच्याच’ प्राण्यांमध्ये होणारे बदल असतात.

^ परि. 6 “सजीव वस्तूंचे वर्गीकरण” हे शीर्षक असलेली चौकट पाहा.

^ परि. 11 संशोधनावरून दिसून येते की पेशींमध्ये असणारे पेशीद्रव्य, पटल व इतर भाग देखील प्राण्याच्या विशिष्ट गुणधर्मांवर प्रभाव टाकतात.

^ परि. 13 या लेखात लॉएनिग यांची जी मते प्रकाशित करण्यात आली आहेत ती त्यांची स्वतःची असून मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूट फॉर प्लान्ट ब्रीडींग रीसर्च या संस्थेची ही मते आहेत असे वाचकांनी कृपया समजू नये.

^ परि. 14 उत्परिवर्तनांच्या प्रयोगांत वारंवार असे आढळले, की नव्या प्रकारच्या उत्परिवर्तित जातींची संख्या घसरत गेली पण त्याच वेळेस एकाच प्रकारच्या असलेल्या उत्परिवर्तित जाती पुन्हा पुन्हा अवतरल्या. यावरून लॉएनिग यांनी “वारंवार दिसून येणाऱ्‍या फरकाचा नियम” शोधून काढला. शिवाय, उत्परिवर्तित जातींच्या वनस्पतींमधून १ टक्क्यापेक्षा कमी वनस्पतींना पुढील संशोधनाकरता निवडण्यात आले आणि या समुहातील १ टक्क्यापेक्षा कमी वनस्पती वापराकरता योग्य असल्याच्या आढळल्या. उत्परिवर्तनाकरवी प्राण्यांची पैदास करण्याचे प्रयत्न तर वनस्पतींच्या प्रयोगापेक्षाही जास्त अपयशी ठरले आणि हे प्रयोग पूर्णपणे सोडूनच देण्यात आले.

^ परि. 29 जडवादी असे मानतात की अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक अस्तित्व असून सर्व सजीवांसहित विश्‍वात जे काही आहे ते कोणत्याही अलौकिक शक्‍तीच्या हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात आले.

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“उत्परिवर्तनांकरवी [एखाद्या वनस्पतीच्या अथवा प्राण्याच्या] मूळ जातीपासून पूर्णपणे नवी अशी जाती उत्पन्‍न करणे शक्य नाही”

[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]

डार्विनच्या फिंच पक्ष्यांच्या अभ्यासातून जर काही निष्पन्‍न झाले असेल तर ते हे की बदलणाऱ्‍या हवामानानुसार प्राणी व पक्ष्यांच्या जाती स्वतःला जुळवून घेऊ शकतात

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

उपलब्ध जिवाश्‍मांवरून हेच दिसून येते की प्राणीजगतातील सर्व मुख्य समूह अचानकच पडद्यावर आले आणि काळाच्या ओघात त्यांच्यात जवळजवळ कोणताच बदल झालेला दिसत नाही

[१४ पानांवरील तक्‍ता]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सजीव वस्तूंचे वर्गीकरण

सजीवांचे विशिष्ट जातींपासून सृष्टींपर्यंत, मोठ्या होत जाणाऱ्‍या समूहांत वर्गीकरण केले जाते. * उदाहरणार्थ, मानवांचे व माश्‍यांचे वर्गीकरण कसे करता येईल ते पाहा.

मानव माशा

जाती सेपियन्स मेलॅनोगॅस्टर

वंश होमो (मानुष) ड्रॉसोफिला

कुल हॉमिनिड ड्रॉसोफायलिड्‌स

श्रेणी प्रायमेट (नरवानर गण) डिप्टेरा

वर्ग मॅमल (सस्तन) कीटक

संघ कॉरडेट (रज्जूमान संघ) ॲनथ्रोपॉड्‌स (मानवकुलीन)

सृष्टी प्राणी प्राणी

[तळटीप]

^ परि. 49 टीप: उत्पत्तिच्या १ ल्या अध्यायात म्हटले आहे की वनस्पती व प्राणी “आपापल्या जातीप्रमाणे” प्रजोत्पादन करतील. (उत्पत्ति १:१२, २१, २४, २५, पं.र.भा.) पण, “जाती” हा बायबलमध्ये वापरण्यात आलेला शब्द विज्ञानाच्या संदर्भात वापरलेला नसून वैज्ञानिक वर्गीकरणात ज्याला “जाती” म्हणून संबोधतात त्याच्याशी याचा घोटाळा करू नये.

[चित्राचे श्रेय]

उत्क्रांतीवाद—विज्ञानावर आधारित की कल्पनेवर? उत्क्रांतीवादासंबंधी आपल्या बहुतेक शिकवणुकी चुकीच्या का आहेत? (इंग्रजी) या जॉनथन वेल्स यांच्या पुस्तकावर आधारित तक्‍ता

[१५ पानांवरील चित्रे]

उत्परिवर्तित माशी (वरील चित्रात) विकृत असली तरीही ती माशीच राहते

[चित्राचे श्रेय]

© Dr. Jeremy Burgess/Photo Researchers, Inc.

[१५ पानांवरील चित्रे]

वनस्पतींच्या उत्परिवर्तन प्रयोगांत वारंवार असे आढळले की नव्या प्रकारच्या उत्परिवर्तित जातींची संख्या सातत्याने घसरत गेली पण त्याच वेळेस एकाच प्रकारच्या असलेल्या उत्परिवर्तित जाती पुन्हा पुन्हा अवतरल्या (चित्रातील उत्परिवर्तित वनस्पतीची फुले मूळ वनस्पतीपेक्षा मोठी आहेत)

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

From a Photograph by Mrs. J. M. Cameron/ U.S. National Archives photo

[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]

फिंच पक्ष्यांची डोकी: © Dr. Jeremy Burgess/ Photo Researchers, Inc.

[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]

डायनॉसॉर: © Pat Canova/Index Stock Imagery; जिवाश्‍मे: GOH CHAI HIN/AFP/Getty Images