तुम्ही काय विश्वास करता, हे महत्त्वाचे आहे का?
तुम्ही काय विश्वास करता, हे महत्त्वाचे आहे का?
तुम्हाला काय वाटते, आपल्या जीवनाला काही उद्देश आहे का? जर उत्क्रांतीवाद खरा आहे तर मग, सायंटिफिक अमेरिकन नावाच्या मासिकात आलेले हे वाक्य रास्त ठरेल: “उत्क्रांतीवादाची आपली आधुनिक समज असे सूचित करते, . . . की जीवनाचा अंतिम अर्थ अस्तित्वातच नाही.”
या शब्दांचा काय अर्थ होतो, त्यावर अंमळ विचार करा. जीवनाचा अंतिम अर्थ अस्तित्वातच नाही, म्हणजे जीवनात सत्कार्ये करण्यापलिकडे व कदाचित तुमचे गुण तुमच्या पुढच्या पिढीला देणे याव्यतिरिक्त जीवनात काहीच उद्देश नाही. मृत्यूनंतर तुम्ही कायमचे नाहीसे होता. जीवनाचा अर्थ काय यावर विचार करण्याची, तर्क करण्याची आणि मनन करण्याची क्षमता असलेला तुमचा मेंदू, निसर्गाचा केवळ एक अपघात समजावा लागेल.
इतकेच नव्हे. उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवणारे पुष्कळ लोक असा दावा करतात की देव अस्तित्वातच नाही किंवा मानवाशी त्याला काहीएक घेणे-देणे नाही. याचा अर्थ आपले भविष्य राजकीय, शैक्षणिक व धार्मिक पुढाऱ्यांच्याच हातात आहे. पण या पुढाऱ्यांच्या गत अहवालाकडे पाहून आपण हा निर्वाळा देऊ शकतो, की मानव समाजाचा नाश करणारा गोंधळ, संघर्ष आणि भ्रष्टाचार असाच पुढे चालत राहील. जर उत्क्रांतीवाद खरोखरच खरा असेल तर, “चला आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे,” या निराशावादी ब्रीदवाक्यानुसार जगण्यातच आपल्याला समाधान मानावे लागेल.—१ करिंथकर १५:३२.
एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे. ती ही, की यहोवाचे साक्षीदार वर उल्लेखलेल्या विधानांवर विश्वास ठेवत नाहीत. शिवाय, ज्या युक्तिवादाच्या आधारावर ही विधाने आहेत, त्यावर अर्थात उत्क्रांतीवादावर साक्षीदारांचा विश्वास नाही. त्याऐवजी ते बायबलला सत्य मानतात. (योहान १७:१७) त्यामुळे आपण इथे कसे आलो, यावर बायबल जे म्हणते ते यहोवाचे साक्षीदार मानतात. बायबल म्हणते: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ [देवाजवळ] आहे.” (स्तोत्र ३६:९) या शब्दांचा अत्यंत गहन व महत्त्वपूर्ण अर्थ आहे.
जीवनाला उद्देश आहे. जे लोक आपल्या निर्माणकर्त्याच्या इच्छेनुसार जगण्याची निवड करतात अशा सर्व लोकांना तो एक प्रेमळ उद्देश देऊ करतो. (उपदेशक १२:१३) तो उद्देश म्हणजे, गोंधळ, संघर्ष, भ्रष्टाचार आणि मृत्यू यांपासून मुक्त असलेल्या जगात जगण्याची प्रतिज्ञा. (यशया २:४; २५:६-८) इतर कोणत्याही गोष्टीने नव्हे तर देवाविषयी आणि त्याच्या इच्छेविषयी शिकल्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ लाभतो, याची पुष्टी संपूर्ण जगभरातील लाखो यहोवाचे साक्षीदार देतील.—योहान १७:३.
त्यामुळे तुम्ही काय विश्वास करता, हे महत्त्वाचे आहे कारण त्याचा तुमच्या सध्याच्या आनंदावर आणि भविष्यातील जीवनावरही प्रभाव पडू शकतो. निवड तुम्हाला करायची आहे. निसर्गातील कल्पक रचनेच्या वाढत जाणाऱ्या पुराव्यांचे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरलेल्या एका सिद्धान्तावर तुम्ही विश्वास ठेवाल की, पृथ्वी आणि तिजवरील जीवन हे एका अद्भुत रचनाकाराची अर्थात ज्याने “सर्व काही निर्माण केले” त्या यहोवा देवाची हस्तकृती आहे ही बायबलमधील शिकवण स्वीकाराल?—प्रकटीकरण ४:११. (g ९/०६)