व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

खोल समुद्र पृथ्वी ग्रहावरील सर्वात मोठे आणि सर्वात प्रतिकूल वस्तीस्थान आहे. . . . तरीपण, जिकडे पाहू तिकडे आपल्याला जीवसृष्टी दिसते आणि कधीकधी तर विलक्षण प्रमाणात दिसते.”—न्यू सायंटिस्ट, ब्रिटन.

अलीकडे एका चाचणीवजा प्रकरणात, यु.एस.ए., पेन्सिल्व्हानिया, हॅरिसबर्ग येथील एका संघ न्यायालयाने असा निर्णय दिला, की “सार्वजनिक शाळेतील विज्ञान वर्गात, उत्क्रांतीवादाऐवजी सृष्टीविषयी शिकवणे बेकायदेशीर आहे.”—न्यू यॉर्क टाईम्स, यु.एस.ए.

२००५ साली बातमीपत्राने घेतलेल्या एका मतमोजणीनुसार, “५१ टक्के अमेरिकन लोक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मानत नाहीत.”—न्यू यॉर्क टाईम्स, यु.एस.ए.

जून २००६ साली, हॅरियट नावाचे १५० किलो वजनाचे एक महागॅलापागोस कासव, ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथील प्राणी संग्रहालयात मरण पावले. १७५ वर्षांचे हे कासव “जगातील सर्वात जुना प्राणी” होते.—ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन.

मक्याच्या काही जाती, वेस्टर्न कॉर्न रूटवर्म या रोगापासून स्वतःचे कसे रक्षण करतात हे स्विस संशोधकांनी शोधून काढले आहे. या जातींच्या झाडांतून विशिष्ट प्रकारचे गंध जमिनीत सोडले जातात. या गंधाने आकर्षित होऊन सूक्ष्म सूत्रकृमी रूटवर्मची डिंभके नष्ट करतात.—डि वेल्ट, जर्मनी.

महा स्क्विडचे फोटो

जपानच्या दक्षिणेकडे बोनीन द्वीपांजवळ, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा एका जिवंत महा स्क्विडचे नैसर्गिक अवस्थेत फोटो घेतले. त्यांनी, लहान स्क्विड आणि कोळंब्यांचे मांस आकड्यांना लावून त्यांच्यावर कॅमेरे लावले. समुद्रात सुमारे ९०० मीटर खाली, हे मांस खाण्यासाठी आलेल्या महा स्क्विडची छायाचित्रे घेण्यात आली. त्याची लांबी सुमारे ८ मीटर इतकी होती.

“डायनॉसॉर गवत खाणारे प्राणी होते”

“डायनॉसॉर गवत खाणारे प्राणी होते, असा जेव्हा वैज्ञानिकांना शोध लागला तेव्हा ते चाट पडले,” असा एका असोसिएटेड प्रेसने अहवाल दिला. भारतात, जीवाश्‍मरूपात सापडलेल्या सॉरपॉड डायनॉसॉरच्या विष्ठेचे परीक्षण केले तेव्हा त्यांना हा शोध लागला. पण यात आश्‍चर्य करण्यासारखे काय होते? असोसिएटेड प्रेसचा अहवाल पुढे म्हणतो: “डायनॉसॉर नामशेष झाल्यानंतर गवत वाढू लागले,” असे आजपर्यंत मानले जात होते. सॉरपॉड डायनॉसॉरांना “खरबरीत असलेली गवताची पाते चावण्यासाठी खास प्रकारचे दात नव्हते,” असेही मानले जाते. ज्या गटाला हा शोध लागला त्या गटाची प्रमुख असलेली पुरावनस्पतीशास्त्रज्ञ कॅरोलाईन स्ट्रॉम्बर्ग म्हणते: “पुष्कळ लोकांनी, [सॉरपॉड] गवत खायचे अशी कल्पना देखील केली नसावी.”

मधमाशा कशा उडतात?

अभियंत्यांनी हे शाबीत केले आहे, की मधमाशांना उडता येत नाही, असे मजेत म्हटले जाते. “भारी” अंगाच्या मानाने इवलेशे पंख असलेल्या मशमाशा उडण्याइतपत आपले पंख फडफडू शकत नाहीत असे मानले जात होते. या कीटकांच्या उड्डाणामागचे रहस्य शोधून काढण्यासाठी अभियंत्यांनी, “उड्डाण करणाऱ्‍या मधमाशांचे एका सेकंदाला ६,००० छायाचित्रे काढली,” असे न्यू सायंटिस्टने म्हटले. मधमाशांचे उड्डाण करण्याचे तंत्र अतिशय “असामान्य” होते, असे म्हणण्यात आले. “पंख ९०-डिग्री वर्तुळाकार रेषेत मागे जाते आणि मग पुन्हा पुढे येते—एका सेकंदाला असे २३० वेळा होते. . . . ते विमानावरील पंख्यासारखे आहे ज्यात या पंख्याची पातेसुद्धा फिरत असतात,” असे संशोधन करणाऱ्‍या गटातील एकाने म्हटले. यांच्या शोधामुळे अभियांत्रिकांना प्रोपेल्लर्स मध्ये सुधारणा करता येईल आणि आणखी सुलभरीत्या हाताळता येतील अशी विमाने तयार करता येतील.

गाणारे उंदीर

“उंदीर गाऊ शकतात आणि . . . आपल्या जोडीदारासाठी ते गात असलेली गीते पक्ष्यांच्या गीतांइतकीच क्लिष्ट असतात,” असा न्यू सायंटिस्टने अहवाल दिला. उंदरांची गाणी अल्ट्रासोनीक फ्रिक्वेन्सीत असतात. म्हणजे, त्यांचे गाणे उच्च स्वरपट्टीतले असते जे मानवी कानांना ऐकू येत नाही. म्हणूनच कदाचित मानवांच्या हे आधी लक्षात आले नसावे. यु.एस.ए., मिसूरी, सेंट ल्यूईस येथील संशोधकांनी पाहिले, की नर उंदरांचे गीत म्हणजे, “कमी अधिक स्वरांचा आवाज जो एखाद्या ‘गाण्यासारखाच’ वाटतो.” यामुळे उंदीर देखील गाणाऱ्‍या प्राण्यांच्या विशिष्ट गटात मोडतात. गाणं गाणाऱ्‍या इतर सस्तन प्राण्यांमध्ये, व्हेलमासे, डॉलफिन्स, काही वटवाघळे आणि अर्थात मानव यांचा समावेश होतो. (९/०६)